Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

हायकूच्या तळ्याकाठी

हायकूच्या तळ्याकाठी - 25 : हिरवी माया

11/3/2026

0 Comments

 
Picture
काही दिवसांपासून पाऊस थांबला आहे. बहुतेक त्याची या भागातील ड्यूटी संपली असेल. पण त्याने बागेला जे द्यावयाचे ते दिले आहे. बागही आता ते सर्वांना वाटून टाकते आहे. झाडांवर तजेला आला आहे. अनेक झाडांना नवी पालवी फुटते आहे. हिरवळ चोहीकडे ‘दाटली’ आहे. अनेक झाडांच्या खोडावर शेवाळ साचले आहे. अनेक झाडांना फुले येऊ लागली आहेत पण ती अजून सार्‍या दृश्यावर मोठा प्रभाव टाकतील एवढी नाहीत. तळ्यात असलेल्या कमळाच्या वेलाची पाने तळ्याच्या पृष्ठभागावर पसरली आहेत, त्यामुळे पाणी झाकले गेले असून तळे हिरवे बनले आहे. तळ्याकाठाच्या दगडावर बसून मी हे दृश्य पाहत होतो. गेल्या वर्षी गणेश विसर्जनांनंतर, पाऊस थांबल्यावर, मी या बागेत येऊन बसायचो तेव्हा जवळजवळ असेच दृश्य दिसायचे याची मला आठवण झाली. अचानक ‘स्मरल्या मला तेव्हा माझ्याच गीतपंक्ति’.. त्यावेळी एक अर्ध्याकच्चा हायकू वहीत लिहून ठेवला होता.
अलीकडे पलीकडे हिरवळ
तळ्याचे पाणीही हिरवेच-
मन कसे बिनरंगी राहील?
पण मला तो हायकू पूर्ण झाल्यासारखा वाटला नव्हता. काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी ‘अधिक’ आहे ते नको असे जाणवत होते. पण ध्यानात येत नव्हते.  
तळ्याकडे पाहताना त्या ओळी मनात फिरू लागल्या. सुरूवातीला जाणवले की या तीन ओळीत अक्षरसंख्या थोडी जास्तच आहे. हायकुला एवढे वजन पेलत नाही. मग मी अक्षरे कमी करण्याचा प्रयत्न करू लागलो. ‘अलीकडे पलीकडे’ च्या ऐवजी ‘सभोवती’ केले तर?
सभोवती हिरवळ
तळ्याचे पाणीही हिरवे [‘च’ कशाला पाहिजे?]
मन कसे बिनरंगी राहील?
पण अजून मनाचे समाधान होत नव्हते. उठून थोड्या अंतरावर असलेल्या ओढ्याजवळ जाऊन बसलो. वाहते पाणी पाहत. समोरचे पाणी निघून जात होते, नवे पाणी तेथे येत होते. माझ्याहि मनात काही नव्या विचारांनी प्रवेश केला. पुन्हा ते दृश्य मी डोळ्यासमोर आणले. सभोवताली हिरवळ आणि झाडे, तळ्याच्या पाण्यावर देखील त्याच रंगाचा उत्सव. निसर्ग हिरव्या रंगात न्हाऊन निघाला आहे. आज देवीचे नवरात्र सुरू होते आहे. महिला या दिवसात रोज एका रंगाची वस्त्रे परिधान करतात. सृष्टीनेहि आज ‘हिरवा रंग’ निवडला आहे  की काय?

हा बदल मोबाइलच्या ‘नोट्स’ मध्ये टिपून ठेवला. घराकडे निघालो. आपण जे लिहिण्याचा प्रयत्न करीत आहो ते शब्दात मांडता आले आहे का हा प्रत्येल लेखकाला त्रास देणारा प्रश्न असतो. कवीच्या संदर्भात तर त्या लेखनाला ‘कवितेचे’ रूप आले का हाही प्रश्न त्याला छळत असतोच. प्राचीन कथेतील राजकुमारीला सात गाद्यांच्या खाली असलेला केस जसा टोचत होता तसे मला काहीतरी टोचत होते. दिवसभर ही टोचणी अधून मधून तिचे अस्तित्त्व दाखवीत होतीच. रात्री किमान त्या टोचणीचे कारण तरी ध्यानात आले. झेन तत्वचिंतनाचा प्रभाव असलेल्या जपानच्या हायकू परंपरेत सहसा कवि स्वत:चा निष्कर्ष किंवा उत्तर वाचकासमोर स्पष्ट मांडत नाही. तो ते काम वाचकावर सोडतो. माझ्या हायकूत मी माझे ‘मत’ स्पष्टपणे मांडले आहे. आणखी थोडा विचार केल्यानंतर माझे मलाच याचे उत्तर कळाले.

‘मन कसे बिनरंगी राहील’ ही ओळ निसर्गाच्या रंगात आपले अस्तित्त्व विरघळून गेल्याची साक्ष देते. हा प्रश्न कवीने विचारला आहे पण या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे, जे सांगितले नाही पण वाचकाला समजते. मन बिनरंगी राहणार नाही, म्हणजे तेही हिरवे झाले आहे.

