अर्पणपत्रिका : आदरणीय श्री. पु. भागवत यांच्या स्मृतीस
What had that flower to do with being white,
The wayside blue and innocent heal-all?
What brought the kindred spider to that height?
Then steered the white moth thither in the night?
What but design of darkness to appall?
If design govern in a thing so small
- Robert Frost
‘जी. एं.च्या रमलखुणा’ या पुस्तकाच्या पहिल्या भागात श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या गुंतवळ, पडदा, बळी, विदूषक, इस्किलार, वीज, ऑर्फियस, यात्रिक, स्वामी व ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’ या दहा कथांवरील दीर्घ आस्वादक समीक्षा लेख एकत्रित केले आहेत. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात ‘जी. एं. च्या कथेतील प्राणीजीवन’, ‘जी. एं. ची प्रतिमासृष्टी व सिनेमा’, ‘कैरी : कथा आणि चित्रपट’, ‘जी. एंची पत्रे-ग्रेससाठी’ हे चार लेख आहेत. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी विजय पाडळकर यांनी जी. एं.ची कथा प्रथम वाचली. कॉलेजच्या त्या वयातही आपण काहीतरी श्रेष्ठ वाचत आहो अशी जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाली. या पुस्तकाच्याअ प्रस्तावनेत पाडळकर लिहितात ,
‘हळू हळू वाचन जसे विस्तारत गेले तसे जी. एंच्या कथेचा आवाका ध्यानात येऊ लागला, व ती अधिकाधिक आवडू लागली. सुरुवातीला मानवी दु:खाच्या कहाण्या सांगणारे जी.ए. पुढे चालून माणूस, त्याचा स्थळकाळ, परिस्थिती, समाज यांच्या बंधनापलीकडे जाऊन पार्थिव पसार्याच्या पलीकडे, अनंताकडे झेपावले होते.’
‘जीवनाच्या प्रवासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जी.एंची कथा मला भेटत गेली व माझे भावविश्व समृद्ध करीत गेली. आज, या वळणावर ती कथा मला कशी वाटते हे शब्दांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न मी या पुस्तकात केला आहे. जी.एंच्या कथेचे हे पूर्ण आकलन आहे असे नव्हे. सत्यशोधाच्या वाटेवरील एका यात्रीकाने मांडलेल्या रमलखुणा समजून घेण्याचा हा प्रयास आहे. या महान कथाकाराने जे विश्व निर्माण केले आहे त्याचे अर्थनिरूपण करण्याचे प्रयत्न पुढेही होत राहतील, नव्हे ते तसे व्हायला हवेत. कारण ‘मनुष्य संपून जातो, पण मानवी जीवनाची बहुरूपी विविधता कधी संपत नाही’.