अर्पणपत्रिका : ‘डॉन किहोते, सांचो पांझा आणि त्यांचा निर्माता म्युगुएल डी. सर्वांतीस यांना
‘काव्याच्या सृजना शिवाय कुठलीही आणि कसलीही पर्वा न करणारी अनिवार्य उर्मी म्हणजे कवीची मस्ती’
---विंदा करंदीकर
---विंदा करंदीकर
‘कवीची मस्ती’ ही ‘अल्पसंख्य’ नंतरची विजय पाडळकर यांची दुसरी कादंबरी. या कादंबरीत पाडळकर यांनी एक आगळा वेगळा प्रयोग केला आहे. ‘डॉन क्विझोट’[किहोते] ही सर्वांतीस याची कादंबरी जगातील पहिली आधुनिक कादंबरी मानली जाते. ती एक महान आणि कालजयी कलाकृती आहे हे आता सर्वमान्य झाले आहे. या कादंबरीचा जगभरच्या विचारवंतांवर आणि लेखकांवर प्रभाव पडला आहे. या कादंबरीतील ‘डॉन’ आणि ‘सांचो’ ही पात्रे या काळात आणि महाराष्ट्रात आली तर ती कोणत्या रूपात अवतरतील अशी विलक्षण संकल्पना घेऊन लिहिलेली ही कादंबरी. ही काल्पनिक असली तरी तिला वास्तवाचा भक्कम आधार आहे कारण ‘सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट ही सत्य आणि कल्पित यांचे मिश्रण असते.’
भ्रम आणि भ्रमनिरास, कल्पित आणि वास्तव यांच्या जाळ्यांतून वाट काढीत मधली गंगारेषा टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मनस्वी कवीची ही कहाणी आहे. ह्या कादंबरीचा विषय अनेक वर्षांपासून पाडळकरांच्या मनात घोळत होता. हंस मासिकाच्या १९९७ च्या दिवाळी अंकात एक कवी आणि जगत असताना त्याचा होणारा भ्रमनिरास या विषयावर ‘गवताच्या पात्यावरील धूळ’ ही दीर्घकथा त्यांनी लिहिली होती. मात्र या कवीत लेखकाला ‘डॉन’ दिसू लागला आणि कथेचे रूपच पालटले. आता ही कहाणी एका कवीची न राहता स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक कलावंताची बनून गेली.
या कादंबरीत पाडळकरांनी रचनेचे काही नवे लक्षणीय प्रयोग केले आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला ते त्या प्रकरणाचे सारांशाने सार मांडतात. या पद्धतीमुळे वाचकाला येणाऱ्या प्रकरणात काय असेल याची उत्सुकता लागून राहते. कादंबरीत एकंदर १४ प्रकरणे असली तरी शेवटच्या प्रकरणाचे नाव ‘प्रकरण शेवटून पहिले’ असे दिलेले आहे. जीवन हे चक्राकार फिरत पुढे सरकत असते, त्याला सुरुवात, मध्य, शेवट नसतो या संकल्पनेची येथे आठवण येते.
भ्रम आणि भ्रमनिरास, कल्पित आणि वास्तव यांच्या जाळ्यांतून वाट काढीत मधली गंगारेषा टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका मनस्वी कवीची ही कहाणी आहे. ह्या कादंबरीचा विषय अनेक वर्षांपासून पाडळकरांच्या मनात घोळत होता. हंस मासिकाच्या १९९७ च्या दिवाळी अंकात एक कवी आणि जगत असताना त्याचा होणारा भ्रमनिरास या विषयावर ‘गवताच्या पात्यावरील धूळ’ ही दीर्घकथा त्यांनी लिहिली होती. मात्र या कवीत लेखकाला ‘डॉन’ दिसू लागला आणि कथेचे रूपच पालटले. आता ही कहाणी एका कवीची न राहता स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येक कलावंताची बनून गेली.
या कादंबरीत पाडळकरांनी रचनेचे काही नवे लक्षणीय प्रयोग केले आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला ते त्या प्रकरणाचे सारांशाने सार मांडतात. या पद्धतीमुळे वाचकाला येणाऱ्या प्रकरणात काय असेल याची उत्सुकता लागून राहते. कादंबरीत एकंदर १४ प्रकरणे असली तरी शेवटच्या प्रकरणाचे नाव ‘प्रकरण शेवटून पहिले’ असे दिलेले आहे. जीवन हे चक्राकार फिरत पुढे सरकत असते, त्याला सुरुवात, मध्य, शेवट नसतो या संकल्पनेची येथे आठवण येते.