मन हिरवे असणे ही कवितेची प्राथमिक अट आहे.

तुमच्या हृदयात एक हिरवी फांदी जिवंत ठेवा, कदाचित एक गाणारा पक्षी तेथे नक्की येईल’ अशा आशयाची एक पारंपारिक चीनी म्हण आहे. हिरवीगार फांदी हे  मनातील आशेचा किरण आणि सकारात्मकता जिवंत ठेवण्याचे  प्रतीक म्हणून तर  गाणारा पक्षी हे  आयुष्यात येणारा अनपेक्षित आनंद किंवा सुख याचे  प्रतीक म्हणून तेथे वापरले आहे. आपण गाणार्‍या पक्ष्याला हायकू म्हणण्यास हरकत नाही.

शिवाय या रचनेची शब्दसंख्या अजून कमी व्हायता हवी. अगदी 5/7/5 मध्ये शब्द बसवले पाहिजेत असे नव्हे मात्र तिन्ही ओळीत एक तलबद्धता आली पाहिजे. मग थोडे शब्द कमी केल्यानंतर ही रचना अशी झाली-
मनाने घेतला
रंग हिरवळीचा
 झाडांचा तळ्याचा...
पण  ही रचना थोडी गद्याकडे झुकणारी वाटत होती. विचार करताना अचानक पुन्हा ती रचना बदलली. कॅलिडोस्कोपला धक्का लागून आत दिसणारी रांगोळी बदलावी तशी. आता नव्या तीन ओळी अशा बनल्या-
झाडे, तळे, हिरवळ
मनही रंगले-  
एकाच रंगात
त्या ओळी ‘नोट्स’ मध्ये लिहून ठेऊन मी मोबाइल बंद केला. नंतर शांत झोप लागली. त्याचा दूसरा अर्थ असा की तेव्हा मला ती रचना ‘असमाधानकारक’ वाटत नव्हती. तेव्हाच्या क्षणी तरी... 
दुसर्‍या दिवशी सकाळी नवा हायकू वहीत लिहून ठेवावा म्हणून मी तो पुन्हा वाचला. पुन्हा काहीतरी ‘डग’ आहे असे वाटू लागले. मी मनाशी म्हणालो, “ठीक आहे, आपल्याला लगेचच तो कुठे प्रकाशनार्थ पाठवायचा नाहीय. वाट पाहू. रात्री विचार करताना ध्यानात आले, ‘झाडे, तळे, हिरवळ’या पहिल्या ओळीत दोन स्वल्पविराम होते! मला हेही आठवले की हायकूमध्ये विरामचिन्हे ही व्याकरणाचे नियम पाळण्यासाठी नसून वाचनाची गती, थांबा [pause], आणि दोन भिन्न प्रतिमातील अंतर यासाठी वापरली जातात. हायकूत पूर्णविराम हा शक्यतो टाळला जातो, कारण हायकू हा कधीही ‘संपलेला विचार’ नसतो. स्वल्पविरामासंदर्भात नियम असा आहे की जिथे ओळ तोडल्यामुळे किंवा शब्दातील अंतरामुळे नैसर्गिक थांबा मिळतो तेथे स्वल्पविराम देणे योग्य नव्हे. माझ्या हायकू मध्ये झाडे, तळे, हिरवळ, आणि रंगले यापुढे स्वल्पविराम दिल्यास चार थांबे येतात व ते लयीला 
बाधा आणतात.  

मग मी ते स्वल्पविराम काढून टाकले. आता हायकुचे अंतिम रूप असे झाले-
झाडे तळे हिरवळ
मनही रंगले-
एकाच रंगात
हे तरी अंतिम रूप आहे का? मी कोण ठरविणार? ​
दिवाळीचा उत्साह सर्वत्र जाणवू लागला आहे. दिवाळीचे दिवस म्हणजे सार्‍या महाराष्ट्रिय रसिक वाचकांसाठी ‘दिवाळी अंकांचे दिवस’. या काही दिवसात मराठीत सुमारे 400 दिवाळी अंक येऊन दाखल होतात. प्रत्येकाचे आवडते अंक ठरलेले असतात. आवडते लेखक ठरलेले असतात. त्यांचे लेखन वाचणे, इतरांना सांगणे, इतरांची निवड ऐकणे इत्यादि ‘काव्य-शास्त्र-विनोदात’ दिवस कसे जातात कळत नाही. अशावेळी बिचार्‍या हायकुकडे कोण पाहणार? त्यामुळे नोहेंबर महिना आपला ‘हायकुच्या तळ्याकाठी’ हा ब्लॉग वरील लेखन बंद असेल. नंतर 1 डिसेंबर पासून पुन्हा आपण एक नवी थीम घेऊन ब्लॉग सुरू करणार आहो. 
ही दिवाळी सर्वांस मंगलमय आनंदाची जावो ही शुभेच्छा.  
0 Comments

Your comment will be posted after it is approved.


Leave a Reply.

    विजय पाडळकर

    Archives

    May 2026
    April 2026
    March 2026
    February 2026
    January 2026

    Categories

    All
    Haiku

    RSS Feed

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क