Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
    • चित्रपटविषयक >
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

कवडसे पकडणारा कलावंत

प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन , मुंबई

आवृत्त्या: २००४, २०१७
चालू आवृत्ती : २०१७ (दुसरी)

किंमत: २५०/-

पृष्ठे: २४८

 महाराष्ट्र राज्य पुरस्कार २००४-०५
 बी. रघुनाथ पुरस्कार, औरंगाबाद  
 आपटे वाचन मंदिर पुरस्कार, इचलकरंजी
 केशवराव कोठावळे पुरस्कार, मुंबई

अर्पणपत्रिका :
गुलजारजींना-
तुम्ही जे असंख्य दिवे प्रवाहात सोडले त्यातले काही तरंगत माझ्या किनाऱ्यालाही लागले आहेत.
त्या स्नेहमयी प्रकाशाबद्दल कृतज्ञता म्हणून...
 अंतोन चेकोव्ह या श्रेष्ठ रशियन कथाकाराचा जन्म १७ जानेवारी १८६० रोजी  झाला आणि १ जुलै १९०४ रोजी तो मरण पावला. उण्यापुऱ्या ४४ वर्षाच्या जीवनात चेकोव्हने सुमारे ५०० कथा, दोन कादंबऱ्या व काही नाटके लिहिली. तो हयात असतांना रशियात कादंबरी हा सर्वश्रेष्ठ साहित्य प्रकार आहे हे मत सर्वमान्य झालेले होते. कथेला दुय्यम साहित्यप्रकार मानून तिची उपेक्षा केली जात होती. या पार्श्वभूमीवर कथेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी चेकोव्हने अथक प्रयत्न केले. त्याच्याच शब्दांत, ‘मी कथेला प्रतिष्ठा मिळावी म्हणून अक्षरशः डोके फोडून घेतले आहे.’ १ जुलै २००४ रोजी चेकोव्हच्या मृत्यूला शंभर वर्षे झाली. ते निमित्त साधून प्रकाशित झालेल्या ‘कवडसे पकडणारा कलावंत’ या ग्रंथात पाडळकरांनी चेकोव्ह याचे जीवन आणि त्याच्याशी समांतर असा त्याच्या कथा लेखनाचा प्रवास यांचे मनोज्ञ चित्रण केले आहे. या ग्रंथाचे फार उत्तम स्वागत झाले. त्याला मानाचा ‘केशवराव कोठावळे पुरस्कार’ मिळाला.
 
या पुस्तकाची दुसरी आवृत्ती सप्टेंबर २०१७ मध्ये मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस तर्फे प्रकाशित करण्यात आली आहे.
‘केशवराव कोठावळे पारितोषिक’ स्वीकारतांना पाडळकर यांनी व्यक्त केलेले मनोगत :

"अंतोन चेकोव्ह हा माझा अत्यंत आवडता कथाकार. तीस वर्षांपासून त्याच्या कथा मी आवडीने वाचतो आहे. त्याच्या संदर्भात अनेकांशी बोलतांना माझ्या ध्यानात आले की या माणसाबद्दल फारच कमी माहिती मराठीत आहे. विशेषत: कथा या साहित्य प्रकारासाठी चेकोव्हने आयुष्यभर जो लढा दिला तो कुणालाच माहित नाही. मग मी त्याच्या कथा, त्याची चरित्रे, त्याच्या आठवणी व त्याचा पत्र व्यवहार जमा करण्यास सुरुवात केली. माझे पहिले पुस्तक ‘देखिला अक्षरांचा मेळावा’' हे मी जी.ए. कुलकर्णी यांना भेट पाठविले होते. त्यावर त्यांचे फार सुरेख पत्र आले. त्यांनी लिहिले होते, ‘वर्तमानपत्रात लिहिल्यामुळे तुमच्यावर जागेचे फार बंधन आलेले दिसते. ..पुढेमागे या स्केचेसचे रूपांतर तुम्ही ऑईल्समध्ये करावे...’

'कवडसे पकडणारा कलावंत’' हे माझे पहिले ऑईलपेंटिंग आहे.

गुलामाचा नातू, दिवाळे निघालेल्या दुकानदाराचा मुलगा इथून सुरुवात करून चेकोव्ह हा रशियन सांस्कृतिक क्षेत्रातील एक महत्त्वाची व्यक्ती कसा बनला हा माझ्यासमोरच्या अभ्यासाचा एक मार्ग होता आणि विनोदी, चुटकेवजा एकपानी लोकप्रिय कथा लिहिणारा जगातील महान कथाकार कसा बनला हा दुसरा. या दोन्ही धाग्यांची गुंफण करण्याचा मी माझ्या पुस्तकात प्रयत्न केला आहे.

