|
एका दिवशी बागेत आलो त्यावेळी नुकताच पाऊस पडून गेला होता. गवत ओले, पायवाट ओली, वेली ओल्या, झाडे ओली...वातावरणात एक हवीहवीशी स्निग्ध ओल. बागेला दोन चकरा मारल्यानंतर बसण्यासाठी जागा शोधू लागलो तर कोरडी जागा मिळेचना. परवा येथे एक स्टूल दिसला होता, तो स्टूलदेखील कोठे दिसेना. शेवटी कोपर्यातील एका बाकावर खिशातील दस्ती टाकून त्यावर बसलो. समोरच्या झुडुपांवर पाण्याचे लहान लहान थेंब चमकत होते. काही थेंब पानाच्या टोकापाशी येऊन गळण्याच्या तयारीत होते. एका अधीर झालेल्या थेंबाने पानाची साथ सोडली व खाली उडी मारली. थेट खालच्या पाण्यात. त्या पाण्यात एक लहानसे वर्तुळ निर्माण झाले आणि काही क्षणात विरून गेले. पुन्हा पाणी नव्या थेंबाची वाट पाहू लागले. वर्तुळ जन्मले, विरले नव्या थेंबाच्या प्रतिक्षेत स्तब्ध जलाशय मीही वाट पाहू लागलो. मला गोविंद कुलकर्णीची एक खूप जुनी कविता आठवली. सुमारे 1970च्या आसपास लिहिलेली. दोन ओळींची कविता. एक थेंब एक वर्तुळ त्याच्या ‘अनिमिष’या कविता संग्रहात जेव्हा ती आली तेव्हा तिची बरीच थट्टा झाली होती. पण दोन ओळीतील चार शब्दात एक निसर्ग चित्र आणि भावस्थिती रेखाटणारी ती कविता होती याकडे कुणी लक्ष दिले नव्हते. दोन बिंबांना तोलून धरणारी एक परिपूर्ण कविता. एक बिंब: पडणारा थेंब. दुसरे बिंब: पाण्यात निर्माण होणारे वर्तुळ. कवीच्या मनात एक नवे वर्तुळ तयार करणारे दृश्य. हे वर्तुळ कसले आहे? कवि अर्थातच सांगत नाही. त्याने दोन बिंबे कागदावर मांडली आणि तो नामानिराळा झाला. कदाचित थेंब हे मनावर आघात करणार्या अनुभवाचे आणि वर्तुळ हे मनात निर्माण होणार्या विचार लहरींचे प्रतीक असू शकते. झेन तत्वज्ञानात वर्तुळ हे पूर्णत्त्वाचे प्रतीक मानले जाते. थेंब हे देखील एक वर्तुळच आहे. म्हणून तोही आपल्या जागी परिपूर्ण आहे. थेंब पाण्यात पडून वर्तुळ तयार होणे म्हणजे पूर्णातून पूर्ण निर्माण होणे होय.पाण्यातील वर्तुळ काही काळात विरून गेले असेल. कवीच्या मनातील वर्तुळही. पण वाचकाच्या मनात नवे वर्तुळ निर्माण करण्याची या दोन ओळींची क्षमता मात्र कायम राहील. आज त्या ओळी आठवल्या आणि माझ्या मनातही एक नवा प्रश्न उभा राहिला. एक थेंब एक वर्तुळ हे कवितेचे कोणते रूप? विचार करू लागलो. आजच्या हायकूशी गोविंदच्या कवितेचे साम्य आहे का? तिला दोन ओळींचा हायकू म्हणता येईल का? मुळात गोविंदची कविता ही कविता ज्यावेळी प्रकाशित झाली होती त्यावेळी ही कविता तरी आहे का असा प्रश्न एकाने विचारला होता. दिवसभर कवितेच्या रूपाकाराचा प्रश्न मनात रेंगाळत राहिला. रात्री या कवितेवर पुन्हा विचार करताना काही दिवसांपूर्वी वाचलेला एक लेख मला आठवला. ‘Experimentation with One-Word Haiku अशा शीर्षकाचा तो लेख P.K.Padhy यांनी लिहिला होता. त्या लेखकाने इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या अत्यंत लहान हायकूसदृश रचनांचा शोध घेतला होता. त्या शोधात त्याला ‘दोन ओळींची’, ‘एका ओळीची’ रचना सापडली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ‘एका ओळीच्या हायकूला फार महत्त्व प्राप्त झाले आहे, आणि त्याला लोकप्रियता देखील मिळू लागली आहे. उदाहरणार्थ- "dust hovers above the road at sunset" किंवा, "spring wind spreads the pine needles" या शोधात लेखकाला ‘एक शब्दाचा हायकू’ देखील सापडला होता. या संदर्भात त्यांनी एका ‘एक शब्द हायकू’चे उदाहरण दिले होते. हा ‘हायकू’ Cor van den Heuvel या कवीने लिहिलेला असून तो असा आहे- ‘Tundra’ Cor van den Heuvel यांनी त्यांच्या Window-washer’s pail या पुस्तकात हा हायकू समाविष्ट केला आहे. तो छापताना त्यांनी पानाच्या मध्यभागी तो शब्द लिहिला आणि बाकी सारे पान मोकळे ठेवले. आपला हा शब्द म्हणजे एक हायकुच आहे असे त्यांचे म्हणणे असून एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की ‘एक शब्द हायकू’च खरा. बाकी सारे हायकू वर्णनात्मक आहेत.’ ‘All haiku are descriptions except one-word haiku.’ Cor van den Heuvel हे अमेरिकेतील मान्यवर कवि असून हायकूचे अभ्यासक म्हणूनही ते ओळखले जातात. 1963 साली त्यांनी हा हायकू लिहिला. अमेरिकेतील सर्वाधिक चर्चा झालेला हायकू म्हणून तो ओळखला जातो. एका टीकाकाराने त्या हायकुच्या संदर्भात लिहिले, ‘हा हायकू दृश्य-काव्याच्या सीमेवर उभा आहे. येथे पानावरची रिकामी जागा ही अवकाशाचा विस्तार बनते तर शब्द हा त्या अवकाशाचा केंद्रबिन्दु ठरतो. समीक्षक विल्यम हिगिंसन यांनी लिहिले, ‘कोर्या पानाच्या मध्यभागी या हायकूला वाचले पाहिजे, तर त्याचा खरा आवाका जाणून घेता येईल.’ या ‘हायकूच्या संदर्भात P.K.Padhy यांनी लिहिले आहे- ‘वाचकाला जे अत्यावश्यक आहे हे या एका शब्दात आहे. या शब्दातून त्याच्या मनात एक प्रतिमा उभी होते जिची तो रोजच्या अनुभवाशी सांगड घालू शकतो. Tundra हा शब्द अर्थाचे अनेक पदर उलगडतो. प्रत्येक ऋतुमध्ये Tundra चे स्वरूप वेगळे असते. या एका शब्दात किती तरी मोठा विस्तार सामावलेला आहे. दुसरे म्हणजे हा एक शब्द वाचकाच्या अर्थ निरूपणाची सर्वात जास्त मागणी करतो.’ मात्र Martin Lucas याने या संदर्भात विरोधी मत नोंदताना लिहिले, ‘अनेक नावांना एक प्रतिमा जोडलेली असते, फक्त ‘Tundra’ लाच नव्हे. महत्त्वाचे म्हणजे खर्या हायकूसाठी एकमेकीशी नाते असणार्या किमान दोन प्रतिमांची आवश्यकता असते. त्या येथे नाहीत. हा एक शब्द वाचून कसल्याच भावना वाचकाच्या मनात प्रवेश करीत नाहीत. केवळ आठवते ते त्या शब्दाविषयी इतरांनी केलेले वर्णन.’ मलाही Tundra हा शब्द एक हायकू आहे हे पटले नव्हते. एखाद्या कवितेचे सौंदर्य किंवा अर्थ जाणून घेण्यासाठी ती विशिष्ट पानावर, विशिष्ट पद्धतीनेच वाचली पाहिजे ही अट असेल तर ती शब्द माध्यमाची मर्यादा ठरते. मग ती कविता ‘visual art’ बनते. एक शब्दच घ्यायचा तर मी ‘हिमालय’ हा शब्द सुचवेन. कारण त्याला अर्थाचे असंख्य संदर्भ आहेत. त्या शब्दामागे एका संस्कृतीच्या प्रदीर्घ इतिहासाचे संचित आहे. आणि जर विशिष्ट पद्धतीने शब्द लिहावयाचा झाला तर मी पानाच्या मध्यभागी ‘शून्य’ हा शब्द लिहीन. झेन तत्वज्ञानातील ‘emptiness’ किंवा भारतीय दर्शनातील ‘शून्यता’ हे हायकुचे मूळ अधिष्ठान आहे. शून्य म्हणजे अभाव नव्हे तर सर्व शक्यतांचा आरंभ बिन्दु आहे. गोविंद कुलकर्णी याची कविता ‘हायकू’च्या पातळीवर उतरते कारण तेथे दोन प्रतिमा आहेत आणि त्या वाचकाच्या मनात अनेक तरंग निर्माण करू शकतात. या संदर्भात नेहमीच दोन परस्पर विरोधी मते मांडली जातात, जाऊ शकतील. वाचकाने थोडा विचार करावा, स्वत:ला विचारावे की बाबा, तुझे मत काय आहे? मग जे उत्तर येईल ते ‘आपल्यापुरते सत्य.’
