|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] हायकू ही एका श्वासाची कविता असते. या अवधीत तिने तिला हवे ते व्यक्त केले पाहिजे. कवी ‘अलोन’ यांचा एक हायकू एक काजवा अंधाराच्या मनात दिवा झालेला हायकू चकाकणारे क्षण पकडण्याचा प्रयत्न करीत असतो कारण अशा क्षणीच कवी प्रकाशकिरण बाहेर टाकत असतो अलोन’ या टोपण नावाने कविता लिहिणार्या कवीचे व्यावहारिक नाव माधव सावरगावकर. माधवरावांनी अगदी तरुणपणीच, 1965 मध्ये कविता लिहिण्यास सुरुवात केली. ग्रेस, आरतीप्रभू, दिलीप चित्रे, महानोर हे त्यांचे समकालीन कवी म्हणता येऊ शकतील. मात्र या कवींचा अलोन यांच्यावर कोणताही परिणाम नव्हता, आपल्या स्वतंत्र, चोख, व एकाकी मार्गाने, ’दूरस्थ पडघम ऐकत’ अलोन आपल्या वाटेने चालत राहिले. हे पडघम ऐकताना कधीतरी त्यांच्या कानावर हायकूची कुहूकुहू आली आणि त्यांची पाऊले त्या पायवाटेकडे वळली. अलोन लिहू लागले त्या काळात मराठी हायकू हा आपल्या अस्तित्त्वाचा आकार शोधण्यासाठी धडपड करीत होता. 1970 च्या दशकातच अलोन यांनी हायकू लिहिण्यास सुरुवात केली. अलोन यांचे काही विखुरलेले हायकू अधून मधून वेगवेगळ्या मासिकात प्रकाशित झाले पण त्यांत सातत्य नसल्यामुळे त्यांची चर्चा झाली नाही. शिवाय त्यांनी हायकू संग्रह प्रकाशित करण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यांच्या निधनानंतर ‘फूलचुखी’ हा त्यांचा संग्रह त्यांच्या मित्रांनी नुकताच प्रकाशित केला आहे. अलोन यांचे हायकू वाचताना हे त्यांच्या कवितेचेच परिष्कृत [refined] रूप आहे असे मला जाणवत राहते. अल्पाक्षरत्व, चित्रदर्शित्व, अनुभवांची तात्कालिकता आणि चिरंतनता, निसर्गप्रेम, जीवनचिंतन आणि दृष्टीच्या टप्प्यात येणार्या भूमीच्या पलीकडले प्रदेश शोधण्याची ओढ ही हायकूकारासाठी आवश्यक असलेली गुणवैशिष्ट्ये त्यांच्या इतर कवितांत देखील आढळत होतीच. ती येथे अधिक उत्कटतेने व सौंदर्याने प्रकट झाली आहेत उघडमीट फुलपाखरू करी मधुतंद्रीत आपल्याच तंद्रीत प्राणांची उघडमीट करणार्या कवीचे हे हायकू आहेत. अल्पाक्षरत्व हे हायकूचा एक प्रधान गुणवैशिष्ट्य. अलोन हे रचनेच्या संदर्भात हायकुची जुनी परंपरा पाळणारे कवि होते. परंपरागत हायकू हा तीन ओळीत, 5/7/5/ या आकृतिबंधात लिहिला जातो. तोच अलोन यांनी पाळला. हा बंध पाळणार्या कवीजवळ जी शब्दांवरची हुकूमत पाहिजे ती अलोन यांच्याजवळ उपजतच होती. जपानी कवींचे ‘चंद्र पाहण्याचे’ वेड सर्वश्रुत आहे. पूर्ण चंद्राच्या दिवशी अनेक हायकू कवि घोळक्या घोळक्याने घराबाहेर पडतात आणि रात्रभर चंद्र ‘पाहतात’॰ मात्र माधवराव हा मार्ग अनुसरत नाहीत, कारण ते ‘अलोन’ आहेत. घोळक्यात रमणे हा त्यांचा स्वभाव नव्हे. त्यांचा