|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] हायकूच्या अनुवादासंदर्भात अनेकांनी माझ्याकडे काही प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी ही खास पोस्ट अनुवादसंदर्भात. ‘घंटेवरले फुलपाखरू’ या तीन श्रेष्ठ जपानी कवींच्या हायकूंच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या प्रकाशनप्रसंगी केलेले भाषण, थोडक्यात. ‘जपानचे तीन महाकवी आणि त्यांचे कार्य यांचा परिचय करून देत त्यांच्या सुमारे पाचशे हायकुंचा भावानुवाद सादर करणारे हे पुस्तक आहे. शाळेत असतानाचे ते दिवस मला आठवतात. त्या दिवसांतच कवितांची गोडी मनाला लागली होती. प्रथम वाचलेले कवितांचे पुस्तक होते ‘विशाखा’. मग बालकवी, गोविंदाग्रज, केशवसुत, तांबे वाचले. कवितांची भूल मनावर पडायला सुरुवात झाली होती. मग कॉलेजमध्ये गेल्यावर बोरकर, मर्ढेकर, ग्रेस वाचले. भूल वाढतच गेली. गंमत म्हणजे इतर भाषांतील लेखक वाचायला सुरुवात केल्यावर देखील प्रथम कवीच वाचले. टागोर आणि खलील जिब्रान. गालिब आणि साहीर. नंतर पास्तरनाक, रिल्के आणि फ्रॉस्ट. नक्ष लायलपुरीचा एक शेर आहे- ‘कहां तक नाम गिनवाये, सभीने हमको लूटा है’! सांगायचं म्हणजे कवितेशी नाते इतके जुने आहे. या कवितांच्या वाचनाने मनाची कवितेला प्रतिसाद देण्याची एक बैठक तयार झाली. कधी वाटायचे की आपणही कविता लिहाव्यात. ही गोष्ट आज माझ्या फक्त एकाच मित्राला ठाऊक आहे की माझ्या दोन कविता १९७०-७१ साली ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. पण मला अजून आठवते की लिहिताना त्या भलत्या ग्रेट आहेत असे वाटले होते, आणि हेही स्पष्ट आठवते की छापून आल्यावर प्रथम जाणवले होते ते त्यांचे सामान्यपण. मी ज्या कविता वाचत होतो, अनुभवत होतो त्या तुलनेत माझ्या कविता कुठेच नव्हत्या. जी.ए.नी एका पत्रात लिहिलेले मी खूप नंतर वाचले, “कवी म्हणून माझी निवड झालेली नव्हती.” मला जाणवले की कवींच्या भूमीत घुसखोरी करता येत नाही. तिच्यात राहण्याचा परवाना तुम्हाला ‘वरून’ मिळावा लागतो. पण तिथले नागरिकत्त्व मिळाले नाही तरी तेथे जाऊन येण्याचा प्रवासी व्हिसा जरूर मिळतो आणि तो मिळतो अनुवादातून. कविता लेखन थांबले, पण कवितांचे वाचन चालूच होते. एकदा गुलजार नांदेडला आले असता त्यांची एक कविता मराठीत अनुवादित करून त्यांना ऐकविली. [त्यांना मराठी चांगले येते.] त्यांना ती आवडली. मग मी त्यांच्या ७५ कवितांचा अनुवाद केला, तो ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ या नावाने प्रकाशित झाला व त्याचे उत्तम स्वागत झाले. या कवितांपैकी काहींचा गुच्छ गुलजारांनी ‘त्रिवेणी’ या नावाने प्रकाशित केला होता. त्यावेळी प्रथम ‘अल्पाक्षरी कवितेची ओळख झाली’. अमेरिकेत मुलाकडे गेलो असता योगायोगाने जपानचा महाकवी इसाच्या ३६० हायकूंचा इंग्रजी अनुवाद हाती आला. तेथल्या वाचनालयात शोधल्यावर तेथे इतरही कवींच्या हायकुंचे