अर्पणपत्रिका : ‘भारत माझा देश आहे असे मनापासून मानणाऱ्या प्रत्येकास...’
‘अल्पसंख्य’ ही विजय पाडळकरांची पहिली कादंबरी. श्री. पाडळकर ह्यांनी तीस वर्षे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी केल्यानंतर स्वेच्छानिवृती घेतली. या काळात आलेल्या कडू-गोड अशा तीव्र अनुभवांना ते आता काहीशा अलिप्तपणे पाहू शकत होते. असे पाहतांना त्यांच्या ध्यानात आले की एका मर्यादित वर्तुळात जगतांना आलेल्या अनुभवांचे नाते हे विशाल जीवनप्रवाहाशी देखील जुळलेले असते. माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती सर्वत्र समानच असतात. फक्त व्यक्ती म्हणून माणसाचा स्वतंत्र विचार करता येत नाही. तो ज्या समाजात जगतो, ज्या काळात जगतो त्या समाजाशी व काळाशी तो बद्ध असतो. या अनुभवांना त्यांनी ‘खींचे है मुझे कुफ्र’ या दीर्घकथेत मांडले. [दीपावली दिवाळी अंक २००२]. परंतू आपण त्यांना पूर्ण न्याय देऊ शकलो नाही आणि जे सांगावयाचे होते ते बरेच राहून गेले असे पाडळकरांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी दीर्घ कादंबरी लिहिण्याचा संकल्प केला.
या संदर्भात ‘राजहंस ग्रंथवेध’ च्या ऑगस्ट २००८ च्या अंकात श्याम देशपांडे यांनी त्यांची विस्तृत मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत पाडळकर म्हणतात-
‘मला हा विषय कथेच्या मर्यादित अवकाशात मावत नाही, संगीतातील वाक्प्रचार वापरायचा तर, अनेक महत्त्वाच्या ‘जागा’ घेणे राहून गेले, असे वाटू लागले. त्या जागा मला खुणावू लागल्या. कथेत एकरेषीय दिसणारे वास्तव मुळात फार गुंतागुंतीचे आहे व्यामिश्र आहे असे मला जाणवू लागले. कथेतील प्रसंगांच्या पलीकडे जाणारी दिशाही मला दिसू लागली. मग मी या विश्वाचा विस्तार करू लागलो. असे करताना अनेक नवी पात्रे, नवे प्रसंग ‘मला घे’ असा हट्ट धरू लागले. हा एक वेगळाच खेळ मांडला गेला.’
‘इलाही महमूद सुभेदार हा एका बँकेचा अधिकारी हा या कादंबरीचा नायक आहे. नायक मुस्लीम असावा असे तुम्हाला का वाटले?’
‘बँकेतील ज्या मित्राच्या आयुष्याने या विचार प्रक्रियेला चालना दिली तो मुस्लीम होता. तो तसाच राहू द्यावा असे मला वाटले. ज्या घटना घडत गेल्या त्यांचा नायकाच्या मुस्लीम असण्याशी जवळचा संबंध होता. हिंदू नायकाच्या जीवनात ते घडणे असंभव होते. शिवाय एका अत्यंत भिन्न संस्कृतीतील पात्राच्या मनात प्रवेश करण्याचा प्रयोगही मला आव्हानात्मक वाटला.
‘मुस्लीम जीवनाचे इतके तपशीलवार, सूक्ष्म वर्णन तुम्ही कसे करू शकला?’
‘माझे लहानपण गेले ते मराठवाड्यातील देगलूर, कंधार या गावात. पोलीस अॅक्शन नंतरचा काळ होता तो. निजामाचे राज्य गेलेले असले तरी उर्दूचा प्रभाव शिल्लक होता. वडिलांचे शिक्षण उर्दूतून झालेले होते, त्यांचे अनेक मित्र मुसलमान होते. तसेच माझेही. उर्दू शेर-शायरीचे व साहित्याचेही मी बरेच वाचन केले आहे.’
‘कादंबरी तुम्ही एका खऱ्या व्यक्तीवरून लिहिली आहे असे म्हणता. मग तिच्यातील घटना कितपत वास्तव आहेत?’
