इ.स. २०२० हे वर्ष आपणा सर्वांनाच एक विलक्षण व अभूतपूर्व अनुभव देऊन गेले. अनेक संकटाना, त्रासांना, समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागले. पण त्याबरोबरच सततच्या धावपळीतून थोडी उसंत देखील मिळाली; जी आवश्यक होती आणि जी सक्तीची नसती तर आपण घेतलीच नसती. या काळात, मागे वळून पाहताना अनेक गोष्टी ठळकपणे जाणवल्या. नव्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये गुंतलेलो नसल्यामुळे निवांत वेळही होता. ठरविले की आजवरची आपली लेखनाची वाटचाल पुन्हा एकदा निरखून पाहू. पुढल्या वर्षासाठी हा प्रोजेक्ट मनाला चांगला वाटला. नाहीतरी खूप दिवसांपासून ग्रंथ आणि आपण यांच्यातील ऋणानुबंध तपशीलवार शोधण्याचा विचार मनात येत होताच. ही वाटचाल निरखून पाहताना नव्या काही संगतीही लागत गेल्या. त्यापैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे माझ्यातला लेखक आणि माझ्यातला वाचक हे एकमेकांत असे काही मिसळून गेले आहेत की त्यांचा वेगळा विचार करणे जवळजवळ अशक्य आहे. अर्थात हा एकदम नवा शोध नव्हता, हे अधूनमधून जाणवत होतेच, पण इतक्या ठळकपणे ते समोर आले नव्हते. आज मागे वळून पाहताना दिसते की वाचनाचे वेड फार लहानपणीच लागले. पुस्तकांशी झालेल्या मैत्रीचा पहिला प्रसंग अगदी स्पष्ट आठवतो आहे. साल १९५६. नुकतीच चौथीची परीक्षा झाली होती. त्यावेळी आम्ही देगलूर या मराठवाड्यातील एका तालुक्याच्या गावी राहत होतो. वडील उप-शिक्षणाधिकारी होते. [इंग्रजीत या पोस्टला फार भारदस्त नाव होते-‘Assistant Deputy Educational Inspector’!] मराठवाडा अजून निजामाच्या ताब्यात असल्यामुळे व्यवहारात उर्दूचे प्राबल्य होते. वडिलांच्या पोस्टला उर्दूत ‘नाजर’ म्हणत. त्याकाळात ‘नाजर साब’ या हुद्दयाला बरेच महत्त्व होते. आसपासच्या शंभर एक शाळा त्यांच्या अधिकार कक्षेत येत. तर झाले असे की परीक्षा झाल्यावर काही दिवस खेळण्यात निघून गेले. एके दिवशी वडिलांनी पाचवीचे मराठीचे पुस्तक विकत आणले व माझ्या हातात ठेवून सांगितले, “वेळ आहे तर आता हे पुस्तक वाचून काढ.” आज्ञेनुसार मी वाचावयास सुरुवात केली व पाहता पाहता नव्या नव्या कविता, नव्या गोष्टी यांनी मन मोहून तर गेलेच पण वाचतो आहे ते परीक्षेसाठी, अभ्यासासाठी नव्हे हे अप्रत्यक्षपणे मनात असल्यामुळे वाचनात वेगळाच आनंद वाटू लागला. त्याचवेळी, मला वाटते, मी पुस्तकांच्या प्रेमात पडलो. अभ्यासाचे टेन्शन नसल्यामुळे दोन तीन दिवसात पुस्तक संपविले व आईजवळ नव्या पुस्तकाची मागणी केली. एक तर वडिलांचा खूप धाक त्यामुळे डायरेक्ट त्यांना एखादी गोष्ट मागणे अशक्य असे. दुसरे म्हणजे माझ्या आईलाही वाचनाची खूप आवड होती. कुठे काही मिळाले तर ती हटकून वाचत असे. माझे बोलणे वडिलांनी ऐकले व ते मला म्हणाले, “उद्या राजेंद्र सरांकडे जा आणि त्यांना मी पाठविले आहे असे सांग. वाचनासाठी पुस्तके द्या