Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

छोट्या छोट्या गोष्टी

विकत घ्या...

बुक-गंगा संकेतस्थळावर विकत घ्या...

प्रकाशन : अभिजित प्रकाशन पुणे

प्रथमावृत्ती: २०१८

किंमत: १५०/-

पृष्ठे: १३६
अर्पणपत्रिका:    विभूतिभूषण बंदोपाध्याय
 या साध्या सत्वशील कलावंतास-

छोट्या छोट्या गोष्टीच मी सोडून जाईन
माझ्या जिवलगांसाठी
मोठ्या गोष्टी तर साऱ्यासाठीच आहेत...
​-रवीन्द्रनाथ ठाकूर
मराठीत सुमारे एक ते दोन पृष्ठांच्या कथांना बहुतेक वेळा ‘लघुत्तम कथा’ म्हटले जाते. श्रेष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या मते ‘लघुत्तम’ हा शब्द चुकीचा असून योग्य शब्द ‘लघुतम’ असा आहे. ‘लघुतम कथा या साहित्यप्रकाराचे पुनरुज्जीवन करण्याची मोलाची कामगिरी पाडळकरांनी बजावली आहे असे त्यांचे या संदर्भातील निरीक्षण आहे.​ या संग्रहात ‘लघुतम कथांच्या रचनेचे काही वेगवेगळे प्रयोग करण्याचा पाडळकरांनी प्रयत्न केला आहे. सहा शब्दांच्या कथेपासून ते सुमारे नऊशे शब्दांच्या कथेपर्यंत या कथांचा विस्तार आहे. काही कथांत कथा व ललित लेख यांची सरमिसळ केलेली आहे. ‘डाकू आणि गोसावी’ या कथेत प्राचीन मिथ्य कथेला नवे रूप देण्याचा प्रयत्न आहे.

या संग्रहाला पाडळकरांनी एक दीर्घ प्रस्तावना जोडलेली असून शब्दसंख्या आणि कथा यांचा परस्पर संबंध शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते लिहितात,

‘विसंगती हा तर अनेक कथांचा प्राण आहे. दृष्टीकोन आणि विसंगती’ हे दोन लघुतम कथेचे अत्यंत महत्त्वाचे मूलाधार आहेत. लघुतम कथा लिहिणाऱ्या प्रत्येक लेखकाजवळ स्वत:चा असा खास  दृष्टीकोन’ असायला हवाच. आपल्या संदर्भात जे घडते ते म्हणजे आपला अनुभव नव्हे तर जे घडले त्याबद्दलचे आपले आकलन आणि त्याचा आपल्या मनावर होणारा परिणाम  म्हणजे अनुभव. पण त्याबरोबरच लेखकाने हे ध्यान ठेवले पाहिजे की जगात एकाच गोष्टीकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोन असू शकतात व त्यांचा त्याने आदर ठेवायला हवा. स्वत:चा दृष्टीकोन नसेल तर कथेला टोकदारपणा आणि सामर्थ्य येणार नाही पण दुसऱ्या दृष्टीकोनाचे भान नसेल तर कथेचे सामर्थ्य मर्यादित होईल, तिचा अवकाश विस्तृत होणार नाही. लेखकाने हेही ध्यानात ठेवायला हवे की त्याच्या कथेतील पात्रांजवळ एक त्यांचा स्वत:चा दृष्टीकोन  असू शकतो.’
स्नेहा अवसरीकर यांनी ‘छोट्या छोट्या गोष्टी’च्या संदर्भात घेतलेल्या मुलाखतीतील काही अंश :

‘कथा हा एक प्राचीन साहित्यप्रकार. कदाचित आद्य साहित्यप्रकार. शिकारकथा ही पहिली कथा आहे असे माझे म्हणणे आहे.  आपण लहानपणी ‘मला एक गोष्ट सांग’ म्हणतो.  कथा ऐकण्याची माणसाला जन्मजात भूक असते. ‘गोष्ट’ हा शब्द आपण अनेक प्रकारे वापरतो. “तुला एक ‘गोष्ट’ सांगतो.” ‘गोष्ट’ हे नाम   एखादी घटना, स्वभाववैशिष्ट्य, यासाठीही वापरले जाते. ‘आमच्या इथे एक मॉल उघडला आहे’, ‘तो फार कंजूष आहे’, ‘आम्ही काश्मीरला जायचे ठरविले आहे’ वगैरे. कथेला आपण कधी गोष्ट म्हणतो, कधी कहाणी म्हणतो. ‘त्याने आपली राम-कहाणी सांगितली’, ‘माझ्या प्रवासाची चित्तर कथा काय सांगू?’ वगैरे.’
  ‘कथेची माझी पहिली भेट अशीच ‘सांगितलेल्या’ कथांतून झाली. आई, आजी रामायण-महाभारतातील कथा सांगायच्या. शुक्रवारच्या कहाण्या सांगायच्या. नंतर पंचतंत्रातील आणि इसापाच्या कथांतून. या आजच्या भाषेत ‘लघुतम कथा’च आहेत.’
 