चेकोव्हच्या मृत्युला २००४ साली शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मी अनेक ठिकाणी चेकोव्हवर लेखन केले. त्यावेळी अनेकांनी विचारले की चेकोव्हची आता आठवण करण्याचे काय प्रयोजन? या प्रश्नाचे उत्तर देताना मला जाणवले की चेकोव्ह हा त्याच्याकाळी महत्त्वाचा लेखक होता, आजही आहे व उद्याही राहील. तो कालातीत आहे. आजही प्रत्येक नव्या कथाकाराने
चेकोव्हने कथेत केलेल्या प्रयोगांचा अभ्यास करायला हवा. चेकोव्ह हा डॉक्टर होता व त्याच्याजवळ असलेली प्रखर जीवन निष्ठा त्याच्या कथेला निराशावादी बनू देत नाही. ज्याची विज्ञानावर श्रद्धा असते त्याची मानवी प्रगतीवर, मानवाच्या चांगल्या भविष्यावर श्रद्धा असते. कलावंताची प्रतिभा, वैज्ञानिकाची चिकित्सा व तत्त्वज्ञाचे चिंतन यांचा मनोहर मिलाफ चेकोव्हच्या साहित्यात आढळून येतो.

गॉर्कीने चेकोव्हची एक आठवण लिहून ठेवली आहे. एकदा तो चेकोव्हला  भेटायला गेला तेव्हा चेकोव्ह बागेत एका झाडाखाली बसला होता. पानातून सूर्यप्रकाशाचे कवडसे खाली उतरत होते.
चेकोव्हने डोक्यावरील हॅट काढली व तिच्यात ते कवडसे पकडून कवडश्यासह हॅट डोक्यावर घालण्याचा तो प्रयत्न करीत होता व ते जमत नाही म्हणून लहान मुलासारखा चिडत होता. माझे पुस्तक म्हणजे चेकोव्ह्च्या जीवनातील व साहित्यातील सत्त्यांचे कवडसे पकडण्याचा प्रयत्न आहे.”
‘कवडसे पकडणारा कलावंत’ हे विजय पाडळकर यांचे पुस्तक म्हणजे श्रेष्ठ रशियन कथाकार अंतोन चेकोव्ह याचे केवळ चरित्र नाही तर चेकोव्हच्या कथासाहित्याचा त्याच्या आयुष्याच्या संदर्भात घेतलेला मर्मग्राही वेध आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने जीवन आणि कला यांच्या नाते संबंधांची गुंतागुंत पाडळकरांनी उलगडून पाहिली आहे. तरल संवेदनशीलता, साहित्याविषयीची मर्मज्ञता, आणि मानवी जीवनाविषयीची आस्था यांच्या बळावर प्रतिभा व्यापाराच्या गूढतेला स्पर्श करण्याचे सामर्थ्य पाडळकर यांच्या लेखनात आहे.

​या पुस्तकाची वाचनीयता आणि शैलीचे लालित्य एवढीच या लेखनाची गुणवत्ता आहे असे नाही. चरित्रात्मक तपशीलाचे अर्थपूर्ण निर्मितीत रूपांतर करतांना रसग्रहण, समीक्षा आणि चिंतन यांनी युक्त अशी समग्रतेचे भान ठेवणारी लेखनपद्धती पाडळकरांनी अवलंबिली आहे आणि वाचकांच्या हाती कला आणि जीवन यांचा अन्वय लावणारे एक प्रगल्भ लेखन दिले आहे.


---केशवराव कोठावळे पारितोषिका’च्या निवड समितीने व्यक्त केलेला अभिप्राय
चेकोव्ह्च्या आयुष्यातील तपशील पाडळकर यांनी जाणतेपणाने व खूप शोध घेऊन सादर केले आहेत व त्यातून त्याच्या जीवनाची रूपरेषा सहजपणे आपल्यासमोर येते. पण हे तपशील देणे हे या पुस्तकाचे उद्दिष्ट खासच नाही. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कथांचा वाचकांना यथासांग थांग घेता यावा या दृष्टीने हे लेखन घडले आहे. ते करतांना पाडळकरांची दृष्टी निकोप, रसडोळस आणि तटस्थ आहे. कथाबीज, त्याचा फुलोरा, पात्रांच्या भावावस्था, कथेतील निसर्ग, त्याची रूपे व त्यांचे कथेतील स्थान, कथेमागचा सूक्ष्म तरल भावाशय आणि एकूणच मानवी जीवनाला भिडण्याची चेकोव्ह्ची वृत्ती-त्याच्या कथांची विलक्षण सामर्थ्ये पाडळकरांनी बोलकी केली आहेत. श्रेष्ठ कथांच्या आस्वादाचा वस्तुपाठच येथे सहजगत्त्या मांडला गेला आहे.