‘वास्तवाची तुमची व्याख्या काय आहे यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. एखादी घटना प्रत्यक्ष घडलेली असलेली की आपण त्याला वास्तव म्हणतो. पण तिच्याकडे पाहणारे अनेक डोळे असतात. त्या डोळ्यांत भिन्न प्रतिमा उमटलेल्या असतात. त्याही वास्तवच असतात. शिवाय एकाच घटनेचा अर्थही ते निरनिराळा लावतात. पूर्णपणे कल्पित काहीही नसते तसेच पूर्णपणे सत्यही. पूर्णसत्त्याचे आकलन ही तर मानवाच्या मर्यादेपलीकडील गोष्ट आहे. त्याच्या वाट्याला खंडित सत्यच येते. खंडित सत्य व कल्पना यांचे योग्य मिश्रण म्हणजे कला. या संदर्भात हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात एक फार महत्त्वाचे विधान केले आहे. ‘कलेचे वरदान म्हणून सत्त्याचा काही एक भाग गोपनीय ठेवण्याचा विशेषाधिकार लेखकाला आपोआप मिळतो.’
‘ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे का?”
‘नाही. माझ्या आयुष्यातील काही प्रसंग यांत आलेले आहेत पण तिच्यात ‘मी’ फार थोडा आहे. या कादंबरीतील बहुतेक घटना नांदेड येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा त्या संदर्भात घडतात. पण येथली पात्रे मला माझ्या तीस वर्षांच्या नोकरीत अनेक ठिकाणी भेटलेली आहेत. काही ठिकाणी एका व्यक्तिमत्त्वात अनेक माणसांनी प्रवेश केला आहे.’
‘कामगार चळवळीचे व्यापक चित्रण या कादंबरीत नाही असा काहींचा आक्षेप आहे.’
‘चळवळीचे समग्र दर्शन घडविणे हा माझा हेतू नव्हताच. चळवळी एका व्यापक पातळीवर चालू असतात, सामान्य माणूस दुसऱ्या पातळीवर जगत राहतो. श्रेष्ठींनी हाक दिली की त्यांच्या आज्ञा पाळायच्या एवढेच त्याला ठाऊक असते. मला रस आहे तो सामान्य माणसात. त्याच्या सुखदु:खात, आशा निराशेत. सामान्य माणसाचा या चळवळीपासून काही लाभ होतो खरा पण त्यासाठी त्याला काही किंमतही द्यावी लागते. माणसाला चळवळीपासून काय मिळते व त्याला काय गमवावे लागते याचा लेखाजोखा मांडणे हाही माझा एक उद्देश होता. चळवळी, संघटना, समाज आणि माणूस यांचे संबंध असे व्यामिश्र असतात.’
‘तुम्ही ‘सामाजिक बांधिलकी’ मानता का?”
‘हो. पण एक गोष्ट. आपल्याकडे हा शब्दप्रयोग फार बदनाम झाला आहे. बांधिलकी न मानणारे नेहमी चळवळींची चेष्टा करतात, तर स्वतंत्र मार्गावरून चालू पाहणाऱ्यांना बांधिलकीवादी तुच्छ लेखतात. बांधिलकीची सोपी व्याख्या म्हणजे समाजाचे ऋण मान्य करून शक्यतो ते फेडण्याचा प्रयत्न करणे. माझा समाजाशी संबंध नाही असे मानणारी आत्मकेंद्रित, व्यक्तीनिष्ठ भूमिका घातक आहे.’
‘कादंबरीचे नाव ‘अल्पसंख्य’ काय सुचविते?
‘हे नाव मी जातीच्या किंवा संघटनांच्या संदर्भात दिलेले नाही. विचार करणारा माणूस हा नेहमीच ‘अल्पसंख्य’ असतो. तो तसा असल्यामुळे त्याच्यावर अनेक अन्याय होतात पण त्यामुळेच त्याची टिकून राहण्याची प्रेरणाही बळकट होत जाते.’
‘बहुतेक वेळा विचार करणारा माणूस हा ‘कार्यकर्ता’ नसतो. तुमचा नायक दोन्ही आहे.’
