Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

हायकूच्या तळ्याकाठी

हायकूच्या तळ्याकाठी - 19: काही विखुरलेल्या नोंदी

7/7/2026

0 Comments

 
आजकाल रोज दैनंदिनी लिहिणे जमत नाही. मग मोबाइल मधल्या नोंदी पाहून नुसती टिपणे लिहून ठेवतो. तीन चार दिवसांनी एकदा त्यांचा विस्तार करतो, मग संगणकात ठेऊन देतो. 
त्या दिवशी बागेत फिरताना एक मुलगा दिसला. मी त्याच्याकडे पाहून हसलो. तो हसला नाही. त्याचे लक्ष माझ्या मागे कोणत्या तरी वस्तूवर होते बहुतेक. मी मागे वळून पाहिले. एका ‘विदेशी जातीच्या’ कुत्र्याला घेऊन त्याची मालकीण उभी होती. मुलगा तिच्या कुत्र्याकडे पाहत होता. कुत्र्याचे गोंधळल्यासारखा भाव असणारे गुबगुबीत तोंड पाहून त्याला गम्मत वाटली असावी. आता त्याच्या चेहर्‍यावर हसू फुलले होते.  
मोबाइलमध्ये लिहून ठेवले-
बागेत फिरताना  
मुलाकडे पाहून हसलो-  
त्याचे लक्ष कुत्र्याकडे
पुढे सरकल्यावर पहिला विचार मनात आला की हा हायकू आहे का? या प्रश्नावर माझी पहिली प्रतिक्रिया ही होती की ही हायकूसदृश रचना आहे, पण सामान्य. कारण चांगल्या हायकूने विचारांची एक वेगळी दिशा सुचविली पाहिजे, ती या ओळी सुचवित नाहीत. मात्र  दिवसभर त्या ओळी मनात हिंडत राहिल्याच.  रात्री कधीतरी मला ती दिशा सापडलीच.  मी मुलाकडे का पाहतो? मला आनंद व्हावा म्हणून.  मूल कुत्र्याकडे पाहून का हसले? त्याला आनंद झाला म्हणून.  
प्रत्येकजण ज्यापासून आपल्याला आनंद मिळेल त्या स्थानाच्या शोधात असतो. जाणीवपूर्वक किंवा अभावितपणे. त्यात वावगे काही नाही. आता हा हायकू आनंद शोधणार्‍या प्रत्येकाचाच बनला.  

आणखी एक जाणवले. आपण वाचकांना सांगतो, हायकूवर पटकन कॉमेंट करू नका. त्याला तुमचा थोडा वेळ द्या. आणि आपणच आपल्या हायकूविषयी पटकन निष्कर्ष काढतो. विजयराव, हे बरोबर नाही!

भल्या पहाटे नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. टेकडीवर चढून जात असताना रस्त्यात  एक गोगलगाय दिसली. हळूहळू हळूहळू तीही टेकडीच्या शिखराच्या दिशेने चालली होती. अशाच एका गोगलगायीला उद्देशून जपानी हायकूकार कोबायाशी इस्साने लिहिले होते-
गोगलगायी गss
पर्वत चढून जा
सावकाश. सावकाश
गोगलगाय पर्वत चढून जाईल असे इस्साला का वाटले असावे? की तिच्या निमित्ताने त्याला स्वत:लाच काही सांगावयाचे होते? समजावयाचे होते? धीर द्यायचा होता?  हेच बरोबर असावे. या विचारातच टेकडी चढून गेलो. थोडावेळ पहाटेचे सुखद उष्ण ऊन अंगावर घेत एका दगडावर बसून राहिलो. मनातले गोगलगायीचे विचार मागे पडले. 
काही वेळाने खाली उतरण्यास सुरुवात केली. उतरताना पुन्हा ती गोगलगाय आठवली. कुठपर्यंत आली असेल ती आता? डोंगर चढत असेल की थकून तिने तो प्रयत्न सोडून दिला असेल? जमिनीकडे पाहत पाहत टेकडी उतरू लागलो.
​
अर्ध्या वाटेवर आल्यावर दिसले, रस्त्याच्या कडेला गोगलगाय मरून पडली होती. कुणाचा तरी तिच्यावर पाय पडलेला दिसत होता.
गोगलगायी ग
कोठे निघाली होतीस
कोठे पोहोचलीस
कुणाचा प्रवास कोठे संपावा हे कोण ठरवते? का ठरवते? मुळात हे कोणी ठरवते तरी का? कोणाला गरज आहे हे ठरवत बसण्याची?  
आणखी एक प्रश्न:  वर चढताना  दिसलेली गोगलगाय हीच होती का?  
असेलही किंवा नसेलही.  
काय फरक पडतो?  
फरक कसा पडत नाही?  
समजा मी सुरूवातीला पाहिलेली गोगलगाय ही नसेल तर?  
‘माझी’ गोगलगाय सुखरूप पुढे गेली असेल तर?  
आपण उगीचच कसले तरी धागे जुळविण्याचा प्रयत्न करतो.  
कसले तरी प्रश्न विचारीत राहतो. उत्तरे शोधत राहतो. ​

समुद्र किनार्‍यावरच्या या लहानशा गावात दोन दिवस राहण्यासाठी आलो आहोत.  
किरायाने घेतलेला बंगला अगदी समुद्राच्या जवळ होता. पण समुद्राकडे जाणारी वाट आडवी तिडवी होती व झाडांनी वेढलेली देखील होती. शिवाय रात्र झालेली होती. दिवसभर ड्रायव्हिंग करून मुलगा कंटाळला होता. त्यामुळे समुद्रदर्शनाच्या मनातील ओढीला आवर घालून बंगल्यातच शिरलो.  
रात्र झाली. खोलीच्या खिडकीतून समुद्र दिसत होता. चंद्र नव्हता तरी  चांदण्यांच्या प्रकाशात लाटांचे अस्तित्त्व जाणवत होते. 

