|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] [या ब्लॉगमधून जगातील श्रेष्ठ हायकुकारांच्या निवडक हायकूंचे मराठी अनुवाद सादर करण्याचा संकल्प आहे: त्यापैकी हा पहिला गुच्छ. मात्र असे गुच्छ सलग न सादर करता अधूनमधून दिले जातील.] बाशो या महाकवीने जपानी भाषेत सर्वप्रथम हायकू या काव्य प्रकाराला मान्यता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्या निधंनांनंतर काही वर्षांनीच हायकूला समर्थपणे पुढे नेऊ शकणारा एक नवा कवी जपानला भेटला. त्याचे नाव योसा बूसोन. बुसोन हा उत्तम चित्रकार देखील होता याची ग्वाही देणारे अनेक हायकू त्याच्या कविता संग्रहात सापडतात. सुमारे पाच वर्षे बुसोन गुरुकडे शिकत होता. या काळात स्वतंत्रपणे तो चित्रकला देखील शिकत होता. हायकूकडे त्याचे दुर्लक्ष जरी नसले तरी त्याचा जास्त भर चित्रे काढण्यावर होता. ही कला पुढे त्याच्या चरितार्थाचे प्रमुख साधन बनली. हायकू लिहून उपजीविकेसाठी पुरेसे पैसे मिळणे अशक्य होते. बुसोनचे हायकू आणि त्याची चित्रकला यांत अभिव्यक्तीचे फार साम्य आहे. चित्रदर्शीपणा हा गुण त्याच्या हायकूत पुरेपूर उतरलेला दिसतो शुभ्र दवबिंदूंचा एक एक थेंब प्रत्येक काट्याच्या टोकावर हा बुसोनचा एक असाच अत्यंत चित्रदर्शी हायकू. तो एक उत्तम चित्रकार-कवी असण्याची साक्ष देणारा. त्याच्या हायकू मध्ये कमालीची दृश्यमानता असते. या हायकूकडे दोन टप्प्यात पाहता येऊ शकते. दृश्यमानता : पहाटेची वेळ आहे. गुलाबाच्या झाडावर किंवा एका काटेरी झुडुपावर दव पडले आहे. कवी अत्यंत जवळून त्या झुडुपाकडे पाहतो आहे. त्याला दिसते, प्रत्येक तीक्ष्ण टोकदार काट्याच्या टोकावर पांढराशुभ्र गोल, पारदर्शक दवबिंदू स्थिरावलेला आहे. निसर्गातल्या दोन टोकाच्या गोष्टी येथे एकत्र आल्या आहेत. हे कवीने मुद्दाम आणलेले एकत्रीकरण नाही. कारण हे दृश्य आपल्या नेहमीच्या पाहण्यातील आहे, ओळखीचे आहे. फक्त इतकेच की त्याकडे आपण एवढे बारकाईने लक्ष दिलेले नाही. एकीकडे काटा आहे. कडक, तीक्ष्ण, वेदना देणारा आणि कुरूप मानला जाणारा. दुसरीकडे दवबिंदू आहे. अत्यंत नाजुक, पारदर्शक, सुंदर. कवी दोन्हींचा एकाच वेळी विचार करतो आहे. काटा आणि दवबिंदू यामध्ये आणखी एक विरोधाभास आहे. दवबिंदूचे आयुष्य काही कालापुरते. क्षणभंगुर. जरासा वारा आला की तो खाली पडणार किंवा सूर्य वर आला की त्याची वाफ होऊन जाणार आहे. उलटपक्षी काटा हा [दवबिंदूच्या मानाने] बरेच मोठे आयुष्य असणारा. काट्याविषयी माणसाच्या मनात तिटकारा आहे, दवबिंदूविषयी प्रेम. पण कवी फक्त दृश्य दाखवून थांबत असला तरी त्याला बरेच काही सुचवायचे आहे. दुसरी पायरी म्हणजे या दृष्यातून आपल्या मनात उमटलेले जीवनविषयक चिंतन त्याला शब्दांतून रसिकांपर्यंत पोचवायचे आहे. तो सुचवतो की निसर्ग केवळ फुलांवरच दवबिन्दु शिंपडत नाही, तो काटयांच्या टोकावर सुद्धा दवबिन्दु आणून ठेवतो. काठ्याविषयी असलेले पूर्वग्रह बाजूला ठेवले