|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] जपानी हायकू कवींचे दोन अत्यंत आवडते विषय आहेत. एक, चेरीचा [किंवा प्लमचा] बहर आणि दूसरा, पौर्णिमेचा चंद्र. अगदी काही आधुनिक कवि सोडले तर 19 व्या शतकापर्यंत जवळजवळ प्रत्येक कवीने या विषयांवर हायकू लिहिले आहेत.विषय निघाला आहे तर आज ‘चंद्रावरचे काही हायकू’ पाहू. मात्सुओ बाशोचा एक गाजलेला हायकू आहे. दार उघडा चंद्राला येऊ द्या मंदिरात असे म्हणतात की बाशो एका पौर्णिमेच्या रात्री मठात झोपण्यासाठी गेला होता. तेथील कर्मचार्यांनी रात्रीची प्रार्थना झाल्यावर मठाचे दरवाजे लावून घेतले. त्यावेळी त्याने हा हायकू लिहिला. पण अशा आख्यायिका अनेक असतात. खरे सांगावयाचे तर हा हायकू लिहिण्यासाठी कवीला ‘प्रत्यक्ष’ त्या अनुभवाची काहीच गरज नव्हती. चंद्राला पाहून काहीजण वेडे होऊन रात्रभर फिरतात हे जसे त्याला माहीत आहे तसेच काहीजण खिडकी लावून घेतात हेही. अशा माणसांसाठीच तर त्याने एकदा लिहिले होते- चांदण्यात शांतपणे एक किडा झाडाचे खोड पोखरतोय आणखी एका हायकूत बाशोने स्वत:विषयी लिहिले- लखलखता चंद्र तळ्याकाठाने मी फिरतोय अरे, पहाट झाली की कवीला चंद्राचे आकर्षण. आणि चंद्राला? पृथ्वीवरल्या चेरी बहराचे. अशी विलक्षण कल्पना असणारा बाशोचा एक हायकू आहे चंद्र रेंगाळतो आहे रात्रीच्या आकाशात चेरीचा बहर निरखीत बुसोन [1716-1784] हा श्रेष्ठ हायकू कवि लिहितो एकटाच आहे मैत्री करावी म्हणतो चंद्राशी चंद्राइतका प्रेमळ मित्र कवीला कोठे मिळणार? चांदण्यात फिरताना कधी कधी गमतीदार गोष्टीही घडतात- [विनोदाचे हायकूला वावडे नसते.] बुसोन एका हायकूत लिहितो चांदण्यात फिरताना एका आंधळ्याने धडक दिली आणि तो हसला ज्याला डोळे आहेत असा माणूसही आंधळ्यासाखा फिरतो आहे, आपल्याला धडक देतो आहे हे पाहून आंधळा हसणारच ना! जपानच्या चार श्रेष्ठ हायकू कवींपैकी एक, कोबायाशी इस्सालाही सामान्य माणसांचे ‘चंद्र-दुर्लक्ष’ ठाऊक आहे. तो लिहितो- काहीजण स्वागत करतात घोरण्याने- पौर्णिमेच्या चंद्राचे मी माझ्या एका हायकूत असेच काही मांडले होते- ज्याचात्याचा चंद्र ज्याच्यात्याच्या आकाशाएवढा इस्साला हेही ठाऊक आहे. म्हणून तो लिहितो- पूर्ण चंद्र प्लमच्या सुवासात गुंफलेला फक्त माझा चंद्र जेव्हा आपला असतो तेव्हा इतरांच्या प्रतिक्रियेची गरजच नसते. जपानमध्ये ‘चंद्र पाहण्याची’ एक प्राचीन परंपरा आहे. पौर्णिमेच्या रात्री कवी आणि रसिक मोठ्या संख्येने चंद्र पाहण्यास घराबाहेर पडतात. ‘चंद्र पाहून’ घरी परत आल्यानंतर कवयित्रि चियो-नी लिहिते- चंद्र पाहून परतल्यानंतर नि:शब्द ट्रेसी डेव्हिडसन लिहिते- उबदार चंद्र मी झटकून टाकते लोकरी पांघरुणे एक भारतीय कवी जगजीत सलाम लिहितो- शांत तलाव मी घेऊन येतो बादलीभर चंद्र चंद्राची मोहिनी माणसाच्या अबोध मनालाही पडत असावी. लहानपणापासून मुले या दैवी गोलाच्या प्रेमात पडलेली असतात. अनेक भारतीय भाषांतील कवितात देखील चंद्र आणि मुलांचे सख्य वर्णन केले आहे. यासुको त्सुशिमाचा एक अप्रतिम हायकू आहे- झोपेतच चेहरा वळविते माझे मूल चंद्राकडे कोण अधिक निरागस? चंद्राकडे चेहरा वळविणारे मूल की ते न्याहाळणारा कवी... मराठी रसिकांना सहज आठवेल ग. दि. माडगूळकरांचे हे अजरामर भावगीत – ‘चांद मोहरे, चांदणे झरे झोपेतच गाली असा हसशी का बरे.. माझ्या ‘हायकूऋतू’ या हायकू संग्रहाची सुरुवात मी चंद्राच्या हायकूनेच केली आहे चंद्र घेऊन आला चकोरासाठी चांदणे माझ्यासाठी हायकू हायकू हा काव्य प्रकार अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपाससून जपानी कवी चंद्रावर कविता लिहीत आलेले आहेत. इ.स.च्या 12 व्या शतकातील एक उत्कट कवी सायग्यो याचे चेरी बहरावर आणि चंद्रावर अतिशय प्रेम होते. 1170 साली त्याने ‘आपण कधी व कोठे मरण पावू इच्छितो’ या संदर्भात एक कविता लिहिली होती. माझी इच्छा आहे वसंत ऋतूत मला मृत्यू यावा चेरीचा बहर फुललेला असताना वर्षाच्या दुसर्या महिन्यात आकाशात पूर्ण चंद्र असताना. पुढे तो वीस वर्षे जगला. मात्र 1190 साली जेव्हा त्याला मृत्यू आला तेव्हा अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धाने त्याची ही इच्छा पूर्ण केली, फक्त एक दिवसाच्या फरकाने. चेरीला बहर आलेला असताना, पौर्णिमेच्या नव्हे तर त्यानंतरच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कदाचित पौर्णिमेच्या चंद्राने त्याला रात्रभर न्याहाळून त्याचा निरोप घेतला असेल!
1 Comment
Madhukar Dharmapurikar
4/4/2026 06:57:42 pm
फारच छान आणि व्यवस्थित!
Reply
Your comment will be posted after it is approved.
Leave a Reply. |
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |
RSS Feed