0 Comments
मच्छरदाणी एक कोपरा उचललेला चंद्र पाहण्यास मच्छरदाणीचा वरचा भाग चौकोनी, एक कोपरा उचलल्यामुळे त्रिकोण तयार झाला आणि चंद्राचे वर्तुळ! एकदा पौर्णिमेच्या दिवशी, तिने तिचा आता प्रसिद्ध बनलेला हायकू वाचला होता- चंद्राची कोर पाहिल्यापासून वाट पाहते आहे आजच्या रात्रीची पौर्णिमेच्या चंद्राचा उल्लेखही न करता तिने त्याच्या सौंदर्याची महती गाईली आहे! या ठिकाणी जपानमधील 18 व्या शतकातील सामाजिक रचना थोडी लक्षात घ्यायला हवी. त्याकाळी जपान मध्ये स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जात असे. त्यांना शालेय शिक्षण दिले जात नव्हते. त्यांना एकट्याने प्रवास करण्याची सुद्धा बंदी होती. मात्र चियो-निने उत्तम हायकुकार असा नावलौकिक मिळवला असल्यामुळे तिला बरेच स्वातंत्र्य मिळाले. [की तिने ते घेतले?] चियो-निची समाजात वावरतांनाची वागणूकही अनेकांना खुपत होती. ती पुरुषांमध्ये मिसळायची, त्यांच्याशी काव्य-शस्त्र-विनोद करायची, त्यांना मार्गदर्शन करायची. या वागण्यामुळे नाराज झालेल्या लोकांनी तिच्याविषयी नाना अफवा पसरविण्यास सुरुवात केली. तिचे अनेक पुरुशांशी संबंध जोडण्यात आले. वयाची तिशी उलटल्यानंतर चियो-नीच्या आयुष्यात अचानक अनेक दु:खद घटना घडण्यास सुरुवात झाली. प्तथम तिचे आईवडील वारले, नंतर तिचा भाऊ वारला, त्यानंतर वाहिनीही वारली. यामुळे तिचे हायकू लेखन थांबले नाही पण खूपच कमी झाले. कौटुंबिक अडचनींच्या या दिवसातच चियो-नीचे काही जवळचे स्नेही हे जग सोडून गेले. या काळात बुद्धाच्या नश्वरतेच्या तत्वाज्ञानाचा तिच्यावर फार मोठा परिणाम झाला. 1754 साली, वयाच्या 52 व्या वर्षी चियो-जो बौद्ध भिक्षुणी बनली आणि तिने चियो-नी हे नाव स्वीकारले चियो-नीने जरी बौद्ध धर्म स्वीकारला होता तरी तिने एखाद्या मंदिरात राहून सेवा करण्याचे नाकारले. ती आपल्या घरातच राहून बौद्ध धर्माच्या शिकवणीप्रमाणे सन्यस्त आयुष्य जगू लागली. शिवाय भिक्षुणी होण्याचा तिला फायदा असा झाला की संसारी स्त्रीवर असणारी बंधने मानण्याची तिला आता आवश्यकता नव्हती. ती मुक्तपणे कोठेही फिरू शकत असे. ज्या दिवशी तिने आपले केस कापले त्या दिवशी तिने लिहिले- ‘मी जगाचा त्याग करीत नाहीय. पण त्याच्या नश्वरतेची जाणीव झाल्यामुळे मी दिवस आणि रात्री वाहणार्या ‘शुद्ध पाण्याच्या मार्गाने’ जाण्याचे ठरविले आहे.’ [बुद्ध विचारात ‘pure water’ किंवा ‘निर्मळ पाणी’ म्हणजे मनाला स्वच्छ करणारे चिंतन, ज्याप्रमाणे ‘स्वच्छ पाणी’ हे शरीरावरची धूळ नाहीशी करते.] नन झाल्यानंतर तिचे हायकू हे अधिक चिंतनशील बनले. पूर्ण चंद्र डोळ्यात साठवून निघाले दूरच्या प्रवासाला आयुष्य हे नश्वर आहे’ ही बुद्धची शिकवण यानंतरच्या तिच्या हायकूत अनेकदा प्रकट होते. स्वप्नाच्या उरलेल्या खुणा- फुलपाखरू फुलांच्या ताटव्यांतून हिंडणारे पूर्व आशियामध्ये कविता, चित्रकला, व सुलेखनकला या तिंहींना मिळून एक कला मानले जाते. चियो-नी या तीनही कलात प्रवीण होती. जपानमध्ये सुलेखनाचा दृश्य परिणाम हा काव्याच्या साहित्यिक परिणामाइतकाच महत्त्वाचा समजला जातो. तिचे अनेक हायकू तिने अतिशय आकर्षक अक्षरात लिहिले आहेत आणि सोबत वैशिष्ट्यपूर्ण चित्रे काढली आहेत. या रचनेला हाइगा असे म्हटले जाते. याशिवाय तिने स्वत:ची चित्रेही काढली आहेत. नन झाल्यानंतर चियो-नी हायकुच्या जगात अधिकच सक्रिय बनली. तिने स्वत:चे स्वतंत्र असे दोन हायकू संग्रह प्रकाशित केले. स्त्री हायकूकारासाठी ही नवीन घटना होती. तिच्या मृत्यूपर्यन्त तिचे हायकू शंभरहून अधिक वेगवेगळ्या प्प्रातिनिधिक काव्यसंग्रहात घेतले गेले होते. मात्र शेवटच्या पाच वर्षांत तिची प्रकृती झपाट्याने खालावत गेली. जपान मधील हायकू कवींत अंत जवळ आल्यावर निरोपाचे हायकू लिहिण्याची प्रथा आहे. चियो-नीने लिहिले- मी चंद्र पाहिला या जगाचा आता निरोप 1775 साली वयाच्या बहात्तरव्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूची बातमी कळल्यावर अनेक तरुण कवींनी तिच्यावर कविता लिहिल्या. एकाने तिच्यासंदर्भात लिहिले, ‘हायकुच्या मार्गावरील प्रकाश हरवला आहे.’
चियो-नीने जवळजवळ 1700 हायकू लिहिले असे मानले जाते. मातो येथील शोकोजी मंदिरात तिने काढलेल्या चित्रांचे, आणि तिच्या खाजगी वस्तूंचे संग्रहालय आहे, आणि एका दगडावर तिच्या काही कविता कोरून ठेवल्या आहेत. तिच्या मृत्यूनंतर तिच्या हायकुंची लोकप्रियता अधिकच वाढली. जपानमध्ये अनेक चित्रकारांनी तिची चित्रे काढलेली आहेत, अनेकांनी तिच्यावर गीते लिहिली आहेत, नाटके लिहिली आहेत, एवढेच नव्हे तर तिचे हायकू लिहिलेले पत्त्याचे डाव देखील लोकप्रिय बनले आहेत. असे भाग्य फार थोड्या कलाकारांना मिळते. ‘हायकूऋतु’ या व्हाटसप समूहाचे एक मान्यवर सभासद, स्वत: उत्तम लेखक आणि कवी असलेले श्री गोपाळ अवटी यांनी समुहाच्या भिंतीवर एक नोंद टाकली आहे. ती नोंद अशी- सर्वांच्या विचारार्थ: ... पण in general हायकू जरा जास्तच हळवेपण गोंजारतायत का? असेही वाटत राहते. जगण्यातील निरागसपणा स्वागतार्हच पण "दृष्टिकोनातले बाळबोध भाबडेपण " या अंगाने जरा जास्त वाटचाल होतेय का हायकूची? सभोवताल अधिक खडबडीत, रखरखीत,मुखवट्याच्या होत असताना अंतर्मनाची strong मशागत प्रखर हायकू ने करावी अशी आशा मी करू शकेन का? जगताना उदासी आणि व्यर्थतेची जाणीव अपरिहार्य असली तरी... 'परिवर्तन- क्रांती- बदल ,जागर' या अंगाने एखादा प्रखर तारा समूह घेऊन अवतरतील का हायकू. 'वृथा भावूकता' एखादवेळी ठीक पण दणदणीत 'जल्लोष जयजयकार ' घडवित येतील का हायकूचे जथ्थे!! सहन करण्या पेक्षा विधायक संघर्षाचा कैवार घेतील का हायकू. बरे! एवढा सुंदर form( शैली) असतानाही तांबे,कुसुमाग्रज,बोरकर भट,ग्रेस वैगेरे मंडळीनी हायकू का नसतील हाताळल्या....... असे प्रश्न group वर अगदी प्रामाणिकपणे मांडावेत असे वाटत होते. आज धाडस केले. पायरी सुटली असल्यास ज्येष्ठांनी क्षमा करावी. 'रुद्रास आवाहन', 'क्रांतीचा जयजयकार',' पसायदान '.... असे काही अमर- शाश्वत ' नव्या मराठी' ला देऊ शकतील का हायकू? या प्रेम भावनेतूनच विचारीत आहे _--गोपाळ अवटी श्री. अवटी यांनी समुहावरील अनेक हायकू वाचून त्यांच्या मनातील विचार स्पष्टपणे मांडले हे चांगलेच झाले. अशी चर्चाच मला अपेक्षित होती. म्हणून मी थोडे तपशीलवार विवेचन करण्याचा विचार करून हा दीर्घ लेख लिहितो आहे. श्री. अवटी यांचा हायकूवरील पहिला आक्षेप, ‘हायकू जरा जास्तच हळवेपण गोंजारतात, भाबडेपण जपण्याच्या अंगाने वाटचाल करतात’ हा आहे. मात्र हळवेपणा किंवा भाबडेपणा याचा दोष काव्यप्रकाराला कसा देता येईल? एक उदाहरण देऊन हे स्पष्ट करतो. मराठी दिवाळी अंकात दरवर्षी किमान 400 कविता प्रकाशित होतात असा एक अंदाज आहे. त्यापैकी 300 कविता तरी सामान्य, हळव्या किंवा कृत्रिम असतात. वाचल्याबरोबर विसरून जातात. त्या बहुतेक कुणाचे तरी अनुकरण करून लिहीलेल्या असतात. आठवणीत राहणार्या अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच. यावरून कविता या साहित्यप्रकारालाच सामान्य म्हणता येईल का? सामान्य साहित्याचे पीक कोणत्याही फॉर्म मध्ये भरघोस वाढत असतेच. हायकूमधील भाबडेपण हा दोष हायकू लिहिणार्यांचा आहे हायकूचा नव्हे. ‘सभोवताल अधिक खडबडीत, रखरखीत, मुखवट्याचा होत असताना अंतरमनाची strong मशागत हायकूने करावी अशी आशा मी करू शकेन का?’ अवश्य करू शकता. का ते पुढे मी मांडेनच. हायकूच्या मूळ उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचे उद्दिष्ट अंतर्मनाची सशक्त मशागत करणे हे आहे. आणि श्रेष्ठ हायकू इमानेइतबारे ते करतो. जपानी हायकुवर झेन तत्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव आहे. ते तत्त्वज्ञान मनाच्या मशागतीबद्दल बरेच काही शिकवते. अभिजात [classical] हायकू मधून हा विषय वारंवार स्पर्शीला गेला आहे. ‘परिवर्तन, जागर, क्रांति या अंगाने हायकू अवतरत नाहीत.’ हे विधान बर्याच प्रमाणावर सत्य आहे पण ते फक्त मराठी हायकूंच्या बाबतीत. परिवर्तन, जागर या अंगाने हायकू अवतरतात, मात्र ते मराठी वाचकाला माहीत नाहीत. या ठिकाणी थोडासा हायकुचा इतिहास सांगितला तर तो अप्रस्तुत होणार नाही. विसाव्या शतकात जपानी हायकूत एक मूलभूत क्रांती घडून आली. तेथे ‘आधुनिक हायकू’ [Gendai Haiku] जन्माला आला. आधुनिक हायकू कवींनी जुन्या हायकुचे सारे संकेत नाकारले,मोडले. [हायकू 17 ‘ओन’चाच असला पाहिजे, त्यांची विभागणी 5/7/5 अशीच झाली पाहिजे, हायकूत एक निसर्गवाचक शब्द असलाच पाहिजे वगैरे.] हायकुला त्यांनी रानावनातून काढून शहरात आणले. नागरी जीवनातील प्रश्न, समस्या यांना हायकूत महत्त्वाचे स्थान दिले. अमेरिकेत Jack Kerouac [ beat generation चा प्रणेता]याने हायकूंना आणखी सामान्य माणसापर्यंत आणले. दोन महायुद्धानंतर तर हायकूत आमुलाग्र बदल झाला. प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्यानी, युद्धामुळे पोळाल्या गेलेल्या व्यक्तींनी उत्तम हायकू लिहिले आहेत. उदाहरणार्थ- हात नाहीत पाय नाहीत त्यांनी माणसाचा ओंडका बनवला व घरी पाठवला - त्सुरू अकिरा भुकेली मुले विकताहेत जुनी हत्यारे दुपारच्या उन्हात -के.जे. हाऊफमन खंदकामध्ये एक घड्याळ टिकटिकते थंड पडलेल्या मनगटावरचे – ताकाजो रेडिओवर युद्धाच्या बातम्या घरी एकुलता बटाटा मुलांच्या खाण्यासाठी - सुगीता हीसाजो हायकू हा त्याच्या शब्दमर्यादामुळे पूर्ण युद्ध आवाक्यात घेण्याचा प्रयत्न करीत नाही, तो असतो एका स्फोटापुरता किंवा एका बंदुकीच्या गोळीइतका. हायकू क्षण हा भय किंवा उत्कंठेचा वा धक्का देणारा क्षण असतो. फार मोठे प्रश्न सोडवणे हे त्याचे धेय्य नसते. युद्ध-हायकूत फक्त समोरचा क्षण असतो. तो अत्यंत वस्तुनिष्ठ असतो कसलाही अर्थ न लावता तो आपल्यासमोर एक वस्तुस्थिती मांडतो आणि बाजूला होतो. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील अनुभवावर हायकू लिहिले जात आहेत. वंचित, शोषित जनतेच्या भावनांना वाट करून दिली जात आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय हायकू कवी उदयाला आले आहेत. ते आपल्या जीवनातील दू:ख, अपमान, अवहेलना अत्यंत प्रभावीपणे मांडतात. पीडितांचा कैवार घेतात. पण ते ‘जल्लोष करीत’ आक्रोश व्यक्त करीत नाहीत. हायकू माणसाला संयम शिकवतो. तो आधुनिक कवींच्याही रक्तात भिनला आहे. हिरोशिमावर जो बॉम्ब हल्ला झाला, तेथे जो प्रचंड विनाश झाला त्याबद्दल जपानी लोकांच्या मनात अमेरिकनाबद्दल प्रचंड राग असेल असे मला वाटले होते. युद्धावरचे असंख्य हायकू मी मिळवून वाचले पण एकाही हायकूत हा संताप अद्वातद्वा व्यक्त झालेला पाहिला नाही. स्वभावत: हायकू शब्दात जे मांडले आहे त्याच्या पलीकडले सुचवू पाहतो, म्हणून जल्लोष करीत प्रकट होण्याची त्याला गरज भासत नाही. प्रख्यात अमेरिकन कृष्णवर्णीय हायकूकार रिचर्ड राइट याचे हे हायकू पहा- कोसळणारा पाऊस फुलांच्या दुकानासमोर मुलगी स्वत:ला विकते आहे या दृश्यात महत्त्वाच्या तीन प्रतिमा स्वाभाविकपणे एकत्र आल्या आहेत. एका बाजूला फुलांचे दुकान [सौन्दर्य आणि सुगंध यांचे प्रतीक] आणि त्याच दुकानासमोर मुलगी स्वत:ला विकते आहे [गरीबी आणि हतबलता]तर त्याचवेळी या सार्यांवर मानवी सुख दु:खाच्या पलीकडे असलेला पाऊस [अलिप्त निसर्ग] कोसळतो आहे. हे सारे विलक्षण व्याकुळ करणारे आहे. किंवा - जळणारे घर पांढरा बर्फ पडतोय काळ्या राखेवर [अमेरिकेतील वर्णद्वेषाच्या [Black and White ]संघर्षाला कवीने पांढरा बर्फ आणि काळी राख यांच्या नैसर्गिक प्रतिकांतून मांडले आहे.] जागतिक हायकू नव्या नव्या विषयांना कवेत घेण्याचा प्रयत्न करतो आहे. विज्ञान कथेप्रमाणे विज्ञान हायकू [Scifiku] ही नवी संकल्पना तयार झाली आहे. पारंपारिक हायकुचा आकृतीबंध वापरुन निसर्गाऐवजी विज्ञान व भविष्यातील तंत्रज्ञान या विषयावर हे हायकू लिहिले जातात. अमेरिकेत या प्रकारवर काही नियतकालिके देखील सुरू झाली आहेत. एकेकाळी हायकूत वास्तव जीवनाचे प्रतिबिंब असावे असे मानले जात होते. आज काल्पनिकेला देखील हायकूत स्थान दिले जात आहे. [fantasyku] आता आपण ‘मराठी हायकुचे भविष्य’ या विवेचनाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळू. मराठी वाचकांना दुर्दैवाने उत्तम हायकू वाचायलाच मिळाले नाहीत, मग त्यांची हायकूविषयक जाण कशी वाढणार? हायकूविषयी प्रेम कसे निर्माण होणार.? मराठी कविपैकी किमान काहीजण नेहमी नवी आव्हाने घेण्यास तयार असतात. ते जर हायकुकडे वळले तर हा किती सशक्त काव्यप्रकार आहे हे वाचकांना समजेल. मराठी श्रेष्ठ आधुनिक कविपैकी कुणीही या साहित्य प्रकाराचा पाठपुरावा केला नाही. [का? हा आणखी एक दीर्घ लेखाचा विषय आहे. त्याबद्दल पुढे कधीतरी.] अगदी एखाद्याने, क्वचित हायकू लिहिले आहेत. उदाहरणार्थ पु. शि. रेगे यांचा हा हायकू- पळसाला या कुठून एकुलत्या कळलं: माघ? त्यामुळे आजच्या कवींसमोर एखादे रोल मॉडेल नाहीच. त्यांनी आपला मार्ग आपणच शोधला पाहिजे. असा मार्ग शोधलेल्या अंबादास सोनवणे या एका अलक्षित हायकू कवीने सामाजिक जाणिवेचे उत्तम हायकू लिहिले आहेत. उदा- उन्हाने माजवला शेतात हाहाकार घामाचा सडा भुकेची आग पेटली उन्हाळ्यात पोट रिकामे कसलाही आक्रोश नाही, घोषणा नाही, तरी समाजातील दाहक वास्तव अत्यंत थोड्या शब्दात किती प्रभावीपणे मांडले आहे! असाच प्रयत्न करणारा माझा एक हायकू- भिकारणीची पोरगी धुळीत काढते चित्र आईचे सामाजिक वास्तव, भुकेलेल्यांची वेदना, कलेतून व्यक्त होण्याची प्रेरणा आणि नात्याची ओढ हे सारे तीन ओळीत व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे. किंवा क्षिप्रा देशमुख यांचा हा हायकू- पेलवेना मला सीतेचे हे ओझे जरी तू राम अत्यंत कमी शब्दात आजच्या सुशिक्षित स्त्री समोरचा एक पेच किती प्रभावीपणे मांडलेला आहे. किंवा, आजचे ई-वास्तव आजच्या भाषेत ई-हायकूत मांडण्याचा माझा प्रयत्न- पौर्णिमेचा चंद्र वहीत कॉपी पेस्ट केला कधीतरी वापरण्यासाठी डायनोसोरच्या पाठीवरून हात फिरवते मूल- आईचे वर्क फ्रॉम होम फेसबुकवर टाकला हायकू सत्तर अंगठे, पाच नमस्कार दोन कॉमेंट्स सरतेशेवटी: हायकू हा सर्वश्रेष्ठ काव्यप्रकार आहे असे मी कधीच म्हटले नाही. [हायकुच्या एकाही पौर्वात्य किंवा पाश्चिमात्य टीकाकाराने असा दावा केलेला नाही.] त्याच्या काही मर्यादा आहेत. पण तो एक श्रेष्ठ काव्यप्रकार आहे हे मी मानतो. त्याच्या मर्यादा गृहीत धरून त्यांतील सौंदर्याचा आस्वाद रसिकांनी घ्यावा. दुसरे म्हणजे माझ्या विवेचनात देखील काही त्रुटि असणे शक्य आहे. [हरिवंशराय बच्चन यांचे ‘कुछ सही कुछ गलत’ हे माझे आवडते वाक्य आहे....]
