|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक श्रेष्ठ जपानी हायकू कवि मात्सुओ बाशो हा जपान मधीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ कवीपैकी एक मानला जातो. माझाही तो अत्यंत आवडता कवि. त्यामुळे ‘हायकुच्या तळ्यात’ हा नवा ब्लॉग सुरू करताना पहिले नमन बाशोला करणे क्रमप्राप्त आहे. सुरूवातीला दिलेला हायकू हा बाशोचा सर्वाधिक लोकप्रिय हायकू आहे. बाशोच्या तळ्यात बेडकाने मारलेल्या उडीचे पडसाद चार शतके लोटली तरी अजून उमटत असतात. प्रत्येक उत्कट हायकू कवि आणि रसिक एकदा तरी त्या बेडकाच्या उडीचा आवाज ‘आपल्या पद्धतीने’ ऐकतोच, या तळ्यात डुबकी मारतोच. पण हे सारे जाणण्याआधी आपण या उडी संबंधी थोडे अधिक जाणून घेऊ. इ.स. 1686 मधील गोष्ट. जपानमधील एका लहानसा गावात अनेक कवी आणि काव्यरसिक मात्सुओ बाशो [1644-1694] या मान्यवर कवीच्या घरी जमले होते. ही घटना घडली त्यावेळी बाशोने नुकतीच वयाची चाळीशी ओलांडली असली तरी एक महत्वाचा हायकूकार म्हणून त्याची प्रसिद्धी जपानभर पसरली होती. तो हायकू या काव्यप्रकारात जे नवे प्रयोग करू लागला होता आणि जे परिवर्तन घडविण्याची त्याची इच्छा होती तिला मान्यता मिळू लागली होती. जवळजवळ दोन हजार साहित्य अभ्यासकांनी त्याला गुरू मानून त्याच्या साहित्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. सुमारे सत्तर कवींनी त्याचे शिष्यत्व पत्करले होते. जिवंतपणीच तो एक आख्यायिका बनला होता. असंख्य लोक त्याच्या दर्शनाला येत. या दिवशी अर्थातच नेहमीप्रमाणे या मैफिलीचे प्रमुखपण बाशोकडे आले होते. अशा प्रकारच्या मैफिलीत सर्वसाधारणपणे एक विषय घेऊन त्यावर हायकू लिहिण्याची पद्धत होती. आजचा विषय ‘बेडूक’ हा होता. बेडकावर अनेक कवींनी आपले हायकू सादर केले. बाशोचा एक शिष्य शिको याने या मैफिलीचे फार अप्रतीम वर्णन लिहून ठेवले आहे. तो लिहितो, ‘त्या दिवशी रिमझिम पाऊस पडत होता. बाशोच्या घराशेजारी असलेल्या तळ्यात बेडूक उड्या मारीत असल्याचा आवाज अधून मधून ऐकू येत होता.' काही काळ शांतपणे विचार केल्यावर बाशोने प्रथम 12 ‘ओन’ची रचना सादर केली. ‘ओन’ म्हणजे जपानी भाषेतील उच्चाराचे एकक. मराठीत त्याला पर्यायी शब्द नाही. शिवाय हायकुचा आस्वाद घेण्यासाठी तो ‘ओन’ ची माहिती असणे गरजेचे नाही. [ओनविषयी अधिक माहिती ओघओघाने या ब्लॉगमधून दिली जाईलच.] हायकू तीन विभागांत असतात व त्यांची रचना सामान्यपणे 5+7+5 अशी 17 ओनची असते. बाशोने लिहीलेल्या त्या 12 ओनच्या रचनेचा इंग्रजी अनुवाद असा- Frog jumps in Sound of water ... पण अजून हायकूची सुरुवात त्याला सापडत नव्हती. त्याच्या एका शिष्याने एक ओळ सुचविली. पण ती बाशोला पटली नाही. काही वेळाने त्याच्या या रचनेत ‘प्राचीन तळ्याने’. प्रवेश केला व त्याने हा हायकू असा पूर्ण केला- The old pond Frog jumps in Sound of water पुढे बाशो हे उपनाम घेतलेल्या मात्सुओ किसाकूचा जन्म उइनो या लहानशा गावी ई.स. 1644 साली झाला.. 