जी. एंच्या रमलखुणाचित्रकलेत Impossible Triangle या नावाची एक संकल्पना आहे. या त्रिकोणाचा आकार भल्याभल्यांना कोड्यात टाकणारा आहे या त्रिकोणाचे वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ कागदावरच असू शकतो. प्रत्यक्षात कुणीही असा त्रिमिती त्रिकोण तयार करू शकत नाही. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा वाचताना जाणवते की आयुष्याचा अर्थ शोधताना त्यांच्या हाती जे बिंदू लागले, त्यांच्यापासून ते असे अशक्यप्राय त्रिकोण तयार करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यांना हेही माहीत असते की असे त्रिकोण फक्त कागदावरच मांडता येतात.... या त्रिकोणांमागे दडलेले बिंदू आणि ते सुचवीत असलेल्या रमलखुणा शोधण्याचा विजय पाडळकर यांचा हा प्रयत्न.
जी.एंच्या निवडक कथांच्या रसग्रहणाचा एक अनोखा कॅलिडोस्कोप.
|
कवितेच्या शोधातजागतिक साहित्यात आपला अमिट ठसा उमटविणारा प्रतिभावान अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट हा एकीकडे अमेरिकेचा सर्वांत लाडका व सर्वश्रेष्ठ कवी मानला गेला तर दुसरीकडे त्याच्यावर पराकोटीची आग पाखडणारी टीकाही झाली. रॉबर्ट फ्रॉस्ट खरा होता तरी कसा? कवीचे जीवन आणि त्याची कविता यांचा परस्परसंबंध शोधणारा विजय पाडळकर यांचा नवा अभ्यासपूर्ण आणि आस्वादक चरित्र ग्रंथ.
अमेरिकेत जवळजवळ एक वर्ष राहून अनेक संदर्भग्रंथ, चरित्रे, पत्रव्यवहार, डायऱ्या व आठवणी तपासून सिद्ध केलेली एक अजोड चरित कहाणी.
|
जिवलग
आपले जीवन हे आपल्या एकट्याचेच थोडेच असते? असंख्य व्यक्तींची साथ घेत, त्यांना साथ देत आपण पुढे जात असतो. जगण्याच्या वाटेवरील हे सोबती आपल्या अस्तित्त्वाला सौंदर्य देतात, बळ देतात, अर्थ देतात. ‘गोजी’सारख्या चिमुकल्या, निरागस मुलीपासून ते गुलजारांसारख्या विख्यात
कलावंतापर्यंत, जन्मदात्या आईपासून ते जिला जन्म दिला त्या ‘मुग्धा’पर्यंत, दीर्घकाळ सोबत चाललेल्या धर्मापुरीकरासारख्या मित्रापासून ते आयुष्याचा एक छोटासा कालखंड प्रकाशून टाकणाऱ्या प्रकाश संतांपर्यंत...पाडळकरांना भेटलेल्या असंख्य सोबत्यांपैकी काहींची ही रसरशीत शब्दचित्रे.. जीवनाच्या विविध रुपांविषयी उत्कट आस्था बाळगणाऱ्या ललित लेखकाने त्याच्या खास ‘पाडळकरी’ शैलीत रेखाटलेली आपल्या जिवलगांची ही रसरशीत शब्दचित्रे.. मराठी ललित गद्याचे एक मनमोहक रूप...
|
देखिला अक्षरांचा मेळावा‘देखिला अक्षरांचा मेळावा’ हे विजय पडळकर यांनी लिहिलेले पहिले पुस्तक असून १९८४ साली त्यांनी ‘मराठवाडा’ दैनिकाच्या रविवार पुरवणीत ‘अक्षर संगत’ या नावाने लिहिलेल्या सदरांतील लेखांचे ते संकलन आहे. या लेखनाद्वारे मराठवाड्यात आस्वादक समीक्षेची पायवाट निर्माण झाली असे मानले जाते.
जगभरातील श्रेष्ठ साहित्याची मराठी वाचकाला ओळख करून द्यायची व तसे करतांना त्याची साहित्य विषयक जाण वाढवायची हे जे लेखकाचे उद्दिष्ट होते, ते यशस्वीपणे साध्य झाले आहे. या पुस्तकाला वाल्मिक पुरस्कार देतांना वामन देशपांडे म्हणाले, “एका रसिक साक्षेपी वाचकाच्या मनावर पडलेले उत्कृष्ट लेखकांचे आणि त्यांच्या पुस्तकांचे हे पुनवी चांदणे आहे. पाडळकर यांचे हे अभिनव पद्धतीने रेखाटलेले तरुण शैलीदार आत्मचरित्रच आहे. पुस्तकांवर अपरंपार प्रेम केले, लेखकांवर अपरंपार प्रेम केले आणि जोडीला तुळशीवृंदावनापुढल्या पवित्र रांगोळीसारखी शब्दांची रांगोळी काढली तर काय होते असे विचारले तर मी म्हणेन-‘देखिला अक्षरांचा मेळावा’ सारखे चिरंतन आनंद देणारे पुस्तक तयार होते.”