रात्रभर खिडकीपलीकडे  
समुद्र गर्जत राहिला
झोपवत, जागवत राहिला
सकाळी उठून समुद्रावर गेलो.  
प्रसन्न वातावरण. पाण्यात पाय बुडवले. काहीसा उष्ण पाण्याचा स्पर्श अंगात रक्तासारखा फिरला. मन शुद्ध करीत. एक लाट पुढे येत होती, पायावर आदळून, फुटून परत जात होती. काल पाहिलेल्या लाटा याच होत्या का?
वेगवेगळ्या लाटा की  
एकच लाट पुन्हा  
 रूप बदलून
मला वाटले मीच लवकर आलोय. पण माझ्या आधी  बरीच माणसे येऊन बसलेली. एक मूल देखील वाळूत बसून आहे. त्याची आई समुद्रात पोहायला गेली असावी.. 
मुलाने रडू नये म्हणून त्याच्या हातात तिने मोबाइल दिलेला दिसत होता.  आता मुलाला दुसरे काही नको. त्याचे मनोरंजन करण्यास मोबाइल पुरेसा आहे.  
त्याला पाहून मला काही दिवसापूर्वी पाहिलेले दृश्य आठवले. संध्याकाळी बागेत जाऊन बसलो होतो. एक बाई मुलाला ढकलगाडीत बसवून बागेत घेऊन आली. तिच्यासोबत तिची एक मैत्रीण देखील होती. दोघीजणी आपल्या गप्पात रमून गेल्या. अर्थात मुलाला त्याची काळजी नव्हती. ते मोबाइलवरचा गेम खेळत निवांत बसले.
बागेत आलेले मूल
आनंदाने खेळते
मोबाइलवरील व्हिडिओ गेम
बागेत असो की समुद्रावर. मुले सारीकडे सारखीच. निसर्गापासून दूरच. पलीकडे काही अंतरावर एक मुलगी मात्र मन लावून किल्ला बनविते आहे.
मुलगी किल्ला बांधतेय- 
माझे लक्ष हातातून
निसटणार्‍या वाळूकडे
माझे लक्ष तत्लीन होऊन किल्ला बांधणार्‍या मुलीकडे नाही, किल्ल्याकडे नाही, समुद्र आणि लाटांकडे नाही. ते आहे निसटणार्‍या वाळूवर.  
बागेत असो की समुद्रावर, वयस्क माणूस सगळीकडे सारखाच.

आज बागेतून येताना गम्मतच झाली. 
कसल्याशा विचारात होतो. कसल्याशा काय! एखादा अर्धा कच्चा हायकू दुरुस्त करण्याच्या विचारात असणार.  
‘आसावरी’ प्रभाग आला. सवयीनेच गेट मधून आत आलो. पुढे निघालो.  
येथून सरळ पुढे गेल्यावर चौथी बिल्डिंग माझी. चालत राहिलो. 
थोड्या वेळाने समोर लक्ष गेले तर आडवी भिंत.  
विचार करता करता मी माझ्या घराच्याही पुढे निघून आलो होतो. असे काही घडले की प्रथम आपल्यावर हसायचे या नियमानुसार हसलो. 
घरी गेल्यावर हा प्रसंग वहीत लिहिताना त्याच्या सोबत तीन ओळीही आल्या 
जाता आले पाहिजे
सहज ओलांडून
 आपले घर
तीन ओळी तर लिहिल्या पण त्या मनात फिरत होत्याच. रात्री वही मिटताना सहज वाचल्या. वाटले, ‘जाता आले पाहिजे /सहज ओलांडून /आपले घर’  हे तर एक विधान होते आहे. काहीतरी ठामपणे मांडणारे. अर्थाची एकच दिशा दाखवणारे. मग त्या ओळीखाली आणखी तीन ओळी लिहून ठेवल्या-
सहज ओलांडले
ते घर
आपलेच होते का?
मनात आलेल्या या प्रश्नामुळे कवीला मिळालेले मूळ उत्तर त्याचे समाधान करणारे नाही हे जाणवते. आता कवीबरोबर वाचकही ‘घर आपले असणे’ आणि आपले नसणे’ यातील फरक शोधू लागतो. ‘घर आपले नसणे’ म्हणजे काय? आपण ज्या भिंतींना, ज्या वास्तूला आपले घर मानतो ते खरोखर आपले असते का? की आपण केवळ एका भ्रमात जगत असतो? आणि जर ते आपले नसेल तर मग ‘आपले घर’ कोठे आहे?  
0 Comments

Your comment will be posted after it is approved.


Leave a Reply.

    विजय पाडळकर

    Archives

    May 2026
    April 2026
    March 2026
    February 2026
    January 2026

    Categories

    All
    Haiku

    RSS Feed

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क