|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे या ब्लॉगवर आपण हायकू या काव्यप्रकारासंबंधी, त्याच्या रूपाकाराविषयी, अनेक श्रेष्ठ जागतिक हायकू कवी व त्यांच्या काव्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहो. मात्र ही माहिती घेण्यासाठी हायकू रसिकाला हायकूच्या व्याकरणाची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे असे समूहावरील प्रतिक्रियेतून मला जाणवले. त्यामुळे या व पुढील ब्लॉग मध्ये या विषयावर मी लिहिणार आहे. या संदर्भात मी ‘हायकूच्या विश्वात’ हे दीर्घ पुस्तक लिहिले असून येत्या काही महिन्यांत ते प्रकाशित होईल. त्यातल्या एका प्रकरणाचा हा सारांश. 1] हायकू हा जपानी काव्य प्रकार आजच्या काळात जगभर लोकप्रिय झालेला असला आणि अनेक देशांत हायकू लिहिण्याची परंपराही तयार होताना दिसत असली तरी ‘हायकू’ची सर्वमान्य व्याख्या मात्र अजून केली गेली नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की हायकूच्या आजवर ज्या ज्या व्याख्या करण्यात आल्या त्यापैकी एकही सर्वांना समाधानकारक अशी वाटलेली नाही. हायकू सोसायटी ऑफ अमेरिकाने हायकूची व्याख्या अशी केली होती: Haiku: A poem recording the essence of a moment keenly perceived, in which nature is linked to human nature. Usually a haiku in English is written in three unrhymed lines of seventeen or fewer syllables. ‘हायकू म्हणजे अशी कविता जिच्यात उत्कटतेने अनुभवलेला एक क्षण शब्दबद्ध केलेला असतो आणि तिच्यात निसर्ग आणि मानवी स्वभाव यांची सांगड घातली जाते. सहसा इंग्रजीत हायकू हे तीन निर्यमक ओळीत लिहिले जातात ज्यांत 17 किवा कमी सिलेबल्स असतात.’ ही व्याख्या हायकू सोसायटीनेच 2004 साली बदलली. नव्या व्याख्येनुसार A haiku is a short poem that uses imagistic language to convey the essence of an experience of nature or the season intuitively linked to the human condition.” या व्याख्येत सिलेबल्सच्या संख्येचा उल्लेखही नाही. Gabriel Rosenstock हा अभ्यासक लिहितो, ‘हायकू ही ‘एका श्वासाची कविता’ [one breath poetry] आहे. ती जपानी परंपरेनुसार 17 सिलेबल्समध्ये तर, जपान बाहेर सहसा ‘मुक्त काव्य’ रूपात, तीन ओळीत लिहिली जाते. हायकुच्या संदर्भात ‘ओन’ हा शब्द सतत वापरला जातो. ही संकल्पना काय आहे हे ध्यानात घेतल्यावरच हायकूची रचना नीट समजू शकते. ‘ओन’ हे जपानी भाषेतील उच्चारांचे एकक. ‘ओन’ ही संकल्पना मराठीत नाही. वाक्य उच्चारताना जेथे एक उच्चार संपतो तेथे पहिला ‘ओन’ संपला असे धरले जाते व तेथून पुढे दूसरा ‘ओन’ सुरू होतो. जपानमध्ये अगदी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांना ‘ओन’ मोजण्याचे शिकविले जाते. एक अत्यंत महत्त्वाची सूचना प्रथमच देऊन ठेवतो. विसाव्या शतकात मराठीत हायकू लिहिताना कुणीतरी हायकूत 17 अक्षरे असली पाहिजेत असे बंधन घातले व हायकूला बंधनात टाकून हायकू लिहिणे विनाकारण अवघड करून टाकले. हायकूत अमुक एक अक्षरेच असली पाहिजेत ही चुकीची समजूत आहे. जपानी हायकूत 17 ओन मोजले जात असले तरी ओन व अक्षर यांत फार फरक आहे, त्यामुळे 17 ओनमध्ये जे सांगितले जाते ते 17 अक्षरांपेक्षा जास्त किंवा कमी असू शकते. उदाहरणार्थ, ‘तोक्यो’ मध्ये जपानी व्याकरणाप्रमाणे 4 ‘ओन’ आहेत, इंग्रजीत 3 सिलेबल्स तर मराठीत 2 अक्षरे. ‘ओसाका’ मध्ये जपानी भाषेत 4 ‘ओन’, इंग्रजीत 3 सिलेबल्स तर मराठीत 3 अक्षरे आहेत. त्यामुळे मराठी हायकू लिहिताना त्यात किती अक्षरे आहेत हे कवींनी किंवा वाचकांनी पाहू नये. हायकूचा एक जाणकार शिक्षक, व अभ्यासक अलन गिन्स्बर्ग याने लिहिले आहे: ‘जपानी हायकू मधील 5/7/5 ही रचना इंग्रजीमध्ये जशीच्या तशी आणता येणार नाही. फक्त ध्यानात असू द्या-‘These three lines must make the mind leap!’ मराठी कवींनीही हे ध्यानात ठेवले पाहिजे. मी माझ्या एका हायकूतून हीच भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अडीच अक्षरे प्रेमाची कशी बसवू सतरा अक्षरात अक्षरांच्या संख्येत भावना बसविण्याचा प्रयत्न केला की त्या गुदमरण्याची शक्यताच अधिक. 17 अक्षर हे बंधन पाळल्यामुळे अनेकदा मराठी हायकू अपूर्ण किवा ‘अनावश्यक कात्री लावलेला’ किंवा ‘त्रोटक’ असा जाणवतो. ही बंधने झुगारून देण्याची वेळ आली आहे असे माझे स्पष्ट मत आहे. जपानी भाषेचे स्वरूप असे आहे की 5/7/5 ओनची रचना कवितेला एक आनंददायक ताल [Rhythm] मिळवून देते. त्याची नक्कल करणे दुसर्या भाषेला शक्य नाही. म्हणून मराठी कवींनी आपला ताल आपणच शोधायला हवा.