बहुआयामी लेखक पाडळकर यांनी एका मनस्वी प्रतिभावंताची कहाणी ‘कवीची मस्ती’ या कादंबरीत सांगितली आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीलाच त्या त्या प्रकरणात काय होणार आहे याची सूचना ते देऊन ठेवतात. लेखकाला कवीचं आयुष्य आपल्या तळहातावर घेतलेल्या आवळ्यासारखं दिसू लागलं आहे. हा आवळा लेखक अनेक अंगांनी निरखून पाहतो आहे. वेगवेगळ्या कोनांतून पाहिल्यावरही तो अगदी गोल गरगरीत आहे हे सत्य पाडळकरांनी बहारदार रीतीने सांगितले आहे. त्यांची लवचिक अशी भाषाशैली आणि ठाशीवपणाने आपल्या व्यक्तिरेखा उभ्या करण्याची हातोटी यामुळे ही कहाणी प्रभावी बनली आहे. एकदा हाती घेतल्यावर वाचक धारेला लागल्यासारखा वाचत जातो. त्याच्यासमोर एक मनस्वी प्रतिभावंताची घुसमटणारी कहाणी साकारत जाते. आवर्जून वाचावी अशी ही कहाणी आहे आणि हे श्रेय सर्वस्वी पाडळकर यांच्या लेखणीचे.
---श्रीराम शिधये [ लक्षवेधी पुस्तके -‘ललित’ फेब्रुवारी १५ ]
..एकूण तेरा प्रकरणांतून लेखकाने ही कादंबरी लिहिली आहे. प्रत्येक प्रकरणात काय आहे याचा सारांश देखील त्यांनी दिला आहे. सर्वांतीसने जगातील आद्य आधुनिक कादंबरीची रचनाही या पद्धतीनेच केली होती. पाडळकरांनी कादंबरी त्या पद्धतीने मांडली आहे. एका कवीची अतिशय तरल शोकांतिका पाडळकर लिहितात. कादंबरीतलाच नव्हे तर भवतालचा कवीही आपण समजून घेऊ लागतो. कवीच्या अवकाशातल्या न दिसणाऱ्या कवितेचे तुकडे शोधू लागतो. त्याचे स्वत:विषयी, कवितेविषयी असणारे भ्रम आणि कठोर वास्तवात होणारे अपेक्षाभंग या घुसमटीला सामोरी जाणारी कवीची मस्ती आपल्याला हेलावून टाकते. कवितेच्या तुकड्यामागे कवी बराच शिल्लक राहतो या निष्कर्षाला आणत ही कादंबरी संपते. शेवटच्या प्रकरणाबद्दल पाडळकर फार मोठ्या आवक्याने लिहितात, ‘प्रकरण शेवटून पहिले..’.हे प्रकरण अवघ्या दहा ओळीत संपते आणि संपूर्ण कादंबरी एका वैश्विक सत्याचा प्रकाशमान झोत टाकत दिपवून टाकते. इतकावेळ साधंच काही वाचत असलेले आपण एका वेगळ्या प्रदेशात पोहोचतो. कवीच्या शोकात्म शेवटाला पुन्हा नव्याने समजून घेण्यासाठी आपण पुन्हा पाहिलं पान उलटतो.
प्रत्येक सर्जनशील साहित्य हे वाचकांच्या समजुतीला, सर्जनशीलतेला एक आव्हान असतं. लेखक एक अवकाश दाखवितो. तो तसाच वाचकांच्या हाती लागेल असं काही निश्चित सांगता येत नाही. पण ही कादंबरी वाचल्यावर मनाचे काही कप्पे भरून जातात आणि काही कप्पे उघडे पडतात नवं काही शोधण्यासाठी. हेच साध्य करायचं असतं का वाचक म्हणून किंवा लेखक म्हणून तरी....
---स्नेहा अवसरीकर [ रसिक निवड-‘साहित्य सूची’ फेब्रुवारी १५]
‘कवीची मस्ती’ वाचली. नावाने कुतूहल वाढविले..