हायकू ही मूलत: आशावादी कविता आहे. ती दु:खाचे अस्तित्व मान्य करते पण त्याला शरण जाण्यास नकार देते. मी एक लहानसा हायकू कवी आहे, मात्र माझ्यातही तो आशावाद नक्कीच आहे. मी आशा करतो की उद्या मराठीला देखील एखादा हायकू महाकवी नक्की मिळेल... [श्री अवटी यांचे विशेष आभार. त्यांनी जर हे प्रश्न उपस्थित केले नसते तर ही चर्चा समुहावर झालीच नसती. मलाही माझ्या मनातील काही अस्ताव्यस्त विचार या निमित्ताने एकत्र करता आले. माझ्या आगामी ‘हायकुच्या विश्वात’ खंड 2 साठी या मुद्द्यांचा विस्तार करून एक दीर्घ लेख होऊ शकेल.] आजकाल रोज दैनंदिनी लिहिणे जमत नाही. मग मोबाइल मधल्या नोंदी पाहून नुसती टिपणे लिहून ठेवतो. तीन चार दिवसांनी एकदा त्यांचा विस्तार करतो, मग संगणकात ठेऊन देतो. त्या दिवशी बागेत फिरताना एक मुलगा दिसला. मी त्याच्याकडे पाहून हसलो. तो हसला नाही. त्याचे लक्ष माझ्या मागे कोणत्या तरी वस्तूवर होते बहुतेक. मी मागे वळून पाहिले. एका ‘विदेशी जातीच्या’ कुत्र्याला घेऊन त्याची मालकीण उभी होती. मुलगा तिच्या कुत्र्याकडे पाहत होता. कुत्र्याचे गोंधळल्यासारखा भाव असणारे गुबगुबीत तोंड पाहून त्याला गम्मत वाटली असावी. आता त्याच्या चेहर्यावर हसू फुलले होते. मोबाइलमध्ये लिहून ठेवले- बागेत फिरताना मुलाकडे पाहून हसलो- त्याचे लक्ष कुत्र्याकडे पुढे सरकल्यावर पहिला विचार मनात आला की हा हायकू आहे का? या प्रश्नावर माझी पहिली प्रतिक्रिया ही होती की ही हायकूसदृश रचना आहे, पण सामान्य. कारण चांगल्या हायकूने विचारांची एक वेगळी दिशा सुचविली पाहिजे, ती या ओळी सुचवित नाहीत. मात्र दिवसभर त्या ओळी मनात हिंडत राहिल्याच. रात्री कधीतरी मला ती दिशा सापडलीच. मी मुलाकडे का पाहतो? मला आनंद व्हावा म्हणून. मूल कुत्र्याकडे पाहून का हसले? त्याला आनंद झाला म्हणून. प्रत्येकजण ज्यापासून आपल्याला आनंद मिळेल त्या स्थानाच्या शोधात असतो. जाणीवपूर्वक किंवा अभावितपणे. त्यात वावगे काही नाही. आता हा हायकू आनंद शोधणार्या प्रत्येकाचाच बनला. आणखी एक जाणवले. आपण वाचकांना सांगतो, हायकूवर पटकन कॉमेंट करू नका. त्याला तुमचा थोडा वेळ द्या. आणि आपणच आपल्या हायकूविषयी पटकन निष्कर्ष काढतो. विजयराव, हे बरोबर नाही! भल्या पहाटे नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. टेकडीवर चढून जात असताना रस्त्यात एक गोगलगाय दिसली. हळूहळू हळूहळू तीही टेकडीच्या शिखराच्या दिशेने चालली होती. अशाच एका गोगलगायीला उद्देशून जपानी हायकूकार कोबायाशी इस्साने लिहिले होते- गोगलगायी गss पर्वत चढून जा सावकाश. सावकाश गोगलगाय पर्वत चढून जाईल असे इस्साला का वाटले असावे? की तिच्या निमित्ताने त्याला स्वत:लाच काही सांगावयाचे होते? समजावयाचे होते? धीर द्यायचा होता? हेच बरोबर असावे. या विचारातच टेकडी चढून गेलो. थोडावेळ पहाटेचे सुखद उष्ण ऊन अंगावर घेत एका दगडावर बसून राहिलो. मनातले गोगलगायीचे विचार मागे पडले. काही वेळाने खाली उतरण्यास सुरुवात केली. उतरताना पुन्हा ती गोगलगाय आठवली. कुठपर्यंत आली असेल ती आता? डोंगर चढत असेल की थकून तिने तो प्रयत्न सोडून दिला असेल? जमिनीकडे पाहत पाहत टेकडी उतरू लागलो. अर्ध्या वाटेवर आल्यावर दिसले, रस्त्याच्या कडेला गोगलगाय मरून पडली होती. कुणाचा तरी तिच्यावर पाय पडलेला दिसत होता. गोगलगायी ग कोठे निघाली होतीस कोठे पोहोचलीस कुणाचा प्रवास कोठे संपावा हे कोण ठरवते? का ठरवते? मुळात हे कोणी ठरवते तरी का? कोणाला गरज आहे हे ठरवत बसण्याची? आणखी एक प्रश्न: वर चढताना दिसलेली गोगलगाय हीच होती का? असेलही किंवा नसेलही. काय फरक पडतो? फरक कसा पडत नाही? समजा मी सुरूवातीला पाहिलेली गोगलगाय ही नसेल तर? ‘माझी’ गोगलगाय सुखरूप पुढे गेली असेल तर? आपण उगीचच कसले तरी धागे जुळविण्याचा प्रयत्न करतो. कसले तरी प्रश्न विचारीत राहतो. उत्तरे शोधत राहतो. समुद्र किनार्यावरच्या या लहानशा गावात दोन दिवस राहण्यासाठी आलो आहोत. किरायाने घेतलेला बंगला अगदी समुद्राच्या जवळ होता. पण समुद्राकडे जाणारी वाट आडवी तिडवी होती व झाडांनी वेढलेली देखील होती. शिवाय रात्र झालेली होती. दिवसभर ड्रायव्हिंग करून मुलगा कंटाळला होता. त्यामुळे समुद्रदर्शनाच्या मनातील ओढीला आवर घालून बंगल्यातच शिरलो. रात्र झाली. खोलीच्या खिडकीतून समुद्र दिसत होता. चंद्र नव्हता तरी चांदण्यांच्या प्रकाशात लाटांचे अस्तित्त्व जाणवत होते. रात्रभर खिडकीपलीकडे समुद्र गर्जत राहिला झोपवत, जागवत राहिला सकाळी उठून समुद्रावर गेलो. प्रसन्न वातावरण. पाण्यात पाय बुडवले. काहीसा उष्ण पाण्याचा स्पर्श अंगात रक्तासारखा फिरला. मन शुद्ध करीत. एक लाट पुढे येत होती, पायावर आदळून, फुटून परत जात होती. काल पाहिलेल्या लाटा याच होत्या का? वेगवेगळ्या लाटा की एकच लाट पुन्हा रूप बदलून मला वाटले मीच लवकर आलोय. पण माझ्या आधी बरीच माणसे येऊन बसलेली. एक मूल देखील वाळूत बसून आहे. त्याची आई समुद्रात पोहायला गेली असावी.. मुलाने रडू नये म्हणून त्याच्या हातात तिने मोबाइल दिलेला दिसत होता. आता मुलाला दुसरे काही नको. त्याचे मनोरंजन करण्यास मोबाइल पुरेसा आहे. त्याला पाहून मला काही दिवसापूर्वी पाहिलेले दृश्य आठवले. संध्याकाळी बागेत जाऊन बसलो होतो. एक बाई मुलाला ढकलगाडीत बसवून बागेत घेऊन आली. तिच्यासोबत तिची एक मैत्रीण देखील होती. दोघीजणी आपल्या गप्पात रमून गेल्या. अर्थात मुलाला त्याची काळजी नव्हती. ते मोबाइलवरचा गेम खेळत निवांत बसले. बागेत आलेले मूल आनंदाने खेळते मोबाइलवरील व्हिडिओ गेम बागेत असो की समुद्रावर. मुले सारीकडे सारखीच. निसर्गापासून दूरच. पलीकडे काही अंतरावर एक मुलगी मात्र मन लावून किल्ला बनविते आहे. मुलगी किल्ला बांधतेय- माझे लक्ष हातातून निसटणार्या वाळूकडे माझे लक्ष तत्लीन होऊन किल्ला बांधणार्या मुलीकडे नाही, किल्ल्याकडे नाही, समुद्र आणि लाटांकडे नाही. ते आहे निसटणार्या वाळूवर. बागेत असो की समुद्रावर, वयस्क माणूस सगळीकडे सारखाच. आज बागेतून येताना गम्मतच झाली. कसल्याशा विचारात होतो. कसल्याशा काय! एखादा अर्धा कच्चा हायकू दुरुस्त करण्याच्या विचारात असणार. ‘आसावरी’ प्रभाग आला. सवयीनेच गेट मधून आत आलो. पुढे निघालो. येथून सरळ पुढे गेल्यावर चौथी बिल्डिंग माझी. चालत राहिलो. थोड्या वेळाने समोर लक्ष गेले तर आडवी भिंत. विचार करता करता मी माझ्या घराच्याही पुढे निघून आलो होतो. असे काही घडले की प्रथम आपल्यावर हसायचे या नियमानुसार हसलो. घरी गेल्यावर हा प्रसंग वहीत लिहिताना त्याच्या सोबत तीन ओळीही आल्या जाता आले पाहिजे सहज ओलांडून आपले घर तीन ओळी तर लिहिल्या पण त्या मनात फिरत होत्याच. रात्री वही मिटताना सहज वाचल्या. वाटले, ‘जाता आले पाहिजे /सहज ओलांडून /आपले घर’ हे तर एक विधान होते आहे. काहीतरी ठामपणे मांडणारे. अर्थाची एकच दिशा दाखवणारे. मग त्या ओळीखाली आणखी तीन ओळी लिहून ठेवल्या- सहज ओलांडले ते घर आपलेच होते का? मनात आलेल्या या प्रश्नामुळे कवीला मिळालेले मूळ उत्तर त्याचे समाधान करणारे नाही हे जाणवते. आता कवीबरोबर वाचकही ‘घर आपले असणे’ आणि आपले नसणे’ यातील फरक शोधू लागतो. ‘घर आपले नसणे’ म्हणजे काय? आपण ज्या भिंतींना, ज्या वास्तूला आपले घर मानतो ते खरोखर आपले असते का? की आपण केवळ एका भ्रमात जगत असतो? आणि जर ते आपले नसेल तर मग ‘आपले घर’ कोठे आहे?