अनुवाद मिळाले. त्या सहा महिन्यांत जवळजवळ तीन हजार हायकू मी वाचले. हायकू हे लघु कवितेचे एक रूप. मूळ देश जपान. तेथे सुमारे चारशे वर्षांपासून ‘हायकू परंपरा’ जपली जाते. तीन ओळींत एक संपूर्ण भावस्थिती वाचकासमोर उभी करणे हे हायकूचे प्रधान वैशिष्ट्य आहे. अल्पाक्षरत्त्वाचा आग्रह असल्यामुळे येथे विस्ताराला मज्जाव आहे. जे मांडावयाचे आहे ते अत्यंत कमी शब्दात, जवळजवळ सूत्ररूपाने मांडण्यावर हायकूकर्त्याचा भर असतो. उदाहरणादाखल बाशोचा एक हायकू आपण पाहू- पर्णहीन फांदीवर कावळा येऊन बसला शरदातील संध्याकाळ हे एक निसर्गचित्र आहे की संध्याकाळविषयी कवीला काही सांगावयाचे आहे? कवी फक्त ‘संध्याकाळ’ लिहितो. त्याचा अर्थ ‘संध्याकाळी’ असा घेतला तर हे मोजक्या रेषांनी रेखाटलेले एक निसर्गचित्र बनते. पण ‘संध्याकाळप्रमाणे’ असा घेतला तर कावळा आणि संध्याकाळ मधील सीमारेषाच संपून जाते.[येथे हेही ध्यानात घेतले पाहिजे की जपानी परंपरेत हायकुमध्ये ‘प्रमाणे, सारखा,’ असे शब्द वापरू नयेत असा संकेत आहे.] कावळा जसा फांदीवर बसला आहे तशी ही संध्याकाळ कवीच्या मनावर येऊन बसली आहे. आता ‘पर्णहीन’ हा शब्द कवीच्या मनाची स्थिती दर्शविणारा बनतो आणि कवितेची दिशा बदलून जाते. फांदीवरल्या कावळ्याचे वजन आता आपल्याला जाणवू लागलेले असते. बुसोनचा असाच एक हायकू आहे- वसंत जातो आहे कोठे ते माहित नाही- बोट नांगरलेली ‘नांगरलेली’ बोट हे कवीच्या आयुष्याचे प्रतीक म्हणून पहिले तर ती, एका ठिकाणी असून सुद्धा आपल्याला किती दूर घेऊन जाते! हायकू हा माणसाची निसर्गाशी आणि स्वत:शी होणाऱ्या भेटीचा क्षण अलगद टिपतो. हायकू हे ‘पाहणे’ आणि ‘अनुभवणे’ यांचे संयुग असते. हायकूत कवी त्या अनुभवात इतका खोल खोल जात राहतो की एका क्षणी तोच अनुभव बनतो. अनुभव त्याच्या अस्तित्त्वात असा काही विरघळून जातो की त्याचे वेगळेपण उरत नाही हायकूंचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे तर अतिशय कठीण बनते. योग्य प्रतिशब्द तर मिळवावेच लागतात, पण मर्यादित संख्येत. सांस्कृतिक भिन्नता असल्यामुळे आपल्या विश्वातील योग्य संदर्भ शोधावे लागतात. मला जपानी येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया जपानी ते इंग्रजी ते मराठी अशी अधिक अवघड बनून जाते. आणखी एक अडचण मला जाणवली. इंग्रजीत जपानी हायकूंचे अनेक अनुवाद झालेले आहेत. इस्साच्या हायकूंचे अनेक वेगवेगळे अनुवाद मला सापडले. आणि ते सारे एकमेकापासून भिन्न होते. बाशोच्या, या ब्लॉगच्या सुरूवातीला सांगितलेल्या, ‘बेडूक हायकूचे’ तर 100 हून अधिक अनुवाद माझ्याजवळ आहेत. मग कोणता ग्राह्य धरायचा? बुसोन या कवीचा एक जगप्रसिद्ध हायकू आहे. त्याचा माझ्या वाचनात आलेला पहिला अनुवाद- Butterfly Sleeping On the temple bell मी त्याचा अनुवाद असा केला होता- देवळातल्या घंटेवर- झोपले आहे फुलपाखरू त्याचे इतर काही अनुवाद असे होते.