​
चेकोव्ह बद्दल इतक्या विस्ताराने लिहिले गेलेले हे पहिलेच पुस्तक. तेही अत्यंत आपुलकीने व अभ्यास करून. सर्व साहित्यप्रेमींनी हे पुस्तक अवश्य हाती धरावे व तृप्त तृप्त व्हावे.

---प्रा. विवेक जोग  (‘ललित’ ऑगस्ट २००४)

देश विदेशांमधल्या प्रतिभावन्तांच्या साहित्यकृतींचा व कलाकृतींचा अत्यंत संवेदनशील मनाने आस्वाद घेणे, मर्मज्ञ दृष्टीने त्या आत्मसात करणे, आणि सूक्ष्म विश्लेषण करून ते रसग्रहण सहज सुंदर भाषेत लिहिणे हे पाडळकर यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य सांगता येईल...त्यांचे ‘कवडसे पकडणारा कलावंत’ हे मराठीतील एक महत्त्वाचे व नाविन्यपूर्ण पुस्तक ठरावे. या पुस्तकात त्यांनी श्रेष्ठ रशियन कथाकार अंतोन चेकोव्ह याचे जीवन आणि त्याच्या कथा यांचा सखोल चिकित्सक आढावा घेतला आहे. एकाचवेळी चेकोव्ह चे व्यक्तिगत चरित्र आणि साहित्यिक चरित्र यांची समांतर गुंफण विलक्षण असल्याने हे पुस्तक वेगळे वाटते. शिवाय हे करीत असतांना पाडळकरांनी स्वत:ची आणि चेकोव्हची प्रखर जीवननिष्ठा आणि कलामूल्ये यांचे भान कुठेही सुटू दिले नाही हे विशेष.

एखाद्या लेखकाच्या साहित्याचा आस्वाद घेतांना त्याच्या खाजगी आयुष्याची माहिती असणे आवश्यक असते का? या प्रश्नाच्या उत्तरादाखल पाडळकर प्रास्ताविकात लिहितात, ‘एखाद्या लेखकाला विशिष्ट पद्धतीनेच साहित्य का लिहावे वाटते? उदा. जी. ए. कुलकर्णींच्या कथांतून नियती सतत का डोकावत असते? डोस्टोव्हस्कीच्या कादंबऱ्यातून खून, आत्महत्त्या व वेड यांचे प्राबल्य का असते? रिक्टर च्या लेखनातून धर्म आणि धार्मिक श्रद्धांचे विश्लेषण सतत का डोकावते? अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना लेखकाने जगलेले जीवन व त्याच्या साहित्यकृती यांच्या परस्पर संबंधावर काही वेगळा प्रकाश पडू शकतो.’


‘...काळाने चेकोव्हला लेखक म्हणून खूप उंचीवर नेऊन ठेवले. पाडळकरांनी त्याच्या अप्रतीम अशा अनेक कथांची साक्षेपी समीक्षा केली आहे.

चेकोव्ह बद्दल लिहिताना वेडे होऊनच लिहावे लागते’ हे म्हणणे पाडळकराणी सार्थ ठरविले आहे. चेकोव्ह्चा त्यांनी सुरु केलेला अभिनव शोध ‘चेकोव्ह हा चेकोव्ह सारखाच’ या वाक्याशी संपत असला तरी चेकोव्ह्चे मोठेपण त्यांच्याच शब्दात सांगता येईल-‘माणसाच्या श्रेष्ठ पणाचे सोपे आडाखे कधीच बांधता येत नाहीत चेकोव्हला ‘सामान्य माणसांचा लेखक’ असे म्हटले जाते ते यामुळेच की या साध्या माणसांची बलस्थाने त्याने ओळखली. उद्याचा महान मानव या माणसांतूनच येईल अशी श्रद्धा बाळगली. ..या जगाच्या पलीकडे सारा अज्ञाताचा काळोख पसरलेला असतो. त्या काळोखाची छाया आपल्या जगावरही पडते. अंधारातून काही प्रकाशाचे कवडसे फक्त आपल्यापर्यंत पोहोचतात. चेकोव्ह हा असाच प्रकाशाचे कवडसे पकडणारा कलावंत होता.