चंद्र वेगळा असतो. स्वत:पुरता. अलक्षितसा दिवसाचा चंद्रमा माझा सांगाती शब्दलालित्य, हा कवितेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे हे आपण आज विसरून चाललो आहो. मराठी नवकाव्याने, जुन्याशी नाते तोडताना ज्या काही गोष्टी गमावल्या त्यातील ही एक. नव्याशी संबंध जुळवितानाही ‘अलोन’ यांची जुन्याशी असलेली नाळ कधी तुटली नाही. त्यांच्या हायकूमधून शब्दांची लालित्यपूर्ण रचना, तिचे रूपलाघव तर जाणवतेच त्याबरोबर त्यांनी केलेली शब्दांची ‘नवनिर्मितीही’ मन मोहवते. कवीने पाऊसकिड्यांसाठी वापरलेला ‘उजेडवेडे’ हा शब्द असाच. पाऊस किडे उजेडवेडे येती जळून जाती आणखी एका हायकूत ते लिहितात- पार ढासळे ढेकळाचा निग्रह ओलबोलीने कधी थरथरत खाली घसरणार्या थेंबासाठी कवी ‘भितुर भितुरसा’ अशा चपखल शब्दांची योजना करतात. कधी गवाक्षातून हळू उतरणार्या चंद्रासाठी ‘चोरल’ चंद्र असे नवे विशेषण ते शोधून काढतात. तर कधी ‘झरणे’ आणि ‘झुरणे’ यांची सुरेख सरमिसळ करीत ते लिहितात- कोरडा नळ पक्ष्यापुरता झुरता थेंब ‘आलोन’ यांचा एक अत्यंत सुंदर हायकू आहे. वास मातीचा की सहवास तिचा काल रातीचा? हायकूविषयी काही गैरसमज आहेत, त्यापैकी एक म्हणजे ‘गतकाळातील आठवण सहसा हायकूत येऊ नये, कारण हायकू ही या क्षणाची कविता असते.’ मात्र हायकूवर असे बंधन टाकता येत नाही. जर आठवण हा आजच्या जगण्याचा एक भाग असेल तर ती आजच्या हायकूचाही भाग होऊ शकते. आठवणीत रमणे हे जर केवळ स्मरणरंजन असेल तर तो मनाचा भावूकपणा असतो. पण आठवण असणे हे माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. अट ही की विचारांच्या साखळीची सुरुवात आठवणीपासून व्हायला नको. गतकातरता हायकुला नको त्या दिशेने नेऊ शकते. आजच्या क्षणाचा एक भाग म्हणून जर ती आठवण मनात प्रवेश करीत असेल तर ती हायकूत येऊ शकते. ‘अलोन’ यांच्या या हायकूत विचारसाखळी सुरू होते ती ‘मातीच्या गंध ज्या क्षणी आला त्या क्षणाने’. मग तो गंध कवीला काल रात्रीकडे घेऊन जातो. हा प्रदेश कवीचा खास स्वत:चा, तिकडे रसिकाने जाऊ नये. आपले प्रदेश आठवावे जेथे इतरांना प्रवेश नाही. हायकू वाचन हा असा बाहेरून आपल्याच मनाकडे परतणारा प्रवास असतो. ‘अलोन’ हे हायकुची परांपरागत 5/7/5 ही रचना प्रमाण मानणारे हे आपण पाहिलेच आहे. मात्र या आकृतीबंधात बसण्यासाठी काही वेळा त्यांनी प्रचलित शब्दांची मोडतोड देखील केली आहे. पण ती देखील इतक्या कौशल्याने की ती मोडतोड आहे हे वाचकाला समजतच नाही किंवा समजले तरी तो तिला सहज स्वीकारून पुढे जातो. अंधारदर्या थेंबुकला दिलासा सोनकिडयाचा कवी ओळखीच्या शब्दाची नवी रूपे सहज सादर करतात. थेंबाचे नाजुकपण ‘थेंबुकला’ मधून किती मोहकपणे व्यक्त