हा इंग्रजी अनुवाद मी प्रथम वाचला असता तर माझा मराठी अनुवाद असा झाला असता- देवळातल्या घंटेवर कुणीतरी शांत झोपले आहे पहा-एक फुलपाखरू प्रश्न असा पडतो मराठी अनुवादसाठी कोणता इंग्रजी अनुवाद ग्राह्य धरायचा? शेवटी मनाचा कौल मानावा लागतो. प्रत्येक भाषेची लय अनन्यसाधारण असते. ती दुसर्या भाषेतील शब्दांतून पकडणे अवघडच. म्हणून काव्याची भाषांतरे सहसा असमाधानकारक वाटतात. जपानमध्ये हायकू संदर्भात काही संकेत पाळले जातात व त्यांचे मूळ परंपरेत असते. ही जपानी परंपरा माहीत नसेल तर तो हायकू नीट समजत नाही व त्याचा अनुवादही ‘नेमका’ होत नाही. हायकूमध्ये नुसता ‘बहर’ असा शब्द असेल तर त्याचा अर्थ ‘चेरीचा बहर’ असा घेतला जातो. हायकूचा अनुवाद जर एवढा अवघड असेल तर मग तो का करावा? या प्रश्नाचे माझे उत्तर असे की हायकू वाचताना मला जो आनंद मिळाला तो मनातल्या मनात त्यावर चिंतन करताना द्विगुणीत झाल्यासारखा भासत होता. कधीकधी कसलाही जाणीवपूर्वक प्रयत्न न करता काही प्रतिशब्द मनात तयार होत आणि कागदावर प्रकट होण्याची मागणी करीत. दुसरे असे की जे आपल्यापर्यंत आले ते इतरांपर्यंत पोचविण्याची एक अनिवार उर्मी माझ्यात आहे. म्हणून मी हे अनुवाद केले. इस्साचा एक हायकू आहे- वसंतातील संध्याकाळ मी एका मेणबत्तीने दुसरी पेटवीत जातो हे अनुवाद म्हणजे एक प्रकारे ‘दुसरी मेणबत्ती’ पेटविण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेतून येताना तेथे वाचलेल्या सुमारे ३००० हायकू पैकी ५०० हायकूंची निवड केली व ते घेऊन परत आलो. नंतर मी रोज फक्त एका हायकूचा अनुवाद करण्याचे ठरविले. सकाळी एक हायकू वाचायचा, दिवसभर तो मनात घोळवायचा आणि रात्री त्याचा अनुवाद करून एका फाईल मध्ये सरकवून द्यायचा. एक महिन्यानंतर लिहिलेल्या तीस हायकुंचे पुन्हा वाचन करायचे, त्यांत सुधारणा करायच्या आणि पुढे सरायचे. अशा प्रकारे अनुवादित केलेले सुमारे पाचशे हायकू या संग्रहात मी समाविष्ट केले आहेत. फक्त एक ‘वैधानिक इशारा’ देऊन ठेवतो. हायकूच्या आकलनासाठी आणि आस्वादासाठी वाचकाचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. हायकू वाचल्यानंतर, ‘हे काहीतरी अवघड दिसते आहे’, किंवा ‘हे काही समजले नाही’ अशी त्वरित कमेंट करून पुढे सरकत गेले तर हायकूच्या विश्वात तुम्हाला कधीच प्रवेश मिळणार नाही. असे करणे म्हणजे काठावर बसून समुद्राची कल्पना करणे होय. कुठल्याही कलाकृतीच्या आस्वादासाठी मनाची स्वागतशील अवस्था अत्यावश्यक असते. हायकूच्या संदर्भात तर जास्तच. हायकू हे निवांतपणे, ‘चित्ती हळुवारपणा’ आणून, एकट्यानेच वाचायचे असतात. सहज जाताजाता चार हायकू वाचू असे म्हणून हायकू वाचता येत नाहीत. शेवटी या अनुवादासंदर्भात मी लिहिलेला एक हायकू: तळ्यातल्या सावल्या उडणाऱ्या पक्ष्यांच्या तसे हे हायक धन्यवाद.
1 Comment
Angha
3/7/2026 07:31:36 pm
किती सुबोध लेखन हे!
Reply
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |


RSS Feed