‘मी अनेक साहित्य प्रकारात लेखन केलेले असले तरी ‘कथा’ या प्रकारावर माझे सुरुवातीपासून प्रेम आहे. [कॉलेजमध्ये असताना -१९६८-६९ साली मी पहिली कथा लिहिली ती कॉलेजच्या मासिकात प्रकाशित झाली होती व तिला पहिले बक्षीस मिळाले होते. ते माझे ‘प्रकाशित झालेले पहिले लेखन.] त्या काळात मी प्रचंड वाचन केले. १९५० ते १९८० दरम्यानचे जवळजवळ सारे महत्त्वाचे मराठी कथाकार मी वाचले आहेत. १९७० पासून मी इंग्रजी [व त्या भाषेतून जागतिक] साहित्य वाचू लागलो. तेथेही कथा भरपूर वाचल्या. पण लिहिण्याबद्दल म्हणाल तर मी सुरुवातीला आस्वादक ललित लेखन केले व तिथे बराच काळ रमलो. स्वत:चे काही लिहावे असे वाटत होते पण मन सतत तुलना करायचे की या मोठ्या लेखकांनी एवढे अप्रतिम साहित्य निर्माण केले आहे. त्यांच्यासमोर आपण काय लिहिणार? नंतर ही भयाची भावनाही आपोआप कमी झाली. अधूनमधून काही कथा लिहिल्या, पण तेवढेच. २००१ साली  अचानक काही कथाबीजे मनात आली. ती डायरीत टिपून ठेवतांना जाणवले की या तर स्वयंपूर्ण कथा आहेत. लिहून काढल्या.  हा फॉर्म आपलासा वाटला. २००१ च्या ‘हंस’च्या दिवाळी अंकात अंतरकरांनी अशा आठ कथांचा एक गुच्छ प्रकाशित केला.’
 
‘१९९१ साली महाराष्ट्र टाईम्स मधून मी ‘कथांच्या पायवाटा’ नावाचे सदर लिहिले, त्यासाठी कथा या साहित्यप्रकारचा बराच अभ्यास झाला. पण खरे सांगायचे तर त्या लेखनाचा माझ्या स्वतंत्र कथालेखनावर काही परिणाम झाला असे मला वाटत नाही. इतक्या विविध प्रकारचे लेखक वाचले, प्रत्येकाचे विश्व वेगळे, प्रत्येकाची अभिव्यक्तीची शैली वेगळी.  पण कुणाचे अनुकरण करावे, किंवा तसे लिहावे असे वाटले नाही.
मात्र हेही खरे की कोणताही कथाकार आपल्या कथांचे संपूर्ण श्रेय घेऊ शकत नाही. तो इमानदार असला तर त्याला ठाऊक असते की त्याच्या भाषेतून आणि साहित्यिक परंपरेतून त्याच्यापर्यंत बरेच काही आलेले होते ते या कथांत झिरपले आहे. तो जर चांगला वाचक असेल तर त्याला हेही ठाऊक असते की त्याच्या वाचनातून देखील बरेच काही संस्कार त्याच्या लेखनावर झालेले आहेत.’
एखादे कथाबीज कथा म्हणून प्रकट व्हावे, लघुतम-कथा म्हणून की दीर्घकथा म्हणून हे सर्वस्वी त्या बीजावर अवलंबून असते. कथेची लांबी वाढवून, तिच्यात तपशिलाची भर घालून तिची दीर्घकथा बनविता येत नाही, तसेच तिची काटछाट करून लघुतम-कथा बनत नाही. हे बीज नैसर्गिकपणेच वाढू द्यावे लागते. म्हणून ठरवून लघुतम-कथा लिहिता येत नाही.  शब्दांचा कसा उपयोग करून घ्यावा हा प्रत्येक लेखकाला पडणारा महत्वाचा प्रश्न आहे. एखाद्या अनुभवाचे रूप एवढे जटील असते की तो दीर्घ कथेतच व्यक्त होऊ शकतो. कथा व लघुतम कथा यांतील मुख्य फरक ‘शब्द संख्येचा’ असला तरी त्यांच्या रचनेत काही मूलभूत फरक असतात. कळीचा मुद्दा हा आहे की शब्दसंख्या मर्यादित ठेवल्यामुळे काय साध्य होते, व काय हरवण्याची शक्यता असते. काही मिळवायचे असेल तर काही गमवावे लागते. लघुतम कथेमध्ये गुंतागुंतीच्या, व्यामिश्र घटनांना, अनुभवांना स्थान नाही. त्यांना दूर ठेवावे लागते. अनेक व्यक्तिरेखांची गर्दी  लघुतम कथेच्या अवकाशात मावत नाही. लघुतम कथेत पाल्हाळाला वाव नसतो, पुनरुक्ती कटाक्षाने टाळावी लागते. विश्लेषण करण्यासही  तेथे वाव नसतो. जे काही विश्लेषण करावे ते वाचकाने. [म्हणून वाचकाचा सहभाग अशा कथांत सर्वाधिक महत्त्वाचा असतो.] लघुतम कथेची मध्यवर्ती कल्पना, घटना, लहानशी असल्याने ती प्रभावी असणे आवश्यक आहे. तपशीलाला वाव नसल्यामुळे अनेकदा सूचकतेचा,प्रतिमांचा अवलंब करावा लागतो. सूचकतेचे व प्रतिमांचे स्वत:चे सामर्थ्य असते, व ते लघुतम कथेला आपोआप मिळते. बहिर्गोल भिंगातून प्रकाशकिरण एका लहान बिंदूवर पडताना उष्णता निर्माण होते, तसा भास उत्तम लघुतम कथा निर्माण करू शकते.’

