Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

हायकूच्या तळ्याकाठी

हायकूच्या तळ्याकाठी: हायकू ‘काल, आज आणि उद्या’

7/23/2026

0 Comments

 
‘हायकूऋतु’ या व्हाटसप समूहाचे एक मान्यवर सभासद, स्वत: उत्तम लेखक आणि कवी असलेले श्री गोपाळ अवटी यांनी समुहाच्या भिंतीवर एक नोंद टाकली आहे. ती नोंद अशी-
सर्वांच्या विचारार्थ:  
...  
पण in general हायकू जरा जास्तच हळवेपण गोंजारतायत का? असेही वाटत राहते. जगण्यातील निरागसपणा स्वागतार्हच पण "दृष्टिकोनातले बाळबोध भाबडेपण " या अंगाने जरा जास्त वाटचाल होतेय का हायकूची? 
सभोवताल अधिक खडबडीत, रखरखीत,मुखवट्याच्या होत असताना अंतर्मनाची strong मशागत प्रखर हायकू ने करावी अशी आशा मी करू शकेन का? 
जगताना उदासी आणि व्यर्थतेची जाणीव अपरिहार्य असली तरी... 'परिवर्तन- क्रांती- बदल ,जागर' या अंगाने एखादा प्रखर तारा समूह घेऊन अवतरतील का हायकू. 
'वृथा भावूकता' एखादवेळी ठीक पण दणदणीत 'जल्लोष जयजयकार ' घडवित येतील का हायकूचे जथ्थे!! सहन करण्या पेक्षा विधायक संघर्षाचा कैवार घेतील का हायकू.  
बरे! एवढा सुंदर form( शैली) असतानाही तांबे,कुसुमाग्रज,बोरकर भट,ग्रेस वैगेरे मंडळीनी हायकू का नसतील हाताळल्या....... 
असे प्रश्न  group वर अगदी प्रामाणिकपणे मांडावेत असे वाटत होते.  आज धाडस केले. पायरी सुटली असल्यास  ज्येष्ठांनी क्षमा  करावी. 'रुद्रास आवाहन',  'क्रांतीचा जयजयकार',' पसायदान '.... असे काही अमर- शाश्वत ' नव्या मराठी' ला देऊ शकतील का हायकू? या प्रेम भावनेतूनच विचारीत आहे
 _--गोपाळ अवटी  

श्री. अवटी यांनी समुहावरील अनेक हायकू वाचून त्यांच्या मनातील विचार स्पष्टपणे मांडले हे चांगलेच झाले. अशी चर्चाच मला अपेक्षित होती. म्हणून मी थोडे तपशीलवार विवेचन करण्याचा विचार करून हा दीर्घ लेख लिहितो आहे.  ​

श्री. अवटी यांचा हायकूवरील पहिला आक्षेप, ‘हायकू जरा जास्तच हळवेपण गोंजारतात, भाबडेपण जपण्याच्या अंगाने वाटचाल करतात’ हा आहे. मात्र  हळवेपणा किंवा भाबडेपणा याचा दोष काव्यप्रकाराला कसा देता येईल? एक उदाहरण देऊन हे स्पष्ट करतो. मराठी दिवाळी अंकात दरवर्षी किमान 400 कविता प्रकाशित होतात असा एक अंदाज आहे. त्यापैकी 300 कविता तरी सामान्य, हळव्या किंवा कृत्रिम असतात. वाचल्याबरोबर विसरून जातात. त्या बहुतेक कुणाचे तरी अनुकरण करून लिहीलेल्या असतात. आठवणीत राहणार्‍या अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच. यावरून कविता या साहित्यप्रकारालाच सामान्य म्हणता येईल का? सामान्य साहित्याचे पीक कोणत्याही फॉर्म मध्ये भरघोस वाढत असतेच. हायकूमधील भाबडेपण हा दोष हायकू लिहिणार्‍यांचा आहे हायकूचा नव्हे.  

