तो उंच माणूससत्यजित राय हे केवळ एक महान चित्रपट दिग्दर्शकच नव्हते तर विसाव्या शतकाच्या सांस्कृतिक जीवनावर ज्यांचा अमित प्रभाव पडला आहे असे विश्वमानव होते. राय हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. सिनेमाच्या सर्वच अंगांवर प्रभुत्त्व असणारे ते कलावंत होते, ते उत्तम चित्रकार होते, बंगाली वाचकांच्या अनेक पिढ्यांना आकर्षित करून घेणारे लेखक होते, मुलांच्या भावविश्वात नव्या संवेदना जागृत करणारे बालसाहित्यिक व साक्षेपी संपादक होते, ते उत्तम संगीतकार होते, व मुद्रणाच्या क्षेत्रात देखील त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे. भारतीय सिनेमाची त्यांनीच प्रथम जगाला ओळख करून दिली.
सुमारे वीस वर्षांच्या अभ्यासातून व ध्यासातून सिद्ध झालेला, एका महामानवाचा सर्वांगाने वेध घेणारा हा ग्रंथ प्रत्येक रसिकाच्या तसेच प्रत्येक महाविद्यालय आणि ग्रंथालय यांच्या संग्रही असायलाच हवा.
|
आनंदाचा झराHappy endings there must be…must be…must…must…must…’ -ब्रेख्त
सत्यजित राय यांचा ‘आगंतुक’, हयातो मियाझाकी चा ‘My Neighbour Totoro’, व्हिक्टर फ्लेमिंगचा ‘Wizard of Oz’ काप्राचा ‘It happened One Night’ अशा अकरा प्रसन्न, टवटवीत चित्रपटांचा रसास्वाद. काही चित्रपट असे असतात की जे एकदा पाहिल्यानंतर आयुष्यभर आपली सोबत करतात. अस्तित्त्वाच्या खोल तळाशी एक झरा बनून ते झुळझुळत राहतात. भोवतीच्या कोलाहलात त्यांचा अनाहत नाद मंदपणे ऐकू येत असतो. त्यांचे तेथे असणे जगण्याला एक शीतल आधार देते. जागतिक चित्रपट सृष्टीतील अशाच काही प्रसन्न चित्रपटांच्या -अक्षय आनंदाच्या झऱ्यांच्या- या कहाण्या.. अनोख्या पाडळकरी शैलीत सांगितलेल्या....
|
सुहाना सफर और...हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रतिभावान गीताकारांत शैलेंद्र हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. लेखक विजय पाडळकरांनी गुलजार यांना एकदा ‘हिंदीतील सर्वश्रेष्ठ गीतकार कोण’ असा प्रश्न केला होता. त्यावर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी उत्तर दिले होते, “शैलेंद्र.” ‘ओ, सजना, बरखा बहार आई’, ‘आजारे परदेसी’, ‘ जीना इसीका नाम है’, ‘आज फिर जीने की तमन्ना है’ अशी असामान्य मधुर आणि अर्थपूर्ण गीते त्यांनी लिहिली. १७७ चित्रपटांसाठी लिहिलेल्या जवळपास आठशे गीतांचा खजिना आपल्यासाठी सोडून गेलेल्या महान गीतकाराचे जीवन आणि त्याचे कार्य यांचा वेध घेत त्यांच्या अजरामर गीतांचा रसास्वाद घेणारा हा आगळावेगळा ग्रंथ.
|
चंद्रावेगळं चांदणंसाहित्य आणि चित्रपट यांचे नाते मोठे गुंतागुंतीचे आहे. गाजलेल्या साहित्यकृती आणि त्यावर आधारित चित्रपट यांचा तौलनिक अभ्यास करणारे मराठीतील हे पहिलेच पुस्तक आहे. ‘तीसरी कसम’, ‘आंधी’, ‘भुवन शोम’, गाईड’, ‘डॉ. झिवागो’ आदी आठ चित्रपट, आणि ‘मुजरीम हाजीर’ ही दूरदर्शन मालिका व त्यांच्या मूळ साहित्यकृतींचा हा प्रवास वाचकांना खिळवून ठेवतो. गंभीर चित्रपट समीक्षेची एक वेगळी पायवाट निर्माण करणारे पुस्तक म्हणून ते मान्यता पावले आहे.
|
नाव आहे चाललेली...विभूतिभूषण बंदोपाध्याय: थोर बंगाली साहित्यिकांच्या परंपरेत स्वत:चे अनन्यसाधारण स्थान निर्माण करणारे कादंबरीकार. ‘पथेर पांचाली’ आणि ‘अपराजितो’ या त्यांच्या दोन महाकादंबऱ्या. सत्यजित राय: साहित्याचे मोल जाणणारे आणि चित्रपटाच्या माध्यमातून साहित्यातील पात्रांना अस्सल त्रिमिती अस्तित्त्व मिळवून देणारे जगप्रसिद्ध दिग्दर्शक. ‘पथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ हे त्यांचे तीन असामान्य चित्रपट.