म्हणावे.” राजेंद्र आमच्या शाळेचे हेडमास्तर होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो. वडील ‘नाजर’ असल्यामुळे त्यांचा शब्द म्हणजे आज्ञाच होती. हेडमास्तर म्हणाले, “सध्या सुट्ट्या आहेत, पण मी काही कामासाठी एखादा तास शाळेत जाऊ बसतो. तेव्हा तू उद्या ये. मी तुला पुस्तक देईन.” नंतरच्या दिवशी शाळेत गेल्यावर त्यांनी शिपायाला बोलावले व मला पुस्तकांचे कपाट दाखविण्यास सांगितले. १९५१ ते ५५ पर्यंतचे ‘चांदोबा’चे सारे अंक तेथे ओळीने लावून ठेवले होते. मग त्यांना काय वाटले कुणास ठाऊक त्यांनी स्वत: उठून ‘चांदोबा’ आणि ‘चित्रमयजगत’ या मासिकांचे काही अंक दिले. मी ते अंक घेऊन घरी आलो. ‘चांदोबा’ मधील रंगीत चित्रे, त्याचा उत्तम कागद, मांडणी यांनी माझे मन मोहून गेले. वाचायला सुरुवात केल्यावर त्या अद्भुत आणि रंजक, नाविन्यपूर्ण कथांनी मनाचा ताबा घेतला. आजवर मी अनेक खंद्या वाचकांशी संवाद केला आहे, कितीतरी जण माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्याशी बोलताना मला जाणवले आहे की त्यापैकी बहुतेकांनी आपल्या जीवनातील वाचनपर्वाची सुरुवात ‘चांदोबा’ने केली आहे. [आणि प्रौढासाठीच्या वाचनाची सुरुवात ‘अर्नाळकरां’पासून. पण त्याबद्दल नंतर.] ‘चांदोबा’ मध्ये केवळ मनोरंजक अद्भुत कहाण्याच नव्हत्या, तर त्यांत मुलांवर उत्तम संस्कार करणारे साहित्यही जाणीव पूर्वक छापले जाई. प्रामाणिकपणाने वागावे, इतरांना मदत करावी, मोठ्यांचा आदर करावा...वगैरे जी मूल्ये नागरिक शास्त्रात पुढे शिकविल्या गेली त्यांचे गोष्टीरूप ‘चांदोबा’तून आधीच आमच्यासमोर आले होते. दुसरे म्हणजे कथेचे शब्दरूप प्रथमच माझ्यासमोर ठसठशीत दृश्यरूप बनून आले. या कथांतील ती नाना प्रकारची माणसे, राजे, राण्या, राक्षस आणि जादूच्या राज्यातील प्राणी मोठ्या आकर्षक स्वरूपात पाहणे यात एक अद्भुत आनंद होता. ‘चांदोबा’त विक्रम-वेताळच्या गोष्टी अनेक वर्षे येत. या गोष्टीच्या सुरुवातीचा लांबलचक लाल अंगरखा घातलेला व हातात तलवार धरलेला, टोकदार मिशांचा तो विक्रम राजा आणि त्याच्या खांद्यावरील, नखे वाढलेला पांढरा वेताळ हे चित्र अजून नजरेसमोर स्पष्ट उभे आहे. अगदी विक्रमामागील झाडाला लटकलेल्या मानवी कवट्यासह. दीर्घकथा हे ‘चांदोबा’चे आणखी एक वैशिष्ट्य होते. दरमहा एक भाग याप्रमाणे या कथा वर्षानुवर्षे चालत. प्रत्येक भागाच्या शेवटी लिहिलेले असे-‘पुढील गोष्ट पुढील अंकी’. त्या कथानकातील पुढील भागाची एवढी उत्कंठा लागलेली असे की पुढील अंक केव्हा हाती येतो याची मी चातकाप्रमाणे वाट पाहत राही. या कथांपैकी एकीत ‘एकाक्ष’ आणि ‘चतुराक्ष’ अशी दोन राक्षसांची नावे होती. ती मला फार आवडत. सुमारे साठ वर्षांनंतर मी जेव्हा मुलांसाठी कादंबरी त्रयी लिहावयास घेतली तेव्हा तिच्यातील राक्षसांची नावेही, ‘चांदोबा’च्या स्मरणार्थ, एकाक्ष, चतुराक्ष व कटाक्ष अशी ठेवली.