‘सभोवताल अधिक खडबडीत, रखरखीत, मुखवट्याचा होत असताना अंतरमनाची strong मशागत हायकूने करावी अशी आशा मी करू शकेन का?’ 

अवश्य करू शकता. का ते पुढे मी मांडेनच. हायकूच्या मूळ उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचे उद्दिष्ट अंतर्मनाची सशक्त मशागत करणे हे आहे. आणि श्रेष्ठ हायकू इमानेइतबारे ते करतो. जपानी हायकुवर झेन तत्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव आहे. ते तत्त्वज्ञान मनाच्या मशागतीबद्दल बरेच काही शिकवते. अभिजात [classical] हायकू मधून हा विषय वारंवार स्पर्शीला गेला आहे.

‘परिवर्तन, जागर, क्रांति या अंगाने हायकू अवतरत नाहीत.’  

हे विधान बर्‍याच प्रमाणावर सत्य आहे पण ते फक्त मराठी हायकूंच्या बाबतीत. परिवर्तन, जागर या अंगाने हायकू अवतरतात, मात्र ते मराठी वाचकाला माहीत नाहीत. या ठिकाणी थोडासा हायकुचा इतिहास सांगितला तर तो अप्रस्तुत होणार नाही. विसाव्या शतकात जपानी हायकूत एक मूलभूत क्रांती घडून आली. तेथे ‘आधुनिक हायकू’ [Gendai Haiku] जन्माला आला. आधुनिक हायकू कवींनी जुन्या हायकुचे सारे संकेत नाकारले,मोडले. [हायकू 17 ‘ओन’चाच असला पाहिजे, त्यांची विभागणी 5/7/5 अशीच झाली पाहिजे, हायकूत एक निसर्गवाचक शब्द असलाच पाहिजे वगैरे.] हायकुला त्यांनी रानावनातून काढून शहरात आणले. नागरी जीवनातील प्रश्न, समस्या यांना हायकूत महत्त्वाचे स्थान दिले. अमेरिकेत Jack Kerouac [ beat generation चा प्रणेता]याने हायकूंना आणखी सामान्य माणसापर्यंत आणले.   दोन महायुद्धानंतर तर हायकूत आमुलाग्र बदल झाला. प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्यानी, युद्धामुळे पोळाल्या गेलेल्या व्यक्तींनी उत्तम हायकू लिहिले आहेत. उदाहरणार्थ- ​
हात नाहीत पाय नाहीत
त्यांनी माणसाचा ओंडका बनवला
व घरी पाठवला
- त्सुरू अकिरा  
 
भुकेली मुले
विकताहेत जुनी हत्यारे
दुपारच्या उन्हात
-के.जे. हाऊफमन  

खंदकामध्ये
एक घड्याळ टिकटिकते
थंड पडलेल्या मनगटावरचे
– ताकाजो 

रेडिओवर युद्धाच्या बातम्या
घरी एकुलता बटाटा
मुलांच्या खाण्यासाठी
- सुगीता हीसाजो 

 हायकू हा त्याच्या शब्दमर्यादामुळे पूर्ण युद्ध आवाक्यात घेण्याचा प्रयत्न करीत नाही, तो असतो एका स्फोटापुरता किंवा एका बंदुकीच्या गोळीइतका. हायकू क्षण हा भय किंवा उत्कंठेचा वा धक्का देणारा क्षण असतो. फार मोठे प्रश्न सोडवणे हे त्याचे धेय्य नसते. युद्ध-हायकूत फक्त समोरचा क्षण असतो. तो अत्यंत वस्तुनिष्ठ असतो कसलाही अर्थ न लावता तो आपल्यासमोर एक वस्तुस्थिती मांडतो आणि बाजूला होतो. 

आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील अनुभवावर हायकू लिहिले जात आहेत. वंचित, शोषित जनतेच्या भावनांना वाट करून दिली जात आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय हायकू कवी उदयाला आले आहेत. ते आपल्या जीवनातील दू:ख, अपमान, अवहेलना अत्यंत प्रभावीपणे मांडतात. पीडितांचा कैवार घेतात. पण ते ‘जल्लोष करीत’ आक्रोश व्यक्त करीत नाहीत. हायकू माणसाला संयम शिकवतो. तो आधुनिक कवींच्याही रक्तात भिनला आहे. हिरोशिमावर जो बॉम्ब हल्ला झाला, तेथे जो प्रचंड विनाश झाला त्याबद्दल जपानी लोकांच्या मनात अमेरिकनाबद्दल प्रचंड राग असेल असे मला वाटले होते. युद्धावरचे असंख्य हायकू मी मिळवून वाचले पण एकाही हायकूत हा संताप अद्वातद्वा व्यक्त झालेला पाहिला नाही. स्वभावत: हायकू शब्दात जे मांडले आहे त्याच्या पलीकडले सुचवू पाहतो, म्हणून जल्लोष करीत प्रकट होण्याची त्याला गरज भासत नाही. प्रख्यात अमेरिकन कृष्णवर्णीय हायकूकार रिचर्ड राइट याचे हे हायकू पहा-  ​
कोसळणारा पाऊस
फुलांच्या दुकानासमोर
मुलगी स्वत:ला विकते आहे
या दृश्यात महत्त्वाच्या तीन प्रतिमा स्वाभाविकपणे एकत्र आल्या आहेत. एका बाजूला फुलांचे दुकान  [सौन्दर्य आणि सुगंध यांचे प्रतीक] आणि त्याच दुकानासमोर मुलगी स्वत:ला विकते आहे [गरीबी आणि हतबलता]तर त्याचवेळी या सार्‍यांवर मानवी सुख दु:खाच्या पलीकडे असलेला पाऊस [अलिप्त निसर्ग] कोसळतो आहे. हे सारे विलक्षण व्याकुळ करणारे आहे. किंवा - 
जळणारे घर
पांढरा बर्फ पडतोय
काळ्या राखेवर  

[अमेरिकेतील वर्णद्वेषाच्या [Black and White ]संघर्षाला कवीने पांढरा बर्फ आणि काळी राख यांच्या नैसर्गिक प्रतिकांतून मांडले आहे.]  
जागतिक हायकू नव्या नव्या विषयांना कवेत घेण्याचा प्रयत्न करतो आहे. विज्ञान कथेप्रमाणे विज्ञान हायकू [Scifiku] ही नवी संकल्पना तयार झाली आहे. पारंपारिक हायकुचा आकृतीबंध वापरुन निसर्गाऐवजी विज्ञान व भविष्यातील तंत्रज्ञान या विषयावर हे हायकू लिहिले जातात. अमेरिकेत या प्रकारवर काही नियतकालिके देखील सुरू झाली आहेत. एकेकाळी हायकूत वास्तव जीवनाचे प्रतिबिंब असावे असे मानले जात होते. आज काल्पनिकेला देखील हायकूत स्थान दिले जात आहे. [fantasyku]  
आता आपण ‘मराठी हायकुचे भविष्य’ या विवेचनाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळू. मराठी वाचकांना दुर्दैवाने उत्तम हायकू वाचायलाच मिळाले नाहीत, मग त्यांची हायकूविषयक जाण कशी वाढणार? हायकूविषयी प्रेम कसे निर्माण होणार.? मराठी कविपैकी किमान काहीजण नेहमी नवी आव्हाने घेण्यास तयार असतात. ते जर हायकुकडे वळले तर हा किती सशक्त काव्यप्रकार आहे हे वाचकांना समजेल. मराठी श्रेष्ठ आधुनिक कविपैकी कुणीही या साहित्य प्रकाराचा पाठपुरावा केला नाही. [का? हा आणखी एक दीर्घ लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुढे कधीतरी.]  अगदी एखाद्याने, क्वचित हायकू लिहिले आहेत. उदाहरणार्थ पु. शि. रेगे यांचा हा हायकू- 
पळसाला या 
 कुठून एकुलत्या  
 कळलं: माघ? 
त्यामुळे आजच्या कवींसमोर एखादे रोल मॉडेल नाहीच. त्यांनी आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे. असा मार्ग शोधलेल्या अंबादास सोनवणे या एका अलक्षित हायकू कवीने सामाजिक जाणिवेचे उत्तम हायकू लिहिले आहेत. उदा- ​
उन्हाने माजवला
शेतात हाहाकार
घामाचा सडा 