1678 साली प्रथम त्याने नवीन वर्षाच्या कविता लिहून प्रकाशित केल्या. त्या काळी फक्त मान्यताप्राप्त कवीच असे करीत, यावरून त्याच्या कवितांना मान्यता मिळू लागली होती असे दिसते. काही तरुण त्याचे शिष्यही बनले. अशाच एका शिष्याने भेट म्हणून एक केळीचे झाड आणून त्याच्या अंगणात लावले. हे झाड कवीला आवडले, केळीच्या झाडाला जपानीत ‘बाशो’ म्हणतात. त्यामुळे यानंतर किसाकूने आपले जुने नाव टाकून ‘बाशो’ हे नाव घेतले. [एका पुस्तकात मला असा संदर्भ आढळला की ‘बाशो’ म्हणजे केवळ झाड नसून ‘फळ न येणारे केळीचे झाड’ आहे!] तसा बेडूक हा विषय ‘हायकू’ साठी नवा नव्हता. पण बेडूक हा त्याच्या ‘गाण्यासाठी’ आठवला जायचा, कवी त्याच्या आवाजाचे, त्याच्या संगीताचे, गाण्याचे वर्णन करणारे हायकू लिहीत. हे हायकू सहसा विनोदाच्या अंगाने लिहिले जात. पण त्या दिवशी बाशोने जो हायकू सादर केला त्या पद्धतीने बेडूक कधीच कवितेत अवतरला नव्हता. बाशोच्या काळात जपानी कवितेवर चीनी काव्याचा फार मोठा परिणाम होता. चिनी कवितेत सहसा बेडकाच्या ओरडण्याचे वर्णन केले जायचे. बाशोने प्रथम रसिकांचे लक्ष ‘पाण्याच्या आवाजाकडे’ वेधले. आता हा हायकू पूर्णपणे जपानी बनला. त्याने एक परंपरा मोडली, एक नवी परंपरा चालू केली. कवितेकडे [आणि जगाकडेही] बघण्याचा एक नवा दृष्टीकोण दाखवला. काही वर्षांपूर्वी मी बाशोचे सुमारे 100 हायकू [घंटेवरले फुलपाखरू’ या पुस्तकासाठी] मराठीत अनुवादित केले होते तेव्हा या हायकूचा अनुवाद असा केला होता- प्राचीन तलाव एक बेडूक उडी घेताना पाण्याचा आवाज माझ्यासारख्या ज्या वाचकाला जपानी भाषा येत नाही त्याला [दुर्दैवाने] इंग्रजी अनुवादावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मी वरील अनुवाद हा एका इंग्रजी अनुवादावरूनच केला होता. काही दिवसांपूर्वी नेटवर एका बाशो-अभ्यासकाने व संग्राहकाने या हायकूचे 32 वेगवेगळ्या आस्वादकांनी इंग्रजीत केलेले अनुवाद प्रसिद्ध केलेले माझ्या वाचनात आले. त्यापैकी प्रो. उइदा यांनी केलेला एक अनुवाद असा होता- Old pond Frog jumps in Splash! ‘sound of water’ चे ‘splash’ का झाले याचा शोध घेत असताना मोठी रंजक माहिती हाती आली. मूळ जपानी हायकूचे शब्द असे आहेत- Furu ike ya kawazu tobikomu mizu no oto Furu म्हणजे प्राचीन, Ike म्हणजे तलाव, Kawazu म्हणजे बेडूक, tobikomo म्हणजे उडी मारणे, mizu म्हणजे पाणी. शेवटचा oto हा शब्द omnomatopoeic आहे. Omnomatopoeia म्हणजे The naming of a thing or action by vocal imitation of the sound associated with it. एखाद्या कृतीचे त्याद्वारे निर्माण होणार्या ध्वनिनुसार वर्णन करणे. हा धागा पकडून आता या हायकूचे भाषांतर मी नव्याने केले. पहिल्या भाषांतरात ‘एक बेडूक’ असे शब्द होते. यांतील ‘एक’ हा शब्द मला अनावश्यक वाटला. तो गाळला. नवे भाषांतर असे झाले- प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक येथून पुढे सुरुवात झाली ‘घंटेवरले फुलपाखरू’ या माझ्या जागतिक हायकूंच्या अनुवादाच्या प्रकल्पाची.
5 Comments
Madhukar Dharmapurikar
2/7/2026 08:24:32 pm
ओघवत्या शैलीने आले आहे लेखन. फार छान!
Reply
Angha
2/7/2026 08:30:03 pm
मात्सुओ बाशेला व आपणास प्रणाम!
Reply
Tukaram Pundlik Khillare
2/7/2026 11:44:58 pm
खूप छान सुरुवात.
Reply
मदन अंबुलगेकर.
2/7/2026 11:52:08 pm
सुटसुटीत व ओघवत्या लयी मध्ये असल्या मुळे वाचण्यात व समजण्यात आनंद झाला.
Reply
Deepali datar
2/8/2026 04:31:09 am
ही बेडकाची उडी नि त्या डुबुकमुळे निर्माण होणारा ध्वनी नि हे सगळं घडतंय तो तलाव प्राचीन केवळ सुंदर नेमका प्रत्ययकारी असा हा अनुवाद झालाय. बाशो चा अर्थ ही फार भिडला. तुमच्या या अभ्यासामुळे हायकूंमध्ये अधिक रस निर्माण होतोय.. खूप खूप धन्यवाद. बाशो चे नमन अगदी उचित वाटले. 👌 आवडला लेख.
Reply
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |
RSS Feed