मग हायकू किती अक्षरांचा असावा? निश्चित आकडा ठरविता येत नसला [आणि त्याची गरजही नाही ] तरी हायकू ही ‘एका श्वासाची कविता’ आहे हे ध्यानात ठेऊन हायकुचे लेखन करायला हवे. एवढे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे की हायकू ही तीन ओळींची, अल्पाक्षरी, अक्षर मर्यादेचे बंधन नसलेली, प्रतिकातून व्यक्त होणारी लघुकविता असते जी एका श्वासात वाचता किंवा सांगता आली पाहिजे. या तीन ओळीत यमक नसले तरी चालेल पण त्यांना एक लय मात्र असली पाहिजे. 2] हायकू हा सामान्यपणे 3 ओळीत असावा. 3] हायकूमधील वाक्याची रचनाच अशा प्रकारे केली पाहिजे की ते वाक्य ‘कवितेचे तीन एकसंघ भाग’ वाटले पाहिजे. 4] हायकुला शीर्षक नको. जे सांगावयाचे आहे ते हायकूतून सांगावे. शीर्षकामुळे वाचकाचे विचार आधीच दुसर्या दिशेला जाण्याचा धोका असतो. 5] यमक जुळविण्याचा खटाटोप नको. बर्याच मराठी हायकूत पहिल्या व तिसर्या किंवा दुसर्या व तिसर्या ओळीत यमक जुळविलेले दिसते. त्याची आवश्यकता नाही. बहुतेक जपानी हायकूत यमकाचा वापर केला जात नाही. यमक सहज जुळून आले तर हरकत नाही पण त्याच्या आग्रहामुळे हायकुला कृत्रिम गेयता येते असे मानले जाते. Encyclopedia Britannica ने तर त्याच्या हायकुच्या व्याख्येची सुरुवातच ‘unrhymed poetic form’ अशी केली आहे. वेबस्टर dictionary मध्येही ‘an unrhymed verse form’ असाच उल्लेख आढळतो. यमक सहज जुळले तर हरकत नाही. ‘यमकामधून’ गेयता आणू नये. 6] विरामचिन्हे, अवतरण चिन्हे टाळली पाहिजेत. 7] हायकूची 17 अक्षरांची मर्यादा जर आपण नाकारली तर मग या काव्य प्रकाराची मुख्य लक्षणे कोणती? तीन ओळीतील एखादी अल्पक्षरी रचना हायकू आहे का नाही हे कसे ठरवायचे? याचा थोडा तपशीलवार विचार करू. हायकूमध्ये तीन महत्वाचे घटक असले पाहिजेत. पहिला म्हणजे निसर्गाविषयीचे प्रेम, जवळीक, निसर्गतादात्म्यता. दुसरा घटक म्हणजे, हायकूत विलक्षण सूचकता हवी. जे सांगायचे ते स्पष्टपणे मांडू नये. यामुळे उत्तम हायकू हा नेहमी विचारांच्या अनेक दिशा सूचित करणारा असतो, त्यामुळे एकाच हायकुची अनेक अर्थनिरूपणे होऊ शकतात. रचनेतील संदिग्धता ही दिखाऊ असू शकते पण अर्थातील संदिग्धता ही वैचारिक प्रवासाला आवाहन करू शकते. जी रचना एकच अर्थ स्पष्ट करू इच्छिते ती हायकू नसतेच. [किंवा कवीचा हट्टच असेल तर तिला ‘साधारण हायकू’ म्हणू.] तिसरे म्हणजे, हायकूत दोन वेगवेगळी बिंबे असायला हवीत, आणि त्यांचे नाते मांडले जावे. हे नाते पुन्हा प्रत्येक वाचकासाठी वेगळे असू शकते. 8] हायकूत म्हणी, वाक्प्रचार यांचा अंतर्भाव करू नये, जनमाणसात रूढ असलेल्या म्हणी वापरू नयेत, कारण त्यांचा एखादा वेगळा, तयार अर्थ वाचकाने लावलेला असतो, किंवा त्याच्या मनात असतो. 9] हायकूत सहसा शब्दांची पुनरावृत्ती करू नये. एकाच अर्थाचे दोन शब्द वापरणेही टाळावे. जितके शब्द कमी तितकी सूचकता अधिक. ‘अधिक माहिती देणे’ अर्थाला मर्यादित करू शकते. 