कवितेच्या प्रतीभ देणगीचे तीव्र भान आणि आपल्याला ते लाभलेले नाही याची आजवर खोल असलेली दुखरी जाणीव यातला झगडा सनातन तरी विकल करणारा आहे. भवताला विषयीचा तुसडेपणा यातूनच उद्भवतो व कवीला एकटा करतो. अटळ शेवटाकडे घेऊन जातो. हे फार छान उतरले आहे. शेवटचा मोनोलॉग फारच थेट पोचतो. अगदी कळसाध्याय. कादंबरीला वाचानीयतेच्या किमान निकषांपलीकडे घेऊन जातो.’
---नितीन वैद्य, सोलापूर
आजची मराठी कादंबरी बाह्य वास्तवात फार गुंतली आहे. सूक्ष्म मनोविश्लेषणाचा लेखकांना जणू विसरच पडला आहे. या पार्श्वभूमीवर ‘कवीची मस्ती’ मधील मनोविश्लेषण आवर्जून अभ्यासावे असे आहे. कवीच्या मनाचा शोध अत्यंत समर्थपणे लेखकाने घेतला आहे. एक अत्यंत गुंतागुंतीचे, व्यामिश्र व्यक्तिमत्त्व उभे करण्यात पाडळकर पूर्णपणे यशस्वी झाले आहेत. नायक हा एक न्यूनगंडाने पछाडलेला कलावंत आहे. हा न्यूनगंड झाकण्यासाठी तो अहंगंडाचा आश्रय घेतो. तो आत्ममग्न आहे. अशी माणसे एकीकडे मस्तीत असल्याचे भासवतात तर दुसरीकडे त्यांना आधाराची गरज भासते. त्यांना व्यवहार व त्यांतील गुंतागुंत कळत नाही, त्याला सामोरे कसे जावे समजत नाही. कवीचा मित्र हा पूर्णपणे नॉर्मल आहे. या दोन व्यक्तींचे जे दोन स्तर आहेत त्यांच्या परस्पर संबंधांची अप्रतीम मांडणी लेखकाने केली आहे.
ह्या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला सूक्ष्म असा उपहासाचा स्वर या कादंबरीत आहे आणि कळत नकळत, हळूहळू तो स्वर कारुण्याकडे जाऊ लागतो, आणि शेवटी ही कलाकृती कारुण्यात परावर्तीत होऊन जाते. कथनात होणारे हे स्वरांतर लेखकाने अतिशय अर्थपूर्ण बनविले आहे. कादंबरीचा आकृतिबंध जर आपण विचारात घेतला तर या जातीची कादंबरी मराठीत यापूर्वी कुणीही लिहिलेली नाही.
---डॉ. सुधीर रसाळ [औरंगाबाद]
ज्याच्या वेगवेगळ्या पैलूवर बोलता येऊ शकते, ज्याची विविधांगी समीक्षा केली जाऊ शकते असा हा विलक्षण ग्रंथ आहे. या कादंबरीची रचना, तिचे तंत्र, लेखकाची शैली, यांचा स्वतंत्रपणे अभ्यास व्हायला हवा. जगातील पहिल्या आधुनिक कादंबरीच्या तंत्राशी मिळती जुळती अशी शैली जाणीवपूर्वक लेखकाने निवडली आहे. पाडळकरांचा सिने माध्यमाचा आणि जागतिक कथा साहित्याचा फार मोठा अभ्यास आहे व त्याचा या कादंबरीत आपल्याला दृश्यात्मक असा सुंदर प्रत्यय येतो. ही कादंबरी वाचतांना मला एखादा जागतिक दर्जाचा, सार्थक, अभिजात सिनेमा पाहत आहोत अशी सतत जाणीव होत होती. विविध कलांचा आणि त्यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास कलाकृतीला किती समृद्ध बनवितो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
कवी आणि कविता यांचे नाते, कवीचा स्वभाव, त्याचे चरित्र, त्याचे चारित्र्य हे सारे अत्यंत वेगवान घटनांतून आपणासमोर उलगडत जाते. कथानक इतके वेगवान व प्रवाही आहे तरी लेखकाचे वैशिष्ट्य हे की कुठलाच प्रसंग लांबत नाही की कमी पडला असेही वाटत नाही. इतके टोकदार, इतके नेमके लेखन मराठीत फार कमी वेळा झालेले आढळते.