तर काट्याच्या टोकावरचा दवबिन्दु देखील सुंदर दिसू लागतो. शेवटी वस्तूंना सुंदर, कुरूप वगैरे विशेषणे आपणच लावतो. मानवी जीवन देखील या काट्यासारखे संघर्षाने भरलेले असते. या हायकुमुळे मनात निर्माण होणारी आंतरिक जाणीव आपल्याला सांगते की प्रत्येक काट्याच्या जीवनात देखील दवबिन्दुमुळे सौंदर्य येऊ शकते. पांढर्या शेवंतीसमोर कात्री आढेवेढे घेते क्षणकाळ नेहमीचे दृश्य. फुलांनी गच्च भरलेले पांढर्या शेवंतीचे झाड. कवी हातात कात्री घेऊन झाडाजवळ आला आहे. त्याला ती फुले कापायची आहेत. पण क्षणभर त्याचे हात थबकले आहेत. पण हायकुच्या शब्दांतून जे उलगडते आहे ते केवळ फूल कापण्याचे थांबणे नाही. एका अत्यंत सूक्ष्म आंतरिक द्वंद्वाचा तो क्षण आहे. पांढरी शेवनती हे जपानी संस्कृतीत केवळ एक फूल नाही तर ते पावित्र्य आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा कवीची कात्री त्या फुलांजवळ जाते तेव्हा निसर्गाच्या त्या सुंदर निर्मितीकडे पाहून कवीचे मन [आणि हात] क्षणभर थांबतात. ते नष्ट करणे म्हणजे निसर्गाच्या किमयेला नष्ट करणे आहे असे त्याला जाणवते. त्याचे आढेकेद्धे घेणे म्हणजे त्या सौंदर्या समोर नतमस्तक होणे आहे. कात्री चालवणे ही एक अंतिम अपरिवर्तनीय कृती आहे. एकदा फूल तोडले की ते झाडाला परत लावता येत नाही, म्हणून हा संभ्रम कवीच्या मनात उभा होतो. कवी थांबतो त्या क्षणी सारी सृष्टीच स्तब्ध झाली आहे. हा क्षण फक्त कवीपुरता राहिलेला नाही आता कवी फूल कापणार की काय असा प्रश्न वाचकाच्या मनातही निर्माण होतो. तोही क्षणभर स्तब्ध होतो. मात्र कवी या प्रश्नाचे उत्तर देत नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे शोधायचे आहे. या परिस्थितीत कवी काय करील याचे उत्तर शोधण्यापेक्षा संवेदनशील वाचक आपण काय करू याचा विचार करतो. या टप्प्यावर या हायकूत दडलेला आणखी एक अर्थाचा पदर आपल्याला दिसू लागतो. कवीने ‘क्षणकाळ’ हा जो शब्द वापरलेला आहे त्यातच त्याचे उत्तर दडलेले आहे. तो कात्री घेऊन आलेला आहे. त्याचा उद्देश स्पष्ट आहे. त्याने फूल तसेच ठेवावे असे आपल्याला कितीही वाटत असले तरी आपल्या मनात तो फूल तोडणार अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कवीच्या मनातील संभ्रम आणि आपल्या मनातील शंका यांचे द्वंद्व हे देखील या हायकुचे एक बलस्थान आहे. आपल्या मनात धास्ती निर्माण होते की हा तात्पुरता विराम संपला की फुलला कात्री लावली जाणारच आहे. फुलाच्या सौंदर्याने मोहित होऊन ते कापायचे की नाही या द्वंद्वात कवी अडकला आहे. उलट वाचकाला वाटते आहे की ते फूल कापले जाऊ नये, पण जगाच्या अनुभवावरून त्याला ते कापले जाणार असेही वाटत आहे. दोघेही एका क्षणी थांबलेले आहेत. पण किती वेगळ्या बिंदुवर! वसंत जातो आहे कोठे ते माहीत नाही बोट नांगरलेली वसंत ऋतुचे शेवटचे दिवस. काही दिवसांनी तो जाणार. पण कोठे जाणार? कुणालाच ठाऊक नाही. एक समुद्रकिनारा. किनार्यावर बोट