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] [या ब्लॉगमधून जगातील श्रेष्ठ हायकुकारांच्या निवडक हायकूंचे मराठी अनुवाद सादर करण्याचा संकल्प आहे: त्यापैकी हा पहिला गुच्छ. मात्र असे गुच्छ सलग न सादर करता अधूनमधून दिले जातील.] बाशो या महाकवीने जपानी भाषेत सर्वप्रथम हायकू या काव्य प्रकाराला मान्यता आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्या निधंनांनंतर काही वर्षांनीच हायकूला समर्थपणे पुढे नेऊ शकणारा एक नवा कवी जपानला भेटला. त्याचे नाव योसा बूसोन. बुसोन हा उत्तम चित्रकार देखील होता याची ग्वाही देणारे अनेक हायकू त्याच्या कविता संग्रहात सापडतात. सुमारे पाच वर्षे बुसोन गुरुकडे शिकत होता. या काळात स्वतंत्रपणे तो चित्रकला देखील शिकत होता. हायकूकडे त्याचे दुर्लक्ष जरी नसले तरी त्याचा जास्त भर चित्रे काढण्यावर होता. ही कला पुढे त्याच्या चरितार्थाचे प्रमुख साधन बनली. हायकू लिहून उपजीविकेसाठी पुरेसे पैसे मिळणे अशक्य होते. बुसोनचे हायकू आणि त्याची चित्रकला यांत अभिव्यक्तीचे फार साम्य आहे. चित्रदर्शीपणा हा गुण त्याच्या हायकूत पुरेपूर उतरलेला दिसतो शुभ्र दवबिंदूंचा एक एक थेंब प्रत्येक काट्याच्या टोकावर हा बुसोनचा एक असाच अत्यंत चित्रदर्शी हायकू. तो एक उत्तम चित्रकार-कवी असण्याची साक्ष देणारा. त्याच्या हायकू मध्ये कमालीची दृश्यमानता असते. या हायकूकडे दोन टप्प्यात पाहता येऊ शकते. दृश्यमानता : पहाटेची वेळ आहे. गुलाबाच्या झाडावर किंवा एका काटेरी झुडुपावर दव पडले आहे. कवी अत्यंत जवळून त्या झुडुपाकडे पाहतो आहे. त्याला दिसते, प्रत्येक तीक्ष्ण टोकदार काट्याच्या टोकावर पांढराशुभ्र गोल, पारदर्शक दवबिंदू स्थिरावलेला आहे. निसर्गातल्या दोन टोकाच्या गोष्टी येथे एकत्र आल्या आहेत. हे कवीने मुद्दाम आणलेले एकत्रीकरण नाही. कारण हे दृश्य आपल्या नेहमीच्या पाहण्यातील आहे, ओळखीचे आहे. फक्त इतकेच की त्याकडे आपण एवढे बारकाईने लक्ष दिलेले नाही. एकीकडे काटा आहे. कडक, तीक्ष्ण, वेदना देणारा आणि कुरूप मानला जाणारा. दुसरीकडे दवबिंदू आहे. अत्यंत नाजुक, पारदर्शक, सुंदर. कवी दोन्हींचा एकाच वेळी विचार करतो आहे. काटा आणि दवबिंदू यामध्ये आणखी एक विरोधाभास आहे. दवबिंदूचे आयुष्य काही कालापुरते. क्षणभंगुर. जरासा वारा आला की तो खाली पडणार किंवा सूर्य वर आला की त्याची वाफ होऊन जाणार आहे. उलटपक्षी काटा हा [दवबिंदूच्या मानाने] बरेच मोठे आयुष्य असणारा. काट्याविषयी माणसाच्या मनात तिटकारा आहे, दवबिंदूविषयी प्रेम. पण कवी फक्त दृश्य दाखवून थांबत असला तरी त्याला बरेच काही सुचवायचे आहे. दुसरी पायरी म्हणजे या दृष्यातून आपल्या मनात उमटलेले जीवनविषयक चिंतन त्याला शब्दांतून रसिकांपर्यंत पोचवायचे आहे. तो सुचवतो की निसर्ग केवळ फुलांवरच दवबिन्दु शिंपडत नाही, तो काटयांच्या टोकावर सुद्धा दवबिन्दु आणून ठेवतो. काठ्याविषयी असलेले पूर्वग्रह बाजूला ठेवले तर काट्याच्या टोकावरचा दवबिन्दु देखील सुंदर दिसू लागतो. शेवटी वस्तूंना सुंदर, कुरूप वगैरे विशेषणे आपणच लावतो. मानवी जीवन देखील या काट्यासारखे संघर्षाने भरलेले असते. या हायकुमुळे मनात निर्माण होणारी आंतरिक जाणीव आपल्याला सांगते की प्रत्येक काट्याच्या जीवनात देखील दवबिन्दुमुळे सौंदर्य येऊ शकते. पांढर्या शेवंतीसमोर कात्री आढेवेढे घेते क्षणकाळ नेहमीचे दृश्य. फुलांनी गच्च भरलेले पांढर्या शेवंतीचे झाड. कवी हातात कात्री घेऊन झाडाजवळ आला आहे. त्याला ती फुले कापायची आहेत. पण क्षणभर त्याचे हात थबकले आहेत. पण हायकुच्या शब्दांतून जे उलगडते आहे ते केवळ फूल कापण्याचे थांबणे नाही. एका अत्यंत सूक्ष्म आंतरिक द्वंद्वाचा तो क्षण आहे. पांढरी शेवनती हे जपानी संस्कृतीत केवळ एक फूल नाही तर ते पावित्र्य आणि शांततेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा कवीची कात्री त्या फुलांजवळ जाते तेव्हा निसर्गाच्या त्या सुंदर निर्मितीकडे पाहून कवीचे मन [आणि हात] क्षणभर थांबतात. ते नष्ट करणे म्हणजे निसर्गाच्या किमयेला नष्ट करणे आहे असे त्याला जाणवते. त्याचे आढेकेद्धे घेणे म्हणजे त्या सौंदर्या समोर नतमस्तक होणे आहे. कात्री चालवणे ही एक अंतिम अपरिवर्तनीय कृती आहे. एकदा फूल तोडले की ते झाडाला परत लावता येत नाही, म्हणून हा संभ्रम कवीच्या मनात उभा होतो. कवी थांबतो त्या क्षणी सारी सृष्टीच स्तब्ध झाली आहे. हा क्षण फक्त कवीपुरता राहिलेला नाही आता कवी फूल कापणार की काय असा प्रश्न वाचकाच्या मनातही निर्माण होतो. तोही क्षणभर स्तब्ध होतो. मात्र कवी या प्रश्नाचे उत्तर देत नाही. कारण या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने स्वतंत्रपणे शोधायचे आहे. या परिस्थितीत कवी काय करील याचे उत्तर शोधण्यापेक्षा संवेदनशील वाचक आपण काय करू याचा विचार करतो. या टप्प्यावर या हायकूत दडलेला आणखी एक अर्थाचा पदर आपल्याला दिसू लागतो. कवीने ‘क्षणकाळ’ हा जो शब्द वापरलेला आहे त्यातच त्याचे उत्तर दडलेले आहे. तो कात्री घेऊन आलेला आहे. त्याचा उद्देश स्पष्ट आहे. त्याने फूल तसेच ठेवावे असे आपल्याला कितीही वाटत असले तरी आपल्या मनात तो फूल तोडणार अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कवीच्या मनातील संभ्रम आणि आपल्या मनातील शंका यांचे द्वंद्व हे देखील या हायकुचे एक बलस्थान आहे. आपल्या मनात धास्ती निर्माण होते की हा तात्पुरता विराम संपला की फुलला कात्री लावली जाणारच आहे. फुलाच्या सौंदर्याने मोहित होऊन ते कापायचे की नाही या द्वंद्वात कवी अडकला आहे. उलट वाचकाला वाटते आहे की ते फूल कापले जाऊ नये, पण जगाच्या अनुभवावरून त्याला ते कापले जाणार असेही वाटत आहे. दोघेही एका क्षणी थांबलेले आहेत. पण किती वेगळ्या बिंदुवर! वसंत जातो आहे कोठे ते माहीत नाही बोट नांगरलेली वसंत ऋतुचे शेवटचे दिवस. काही दिवसांनी तो जाणार. पण कोठे जाणार? कुणालाच ठाऊक नाही. एक समुद्रकिनारा. किनार्यावर बोट नांगरलेली आहे. नांगरलेली असल्यामुळे तिला कोठेच जाता येत नाही. मात्र ही बोट कवीच्या आयष्याचे प्रतीक म्हणून पाहिली तर ती वाचकाला कोठल्या कोठे घेऊन जाते! कवीच्या दृस्टिकोणातून पाहिले तर ज्याची बोट नांगरलेली असते त्याला काय, वसंताचे येणे किंवा जाणे’ हा अर्थही या ओळीतून ध्वनित होतो. बुसोनने हायकूत अनेक प्रयोग केले. त्याचे कितीतरी हायकू समोरचे एक दृश्य 17 ओनमध्ये रेखाटतात आणि बाजूला होतात. त्यावर कसलेही भाष्य करीत नाहीत. त्याचा एक अत्यंत गाजलेला हायकू – देवळातल्या घंटेवर झोपलेले आहे फुलपाखरू आता या हायकूत ‘साक्षात्काराचा क्षण’ कोणता? तर ज्या क्षणी कवीची नजर त्या दृश्यावर पडली तो. आपल्या मनात काय उलथापालथ झाली हे कवी सांगत नाही. आपणही तिचा विचार करीत नाही कारण विचारांचे हे चक्र आता आपल्या मनात सुरू झालेले असते. हा हायकू एक चित्र आपल्यासमोर उभे करतो. एक मंदिर आहे, त्याच्या घंटेवर एक फुलपाखरू झोपले आहे. एक निवांत क्षण. मंदिर ही काही फुलपाखराची वास्तव्याची जागा नव्हे. म्हणजे ते दुरून कोठून तरी प्रवास करून आले आहे. थकले आहे. त्याला घंटा दिसली, ते तिच्यावर जाऊन बसले व झोपले. येथे आपण सुरक्षित आहो असे त्याच्या अंतर्मनाला वाटले असेल काय? कवी सांगत नाही पण ध्यानात येते की ही एक निवांत वेळ आहे. मंदिरात कुणीही नाही. शांतता आहे म्हणूनच फुलपाखरू झोपी गेले आहे.
हॅरोल्ड हंडरसनने लिहिले आहे, ‘हायकू म्हणजे विचारांच्या प्रवासाचा पहिला बिंदू.’ या दृश्याकडे पाहताना आता त्यांतील दोन परस्परविरोधी घटक दिसू लागतात. घंटा आणि फुलपाखरू. घंटा आकाराने मोठी, तर फुलपाखरू इवलेसे. घंटेचा रंग काळसर, करडा, तर फुलपाखरू रंगीबेरंगी. घंटा वजनदार तर फुलपाखरू हलके, नाजुक. घंटा एका जागी बद्ध आहे तर फुलपाखरू स्वच्छंद भिरभिरणारे. घंटा प्राचीन आहे, किमान अनेक दिवसांपासून आहे आणि पुढेही अनेक दिवस राहणार आहे; फुलपाखराचे जीवन क्षणिक. घंटा ही आवाज या संकल्पनेशी निगडीत आहे, मात्र येथे ती शांत आहे. का? फुलपाखरू झोपले आहे म्हणून? पण यामुळे आपल्या मनात एक ताण निर्माण होतो. घंटा केव्हाही वाजू शकते. ती वाजल्यावर फुलपाखरू जागे होईल, उडून जाईल. कोठे जाईल? चीनी कवी चु आंग त्सु याची एक कविता आहे. ‘चु आंग त्सुला स्वप्न पडले की तो म्हणजे एक फुलपाखरू आहे. दिवसभर तो वायुलहरीवर भिरभिरत आहे. त्याला प्रश्न पडला-मी एक माणूस आहे ज्याला तो फुलपाखरू असल्याचे स्वप्न पडले, की मी एक फुलपाखरू आहे ज्याला आपण माणूस आहो असे स्वप्न पडले आहे? कदाचित माझे हे जागरू मानवी आयुष्य म्हणजेच फुलपाखराच्या स्वप्नातील एक क्षण असेल.’ आता आपण आणि फुलपाखरू यातील साम्य रसिकाला दिसू लागते. या विशाल जगाच्या तुलनेत आपण लहानसेच. आपले हे जीवन आहे की एक भ्रम? निद्रा? आणि मनात एक प्रश्न जागा होतो-‘आपल्यासाठी घंटा कधी वाजणार?’ वसंत ऋतूचे आगमन, म्हणजे सुमारे मार्च एप्रिलचा काळ, या काळात सारा जपान चेरीच्या फुलांच्या बहराने रंगून गेलेला असतो. जपानचे सांस्कृतिक जीवन देखील अनेक अंगानी फुलून आलेले असते. या पंधरा वीस दिवसात प्रचंड उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण झालेले असते. माणसे एकेकट्याने, गटागटाने, बहर पाहण्यासाठी बाहेर पडतात. जंगले, वने, उपवने चेरीच्या फुलांनी व्यापून टाकलेली. शहरात देखील रस्त्याच्या कडेला ओळीने लावलेल्या वृक्षांवर गुलाबी छटा असलेली नाजूक फुले लखडलेली असतात. त्यांचा मंद पण मन गंधित करून टाकणारा सुवास वातावरणात पसरलेला असतो. पुरातन काळापासून लोकप्रिय असलेली ही परंपरा आधुनिक काळात देखील जपानने जपली आहे. जंगलात तर चेरीच्या वृक्षांच्या प्रजातींचा अभ्यास करून उत्तम जातींची पद्धतशीर लागवड व जोपासना केली जातेच, पण असंख्य शाळांच्या आणि सरकारी इमारतींच्या आवारात देखील चेरीची झाडे लावली जातात. मुलांना लहानपणापासून त्या संबंधीच्या कथा, कविता ऐकविल्या जातात. चेरीचे फूल हे जपानने आपले राष्ट्रीय फूल म्हणून निवडले आहे. या काळात माणसे खास ‘चेरीचा बहर पाहण्यासाठी’ बाहेर पडतात. इ.स.च्या 7व्या शतकापासून ही परंपरा सुरू झाली असे मानले जाते. प्रथम राजघराण्यातील मंडळी चेरीच्या बागेत जमत. फुलांच्या सावलीत दिवस घालवत. नंतर सामुराई घराण्यांनी ही परंपरा उचलली. हळू हळू ती सामान्य माणसांत देखील लोकप्रिय बनली. अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरेला ‘हनामी’ असे नाव दिले गेले आहे. ‘हनामी’ म्हणजे ‘flower viewing’ [बहर पाहणे]. या ‘पाहण्याला’ जपानी परंपरेत खास अर्थ आहे. पाहणे म्हणजे नुसते दृष्टिक्षेप टाकणे नव्हे. पाहणे म्हणजे सारे चित्त एकवटून लक्ष केन्द्रित करणे. पाहणे म्हणजे एकटक पाहत राहणे जोपर्यंत समोरच्या दृश्याशी आपले नाते जुळत नाही. इतक्या उत्कटतेने की एका काळानंतर पाहणाराच त्या दृश्याचा एक भाग बनून जातो, फूल बनतो. जपान मधील बहुसंख्य कवी ही [आणि पौर्णिमेचा चंद्र पाहण्याची] परंपरा पाळतात. अर्थात पाहण्यासाठी आलेल्या लोकांत हौशे-नवशेच अधिक असतात. अशाच लोकांना उद्देशून सायग्यो या कवीने हाइकू लिहिला आहे- या चेरीचा एकमेव दोष त्या फुलतात गर्दी जमा होते. अर्थात हा दोष लोकांचा आहे हेच कवीला सांगायचे आहे हे लगेच ध्यानात येते. चेरीच्या बहराचा प्रभाव जपानच्या संस्कृतीत खोलवर रूजला आहे. प्राचीन काळापासून चित्रकार या फुलांची व झाडांची अगणित चित्रे काढीत आले आहेत. असा चित्रकार दाखविता येणे कठीण आहे ज्याने चेरीच्या बहराचे चित्र काढले नाही, असा कवी दाखविता येणे कठीण ज्याने या बहरावर कविता लिहिली नाही. कलावंत तर सोडाच, सैनिकांना देखील या बहराचे आकर्षण आहे. दुसर्या महायुद्धात चेरीच्या बहराचा लोकांत राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी उपयोग केला गेला. बॉम्बर विमानावर चेरीची झाडे रंगविली गेली. आजच्या तरुणांमध्ये देखील बहराविषयीचे प्रेम संक्रमित झाले आहे. जपानच्या राष्ट्रीय रग्बी टीमच्या युनिफोर्मवर चेरीच्या फुलांचे चित्र आहे, आणि तिचे नाव आहे-Brave Blossoms. चेरीच्या बहराशी पुरातन काळापासून आणखी एक प्रतिकात्मक अर्थ निगडीत आहे. तो बहर जसे सौंदर्याचे तसेच जीवनाच्या क्षणभंगुरतेचे प्रतीक म्हणून देखील मानला गेला आहे. चेरीचा बहर हा जास्तीत जास्त आठ दहा दिवसच टिकतो, नंतर त्याची फुले गळून पडायला सुरुवात होते. जीवन सौंदर्यापूर्ण आहे पण तसेच ते क्षणकाळ टिकणारेही आहे. ही संकल्पना जपानी संस्कृतीतील mono no aware [ melancholy at passing of things- काल निसटून जात असल्याची विषण्ण जाणीव] या संकल्पनेशी निगडीत आहे. [जी.एंच्या ‘भेट’, ‘ओर्फिअस’ अशा काही कथांतून ही संकल्पना अवतरताना दिसते.] 11 व्या शतकातील पहिल्या जपानी महाकादंबरीत- ‘ The tale of Genji’- मध्ये प्रथम एका कवितेत ही संकल्पना मांडली गेली. चेरीचा बहर वसंत ऋतु काहीच शाश्वत नाही श्रेष्ठ जपानी हाइकूकार योसा बुसोन लिहितो- ‘चेरीची फुले गळून पडताहेत आजही’ फुले उगवण्याची तसेच ती गळून पडण्याची क्रिया अव्याहतपणे चालूच आहे..चालूच राहणार आहे. सौंदर्य हरवलेले जीवन हे वास्तवही माणसाला स्वीकारावेच लागते. असे असले तरी चेरीचा बहर म्हणजे उत्साहाचा बहर. चैतन्याचा बहर. कोबायाशी इस्सा लिहितो- जगण्यातील आनंद अद्भुत चेरीबहराच्या सावलीत या बहराचा प्रभाव एवढा आहे की- कुणीही अनोळखी उरत नाही चेरीच्या बहराखाली [इस्सा] एकाच सौंदर्यपूजक वृत्तीतून ही माणसे एकत्र आलेली आहेत, मग ती अनोळखी कशी राहतील? त्यांचे एकमेकांशी नाते जुळेलच. मात्र हे नाते तात्पुरते जुळले आहे का? कारण कायमचे नाते जुळविण्यास हे जग अपात्र आहे! दुसर्या एका हायकूत इस्सा लिहितो- चेरी बहर जिकडे तिकडे आणि हे अपात्र जग या बहराचा फक्त माणसावरच परिणाम होतो असे नव्हे. ओनित्सुरा हा कवी एका हायकूत लिहितो- पहाडातील निर्झर चेरीच्या छायेखाली दगड देखील गाणे गाऊ लागतात चेरीची फुले क्षणजीवी तसेच नाजुक देखील. आवाजानेही गळून पडतील. म्हणून एक हाइकूकार इशारा देतो- मंदिराची घंटा हळूच वाजवा चेरी फुलली आहे चेरीचा बहर असंख्य वेळा पाहत राहिल्यामुळे त्याच्या संदर्भातल्या अगणित आठवणी माणसाच्या मनात भिरभिरत असतात, म्हणूनच बाशो एका हायकूत लिहितो- किती किती गोष्टी पुन्हा मनात घेऊन येतो चेरीचा बहर चेरीचा बहर हा सौंदर्याचे प्रतीक असो की क्षणभंगुरतेचे, खरे तर हा प्रतीकात्मक अर्थ माणूसच त्याला देतो. निसर्ग फक्त असतो. आपल्याच नियमांनुसार बदलणारा. कोबायाशी इस्साने एका हाइकूतून हे सत्य अतीशय नेमकेपणाने मांडले आहे- तुझ्याशिवाय चेरीचा बहर फक्त बहर निसर्ग सर्वांसाठीच फुलत असतो. आपण त्याला काही खास बनवितो. त्याचे महत्त्व आपल्यासाठी अधिक वाढते जेव्हा तो बहर आपण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पाहतो. पण जेव्हा ती प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर? तर मग तो बहर ‘फक्त बहर’ असतो. आपले सारे वैशिष्ठ्य हरवून बसलेला. केवळ एका झाडाचा बहर असलेला. चेरीच्या बहराविषयीचा एक अतिशय उत्तम आणि अर्थपूर्ण हायकू बुसोन याने लिहिला आहे. झाडाच्या फांद्यातून पलीकडले देऊळ दिसते बहर ओसरल्यावर बुसोन हा केवळ कवि नव्हता तो एक उत्तम चित्रकार देखील होता, आणि त्याच्या हायकू मध्ये या गोष्टीचे प्रतिबिंब स्पष्टपणे पडलेले दिसते. या हायकूमध्ये सुरूवातीला आपल्याला झाडाच्या फांद्या दिसतात जो दृश्याचा समोरचा भाग आहे. त्यानंतर त्या फांद्यामधून ‘पाठीमागचे मंदिर’ दिसते, जे दृश्याची पार्श्वभूमी आहे. ही मांडणी एका कुशल चित्रकाराची आहे हे जाणवते. या हायकू मधील सर्वात महत्त्वाचा शब्द ‘बहर ओसरल्यावर’ हा आहे. जेव्हा झाड पाणा फुलांनी पूर्ण डवरलेले असते तेव्हा ते खूप सुंदर दिसते. पण त्याच वेळी ते पलीकडचे सारे दृश्य दृष्टीपासून लपवून टाकते. जेव्हा हा बहर ओसरतो [पाने फुले गळून पडतात] तेव्हा झाड त्याचे बाह्य सौन्दर्य घालवते पण त्याचवेळी ते पारदर्शक दिसते. आता या हायकुला असलेला एक अध्यात्माचा पदर आपल्याला दिसू लागतो. मंदिर हे ‘ईश्वराचे’ किंवा ‘सत्याचे’ प्रतीक मानले तर हा हायकू एका वेगळ्या दिशेकडे अंगुलीनिर्देश करतो. जोपर्यंत मानवाच्या आयुष्यात यश किंवा मोहाचा बहर असतो तोपर्यंत त्याचे लक्ष्य बाह्य सौंदर्यावर असते. जेव्हा हा बहर ओसरतो तेव्हा गोष्टी साध्या आणि रिक्त होतात. तेव्हाच माणसाला आध्यात्मिक सत्याचे दर्शन होऊ शकते. सहसा बहर ओसरणे ही गोष्ट दू:खाद मनाली जाते, पण कवि येथे त्या घटनेला एका सकारात्मक वळणावर नेऊन ठेवतो. पाने, फुले गळून पडली आहेत या गोष्टीने निराश न होता त्या फांद्या आता ‘मंदिर पाहाण्यासाठी’ खिडकी बनल्या आहेत हे तो अधोरेखित करतो. प्रत्येक रसिक आपआपल्या पद्धतीने या हायकूचे रसग्रहण करू शकतो.एका समीक्षकाच्या मते ‘काहीतरी गमावल्याशिवाय काही प्राप्त होत नाही’ हे या हायकुचे मुख्य आशयसूत्र आहे. चेरीचा बहर पाहून नादावणे ही काही जपानी कवींचीच मक्तेदारी नाही, जगातल्या प्रत्येक कवीला सौंदर्याची भूल पडलेली आहे. ज्याला ही भूल पडलेली नाही तो कवी होऊच शकत नाही. चेरीच्या बहरासंदर्भातील हायकू शोधताना मला अचानक Marilyn Potter या कवयित्रीचा हाइकू दिसला आणि मी चमकलो. तिच्या हायकूचा अनुवाद असा- हिवाळ्यातील वादळ- कॅलेंडरच्या पानांवर शोधते चेरीबहराचा फोटो हिवाळ्यातील एक सर्दलेली एकाकी रात्र. खोलीत कवयित्री एकटी बसलेली आहे. बाहेर कडाक्याची थंडी, वादळ. आतले एकाकीपण आणि बाहेरचे गारठलेपण. अशावेळी आवश्यकता आहे ती कुठल्यातरी सोबतीची. मग ती सोबत आठवणींची का असेना. तिला आठवते, कॅलेंडरच्या मार्च महिन्याच्या पानावर चेरीच्या बहराचा सुंदर फोटो आपण पाहिला होता. ती ते पान शोधते. तो फोटो शोधते. त्याच्यावरून अलगद हात फिरविते. चेरीचा बहर पाहिल्याची सय तिच्या मनात जागी होते, पानावरच्या चित्रातले रंग आठवणीच्या रंगात हलकेच मिळून जातात. मनभर पसरतात. आता ती एकटी राहिलेली नसते. तिची आवडती चेरी तिच्या सोबतीला आलेली असते