10] ’शब्दांचे खेळ’[wordplay] सहसा टाळायला हवे. कधी खेळ सहज जमून गेला तर तो त्याज्य मानू नये. 11] निसर्ग,ऋतुदर्शक शब्द [ज्याला जपानी भाषेत ‘किरेजि’ म्हणतात] हायकूत आलाच पाहिजे असे नव्हे. आधुनिक माणसाला दुर्दैवाने निसर्गापासून दूर जावे लागले आहे. त्याने आजूबाजूच्या जगातूनच कवितेचे विषय शोधले तर ते हायकूला वर्ज्य नसावेत. 12] ठोस प्रतिमा वापरायला हव्या. ठोस प्रतिमा इंद्रियांना आकर्षित करतात ज्यामुळे वाचक दृश्य, वस्तु किंवा कल्पना, ध्वनि, वास, चव आणि स्पर्श यासारख्या संवेदना वेगळ्या रूपात अनुभवू शकतात. त्या विशिष्ट आणि मूर्त असतात. अमूर्त प्रतिमा टाळा, ज्या इंद्रियाद्वारे थेट जाणवत नाहीत. 13] न्यायदाते बनू नका. आपण मांडले तेच सत्य असा आग्रह धरू नये. असा आग्रह हायकूला एकांगी व कमकुवत बनवू शकतो. संदेश देण्याचा, उपदेश करण्याचा, मार्गदर्शनाचा प्रयत्न करू नये. या भूमिका हायकूकाराच्या नाहीत. 14] दुर्बोधता टाळावी. अवघड, बोजड शब्द वापरू नयेत. 15] हायकू हे सहसा पूर्णपणे वस्तुनिष्ठ नसतात कारण मानवी अनुभवाशी त्यांचा जवळचा संबंध असतो. असे असले तरी निसर्गातील घटकांवर भाष्य करताना ‘स्व’ला मध्ये येऊ देऊ नये. ‘मी’, ‘मला’, ‘माझे मत’ असे शब्द सहसा टाळले पाहिजेत. 16] हायकू मधून ‘निष्कर्ष’ सांगण्याचा प्रयत्न कवीने करू नये. तो वाचकाला काढू द्या. 17] केवळ तात्विक विचार मांडू नका. हायकूत अवघड तत्वचिंतन येऊ देऊ नका. ते मूळ रूपात काव्य आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. 18] हायकूत नकारात्मक दृष्टीकोण नको. हायकू ही आशावादी कविता आहे. ती दु:खाचे मानवी जीवनातील महत्त्वाचे स्थान मान्य करते पण दु:खाला शरण जाण्यास नकार देते. दु:खाचे अस्तित्त्व मान्य करते पण सामर्थ्य नाकारते. 19] हायकूमध्ये एक लपलेला अर्थ असायला हवा. मात्र तो स्पष्ट करण्यासाठी धक्कातंत्र वापरू नका. ‘रसिकरंजनी’ वृत्ती, अति सुलभता, सोपेपणा, स्पष्टीकरण हे सारे टाळले पाहिजे. सहजसाध्य कलाटणी टाळली पाहिजे. 20] हायकूत वर्तमानकाळच वापरावा, भूतकाळ आला तर तो वर्तमान काळाशी नाते जोडणारा असावा. जर आठवण हा आजच्या जगण्याचा भाग असेल तर ती आजच्या हायकूचाही भाग होऊ शकते. आठवणीत रमणे हे जर केवळ स्मरणरंजन असेल तर तो मनाचा भावुकपणा असू शकतो. पण आठवण असणे ही माणसाच्या जिवंतपणाचे एक लक्षण आहे. हायकूसाठी आवश्यक हे की विचारांच्या साखळीची सुरुवात आठवणीपासून व्हायला नको. आजच्या क्षणाचा एक भाग म्हणून ती आठवण मनात प्रवेश करीत असेल तर ती हायकूत येऊ शकते. 21] आत्ताच्या क्षणावर लक्ष केन्द्रित करा’ पण ‘आताचा क्षण’ ही गेलेला क्षण आणि येणारा क्षण यांच्यामधील कडी आहे हे भान कवीला असायला हवे. 22] ‘सारखे’, ‘प्रमाणे ‘ असे शब्द टाळावे. ‘तुलना’ नको. उपमा, उत्प्रेक्षा असे अलंकार नकोत. 23] प्रत्येक विषयाला ‘तीन ओळीत’ बसविण्याचा प्रयत्न नको. जर तो विषय अधिक शब्द मागत असेल तर वाटल्यास त्यावर स्वतंत्र कविता लिहा. 