|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] गेले तीन चार ब्लॉग आपण तत्वचर्चेत बुडालो असल्यामुळे आपल्या बेडकाला विसरलो होतो. पुन्हा एकदा त्याची भेट घेऊ. बाशोचा हायकू, मला वाटते आतापर्यंत सर्वांना पाठ झाला असेल. प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक एक काळ असा होता की हायकूला ‘झेन तत्वज्ञानाचे काव्यात्म रूप’ असे समजले जात होते. आज ती कल्पना कालबाह्य झाली आहे. अनेक तरुण जपानी कवींना, आणि बहुतेक परकीय हायकूकारांना झेन तत्वज्ञानाची नीट ओळख नाही. हायकू लिहिण्यासाठी वा अनुवादित करण्यासाठी त्याची गरज आहे असे त्यांना वाटत नाही. असे असले तरी बाशो हा झेन सांप्रदायाचा अभ्यासक होता व त्याच्यावर असलेला ‘झेन’ प्रभाव या हायकूत देखील स्पष्ट दिसतो. हा हायकू म्हणजे 17 ओन मध्ये सांगितलेली काव्यात्म ‘झेन कथा’च आहे. प्राचीन तलाव या हायकूचे मध्यवर्ती केंद्र आहे. तो किती प्राचीन आहे हे सांगता येत नाही. अर्थात त्याची गरजही नाही. तो ‘प्राचीन’ आहे एवढे पुरेसे आहे. मग आपल्याला दिसते की एक बेडूक त्या तलावात उडी मारतो आहे, आणि त्या उडीतून एक आवाज निर्माण होत आहे. फक्त आवाज नव्हे, कवीच्या मनात आणखी काहीतरी निर्माण झाले आहे. ती आहे ‘जाण’. तो आहे आत्मसाक्षात्कार. Enlightenment. असे म्हटले जाते की बुद्धाला पहाटेच्या तार्याकडे पाहून ‘साक्षात्कार’ झाला. या क्षणाला जपानी भाषेत ‘सटोरी’ असे नाव आहे. एखाद्या बाह्य घटनेमुळे अचानक सार्या चित्तवृत्ती स्थिर होतात, मन स्वच्छ होते. निर्मळ होते. आणि माणूस विश्वाशी एकरूप होतो. हा साक्षात्कारी क्षण समजावून सांगता येत नाही, ज्याला तो साक्षात्कार झाला त्याला देखील आपल्या आत नेमके काय घडले हे समजत नाही, मग इतरांना ते सांगणे दूरच. ‘ज्ञान जे समजावून सांगता येते ते विश्वात्मक ज्ञान नसतेच’ अशी ताओ तत्वज्ञानात एक संकल्पना आहे. बुद्धासाठी तार्याचे दिसणे हा साक्षात्कारी क्षण होता, बाशोसाठी, ‘बेडकाने उडी मारणे’ हा. या हायकूतील अव्यक्त भाव ‘मी एकाकी आहे’ हा आहे. एका समीक्षकाने लिहिले, ‘ही कविता हा एक प्रवास आहे-शांततेकडून ध्वनीकडे व ध्वनिकडून परत शांततेकडे.’ आणखी एका रसिकाच्या मते, ‘येथे मांडला गेला आहे तो फक्त एक क्षण. या कवितेत स्थल आणि काळाचा विस्तार नाही. कोणतीच कविता याहून साधी असू शकत नाही. ती अनन्यसाधारण आहे.’ प्रत्येक क्षण हा एक नवा ‘अर्थ’ मनात निर्माण करू शकतो. तेवढ्या उत्कटतेने तो जगला मात्र पाहिजे. त्या दिवशी बेडकाने हायकूत मारलेली उडी एका अर्थाने युगप्रवर्तक ठरली. कारण त्यानंतर प्राण्यांकडे पाहण्याच्या जपानी कवींच्या दृष्टीतच फरक घडून आला. पण हा फरक झाला होता तो कुणा एकाच्या कवितेमुळे. तो आतून आलेला नव्हता. त्यामुळे इतरांनी त्यानंतर लिहिलेले ‘बेडकावरील हायकू’ बहुतेक वेळा पृष्ठस्तरावरच राहिले. त्यांची उडी खोल गेलीच नाही. बाशोच्या या सुप्रसिद्ध ‘बेडूक-तलाव’ हायकूबद्दल नंतरच्या हायकूकवींनीही अनेक टिपणे लिहिली आहेत. शिकी, ज्याला आधुनिक हायकूचा निर्माता’ असे मानले जाते, त्याने या संदर्भात एक सुरेख टिपण लिहिले आहे. तो कल्पनेत बाशोला त्याच्या झोपडीत एकटा बसलेला पाहतो. [इतर टीकाकार जसे मानतात तसे ‘मित्रांच्या, शिष्यांच्या घोळक्यात’ नव्हे. ] शिकी लिहितो, ‘बाशोच्या मनात हायकूच्या परंपरागत रचनेबद्दल असमाधान होतेच. काहीतरी एक वेगळा मार्ग शोधायला हवा असा तो विचार करीत होता. जणू एखाद्या धुक्यात बसावे तसा तो बसून होता. Trance’ मध्ये असल्यासारखा. अर्धजागृत, अर्धनिद्रिस्त. भोवती सर्वत्र शांतता होती. अशावेळी त्याला ‘तो’ आवाज ऐकू आला. बेडकाने तळ्यात उडी मारल्याचा आवाज. त्याच्या कानात कोठूनसे शब्द उमटले, ‘बेडूक उडी मारतो...