|
फेब्रुवारी 1940 ची गोष्ट. जपानमधील कोबे या शहरातील एक बर्फाळ सकाळ. भल्या पहाटे प्रसिद्ध हायकू कवि आणि डॉक्टर सेइतो हिराहारा [1905 ते 1007] यांच्या दारावर थापा पडल्या. तीन सैनिक घरात शिरले व त्यांनी कवीला आपल्या कार्यालयात चौकशीसाठी नेणार असे जाहीर केले. कवी म्हणाले, “मी माझ्या दवाखान्यात फोन करून कळवतो.” त्यावर सैनीकाच्या प्रमुखाने स्पष्ट केले, “त्याचा काही उपयोग नाही. तुमच्या सगळ्या मित्रांना आम्ही आधीच ताब्यात घेतले आहे.” या घटनेच्या संदर्भात हिराहारा यांनी लिहून ठेवले आहे, “माझा लहान मुलगा सारे पाहत होता. तो म्हणाला, “वा! आपल्या घरी पोलिस आले आहेत. आपण ‘चोर-पोलिस’ खेळावचे का?” लहान मुलांना या घटनेतील भीषणता जाणवणे शक्य नव्हते पण मोठ्यांनाही ती त्यावेळी जाणवली नाही. मात्र पुन्हापुन्हा अशा घटना घडू लागल्यावर आणि त्यांच्यातून निघणारे घटनाचक्र ध्यानात आल्यावर सर्वत्र एक दहशतीचे वातावरण निर्माण झाले. डॉक्टरना त्या दिवशी चौकशीसाठी नेण्यात आले व नंतर थेट तुरुंगात डांबण्यात आले. नंतरच्या पाच महिन्यांत एकंदर 16 हायकू कवींना अटक करण्यात आली. काही दिवसांनी आणखी 13 कवींना अटक झाली. त्यापैकी शिमादा सेइहो यांचा तुरुंगातील छळामुळे मृत्यू झाला. हा छळ शारीरिक तर होताच, त्याबरोबर मानसिक देखील होता. त्या कैदयाकडून जबरदस्तीने लिहून घेतले जायचे, ‘मी सरकारचा शत्रू होतो, पण आता मी सम्राटांची पूजा करतो.’ आकडेवारी सांगते की 1040 ते 45 या काळात हायकू छापणारी 12 मासिके बंद करण्यात आली, एकंदर 46 कवींना अटक झाली, त्यापैकी दोन तुरुंगातच मरण पावले. हे सारे हायकू कवी ‘New Rising Haiku movement’ शी संबंधित होते. युद्धकालीन हायकू समजून घ्यायचे असतील तर ही चळवळ समजून घेणे गरजेचे आहे. जपानमध्ये हायकू लिहिण्यास सुरुवात झाली तेव्हापासून अधूनमधून कवींनी युद्धाशी संबंधित हायकू लिहिले आहेत. जपानी भाषेतील सर्वात प्रसिद्ध असा युद्ध-हायकू 1689 साली ‘हायकुचा संत’ असे ज्याला म्हटले जाते त्या मात्सुओ बाशो याने लिहिला.
मात्र युद्ध-हायकू लिहिणार्यांची चळवळ ही विसाव्या शतकात निर्माण झाली. जपानचा महाकवी शिकी 1902साली मरण पावल्यानंतर त्याचे शिष्य दोन गटात विभागले गेले. ताकाहामा क्योशी याचा आग्रह असा होता की हायकूने जुन्या परंपरांची बंधने [ 5-7-5 मध्ये विभागले गेलेले 17 ओन आणि निसर्गवाचक शब्द] पाळलीच पाहिजेत. उलट हेकिगोतो याने मांडले की ही बंधने आता कालबाह्य झालेली असून त्यांचा त्याग केला पाहिजे. त्यांच्या बंदिवासातून हायकू मुक्त झाला पाहिजे. मात्र शिकीच्या मृत्यूनंतर त्याने नावारूपाला आणलेल्या होतोतोगिसु या मासिकाची मालकी क्योशीकडे आली व त्याला जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले. त्यामुळे काही काळ तरी प्राचीन पद्धतीच्या हायकुंचा वरचष्मा राहिला. नव्या जाणिवांचे जे कवी होते त्यांनी सारी शक्ति एकवटून आपले अस्तित्त्व टिकविण्याचा प्रयत्न सुरू केला. हायकूत निसर्गाचे, ऋतुचे वर्णन करण्याचे बंधन नाकारले. जनसामान्याच्या जीवनातील घटनांवर हायकू लिहिले जाऊ लागले. नव्या हायकुंचा पुरस्कार करणारी अनेक मासिके सुरू करण्यात आली. 