24] हायकूला विनोद वर्ज्य नाही, फक्त तो केवळ ‘हसविण्यासाठी’ नसावा. जपानमध्ये निखळ विनोदी हायकू देखील लिहिले जातात पण त्यांना ‘सेनर्यू’ असे नाव आहे. [याविषयी एक स्वतंत्र लेख पुढे लिहिला जाईल.] 25] हायकू लिहिताना मनाला भटकू देऊ नये. ‘विषयावर’ मन केन्द्रित करण्याचा प्रयत्न करा. हायकू लेखन ही एक प्रकारची ध्यानधारणा आहे. 26] आपल्याला हायकू लिहिता येत नाहीत असे मानून कवीने प्रयत्न सोडू नये. सकारात्मक दृष्टीकोण असू द्यावा तो तुम्हाला लेखनातच नव्हे तर जगण्यातही साथ देईल. 27] सारेच हायकू ‘नियमांनुसार’ लिहिले जातील असे नव्हे. काही हायकूत वरीलपैकी काही नियम पाळले जाणारही नाहीत. 28] एक सल्ला : हायकू लिहिल्यावर लगेच प्रकाशित करण्याची घाई करू नये. लिहीलेल्या हायकूत दुरूस्ती करणे कमीपणाचे समजू नये. अनेक श्रेष्ठ हायकूकारानी आपल्या हायकूत तो प्रकाशित झाल्यावर देखील ‘सुधारणा’ केल्याची उदाहरणे सापडतील. सारेच हायकू उत्तम लिहिले जातील असे मानू नये. अनेक महान कवींनी सामान्य हायकू लिहिले आहेत. बाशोने लिहिले आहे, ‘जर तुम्ही आयुष्यात पाच उत्तम हायकू लिहिलेत तर तुम्ही ‘हायकू कवी’ आहात; दहा लिहिले तर तुम्ही श्रेष्ठ कवी.’ सरतेशेवटी वाचकांसाठी : हायकू वाचताना प्रत्येक हायकुला थोडा वेळ द्या. पुढल्या हायकूकडे जाण्याची घाई करू नका. पहिल्या वाचनात हायकू समजला नाही तर लगेच त्याला बाद करू नका. पुन्हा किमान एकदातरी त्याच्याकडे जा. ‘रोज एक पुस्तक’ वाचणार्यांनी कृपया हायकूच्या वाटेला जाऊ नये. हायकू कवींना व वाचकांनाही खूप खूप शुभेच्छा.
4 Comments
Anagha
2/14/2026 08:41:37 pm
हायकू ची अशी ही छान जवळून ओळख करून देत
Reply
दीपाली दातार
2/14/2026 10:36:33 pm
फार समर्पक आणि सविस्तर शब्दात तुम्ही लिहिले आहे सर. हायकू म्हणजे नेमके काय या विषयी छान समजते आहे. अर्थात हे पुन्हा पुन्हा वाचून अंगी मुरायला हवे. मनापासून धन्यवाद. तुमचा इतक्या वर्षांचा अभ्यास ना त्यातून तुम्हाला मिळालेली दृष्टी यामुळे आम्हा नव्याने लिहिणाऱ्यांना मार्गदर्शन होते आहे. 🙏🏻Thanks a lot.
Reply
Tukaram Pundlik Khillare
2/15/2026 04:23:03 am
खूप छान
Reply
प्राची कुलकर्णी
2/15/2026 06:55:03 pm
फार सुरेख आणि सविस्तर पोस्ट वाचण्याचा आनंद मिळाला. हायकूची व्याख्या आणि नियम काय आहेत याबाबत कुतूहल होतंच, ते शमलं. काही गैरसमज होते ते दूर झाले. मुख्य म्हणजे हायकू हा नुसताच एक काव्यप्रकार नव्हे तर ते एक प्रकारे तत्वज्ञानाचं दर्शन घडवणारा मार्ग आहे याची जाणीव झाली. पोस्टमधला मुद्दा, 'आताचा क्षण ही गेलेल्या आणि येणाऱ्या क्षणाला जोडणारी कडी आहे, याचं भान कवीला असायला हवं. ही एक ध्यानधारणा आहे.' हा फारच आवडून गेला आहे.
Reply
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |
RSS Feed