पाण्याचा आवाज.’ बाशो स्वप्नातून जागा झाला त्याच्या चेहर्यावर स्मित फुलले होते.’ अनेक कवींनी बाशोच्या बेडकाच्या पाठीवर बसून तलावात उडी मारलेली आहे. 19व्या शतकातील प्रसिद्ध जपानी कवी र्योकान याने या हायकूच्या संदर्भात एक हायकू लिहिला आहे- नवीन तलाव बेडूक उडी मारतो आवाज नाही. आपण ‘नवीन तलावात उडी मारणारे बेडूक’ आहो आणि आपल्या ‘हायकूत उडी’ मारण्यामुळे कसलाही आवाज होणार नाही असे तर कवीला सुचवायचे नसेल? एखादी कविता लोकप्रिय झाली की तिची विडंबनेही होऊ लागतात. एका कवीने लिहिले - तळ्याकाठी चिंतन करतोय बाशोचा बेडूक माशी केव्हाच उडालीय बाशोच्या या हाइकूची लोकप्रियता इतकी वाढली की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना त्याचा मोह पडलेला आहे. सेनगई नावाच्या एका चित्रकार भिख्खूने 18 व्या शतकात काढलेले एक चित्र उपलब्ध आहे. या चित्रात एका केळीच्या झाडाखाली एक बेडूक बसलेला दिसतो. [जपानी भाषेत ‘बाशो’ म्हणजे फळ न येणारे केळीचे झाड हा संदर्भ ध्यानात घ्यायला हवा]. या चित्राच्या वरच्या बाजूस एक हायकू लिहिला आहे- इथे तलाव असता तर मी उडी मारून बाशोला आवाज ऐकवला असता आधुनिक काळात देखील या हायकूची लोकप्रियता कमी झालेली नाही. Marlin Mountain [1939-1987] या अमेरिकन कवयित्रीचा एक हायकू प्रसिद्ध आहे. तिने तो जपानी पद्धतीने एका ओळीत लिहिला आहे. Old pond frog rises belly up प्राचीन तलाव बेडूक तरंगतोय पोट वर अगदी अलीकडे, म्हणजे 1987 साली जपान एयरलाईन्सने या हायकूचा संदर्भ घेत स्वतंत्र हायकू लिहिण्याची स्पर्धा घेतली होती. तिच्यासाठी हजारो स्पर्धकांनी आपले हायकू पाठविले होते. या स्पर्धेत Bernard Einbound च्या ज्या हायकूला पहिले बक्षीस मिळाले तो असा होता- बेडूक-तलाव एक पान पडले आवाजाविना -प्रत्येकाच्या तळ्यात काही पडले तर आवाज येईलच असे नाही. बाशोच्या बेडकाने तलावात मारलेली उडी किती खोल गेली आहे याचा अभ्यासक सतत शोध लावतच असतात. उडीमुळे निर्माण झालेल्या आवाजाचे प्रतिध्वनी अजून जगभर घुमतच आहेत! येथपर्यंत मी लिहिले होते व लेख पूर्ण केला होता. माझ्या नव्या पुस्तकात हा लेख अंतर्भाव करण्यासाठी पुन्हा वाचला तेव्हा माझ्या मनात आले, या हायकुला आधुनिक संदर्भही आहे. बाशोच्या काळात सर्वत्र तलाव होते आज त्यापैकि बहुसंख्य आटले आहेत. जग हळूहळू कोरडे होत चालले आहे. उडी मारण्यास पाणी नसेल तर बेडूक काय करील? माणूस काय करील? चिंतेशिवाय दुसरे काय? मग मला जाणवले की मीच बेडूक आहे. मीच बाशो [कवि]. माझ्यातील बेडकाने पाणी नसलेल्या जमिनीवर उडी मारली तरी ‘आवाज’ कसा येणार? मनात स्निग्धता नसेल तर नवनिर्मिती कशी होणार? थोडा विचार केल्यावर ध्यानात आले की हे सार्या कलांसाठी लागू होणारे सत्य आहे. कलेला रसाची आवश्यकता असते आणि आटला तर सृजनशीलता करपून जाते. आणि मी लिहिले - बाशो आहे मी आहे
तलाव मात्र नाही चिंता करतोय बेडूक
3 Comments
नीतिन वैद्य
3/14/2026 09:30:08 pm
मस्त तरी इथे मात्र शब्दही जास्तीचा वाटतोय.
Reply
शरद तरडे
3/14/2026 09:45:09 pm
खूप सुंदर रितीने समजावले आहे तुम्ही सगळी प्रक्रिया! एकाच गोष्टीकडे अनंत बाजूने पहायची सवय लागली तर समृद्ध जीवनाकडे वाटचाल सुरू होते.
Reply
Jayant Raleraskar
3/15/2026 12:25:28 am
आवाजासह उडी आणि आवाजरहित उडी हा प्रवास मजेशीर वाटला.
Reply
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |

RSS Feed