---आशा कर्दळे. (‘ललित’चे ‘मानाचे पान’)
कालच रात्री आपला चेकोव्हवरला ग्रंथ वाचून पूर्ण केला...आपल्या ग्रंथाने मला चेकोव्ह प्रथमच कळला. आजवर त्याच्या लेखनाकडे मी पुरेशा गांभीर्याने वळलो नव्हतो. आपला चरित्र ग्रंथ खूप श्रमातून उभा झाला आहे. त्या श्रमांना मी अभिवादन करतो.

---
सतीश काळसेकर
‘Dear Shri Vijay Padalkar,
I read a review of a book on Chekov published by Majestic Prakashan by name ‘कवडसे पकडणारा कलावंत’. I immediately went to their shop and brought it and finished it in 4 days. It was so interesting that that I was restless till I finished it. You have done tremendous work on Chekov. Congratulations.


--P. N. Kumtha , Popular Prakashan
मी तुमचे लेखन दिसले की वाचतो व मला ते आवडते. त्यात व्यक्त होणारी रसिकता सूक्ष्म आणि चिकित्सक समीक्षादृष्टीने सुसंस्कारित आहे. तुमच्या वाचनाने तिला चांगले वजन दिले आहे आणि अभिजात साहित्याची दिशा दाखविली आहे

---श्री. पु. भागवत
कै. केशवराव कोठावळे पुरस्कार तुम्हाला मिळाला याबद्दल तुमचे अभिनंदन. या पुरस्कारावर तुमचा अधिकारच होता, तो तुम्हाला मिळाला नसता तर नवल वाटले असते. तुमचे ‘कवडसे पकडणारा कलावंत’ मी नुकतेच वाचून संपविले.  मराठीत या जातीचे हे एकमेव व पहिले पुस्तक आहे. तुम्ही चेकोव्ह फार व्यवस्थितपणे उभा केला आहे. तुमच्या या चरित्रामुळे कुणीही चेकोव्ह्च्या प्रेमातच पडेल. जगातल्या फार मोठ्या कथाकाराचे जीवन आणि त्याचे श्रेष्ठ दर्जाचे कथा साहित्य तुम्ही वाचकापुढे ठेवले आहे. या पुस्तकातील कथा परिचयामुळे मराठी वाचकाला श्रेष्ठ दर्जाची कथा काय असते हे निश्चित उमगेल. त्याच्या अभिरुचीवर चांगल्या कथांचे संस्कार होतील. तुम्ही केलेले हे काम ऐतिहासिक मोलाचे आहे.

तुमच्या या ग्रंथातून  वाड़मयासंबंधी फार सूक्ष्म समज प्रकट झाली आहे. तुम्ही चेकोव्ह च्या कथांची जी विश्लेषणे केली आहेत ती आस्वादक समीक्षेचा उत्कृष्ठ नमुना आहेत. तुम्ही स्वत: कथाकार आहात आणि कथा या वाड़मयप्रकारची तुम्हाला फार चांगली जाण आहे.  त्यामुळे तुमची कथा विश्लेषणे डोळस आणि मार्मिक झाली आहेत. दुसरे म्हणजे तुम्ही चेकोव्हकडे, त्याच्या जीवनात आलेल्या व्यक्तींकडे फार समजूतदारपणे पाहिले आहे. तुम्ही त्यांच्या वर्तनाचे केलेले मूल्यमापन त्यांच्यावर जराही अन्याय होऊ देत नाही.

‘कवडसे पकडणारा कलावंत’ हा तुमच्या आतापर्यंतच्या वाड़मयीन कारकीर्दीत मानाचा तुरा आहे. तुम्ही ज्या प्रकारचे लेखन करीत आहा ते मराठीत तुमच्याशिवाय कुणीच केलेले नाही. ते केवळ ललित गद्य नाही. त्यात लालित्य तर आहेच पण त्याबरोबर चांगल्या दर्जाची तर्कशुद्ध वैचारिकता देखील आहे.


----डॉ. सुधीर रसाळ
तुमची व्यापक साहित्य दृष्टी, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, मन:पूर्वकता, रसिकता व व्यासंग ह्या साऱ्या गुणांतून तुम्ही घडविलेले स्वत:चे व्यक्तिमत्त्व या साऱ्यांचा ‘कोठावळे’ पुरस्कार हा यथायोग्य गौरव आहे.

---आनंद अंतरकर

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
vvpadalkar@gmail.com
+९१-९८६७५९८८३६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
    • चित्रपटविषयक >
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क