‘हो. मला एक ‘positive good man’ रंगवायचा होता. कॉनराड रिक्टर याच्या ‘A Simple Honorable Man’ या कादंबरीत त्याने असा माणूस उभा केलेला मी वाचला आणि तो माझ्या मनात येऊन बसला. आजच्या गुंतागुंतीच्या आधुनिक युगात असा माणूस कसा वागेल याचा सहज विचार करताना मला माझ्या बँक मधील एका मित्राची व त्याच्या जीवनातील काही घटनांची आठवण झाली, आणि मी त्याला शब्दबद्ध करण्याचे ठरविले. आपण अनेकदा म्हणतो, ‘तो फार चांगला माणूस आहे, कुणाच्या अध्यात नाही, मध्यात नाही.’ हे चांगुलपण मला अभिप्रेत नाही. चांगलं व्हावं पण कुठल्यातरी मूल्यासाठी जगण्याचा ध्यास असावा. क्रियाशील चांगुलपण हे मला जास्त मोलाचं वाटतं.’
‘हा एक प्रकारचा आदर्शवाद नव्हे काय?’
‘असेलही. पण आदर्शवादी भूमिका घेण्यात गैर काय आहे? आदर्शवादाची भरपूर थट्टा केली जाते, पण जग पुढे नेण्यासाठी तो मोठे बळ देऊ शकतो हे कसे नाकारता येईल?’
‘म्हणून तुमची कादंबरी शोकांतिका न बनता आशावादी टोनवर संपते का?’
‘होय. आशावाद हा मानवी मनाचा मूलभाव आहे असे मी मानतो. माझ्या कादंबरीत एक कोसळण्याच्या सीमेवर उभा असलेला माणूस पुन्हा उमेदीने उभा राहतो. कादंबरीचा शेवट मी नायकापाशी न करता त्याच्या मेव्हण्यापाशी केला तो यामुळेच. ‘आशा हे दु:खाचे मूळ आहे’ हा विचार फार भव्य आहे पण सामान्य माणसाला तो पेलवणारा नाही. तो तात्विक पातळीवरच राहतो. उलट आशा संपली की जीवन संपलेच. मला मान्य आहे की आज माझ्या देशात दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, कुपोषण आणि शोषण आहे. तरी सामान्य माणूस हरलेला नाही, त्याची जिद्द कायम आहे. या विनाशगामी पथावर चालणाऱ्या माणसाला योग्य मार्ग दाखविणे हे एखाद्या महान कलावंतालाच शक्य आहे. माझ्यात ते सामर्थ्य नाही. पण माझा वाटा मला उचलायला हवा. मी त्याच्या बाजूने आहे हे सांगायला हवे.
‘जीवनाचा अर्थ हरवणे आणि तो सापडणे या चक्रांतून प्रत्येक संवेदनशील माणसाला जावे लागते. या वाटेवर त्याला नेहमी एक निवड करावी लागते. ‘श्रद्धा-प्रेम’ की व्यवहार-तात्कालिक लाभ’? या निवडीत प्रेमाच्या मार्गावर चालण्यासाठी त्याला साथ देणे हे प्रत्येक कलावंताचे कर्तव्य आहे. भोवतीच्या गदारोळात आशेचा, प्रेमाचा क्षीण का असेना, स्वर उमटत असतो. लेखकाने तो टिपला पाहिजे, तो मोठा करून जगासमोर मांडला पाहिजे, त्याचे बळ वाढविले पाहिजे.’

कर्मधर्मसंयोगाने आपले ‘अल्पसंख्य’ हे अप्रतीम वास्तववादी पुस्तक माझ्या वाचनात आलं. तीनच दिवसात मी ते अथ पासून इति पर्यंत सलग वाचून काढलं. मी अक्षरशः भारावून गेलो. ...मला असं वाटलं की आपण ही कादंबरी माझ्या जीवनावरच लिहिली की काय?
‘मी खलील इस्माईल पटेल, ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्व अंतरमनापासून मानणारा, सर्वधर्मसमभाव दैनंदिन जीवनातही खऱ्या अर्थाने जोपासणारा एक सच्चा भारतीय नागरिक. ***बँकेत शाखाधिकारी म्हणून काम करून नुकताच निवृत्त झालेला माणूस...बँकिंग क्षेत्राशी निगडीत कादंबरीतील प्रत्येक प्रसंगाची अनुभूती मला सारखीच वाटली. ..