अपूच्या आयुष्याभोवती विणलेल्या दोन कादंबऱ्या आणि तीन चित्रपट यांचा तौलनिक अभ्यास करणारे विलक्षण वेगळे पुस्तक. Adaptation [चित्रपटीकरण] या विषयावरील मराठीतील पहिले पुस्तक.
|
सिनेमाचे दिवस पुन्हा पुणे येथील ‘फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या ‘फिल्म अॅप्रीसिएशन कोर्स’ मध्ये दाखल होऊन विजय पाडळकर यांनी या विषयाचे अध्ययन केले. जागतिक चित्रपटांचे विश्व केवढे विशाल असते याचे विस्मयकारी दर्शन त्यांना या दरम्यान घडले. या काळात त्यांनी लिहिलेल्या डायरीला दिलेले हे शब्दरूप. ‘अंतर्नाद’ मासिकांतून क्रमशः प्रकाशित झालेली लोकप्रिय लेखमाला.
|
गर्द रानात भर दुपारी
‘राशोमोन’ हा प्रख्यात जपानी सिने-दिग्दर्शक अकिरा कुरोसावा याचा अभिजात चित्रपट. या महान चित्रपटाचा सांगोपांग अभ्यास करणारे आणि सिने आस्वादाच्या नव्या वाटा शोधणारे हे पुस्तक आहे. ‘राशोमोन’ हा चित्रपट ज्या दोन कथांवर आधारित आहे त्या कथांचा अनुवाद, चित्रपटाची पटकथा, निर्मिती प्रक्रिया आणि आस्वाद शब्दबद्ध करणारा महत्वपूर्ण ग्रंथ.
चित्रपट समीक्षा हा एक प्रकारे धुक्याचे वस्त्र बनविण्याचा प्रयत्न असतो. पण असा प्रयत्न म्हणजे एक आनंददायक आव्हानही असते. हे आव्हान लेखकाने कसे पेलले आहे हे पाहणे वाचकांसाठीही निश्चित आनंददायक आहे.
|
गंगा आये कहां सेअष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे श्रेष्ठ कलावंत गुलजार यांच्या चित्रपट-दिग्दर्शकीय प्रवासाचा आलेख मांडणारे हे पुस्तक आहे. गुलजार हे कवी आहेत, कथाकार आहेत, गीतकार, पटकथाकार, संकलक आणि दिग्दर्शक आहेत. ते उत्तम वाचक आहेत तसेच चित्रकार देखील. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या साऱ्या वैशिष्ट्यांचा त्यांच्यातील चित्रपट दिग्दर्शकावर कसा परिणाम झाला आहे याचा वेध घेणारे हे पुतक आहे. २००६ साली विजय पाडळकर यांनी गुलजार यांची [टप्प्या टप्प्याने] सुमारे वीस तास मुलाखत घेतली. त्या मुलाखतीवर आधारित गुलजार यांच्या संपूर्ण १६ चित्रपटांचा अभ्यास व आस्वाद पाडळकर यांनी या पुस्तकात मांडला आहे.
या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गुलजार लिहितात, “मुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान में, सेनिमा पर लिखने के लिये एक विजय पाडलकर की जरूरत हैं.”
|
सिनेमायाचे जादूगार
सिनेमाच्या मायेची जादू पसरण्यास सुरू होऊन उणीपुरी शंभर वर्षे झाली आहेत. या कालावधीत या कलेच्या असंख्य जादूगारांनी-दिग्दर्शकांनी- आपल्या किमयेने सिनेमाची ही सृष्टी समृद्ध केली तिला अभिजात कलेचे रूप दिले. या दिग्दर्शकांपैकी निवडक अशा पन्नास दिग्गजांच्या कार्यावर, कर्तृत्वावर, स्वप्नांवर आणि स्वप्नपूर्तीवर, तसेच कल्पनांवर आणि कृतींवर प्रकाशझोत टाकणारी लेखमाला विजय पाडळकर यांनी २००८ साली ‘लोकसत्ता’ दैनिकात वर्षभर लिहिली. एका साक्षेपी अभ्यासकाने व अभिजात रसिकाने घेतलेला कलेचा हा लालित्यपूर्ण वेध जाणकारांना व सामान्य वाचकांनाही फार आवडला. त्या लेखमालेचे हे ग्रंथरूप.
|
मोरखुणा
सात अप्रतीम काव्यात्म चित्रपट :
‘प्यासा’, ‘मधुमती’, ‘कैरी’, ‘भेट’. ‘सिटी लाईट्स’, ‘देर्सू उझाला’, ‘बायसिकल थीव्हज’.. या चित्रपटांचा अभ्यासपूर्ण आस्वाद शब्दबद्ध करणारे सात अप्रतीम दीर्घ लेख. ‘अभिजात सिनेमा जनसामान्यापर्यंत पोहोचला पाहिजे या ध्यासाने केलेले हे लेखन वाचकांच्या चित्रपट विषयक जाणीवा विस्तारणारे ठरेल यांत शंका नाही.’