लहान वयात मुलांच्या हाती काल्पनिक गोष्टी देऊ नयेत असा एक मतप्रवाह आहे. पण हे चुकीचे आहे. या वयात अद्भुताची गोडी मुलांना लागायलाच हवी. [पुढे त्यांचे रंग उडणार असतातच.] पण हे त्यांचे वय स्वप्ने पाहण्याचे असते, त्यांत त्यांना स्वप्ने पाहू द्या. विभूतिभूषण बंदोपाध्याय यांनी लिहिले आहे- ‘स्वप्ने आणि कल्पनाविलास यांनी आयुष्याला गोडवा येतो. ही स्वप्ने कदाचित पूर्ण होणार नाहीत, तरी ती जीवनाचे सर्वात मोठे वैभव असतात. आपल्या आयुष्यात या स्वप्नांनी सदैव राहावे कारण त्यांच्या तुलनेत सत्य हे नेहमी क्षुल्लकच असणार, त्याचा लाभ कमीच असणार.’ मुलांच्या हातात राजा राणीच्या कथा द्या, पऱ्यांच्या कथा द्या, जादूच्या जगाच्या कथा द्या. कल्पनेच्या वारूवर त्यांना बसू द्या आणि चौखूर उधळू द्या. ‘चांदोबा’ सोबत मी ‘सिंदबादच्या सफरी’च्या कहाण्या वाचल्या, पंचतंत्रातील गोष्टी वाचल्या, इसापाच्या कथा वाचल्या...पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या हाती ‘अॅलिस इन वंडरलॅंड’ हे लेविस कॅरोलचे अजरामर पुस्तक लागले आणि नंतर मनाचा एक कोपरा कायम बालकाचा बनून राहिला. या पुस्तकाची जन्मकथादेखील पुस्तकाएवढीच सुरेख आहे. लेविस कॅरोल हे चार्लस लुटविग डॉगसन या लेखकाचे टोपणनाव. तो मूळचा एक गणितज्ञ होता. एके दिवशी, नेमके सांगायचे म्हणजे ४ जुलाई १८६२ रोजी हा तीस वर्षांचा तरुण गणिताचा प्राध्यापक त्याच्या डीनच्या तीन लहान मुलींना घेऊन नदीवर सहलीसाठी गेला होता. सुटीचा निवांत वेळ, मोकळी हवा, वातावरणात पसरलेला सौम्य सोनेरी सूर्यप्रकाश.. त्या मुलींनी त्याला एखादी गोष्ट सांगण्याचा आग्रह केला. त्यांचा हट्ट पुरविण्यासाठी त्याने त्यांना, त्यांच्यासारख्याच एका लहान मुलीची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. त्या तिघीपैकी एकीचे नाव अॅलिस होते, म्हणून त्याने आपल्या कहाणीतील मुलीलाही तेच नाव दिले. ही गोष्ट त्या मुलींना तर खूप आवडली पण त्या तरुणाच्या मनातही ती घोळत राहिली. पुढे त्याने या कथेलाच थोडे वाढवून एक दीर्घ कहाणी लिहिली आणि काही दिवसांनी तिचा दुसरा भागही ‘अॅलिस थ्रू लुकिंग ग्लास’ या नावाने लिहून काढला. हे पुस्तक इंग्लंडमध्ये अतिशय लोकप्रिय बनले व त्याची अनेक युरोपीय भाषांत भाषांतरे देखील झाली. हळूहळू साऱ्या विश्वात त्याची ख्याती पसरली. या कथेवर आधारित असे एक स्वतंत्र विश्व नंतर जी.एंनी ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ या पुस्तकात निर्माण केले. -पुढील गोष्ट पुढील अंकी...
1 Comment
Sushama Powdwal
7/1/2023 04:23:45 am
पोस्ट फारच भावली
Reply
Leave a Reply. |
Vijay padalkarRandom thoughts... ArchivesCategories |