‘[कादंबरीचे] नायक सुभेदार हे आपल्या जन्मजात मुस्लीम रूढी, परंपरा आपल्या घरच्या उंबरठ्याच्या आतच सांभाळून घराच्या बाहेर पडल्यानंतर आपण केवळ एक सच्चा नागरिक म्हणून जगत असल्याची भावना आपण अतिशय सुंदर पद्धतीने रेखाटली आहे.
‘कधी आपण कोल्हापुरातील आई अंबाबाईच्या दर्शनास आलात तर आपली भेट होऊ शकेल. तशी प्रार्थना मी श्री. माता महालक्ष्मी कडे करतोय.
--- खलील इस्माईल पटेल, कोल्हापूर
दीपावली’ दिवाळी अंकात ‘खींचे है मुझे कुफ्र’ ही कादंबरी वाचली.
...
सध्या देशातील सारे वातावरण अविवेकाने भरलेले आहे.अविवेक, विद्वेष, परस्परांविषयी संशय, राजकीय व सामाजिक नाकर्तेपणा, माणुसकी शून्यता, स्वार्थीपणा अशा बिकट परिस्थितीत आपला देश सापडला आहे. अविवेकाची काजळी झटकून विवेकाची कास धरण्याची आज कधी नव्हे एवढी गरज आहे.
...
आपल्या कादंबरीतील घटना आणि समस्या वास्तव वादी आहेत, त्यांचे चित्रण उत्तम आहे, हृदयस्पर्शी आहे. मनुष्य स्वभावाचे अनेक कंगोरे या कथेत उत्तम प्रकारे चित्रित केले आहेत. समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी व विचार मंथनाला चालना देणारी ही कथा खरोखरच उत्कृष्ट दर्जाची आहे.
--- आर.एस. अय्यर, चेन्नई
अल्पसंख्य’ चा शब्दशः अर्थ संख्येने खूप कमी असलेला. मात्र प्रचलित अर्थ इतका साधा नाही. त्याला राजकीय, सामाजिक असे अनेक ग्रह-पूर्वग्रह चिकटलेले आहेत. म्हणूनच या नावाची कादंबरी जेव्हा आपल्यासमोर येते तेव्हा मनात कळतनकळत एक पार्श्वभूमि तयार होते. एखाद्या विशिष्ट धर्माविषयीचे, जमाती विषयीचे कथन यांत असणार हे आपण मनोमन जाणलेलं असतं. कथानक जसजसे पुढे सरकत जातं तसा ‘अल्पसंख्य’ या शब्दाविषयीचा आपला अंदाज थोडासा चुकतोच. ती कहाणी ठराविक धर्माची राहत नाही. ती बनून जाते तुमच्या, माझ्या, आपल्यासारख्या सामान्य माणसांची. अशी माणसं, जी कुठल्याही धर्म पंथात अडकून राहत नाहीत. त्यांचा धर्म फक्त एकच, मानव धर्म! कादंबरी वाचून संपते तेव्हा जाणवतं की अशी माणसं खरोखरीच ‘अल्पसंख्य’ असतात....
ही कादंबरी वाचताना मनात जे अनेक प्रश्न निर्माण होतात ते केवळ इलाही महमूद सुभेदार यांचे न राहता आपलेही बनून जातात. ...त्यांची उत्तरे सर्वस्वी हो किंवा नाही अशी ठामपणे देता येत नाहीत. प्रत्येकाने आपण नेमके कोण आहो, कोठे आहो, आपले ध्येय काय आहे, ते पूर्ण करण्यासारखी परिस्थिती वा वातावरण आपल्या आजूबाजूला खरोखरीच आहे का, त्यांत बदल घडवून आणणे शक्य आहे का, तसे नसेल तर मग प्राप्त परिस्थितीत आपण जास्तीत जास्त चांगलं काय करू शकतो, असा विचार करणे ही काळाची गरज आहे हे मनावर ठसते...
एका वेगळ्या जगात घेऊन जाणारी ही कादंबरी. आपल्या स्वत:विषयी, आपण जगतो आहो त्या आपल्या आजूबाजूच्या जगाविषयी भान आणण्यास विचार-प्रवृत्त करणारी, आपले प्रश्न बाजूला न सारता त्याकडे डोळसपणे बघायला लावणारी!
---चित्रा जोशी, मुंबई