|
फार वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी मी नांदेड येथे राहत होतो. आमच्या ‘यक्ष’ नावाच्या घरात पाठीमागच्या बाजूस माझी खोली होती. त्या खोलीला लागून, बाहेरच्या बाजूस आमची छोटीसी बाग होती. घर बांधतानाच ज्या गोष्टी मनात ठरविल्या होत्या त्यापैकी एक म्हणजे घराभोवती बागेसाठी शक्य होईल तेवढी जागा सोडायची. आतापावेतो बाग खूप छान वाढली होती. खिडकीपाशी मी वाचत किंवा लिहीत बसलो असलो की अधून मधून बाहेर काहीतरी हालचाल व्हायची व मी बाहेर पहायचो. कोपर्यातल्या जांबाच्या झाडावर एखादी चिमणी येऊन बसली तरी मला समजायचे. कधी एखादे मुंगूस कुंपणावरून इकडून तिकडे जायचे, कधी दोन सरडे एकमेकांचा पाठलाग करीत पळायचे, कधी तीनचार चिमणे पक्षी पानांच्या झुबकयात बसून चिवचिव करू लागायचे. मात्र मला त्यांचा काही त्रास होत नसे. मी वर पहायचो, हसून “आलात का?” असे विचारायचो. अर्थात ते काही उत्तर द्यायचे नाहीत. मलाही उत्तर नकोच असायचे. घरचा कर्ता पुरुष म्हणून त्यांची दखल घेणे माझे कर्तव्य होते म्हणू मी विचारायचो, एवढेच. एके दिवशी असाच मी खिडकीजवळ वाचत बसलो होतो. काहीतरी कामासाठी म्हणून मी घरात गेलो. थोड्या वेळाने परत आलो तर दिसले की खिडकीत एक फुलपाखरू येऊन बसलेले होते. नेहमी भिरभिरत, एके ठिकाणी स्थिर न राहता फिरणारे फुलपाखरू एवढे निवांत बसलेले पाहून मला गम्मत वाटली. मी दारातच उभा राहिलो. पुढे सरकलो तर ते उडून जाईल. बिचारे विश्रांति घेते आहे तर घेऊ द्यावी. काही क्षण ते तेथे थांबले आणि उडून गेले. गोष्ट ही एवढीच पण का कुणास ठाऊक, माझ्या आठवणीत ती कायमची येऊन बसलेली. काही क्षणांचे व आपले काय नाते असते कोण जाणे. ही गोष्ट 2010 च्या सुमारासची. म्हणजे सोळा सतरा वर्षांपूर्वीची. नंतर आज, जीवनात जेव्हा हायकू ऋतु आला आहे तेव्हा, अचानक ती पुन्हा आठवली, आणि मनात काही शब्द आले. फुलपाखरू निवांत बसलेले खिडकीच्या गजावर उपजत: चंचल असलेले नाजुक फुलपाखरू येथे येऊन थांबले आहे. खिडकीच्या कठीण, स्थिर गजांवर. अनेक दिवस या ओळी वहीत पडून होत्या. आज कच्च्या हायकूंची ती वही चाळताना त्या दिसल्या. आणि नांदेडच्या त्या प्रसंगातील आणखी काही तपशील आठवले. मी त्यावेळी रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेवर ‘कवितेच्या शोधात’ या संकल्पित नावाचे पुस्तक लिहीत होतो. ते फुलपाखरू खिडकीत आले तेव्हा माझ्या टेबलावर फ्रॉस्टच्या निवडक कवितांचे पुस्तक होते. माझ्या मनात एक कल्पना आली. मनातले फुलपाखरू जर मनातल्या त्याच पुस्तकावर बसविले तर? माझ्या मनात कल्पनांचे अनेक तरंग उठले. प्रथम जाणवले ते त्या ‘काल्पनिक’ दृष्यातील सौन्दर्य. एक आकर्षक, इवलेसे फुलपाखरू, कवितेच्या पुस्तकावर बसलेले. जणू निसर्गच त्याच्या रूपाने खोलीत आला आहे. ते फुलपाखरू कवितेच्या पुस्तकावर बसले हा केवळ योगायोग नाही, दुरून पुस्तकातील काव्याचा जणू त्याला ‘वास’ आलेला आहे. कवितांमुळे ते पुस्तक केवळ कागद किंवा शाई उरलेले नाही, ते इतके जिवंत, सुगंधी आणि रसाळ आहे की फुलपाखराला ते एक फूलच वाटते आहे. या बिंदुवर निसर्ग आणि मानवी प्रतिभा या दोन वेगवेगळ्या गोष्टी उरत नाहीत. बाह्य सृष्टी ही फुलपाखराच्या रूपाने मानवी निर्मितेला-कवितेला-दाद देण्यासाठी ‘निवांत’ झाली आहे. निसर्ग आणि कलेच्या या अद्वैताने मला अंतर्मुख बनविले. मला हेही जाणवले की त्या दिवशी, खोलीतून थोड्या वेळासाठी बाहेर जाण्यापूर्वी, मीसुद्धा ते कवितेचे पुस्तक हाती घेऊन निवांत बसलो होतो. मनाने त्या कवितांतून फिरत होतो, या कवितेकडून त्या कवितेकडे. रसग्रहण करीत. अगदी फुलपाखरासारखा. मी आणि फुलपाखरू यांतही एक अद्वैत निर्माण झाले होते की काय? असेल वा नसेल. पण एक गोष्ट खरी की आज एकाच दिवशी दोन जन्म झाले होते. पहिला मनातल्या फुलपाखराचा. दुसरा फुलपाखराच्या कवितेचा- फुलपाखरू निवांत बसलेले- कवितेच्या पुस्तकावर मनाने काही क्षण तरी फुलपाखरू झाल्याखेरीज फुलपाखरावर कविता लिहिता येत नाही...
0 Comments
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |
RSS Feed