होते! कोयल कोहे दूर आम्रवनात फुले मनात कोकिळेची कुहू कुहू आपण ऐकतोच. कवी त्याला एक हलकासा धक्का देत ‘कोहे’ हे नाजुक क्रियापद तयार करतात. निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल हायकूकाराच्या मनात प्रेम असायला हवे. सारे एकाच अमर आत्म्याचे अंश आहेत हे त्याला ठाऊक तर असलेच पाहिजे पण मान्यही पाहिजे. ही अत्यंत अवघड गोष्ट असते. रचनेचे कौशल्य तर अनेकांजवळ असते पण मनाची निसर्गाशी ही एकतानता अपवादात्मक असते. ती ज्याच्याजवळ असते तोच खरा हायकू कवी बनु शकतो. यामुळेच येती कुठून थव्याथव्यांनी रावे नि जाती कुठे ? हा फक्त इतरांविषयीचा प्रश्न राहत नाही, तो शोध बनतो. स्वत:च्याही आगमन प्रस्थानाचा. हायकू हे एखादा गुरु सांगत असलेले तत्वज्ञान नव्हे. कवीने आपल्यासाठी उघडे केलेल्या हृदयाचे ते दार आहे. आपल्या आत्म्याच्या गवाक्षातून कवी जगाकडे पाहतो. त्याच्याजवळ ती एकटीच खिडकी असते. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यांतून जे दिसते ते एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद असते. F. Scott. Fitzgerald ने लिहिले आहे, ‘Life is much more satisfactorily looked at from a single window.’ दुर्दैवाने माधवरावांनी आपल्यामधील कवित्वशक्तीचा खोलवर वेध घेण्याचा प्रयत्न केला नाही. झाडावरून पान पडावे इतक्या नैसर्गिकपणे ते कविता लिहीत राहिले आणि कागदावर ठेऊन नामानिराळे झाले. पण जे झाले नाही त्याबद्दल आता खंत करण्यात काय अर्थ आहे? जे उरले आहे, आपल्या हाती गवसले आहे त्याचे स्मरण करू या. कारण तसे करणे म्हणजे कवीचेच पुन्हा स्मरण करणे असेल. एका हायकूत कवी लिहितात- फुलचुखीने फुलाच्या हृदयात काय गोंदले ? या प्रश्नाचे ज्याचे त्याचे उत्तर वेगळे असणार कारण ते खास त्याचे उत्तर असणार. पण असे उत्तर शोधण्यासाठी रसिकाला प्रवृत्त करणे हीच तर हायकुची खरी देणगी. हायकूतून नेहमी एखादा मोठा साक्षात्कार घडला पाहिजे अशी अपेक्षा करणे योग्य नव्हे. साक्षात्कार हे योगी वगैरे घडवू शकतात. हायकूकार हाही आपल्यासारखाच एक माणूस. फक्त समोरच्या क्षणातील सत्य चिमटीत पकडणे व शब्दांद्वारे आपल्या पर्यन्त पोचवणे ही असाधारण कला त्याच्याजवळ असते. त्या शब्दांमुळे आपल्या भोवतीचा अंधार क्षणिक उजळून निघतो. कदाचित आपण पुन्हा अंधाराने वेढले जाऊही. पण आता आपल्यात एक सूक्ष्म बदल झालेला असतो. हायकू वाचण्यापूर्वीचे आपण हायकू वाचल्यानंतर राहत नाही. सरतेशेवटी अलोन यांच्या ‘फुलचुखी’साठी माझ्या तीन ओळी ‘ही ‘फुलचुखी’ बनली आहे स्वत:च एक फूल ...’ आता रसिकाला फुलचुखी होणे भाग आहे
0 Comments
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |
RSS Feed