|
कथांच्या पायवाटा१९९० साली विजय पाडळकर यांनी ‘देशोदेशीच्या कथा’ या विषयावर ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये एक लेखमाला लिहिली. जगभरातील लघुकथांचा अभ्यास करीत असतांना पाडळकर यांना ज्या अप्रतीम कथा भेटल्या, त्या कथा व त्यांचे कथाकार यांच्यावर आस्वादक समीक्षेच्या पद्धतीने लिहिलेले लेख वाचकांना अतिशय आवडले. या लेखात आणखी काही लेखांची भर घालून हे पुस्तक सिद्ध केले आहे.
|
मृगजळाची तळी
श्रेष्ठ कादंबरीकार म्युगुएल डी. सर्वांतीसची महा-कादंबरी ‘डॉन किहोते’ ही आद्य आधुनिक कादंबरी मानली जाते. या कादंबरीचा आणि सर्वांतीसच्या शैलीचा प्रभाव जगातील अनेक विचारवंतावर तसेच सृजनशील लेखकांवर पडला आहे. सर्वांतीसची ही कादंबरी आणि दोस्तोव्हस्की, फ्लोबेर, बिमल मित्र यांच्या कादंबऱ्या व जी. ए. कुलकर्णी यांची ‘यात्रिक’ ही कथा यांच्यातील आशयसूत्रांची आणि जीवनदृष्टीची समानता यांचा वेध घेणारे पाच दीर्घ लेख या संग्रहात एकत्रित केलेले आहेत.
|
कवडसे पकडणारा कलावंतथोर रशियन कथाकार अंतोन चेकोव्ह याचे जीवन आणि त्याच्या कथा यांचा वेध घेणारे मराठीतील एकमेव पुस्तक.
‘उणेपुरे ४४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या चेकोव्हच्या जीवनातील नाट्यपूर्ण घटना व त्यांच्या समांतर, एक कथाकार म्हणून त्याचा होत गेलेला विकास यांचे चित्रण करताना कलावंताच्या अंतरंगातील माणूस शोधण्याचा पाडळकर तरल संवेदनशीलतेने व एकाग्र चिंतनाने करतात. त्यांची निखळ जीवन निष्ठा त्यांना या अभिनव शोधात मूल्य विवेकापासून ढळू देत नाही. चेकोव्हचे मोठेपण मान्य करूनही त्याच्या मनुष्यपणाला पडलेल्या चिरांकडे देखील पाडळकर तेवढ्याच साक्षेपाने लक्ष वेधतात.’
|
येरझारा
‘जे हरवले होते ते खरेच हरवले होते का? माझ्या आठवणीत तर ते त्याच्या रूप-रस-गंध-चवीसह जिवंत होते. फक्त त्याला जाग आणण्यासाठी एक पहाट हवी होती, एक पायवाट हवी होती, एक मंत्र हवा होता..’
भूतकाळात जाण्याची पायवाट ज्याची त्याची स्वतंत्र असते. अशा पायवाटेने भ्रमण करतांना हाती लागलेल्या क्षणांचे मनोहर ललित शब्दरूप. विविध दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेल्या, गाजलेल्या, ललित लेखांचे संकलन.
|
वाटेवरले सोबती
``वाचता-वाचता एखादी व्यक्तिरेखा पुस्तकातून उठून मनात येऊन बसते. तिच्याशी चटकन एक नाते जुळते. मी लिहितो आहे ते अशा नाते जुळलेल्या माणसांबद्दल. हे नाते जुळणे जितके सुंदर तितकेच दुर्मिळ असते. आजवर वाचलेल्या असंख्य पुस्तकांतून हजारो व्यक्ती नजरेसमोरून सरकून गेल्या आहेत.
त्यांपैकी थोड्यांशीच असे नाते जुळले आहे. कुणी माझीच स्वप्ने आपल्या डोळ्यांनी पाहिली म्हणून, कुणी मला प्रिय अशा मूल्यांसाठी लढा उभारला म्हणून, कुणी मला जे करावेसे वाटते पण करता येत नाही तेच करीत आहे म्हणून, तर कुणी दुःखाच्या ओझ्याने दबलेला असूनही माणूसपणाची गंगारेषा जपतोय म्हणून.. या सार्याची अदृश्य पावले माझ्याबरोबर चालत असतात. त्यांना माझ्यापासून काहीच नको असते. हवे असते ते मलाच. थोडेसे जगण्याचे बळ, थोडासा दिलासा...’’ अशा वाटेवरल्या सोबत्यांची आठवण जागवणारे हे लेखन. आस्वादक ललितलेखनात आपली स्वतंत्र नवी पायवाट निर्माण करणार्या विजय पाडळकरांचे हे टवटवीत पुस्तक. तुमचे पुस्तक वाचताना गतकाळात वाचलेल्या पुस्तकातील व्यक्तिरेखा मित्रमैत्रिणी सारख्या आसपास गर्दी करून वावरत आहेत असा मला भास झाला. जुन्या पुस्तकातील वातावरणाचा तुकडा काळाच्या ओघात रंगविहीन न होता तसाच्या तसाच कोरा करकरीत आढळला.
|