नांगरलेली आहे. नांगरलेली असल्यामुळे तिला कोठेच जाता येत नाही. मात्र ही बोट कवीच्या आयष्याचे प्रतीक म्हणून पाहिली तर ती वाचकाला कोठल्या कोठे घेऊन जाते! कवीच्या दृस्टिकोणातून पाहिले तर ज्याची बोट नांगरलेली असते त्याला काय, वसंताचे येणे किंवा जाणे’ हा अर्थही या ओळीतून ध्वनित होतो. बुसोनने हायकूत अनेक प्रयोग केले. त्याचे कितीतरी हायकू समोरचे एक दृश्य 17 ओनमध्ये रेखाटतात आणि बाजूला होतात. त्यावर कसलेही भाष्य करीत नाहीत. त्याचा एक अत्यंत गाजलेला हायकू – देवळातल्या घंटेवर झोपलेले आहे फुलपाखरू आता या हायकूत ‘साक्षात्काराचा क्षण’ कोणता? तर ज्या क्षणी कवीची नजर त्या दृश्यावर पडली तो. आपल्या मनात काय उलथापालथ झाली हे कवी सांगत नाही. आपणही तिचा विचार करीत नाही कारण विचारांचे हे चक्र आता आपल्या मनात सुरू झालेले असते. हा हायकू एक चित्र आपल्यासमोर उभे करतो. एक मंदिर आहे, त्याच्या घंटेवर एक फुलपाखरू झोपले आहे. एक निवांत क्षण. मंदिर ही काही फुलपाखराची वास्तव्याची जागा नव्हे. म्हणजे ते दुरून कोठून तरी प्रवास करून आले आहे. थकले आहे. त्याला घंटा दिसली, ते तिच्यावर जाऊन बसले व झोपले. येथे आपण सुरक्षित आहो असे त्याच्या अंतर्मनाला वाटले असेल काय? कवी सांगत नाही पण ध्यानात येते की ही एक निवांत वेळ आहे. मंदिरात कुणीही नाही. शांतता आहे म्हणूनच फुलपाखरू झोपी गेले आहे.
हॅरोल्ड हंडरसनने लिहिले आहे, ‘हायकू म्हणजे विचारांच्या प्रवासाचा पहिला बिंदू.’ या दृश्याकडे पाहताना आता त्यांतील दोन परस्परविरोधी घटक दिसू लागतात. घंटा आणि फुलपाखरू. घंटा आकाराने मोठी, तर फुलपाखरू इवलेसे. घंटेचा रंग काळसर, करडा, तर फुलपाखरू रंगीबेरंगी. घंटा वजनदार तर फुलपाखरू हलके, नाजुक. घंटा एका जागी बद्ध आहे तर फुलपाखरू स्वच्छंद भिरभिरणारे. घंटा प्राचीन आहे, किमान अनेक दिवसांपासून आहे आणि पुढेही अनेक दिवस राहणार आहे; फुलपाखराचे जीवन क्षणिक. घंटा ही आवाज या संकल्पनेशी निगडीत आहे, मात्र येथे ती शांत आहे. का? फुलपाखरू झोपले आहे म्हणून? पण यामुळे आपल्या मनात एक ताण निर्माण होतो. घंटा केव्हाही वाजू शकते. ती वाजल्यावर फुलपाखरू जागे होईल, उडून जाईल. कोठे जाईल? चीनी कवी चु आंग त्सु याची एक कविता आहे. ‘चु आंग त्सुला स्वप्न पडले की तो म्हणजे एक फुलपाखरू आहे. दिवसभर तो वायुलहरीवर भिरभिरत आहे. त्याला प्रश्न पडला-मी एक माणूस आहे ज्याला तो फुलपाखरू असल्याचे स्वप्न पडले, की मी एक फुलपाखरू आहे ज्याला आपण माणूस आहो असे स्वप्न पडले आहे? कदाचित माझे हे जागरू मानवी आयुष्य म्हणजेच फुलपाखराच्या स्वप्नातील एक क्षण असेल.’ आता आपण आणि फुलपाखरू यातील साम्य रसिकाला दिसू लागते. या विशाल जगाच्या तुलनेत आपण लहानसेच. आपले हे जीवन आहे की एक भ्रम? निद्रा? आणि मनात एक प्रश्न जागा होतो-‘आपल्यासाठी घंटा कधी वाजणार?’
0 Comments
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |
RSS Feed