1931 मध्ये जपानच्या सम्राटाने चीनशी युद्ध पुकारल्यानंतर नव्या हायकू कवींनी युद्ध आणि त्याच्या दुसपरिणामावर हायकू लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या चळवळीला ‘New Rising Haiku movement’ असे नाव दिले. परंपरावादी कवींनी ही संधि साधून युद्धावर हायकू लिहिणार्या लोकांना देशद्रोही ठरविण्यास सुरुवात केली. सम्राटाला असा एक साहित्यिक गट आपल्या बाजूने पाहिजे होताच. सम्राटाने परंपरावादी कवींना सरकारमध्ये महत्वाची स्थाने दिली. या स्थानांचा उपयोग करून नव्या आधुनिक कवींचा छळ सुरू केला गेला. लेखाच्या सुरूवातीस दिलेल्या घटनेतील डॉक्टर हिराहारा हे याच आधुनिक कवींच्या गटाचे एक प्रमुख होते. हायकू हा त्याच्या शब्दमर्यादामुळे पूर्ण युद्ध आवाक्यात घेण्याचा प्रयत्न करीत नाही, तो असतो एका स्फोटापुरता किंवा एका बंदुकीच्या गोळीइतका. हायकू क्षण हा भय किंवा उत्कंठेचा क्षण असतो. फार मोठे प्रश्न सोडवणे हे त्याचे धेय्य नसते. युद्ध हायकूत फक्त समोरचा क्षण असतो तो अत्यंत वस्तुनिष्ठ असतो कसलाही अर्थ न लावता तो आपल्यासमोर एक वस्तुस्थिती मांडतो आणि बाजूला होतो. हायकू युद्धाचा अनुभव अतीशय परिणामकारकपणे वाचकापर्यन्त पोचवू शकतो. हायकू व युद्ध दोन्हीचे अनुभव स्वयंस्फूर्त , तुकड्या तुकड्यातून माणसापर्यंत येणारे, संकल्पनातीत, आणि तातडीचे असतात. दोन्हीही आपल्याला श्वास घेण्यास फुरसत देत नाहीत. एक तर आपल्यावर जबरदस्त आघात होतो, नाहीतर होतच नाही. हायकुच्या अत्यंत लहान आकारमानामुळे तो एका क्षणावर लक्ष केन्द्रित करतो. शिवाय तो या क्षणी जे समोर आहे त्यावर लक्ष केन्द्रित करतो, काय असावे यावर नाही. हायकू भाष्य न करता सत्य मांडतो. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला आणि इतिहासातील सर्वात मोठे मानवी क्रौर्य जगाने पाहिले. या घटनेचा परिणाम जपानमधील जनतेवर तर झालाच पण जगभर तिचे पडसास उमटले. हायकू कवींनी या संदर्भात काही अत्यंत परिणामकारक असे हायकू लिहिले आहेत. हिरोशिमा दिवस’- सिमेंटच्या रस्त्याखाली खात्रीने हाडे असणार हा हायकू यासुहिको शिगेमोतो यांचा आहे. 6 ऑगस्ट 1945 ला झालेल्या अणू-हल्ल्याच्या वेळी शिगेमोतो फक्त 15 वर्षांचे होते. त्यांच्या शाळेतील निम्म्याहून अधिक मुले त्या स्फोटात मरण पावली होती. युद्ध संपल्यावर शहराची पुनर्बांधणी झाली, रस्ते सिमेंटचे करण्यात आले.पण त्या रस्त्यावरून चालताना कवीला अजून वाटते की त्या सीमेंटच्या थराखाली खात्रीने त्या निष्पापांचे सांगाडे असणार. शिगेमातो यांचा आणखी एक हायकू – सूर्यास्ताचा चमकणारा प्रकाश जणू हिरोशिमा अजून जळते आहे ‘दाखवा, सांगू नका’ हा नियम युद्धाचे हायकू तंतोतंत पाळतात. अर्थ शोधायचा असतो तो वाचकाने आणि तो त्याचा स्वत:चा अर्थ असतो, कुणी सांगितलेला नव्हे. युद्ध-हायकुंची आणखी काही उदाहरणे-
स्त्रियांना जरी युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव आला नाही तरी त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेच. सुगीता हीसाजो या कवयित्रीने लिहिलेला हा हायकू- रेडिओवर युद्धाच्या बातम्या घरी एकुलता बटाटा मुलांच्या खाण्यासाठी युद्धाचा हिंस्रपणा दाखवणारा हा हायकू- हात नाहीत पाय नाहीत त्यांनी माणसाचा ओंडका बनवला व घरी पाठवला - त्सुरू अकिरा युद्धाच्या झळा मोठ्याबरोबरच मुलांनाही सहन कराव्या लागल्या- भुकेली मुले विकतहेत जुनी हत्यारे दुपारच्या उन्हात -के.जे. हुफ्मन असे असले तरी हायकू ही मूलत: आशावादी कविता आहे. हायकू कवींनी वाचकांच्या मनात आशा फुलविण्याचे आपले प्रयत्न सोडले नाहीत-
0 Comments
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |
RSS Feed