तरीही ही केवळ घटनाप्रधान कादंबरी नाही. अनेक मूलभूत प्रश्नांची मांडणी या कादंबरीत लेखकाने केली आहे. कलाकृतीची निर्मितीप्रक्रिया आणि कलावंत यांच्या संदर्भातील हे प्रश्न अत्यंत मोलाचे आहेत. माणूस भ्रमात आहे असे आपण म्हणतो, पण भ्रमात राहणे न राहणे माणसाच्या हातात असते का? भ्रमात न राहता जगता येते का ? मनात भ्रम का निर्माण होतात, कसे निर्माण होतात ? श्रेष्ठ कलाकृती हातून घडावी हे कलावंताचे स्वप्न असते. पण ती घडणे हे माणसाच्या हातात नाही. ठरवून श्रेष्ठ कलाकृती घडू शकत नाही. अशी कलाकृती घडण्यासाठी कलावंताची ‘निवड’ व्हावी लागते असे म्हटले जाते. मग कवीच्या मनात प्रश्न असा निर्माण होतो की ‘त्या निवड करणाऱ्या’ शक्तीने माझी का निवड केली नाही ? अत्यंत महत्त्वाचे असे मूलभूत प्रश्न येथे मांडले गेले आहेत. शिवाय ते उपरे नाहीत. लेखकाच्या मनात आहेत म्हणून कादंबरीत येत नाहीत, तर या प्रश्नांनी कवीला आयुष्यभर छळले आहे म्हणून येतात. कवी ज्या प्रश्नांची उत्तरे शोधतो आहे ते आजच्या समकालीन साहित्यिक व्यवहारातील कळीचे प्रश्न आहेत आणि ते या कादंबरीशिवाय इतरत्र कुठेही इतक्या प्रभावीपणे, ठामपणे तरीही नम्रपणे व्यक्त झालेले नाहीत.
पाडळकर यांच्यावर समकालीन मराठी साहित्याचा कसलाच प्रभाव नाही. त्यांच्यावर प्रभाव आहे तो अभिजात जागतिक साहित्याचा व चित्रपटांचा. इथल्या मातीत मुळे असणारी तरी विश्वात्मक असणारी ही कलाकृती आहे. म्हणूनच या कादंबरीचे तंत्र, शैली, निवेदन, लेखन व्यूह, नैसर्गिक वाढ आणि उभे केलेले प्रश्न हे सहसा मराठी लेखकाला पडणारे प्रश्न नाहीत. कारण बहुसंख्य मराठी लेखकांजवळ या प्रश्नांची तयार उत्तरे आहेत. पाडळकरांजवळ उत्तरे नाहीत कारण अंतिम उत्तरे मिळत नसतात हे त्यांना ठाऊक आहे !
ही कादंबरी जिथे संपते तिथून पुढे सुरु होते. कादंबरीतील शेवटच्या प्रकरणाचे नाव लेखकाने ‘प्रकरण शेवटून पहिले’ असे दिले आहे. कवी स्वत:ला डोहात झोकून देतो. आयुष्य संपल्यावर तो ईश्वराकडे जातो. ईश्वराला म्हणतो की त्याचे प्रश्न पूर्वीच्या जगात सुटले नाहीत. हे ईश्वरा तूच त्या प्रश्नांची उत्तरे दे. आणि दयाघन परमेश्वर म्हणतो, “मी प्रयत्न करीन, पण मानवाच्या साऱ्याच साऱ्याच प्रश्नांना मजजवळ उत्तरे आहेत असे तू समजू नको.” कवी परत फिरतो.
कवी परत फिरला याचा अर्थ या प्रश्नांचा आणि जीवनाचा हा जो व्यूह आहे तो तेथे संपत नाही. पुढेही अनेक कलावंत या जगात येत राहणार, असेच जगणार, असेच त्यांचे भ्रम असणार, असेच त्यांचे भ्रमनिरास होत राहणार, ते असेच प्रश्न विचारणार आणि त्यांची उत्तरे शोधण्यात त्यांची यात्रा संपून जाणार...
वाचकाची कलात्मक जाण वाढविणारा हा ग्रंथ आहे. तो वाचणारा वाचक सुद्धा थोडा सुबुद्ध, सुजाण, साहित्याची जाण असणारा असावा अशी माझी अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने पाडळकरांनी हे विश्व उभे केले आहे ते विश्व आजचे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, जीवनविषयक, अस्तित्त्वविषयक असे वास्तव आहे आणि त्या वास्तवाची ही कादंबरी आहे. या पद्धतीची रचना मराठीत येणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. अशा अभिरूचीचे जतन करणे ही काळाची गरज आहे.
---श्रीपाद भालचंद्र जोशी [नागपूर]