|
बखर गीतकारांची हिंदी चित्रपट संगीत हा असंख्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेकांच्या मर्मबंधातली ठेव आहे. गीतकार हा सिनेगीतातील सर्वांत महत्वाचा घटक. मात्र बहुतेक रसिकांना चित्रपट गीतकारांची माहिती नसते. ज्यांनी हा कारवा पुढे नेला आहे अशा गीतकारांपैकी कित्येक जण आज विस्मृतीच्या काळोखात लुप्त झाले आहेत. शैलेंद्र, साहीर, मजरूह, राजेंद्र कृष्ण अशा सुप्रसिद्ध गीतकारांसोबतच अनेक अलक्षित कवींच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणारा हा आगळा वेगळा ग्रंथ. हा विश्वसनीय इतिहास आहे, ही एक वाचनीय बखर आहे आणि आजच्या युगातील एका महत्त्वाच्या कलेचा अभ्यासपूर्ण आस्वाद देखील आहे.
|
‘देवदास' ते 'भुवन शोम’
‘अभिजात रसिकता, सखोल अभ्यास आणि लालित्यपूर्ण विवेचन यांचा विजय पाडळकर यांच्या लेखनात असलेला मनोज्ञ संगम मराठी साहित्यात दुर्मिळ आहे. मराठीतील चित्रपट समीक्षेची पायवाट विस्तारत नेऊन तिचा राजमार्ग बनविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. ‘विसाव्या शतकातील हिंदी सिनेमाचा इतिहास’ या द्विखंडात्मक भव्य प्रकल्पाचा हा प्रथम खंड. १९३५ सालच्या ‘देवदास’ पासून १९६९ सालच्या ‘भुवन शोम’ पर्यंत सुमारे पस्तीस वर्षांच्या या कालखंडातील निवडक चित्रपटांचा साक्षेपी अभ्यास या ग्रंथात शब्द बद्ध झाला आहे.
|
शेक्सपिअर आणि सिनेमा शेक्सपिअर हा जगातील सर्वश्रेष्ठ नाटककार समजला जातो. सामान्य वाचकांपासून ते अभिजात कलावंतांपर्यंत, लेखकांपर्यंत, तत्त्वचिंतकांपर्यंत असंख्यांवर त्याचा मोठा प्रभाव पडला आहे. त्याच्या नाटकांची मोहिनी जगभरातील महान चित्रपट दिग्दर्शकांवर देखील पडलेली असून त्याच्या नाटकांवर आजवर चारशे पेक्षा अधिक चित्रपट निर्माण झाले आहेत. शेक्सपिअरसारख्या शब्दप्रभूला दृश्य प्रतिमांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना, सिने दिग्दर्शकांना आलेल्या यशापयषाची चिकित्सा करीत नाटक आणि सिनेमा या वरकरणी परस्परविरोधी वाटणाऱ्या कलांच्या साम्यभेदांचा तौलनिक अभ्यास करणारा हा ग्रंथ विजय पाडळकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे.
२०१६ साली जगभर शेक्सपिअरची चारशेवी पुण्यतिथी साजरी केली गेली. हे औचित्य साधून प्रकाशित झालेल्या या ग्रंथात गेल्या पंधरा वर्षांपासून पाडळकर करीत असलेल्या साहित्य आणि चित्रपट या दोन कलांच्या सखोल अभ्यासाचे प्रतिबिंब पडलेले दिसेल.
|
गगन समुद्री बिंबले...सत्यजित राय या महान चित्रपट दिग्दर्शकाचे बहुसंख्य चित्रपट हे कुठल्या न कुठल्या साहित्यकृतीवर आधारित आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा चित्रपटांची समीक्षा करताना मूळ साहित्य कृतीचा संदर्भ घेतला तर साहित्य आणि चित्रपट या दोन्ही कलांची बलस्थाने समजू शकतात. विभूती भूषण बंदोपाध्याय यांच्या दोन कादंबऱ्या [आणि त्यावर आधारित राय यांचे तीन चित्रपट], रवींद्रनाथ टागोरांच्या चार कथा [व त्यांवर आधारित राय यांचे चार चित्रपट], प्रेमचंद यांची कथा तसेच इब्सेन याचे नाटक [आणि त्यावर आधारित दोन चित्रपट] अशा विविध कलाकृतींचा अभ्यास पाडळकरांनी या ग्रंथात सादर केला आहे. एका प्रतिभावंताच्या कृतीमधून दुसऱ्या प्रतिभावंताने निर्मिलेली तशीच प्रभावी कलाकृती म्हणजे जणू आकाशाचे सागरात उतरणेच होय....
|