‘पण ही किमया फार क्वचित घडते. अनेकदा लघुतम कथा म्हणून एक लहानसा किस्सा सांगितला जातो, किंवा चमकदार कल्पना मांडली जाते. लघुतम कथा ही एखाद्या टोकदार खिळ्यासारखी असायला हवी, वाचकाच्या मनात थेट घुसणारी. ही एक प्रभावी विधा आहे पण तिची रचना ही अत्यंत अवघड बाब आहे. एखाद्या चिंचोळ्या मार्गावरून चालताना जी कसरत करावी लागते ती लघुतम कथा लिहिताना देखील करावी लागते.’

 ‘आधुनिक कथा ही कथा, कविता आणि ललित लेखन यांचे संयुग बनले आहे. माझ्या कथांतून लहानशा अवकाशात रचनेचे वेगवेगळे प्रयोग करण्याचा मी प्रयत्न केला आहे.’

‘मराठीत लघुतम कथा फारशी लिहिली गेली नाही. तुरळक काही प्रयत्न केले गेले पण एखाद्या लेखकाने सातत्त्याने लघुतम कथेचा पाठपुरावा न केल्यामुळे या विधेकडे वाचकांचे लक्ष गेले नाही.  समीक्षकांनी [एखादा अपवाद वगळता] सदैव कथेला ‘दुय्यम साहित्यप्रकार’ मानले आहे. जागतिक साहित्यातही कथेच्या उपेक्षेचा इतिहास फार जुना आहे. ‘कथेसाठी मी डोके फोडून घेतले आहे’ असे चेकोव्हने लिहिले आहे. नोबेल पारितोषिके देण्यास सुरुवात होऊन शंभर वर्षे होऊन गेली. इतक्या दिवसात २०१३ साली फक्त अॅलिस मन्रो या लेखिकेला केवळ ‘कथा लेखनासाठी’ नोबेल देण्यांत आले.’
You are a natural storyteller. I admire the way you write and narrate punches of life in a story.

---गुलजार
मला सर्वाधिक आवडली ती तुमची ‘आर्त’ ही कथा. त्रोटक आकारमान, विषय, तो हाताळण्याची रीत आणि तिची ‘crescendo’ सारखी अखेर यामुळे ती नुसतीच आगळी वेगळी नव्हे तर वाचन संपताच नकळत कर जुळावेत इतकी प्रभावी झाली आहे. अंतरातली आयुष्यभराची घालमेल क्षणात संपविणाऱ्या एका प्रत्ययकारी अनुभूतीचा तो विलक्षण आलेख आहे. असे काही घडते ते अवधानासारखे निमिषातच, म्हणून त्याची कथाही तेवढीच त्रोटक असणे साहजिक आहे.
तुमच्या कथेतला ‘तो’ रूढ अर्थाने आस्तिक नाही. तीर्थक्षेत्रे, देव देवळे यांत त्याला मुळीही रुची नाही. त्यांनी दु:ख दूर होत नाही ही समज असण्याइतका तो सुजाण आहे. त्याला आत्मकेंद्री दु:खापासून सुटका करून घेण्याची ओढही आहे पण, ती कशी व्हावी हे मात्र कळत नाही. अशा तडफडीत त्याला एका आर्त संध्याकाळी देवळाबाहेरच्या विराट निसर्गात ‘देवदर्शन’ होते आणि क्षणात तो ब्रह्मांडरूप होतो. या विस्तारातून त्याची अहंकेंद्री व्यथा संपते आणि नकळत तो ‘नरहरी, शामराजा, कृपा करा’ असे म्हणून शरणागत होतो. ही ‘मी’ चा ‘स्वामी’ होण्याची कथा आहे. अशा परिवर्तनाला कुठलातरी धक्का, आघात, वा साक्षात्कार लागतो. असला आघात फक्त शेलक्यांच्याच वाट्याला येतो. असा एक भाग्यवान तुमच्या कथेत अवतरलाय. वाटते तो तुम्हीच तर नव्हे? असाल तर बरे, कारण मला तुमचा हेवा करायचाय!


--- मनोहर सप्रे

    तुम्हाला हे पुस्तक कसे वाटले?

जतन करा

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क