भुकेची आग
पेटली उन्हाळ्यात
पोट रिकामे

कसलाही आक्रोश नाही, घोषणा नाही, तरी समाजातील दाहक वास्तव अत्यंत थोड्या शब्दात किती प्रभावीपणे मांडले आहे!  
असाच प्रयत्न करणारा माझा एक हायकू- ​
भिकारणीची पोरगी
धुळीत काढते
चित्र आईचे
सामाजिक वास्तव, भुकेलेल्यांची वेदना, कलेतून व्यक्त होण्याची प्रेरणा आणि नात्याची ओढ हे सारे तीन ओळीत व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. किंवा क्षिप्रा देशमुख यांचा हा हायकू- 
पेलवेना मला
सीतेचे हे ओझे
जरी तू राम

अत्यंत कमी शब्दात आजच्या सुशिक्षित स्त्री समोरचा एक पेच किती प्रभावीपणे मांडलेला आहे.  
किंवा, आजचे ई-वास्तव आजच्या भाषेत ई-हायकूत मांडण्याचा माझा प्रयत्न-
पौर्णिमेचा चंद्र वहीत
कॉपी पेस्ट केला
कधीतरी वापरण्यासाठी 
डायनोसोरच्या पाठीवरून
हात फिरवते मूल-
आईचे वर्क फ्रॉम होम
फेसबुकवर टाकला हायकू
सत्तर अंगठे, पाच नमस्कार
दोन कॉमेंट्स
सरतेशेवटी: हायकू हा सर्वश्रेष्ठ काव्यप्रकार आहे असे मी कधीच म्हटले नाही.  [हायकुच्या एकाही पौर्वात्य किंवा पाश्चिमात्य टीकाकाराने असा दावा केलेला नाही.] त्याच्या काही मर्यादा आहेत. पण तो एक श्रेष्ठ काव्यप्रकार आहे हे मी मानतो. त्याच्या मर्यादा गृहीत धरून त्यांतील सौंदर्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा. दुसरे म्हणजे माझ्या विवेचनात देखील काही त्रुटि असणे शक्य आहे. [हरिवंशराय बच्चन यांचे ‘कुछ सही कुछ गलत’ हे माझे आवडते वाक्य आहे....] 
 हायकू ही मूलत: आशावादी कविता आहे. ती दु:खाचे अस्तित्व मान्य करते पण त्याला शरण जाण्यास नकार देते. मी एक लहानसा हायकू कवी आहे, मात्र माझ्यातही तो आशावाद नक्कीच आहे. मी आशा करतो की उद्या मराठीला देखील एखादा हायकू महाकवी नक्की मिळेल...  
[श्री अवटी यांचे विशेष आभार. त्यांनी जर हे प्रश्न उपस्थित केले नसते तर ही चर्चा समुहावर झालीच नसती. मलाही माझ्या मनातील काही अस्ताव्यस्त विचार या निमित्ताने एकत्र करता आले. माझ्या आगामी ‘हायकुच्या विश्वात’ खंड 2 साठी या मुद्द्यांचा विस्तार करून एक दीर्घ लेख होऊ शकेल.] 
     ​
0 Comments

Your comment will be posted after it is approved.


Leave a Reply.

    विजय पाडळकर

    Archives

    May 2026
    April 2026
    March 2026
    February 2026
    January 2026

    Categories

    All
    Haiku

    RSS Feed

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क