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] मागच्या एका ब्लॉग मध्ये मी लिहिले होते, हायकूला विनोदाचे वावडे नसते. हायकूविषयीचा एक गैरसमज म्हणजे तो नेहमी चिंतनपर किवा गंभीरच असला पाहिजे, त्याने जीवनाविषयी काही भाष्य केले पाहिजे. मात्र हायकू गंभीरच असावा असे मुळीच नाही. तो खेळकर, विनोदी देखील असू शकतो. कोबायाशी इस्साचे अनेक हायकू वाचताना ओठावर हास्य फुलते. उदाहरणार्थ, हडकुळ्या बेडका धीर सोडू नकोस इस्सा आला आहे जाताजाता सहज कवीला दिसलेले हे एक दृश्य आहे. दोन बेडूक एकमेकांशी लढताहेत. त्यांच्यापैकी एक धष्टपुष्ट आहे तर दूसरा रोड, हडकुळा आहे. स्वाभाविक आहे की जो रोड आहे त्याची या लढाईत पीछेहाट होते आहे. कवि ते पाहतो, आणि बेडकाला म्हणतो, ‘धीर सोडू नकोस, मी आलो आहे!’ आता कवीच्या येण्याचा या लढाईत हडकुळ्या बेडकाला काय फायदा? बरे तो काही मदत करण्याचा वादाही करीत नाहीय. जगात अशी वृत्ती असणारेच खूप असतात. दुरून पहायचे, मनोरंजन करून घ्यायचे आणि तोंडाने मात्र दुर्बलांना पाठिंबा द्यायचा. अशा वृत्तीचा छान उपहास कवीने या हायकूत केला आहे. या पद्धतीच्या विनोदी किंवा खेळकर हायकूंना जपान मध्ये सेनर्यू [Senryu] असे नाव दिलेले आहे. मराठीत त्यासाठी अजून वेगळे नाव नाही. मी अशा हायकूसाठी ‘रंजक हायकू’ असे नाव सुचवतो आहे. हायकू आणि रंजक हायकू यांच्यातील सीमारेषा बरीचशी अस्पष्ट आहे. हायकूमध्ये सुरुवातीपासून एक ‘निसर्गवाचक किंवा ऋतुवाचक’ शब्द वापरला पाहिजे असा संकेत आहे. या रंजक हायकूमध्ये सहसा ‘निसर्गवाचक शब्द’ न वापरण्याची सूट दिली जाते. काही टीकाकार रंजक हायकूंना एक वेगळा काव्यप्रकार मानत असले तरी बरेचदा ते हायकू म्हणूनही स्वीकारले जातात. एका टीकाकाराने त्यावर भाष्य करताना [विनोदाने?] म्हटले आहे, ‘जर हायकू म्हणजे चंद्राकडे वळलेले बोट असेल तर senryu म्हणजे तुमच्या बरगडीकडे ‘गुदगुल्या करण्यासाठी’ वळलेले बोट आहे.’ फार पूर्वीपासुन अशा प्रकारचे हायकू तुरळकपणे लिहिले जात पण ते सातत्याने लिहून लोकप्रिय करण्याचा मान Karai Senryu [1718-1790] याला दिला जातो. या कवीचे मूळ नाव काराई हेचिमोन. पण त्याने हायकू लिहिण्यासाठी Senryu हे उपनाम घेतले. ‘सेनर्यू’ चा अर्थ तिसर्या प्रतीचा, अत्यंत कमी दर्जाचा. हे उपहासपूर्ण नाव इतके लोकप्रिय झाले की तेच पुढे या काव्यप्रकाराला दिले गेले. सेनर्यूच्या नव्या पद्धतीच्या हायकूंना विलक्षण लोकप्रियता मिळाली. त्याला असंख्य शिष्यही मिळाले. या शिष्यांनी 1765 साली सेनर्यूच्या निवडक हायकुंचा एक संग्रह प्रकाशित केला. रचनेच्या दृष्टीने हायकू आणि सेनर्यू मध्ये काही फरक नाही. पण दोन्हींचे उद्देश भिन्न असतात. हायकू हा बहुदा निसर्ग आणि ऋतु यांच्याशी संबंधित असतो तर सेनर्यू हा मानवी स्वभाववैशिष्ट्यांचे उपहासपूर्ण वर्णन करतो. त्यांच्यावर खुसखुशीत टीका करतो. विनोदी लेखनाची सारी हत्यारे त्यांत कुशलतेने वापरली जातात. सुरूवातीला या लेखनावर मान्यवर अभ्यासकांनी खूप टीका केली, पण नंतर त्याला हायकुचा उपप्रकार म्हणून मान्यता दिली गेली. काराई ‘सेनर्यू’ चा एक गाजलेला हायकू आहे- मी पकडले चोराला तो निघाला माझाच मुलगा वाचताना प्रथम हसू आले तरी मनात कोठेतरी त्या बापाविषयी सहानुभूतीही देखील निर्माण होते. हायकूत अनेकदा काव्यात सहसा न वापरले जाणारे, शिष्टसम्मत मानले न जाणारे शब्द देखील वापरले जातात. उदाहरणार्थ कोबायाशी इस्साचेच आणखी दोन हायकू माझ्या लघवीचा धबधबा पाहण्यास तयार रहा ओरडणार्या बेडका तू फार ओरडतो आहेस का ? गप्प बस नाहीतर मी तुझ्या अंगावर लघवी करतो असा ‘विनोदी’ दम कवि भरतो आहे. कुणास ठाऊक तो आपली धमकी खरीही करील. इससचा आणखी एक हायकू- अरे नावाड्या पाण्यातील चंद्रबिंबावर लघवी करू नकोस [नावाड्यासाठी चंद्र रोजचाच. त्याला त्याच्या सौंदर्याचे काय कौतुक असणार?] कोबायाशी इस्सा याच्या व्यक्तिमत्त्वातच एक मिस्किलपणा आहे. उदाहरणार्थ, त्याचा एक लोकप्रिय हायकू- म्हातारी चालता चालता नाक शिंकरते- रस्त्याकडेच्या फुलांवर काही माणसे अशी असतात, विशेषत: म्हातारी, की त्यांना जग रहाटीच्या संकेतांचे काही नसते. काही माणसे अशीही असतात की निसर्गातील सौंदर्याकडे त्यांचे लक्षच नसते. ही म्हातारी अशीच आहे. नावाड्याला जसा चंद्र रोजचाच तशी म्हातारीला फुले. शिवाय फुलांवर नाक शिंकरू नये हा संकेतही तिला माहीत असण्याची शक्यता नाही. इस्साचे हे रंजक हायकू जपान मध्ये अतिशय प्रसिद्द्घ आहेत. खोड्या करणार्या मांजरीला तो म्हणतो, मांजरे ग ss ते फुलपाखरू पहा किती सभ्य आहे फुलपाखराचे कौतुक मांजरीसमोर का? तर त्याला सुचवायचे आहे की मांजरी, तू का असे सभ्यपणे वागत नाहीस? हायकूचे विलक्षण सामर्थ्य हे की तो प्रत्येक वाचकाच्या मनात वेगळे तरंग निर्माण करू शकतो. एका अभ्यासकाने लिहिले आहे, इस्सा फक्त मांजरीलाच चिडवीत नाही, तो वाचकालाही चिडवितो आहे..सभ्यपणे वागत नाही म्हणून. एका हायकूत इस्सा लिहितो, थोडाफार आनंदी हो आतातरी घुबडा वसंतातील पाऊस निसर्गातील सौंदर्याचा काही माणसांवर मुळीच परिणाम होत नाही ही इस्साची आवडती थीम आहे. हा हायकू इस्साने घुबडाला उद्देशून लिहिलेला असला तरी त्याचा रोख माणसाकडेच आहे हे ध्यानात येते. जनावरे आणि माणूस यांच्यातील साम्य इस्साला सतत खुणावत असते. त्याच्या एका अत्यंत लोकप्रिय हायकूत त्याने लिहिले आहे, चिमणे ग ss बाजूला सरक अश्वराज येत आहेत हा हायकू वाचताना प्रथम हसू येत असले [शाळेत मुलांना जे हायकू शिकविले जातात त्यांत हा हायकू असतोच.] तरी तो केवळ हसविण्यासाठी लिहिलेला नाही. पहिल्या पातळीवर हे एक क्षणचित्र आहे. जणू कॅमेर्याने घेतलेले. कवी वाटेवरून चालला आहे. त्याला एक दृश्य दिसते. त्या दृश्याच्या चौकटीत अलीकडे, वाटेवर बसलेली एक चिमणी त्याला दिसते आणि जरा अंतरावर एक मोठा अश्वही येताना दिसतो. त्याने मन या दृश्याची संगती लावू पाहते. चिमणी रस्त्यावर बसली आहे, कदाचित पडलेले दाणे किंवा किडे पकडण्यासाठी. तिचे लक्ष इतरत्र नाही व ते साहजिकच आहे. पण कवीला येणार्या घोड्याचा चिमणीला असलेला धोका दिसतो. तो तिला सावध करण्यासाठी म्हणतो, ‘बाजूला सरक, अश्वराज येत आहेत.’ दुसर्या पातळीवर पाहिले तर समाजातील एका ‘रीतीरिवाजावर’ इस्साने तिरकस भाष्य केले आहे. राजा, सेनापती वगैरे येत असताना जनतेने रस्ता मोकळा केला पाहिजे असा प्राचीन काळी दंडक होता. सामर्थ्यवान हे दुर्बलापेक्षा नेहमीच श्रेष्ठ व वरच्या दर्जाचे समजले जातात. त्यांना काही खास अधिकार आहेत असेही मानले जाते, आणि ते अधिकार जनसामान्यांनी निमूटपणे पाळले पाहिजेत अशी अपेक्षा केली जाते. ‘खालच्या’ पातळीवरील चिमण्यांनी रस्त्यातून बाजूला सरावे नाहीतर परिणाम भोगायला तयार असावे. म्हणून इस्सा घोड्याला ‘अश्वराज’ म्हणतो. [इंग्रजी भाषांतरात ‘Sir Horse’ असा शब्द वापरलेला आहे.] यात थोडासा सामाजिक उपरोधाचाही सूर आहे. आजही काही वेगळी परिस्थिती नाही. तथाकथित ‘लोक प्रतिनिधी’ मार्गाने जात असताना ‘जनतेला’ बळाने हटविले जाते हे आपण पहातोच. इस्साची सहानुभूती अर्थातच या ‘गरीब प्राण्यांकडे’ आहे. हे हायकू अनेकदा उपहासात्मक, विडंबन किंवा चेष्टा करणारेही असतात. बाशोचा एक हायकू आहे- ती बाई दाखवते आहे आरसा कोळसे विकणार्याला किंवा एका अनामिक कवीचा खालील हायकू- हळुवारपणे द्राक्षे उचलीत ती म्हणाली- “केवढ्याला?” काही माणसांच्या कृतीतच फक्त हळुवारपणा असतो! आधुनिक हायकू कवींनीही ‘रंजक हायकू’ यशस्विपणे लिहिले आहेत. एक कवयित्रि लिहिते, मी सध्या काय करते आहे हे पाहण्यासाठी मी गुगलवर गेले सुझान फुल्लरचा एक हायकू आहे ‘बहुतेक मला वाटते मला निर्णय घेता येत नाहीत’ तिसर्या वाक्यात कवयित्रीने जे विधान केले आहे ते ‘अधिक स्पष्ट’ करण्यास तिनेच बहुतेक पहिल्या वाक्यात ‘बहुतेक’ हा शब्द वापरला असावा. मला वाटते हायकू कवींना गंभीर किंवा ‘अर्थपूर्ण’ हायकू लिहून ‘थकवा’ येत असला पाहिजे. म्हणूनच बहुतेक कवि ‘रंजक हायकू’ कडे वळतात. मीही असे काही हायकू लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ठाण्याला माझी मुलगी राहते. तिच्याकडे अधून मधून जायचो तेव्हा पूर्व दिशेला मोकळी जागा असल्यामुळे सूर्य छानपैकी उगवताना दिसायचा. एकदा असाच तेथे गेलो असताना सकाळी उठल्यावर पाहिले, पूर्वेला एक मोठी इमारत बांधली जात होती आणि तिच्या लोखंडी खांबात, सळयांत, सूर्य बंदिस्त झाला होता. वाईट वाटले. पण शहरी विकासाच्या रेट्यापुढे आपण सामान्य माणसे काय करणार? मी आपला तीन ओळी लिहून माझा निषेध व्यक्त केला. सूर्य उगवला, प्रकाश झाला
आडवा बिल्डर तयाला माझा नमस्कार. [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] वसंत ऋतूचे आगमन, म्हणजे सुमारे मार्च एप्रिलचा काळ, या काळात सारा जपान चेरीच्या फुलांच्या बहराने रंगून गेलेला असतो. जपानचे सांस्कृतिक जीवन देखील अनेक अंगानी फुलून आलेले असते. या पंधरा वीस दिवसात प्रचंड उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण झालेले असते. माणसे एकेकट्याने, गटा गटाने, बहर पाहण्यासाठी बाहेर पडतात. जंगले, वने, उपवने चेरीच्या फुलांनी व्यापून टाकलेली. शहरात देखील रस्त्याच्या कडेला ओळीने लावलेल्या वृक्षांवर गुलाबी छटा असलेली नाजूक फुले लखडलेली असतात. त्यांचा मंद पण मन गंधित करून टाकणारा सुवास वातावरणात पसरलेला असतो. पुरातन काळापासून लोकप्रिय असलेली ही परंपरा आधुनिक काळात देखील जपानने जपली आहे. जंगलात तर चेरीच्या वृक्षांच्या प्रजातींचा अभ्यास करून उत्तम जातींची पद्धतशीर लागवड व जोपासना केली जातेच, पण असंख्य शाळांच्या आणि सरकारी इमारतींच्या आवारात देखील चेरीची झाडे लावली जातात. मुलांना लहानपणापासून त्या संबंधीच्या कथा, कविता ऐकविल्या जातात. चेरीचे फूल हे जपानने आपले राष्ट्रीय फूल म्हणून निवडले आहे. या काळात माणसे खास ‘चेरीचा बहर पाहण्यासाठी’ बाहेर पडतात. इ.स.च्या 7व्या शतकापासून ही परंपरा सुरू झाली असे मानले जाते. प्रथम राजघराण्यातील मंडळी चेरीच्या बागेत जमत. फुलांच्या सावलीत दिवस घालवत. नंतर सामुराई घराण्यांनी ही परंपरा उचलली. हळू हळू ती सामान्य माणसांत देखील लोकप्रिय बनली. अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरेला ‘हनामी’ असे नाव दिले गेले आहे. ‘हनामी’ म्हणजे ‘flower viewing’ [बहर पाहणे]. या ‘पाहण्याला’ जपानी परंपरेत खास अर्थ आहे. पाहणे म्हणजे नुसते दृष्टिक्षेप टाकणे नव्हे. पाहणे म्हणजे सारे चित्त एकवटून लक्ष केन्द्रित करणे. पाहणे म्हणजे एकटक पाहत राहणे जोपर्यंत समोरच्या दृश्याशी आपले नाते जुळत नाही. इतक्या उत्कटतेने की एका काळानंतर पाहणाराच त्या दृश्याचा एक भाग बनून जातो, फूल बनतो. जपान मधील बहुसंख्य कवी ही [आणि पौर्णिमेचा चंद्र पाहण्याची] परंपरा पाळतात. अर्थात पाहण्यासाठी आलेल्या लोकांत हौशे-नवशेच अधिक असतात. अशाच लोकांना उद्देशून सायग्यो या कवीने हाइकू लिहिला आहे या चेरीचा एकमेव दोष त्या फुलतात गर्दी जमा होते. अर्थात हा दोष लोकांचा आहे हेच कवीला सांगायचे आहे हे लगेच ध्यानात येते. चेरीच्या बहराचा प्रभाव जपानच्या संस्कृतीत खोलवर रूजला आहे. प्राचीन काळापासून चित्रकार या फुलांची व झाडांची अगणित चित्रे काढीत आले आहेत. असा चित्रकार दाखविता येणे कठीण आहे ज्याने चेरीच्या बहराचे चित्र काढले नाही, असा कवी दाखविता येणे कठीण ज्याने या बहरावर कविता लिहिली नाही. कलावंत तर सोडाच, सैनिकांना देखील या बहराचे आकर्षण आहे. दुसर्या महायुद्धात चेरीच्या बहराचा लोकांत राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी उपयोग केला गेला. बॉम्बर विमानावर चेरीची झाडे रंगविली गेली. आजच्या तरुणांमध्ये देखील बहराविषयीचे प्रेम संक्रमित झाले आहे. जपानच्या राष्ट्रीय रग्बी टीमच्या युनिफोर्मवर चेरीच्या फुलांचे चित्र आहे, आणि तिचे नाव आहे-Brave Blossoms. चेरीच्या बहराशी पुरातन काळापासून आणखी एक प्रतिकात्मक अर्थ निगडीत आहे. तो बहर जसे सौंदर्याचे तसेच जीवनाच्या क्षणभंगुरतेचे प्रतीक म्हणून देखील मानला गेला आहे. चेरीचा बहर हा जास्तीत जास्त आठ दहा दिवसच टिकतो, नंतर त्याची फुले गळून पडायला सुरुवात होते. जीवन सौंदर्यापूर्ण आहे पण तसेच ते क्षणकाळ टिकणारेही आहे. ही संकल्पना जपानी संस्कृतीतील mono no aware [ melancholy at passing of things- काल निसटून जात असल्याची विषण्ण जाणीव] या संकल्पनेशी निगडीत आहे. [जी.एंच्या ‘भेट’, ‘ओर्फिअस’ अशा काही कथांतून ही संकल्पना अवतरताना दिसते.] 11 व्या शतकातील पहिल्या जपानी महाकादंबरीत- ‘ The tale of Genji’- मध्ये प्रथम एका कवितेत ही संकल्पना मांडली गेली. चेरीचा बहर वसंत ऋतु काहीच शाश्वत नाही श्रेष्ठ जपानी हाइकूकार योसा बुसोन लिहितो- चेरीची फुले गळून पडताहेत आजही फुले उगवण्याची तसेच ती गळून पडण्याची क्रिया अव्याहतपणे चालूच आहे..चालूच राहणार आहे. सौंदर्य हरवलेले जीवन हे वास्तवही माणसाला स्वीकारावेच लागते. ही कल्पना मांडताना बूसोन आणखी एका हाइकूत लिहितो- चेरीचा बहर संपला मंदिर पुन्हा फांद्यांच्या ताब्यात असे असले तरी चेरीचा बहर म्हणजे उत्साहाचा बहर. चैतन्याचा बहर. कोबायाशी इस्सा लिहितो- जगण्यातील आनंद अद्भुत चेरीबहराच्या सावलीत या बहराचा प्रभाव एवढा आहे की- ‘कुणीही अनोळखी उरत नाही चेरीच्या बहराखाली ‘ [इस्सा] एकाच सौंदर्यपूजक वृत्तीतून ही माणसे एकत्र आलेली आहेत, मग ती अनोळखी कशी राहतील? त्यांचे एकमेकांशी नाते जुळेलच. मात्र हे नाते तात्पुरते जुळले आहे का? कारण कायमचे नाते जुळविण्यास हे जग अपात्र आहे! दुसर्या एका हायकूत इस्सा लिहितो- चेरी बहर जिकडे तिकडे - आणि हे अपात्र जग या बहराचा फक्त माणसावरच परिणाम होतो असे नव्हे. ओरीसुरा हा कवी एका हाइकूत लिहितो- पहाडातील निर्झर. चेरीच्या छायेखाली दगड देखील गाणे गाऊ लागतात. चेरीची फुले क्षणजीवी तसेच नाजुक देखील. आवाजानेही गळून पडतील. म्हणून एक हाइकूकार इशारा देतो- मंदिराची घंटा हळूच वाजवा चेरी फुलली आहे. चेरीचा बहर असंख्य वेळा पाहत राहिल्यामुळे त्याच्या संदर्भातल्या अगणित आठवणी माणसाच्या मनात भिरभिरत असतात, म्हणूनच बाशो एका हाइकूत लिहितो- किती किती गोष्टी पुन्हा मनात घेऊन येतो चेरीचा बहर चेरीचा बहर हा सौंदर्याचे प्रतीक असो की क्षणभंगुरतेचे, खरे तर हा प्रतीकात्मक अर्थ माणूसच त्याला देतो. निसर्ग फक्त असतो. आपल्याच नियमांनुसार बदलणारा. कोबायाशी इस्साने एका हाइकूतून हे सत्य अतीशय नेमकेपणाने मांडले आहे- ‘तुझ्याशिवाय चेरीचा बहर फक्त बहर निसर्ग सर्वांसाठीच फुलत असतो. आपण त्याला काही खास बनवितो. त्याचे महत्त्व आपल्यासाठी अधिक वाढते जेव्हा तो बहर आपण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पाहतो. पण जेव्हा ती प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर? तर मग तो बहर ‘फक्त बहर’ असतो. आपले सारे वैशिष्ठ्य हरवून बसलेला. केवळ एका झाडाचा बहर असलेला. झाडाच्या फांद्यातून पालीकडले देऊळ दिसते बहर ओसरल्यावर चेरीचा बहर पाहून नादावणे ही काही जपानी कवींचीच मक्तेदारी नाही, जगातल्या प्रत्येक कवीला सौंदर्याची भूल पडलेली आहे. ज्याला ही भूल पडलेली नाही तो कवी होऊच शकत नाही. चेरीच्या बहरासंदर्भातील हाइकू शोधताना मला अचानक Marilyn Potter या कवयित्रीचा हाइकू दिसला आणि मी चमकलो. तिच्या हाइकूचा अनुवाद असा- ‘हिवाळ्यातील वादळ- कॅलेंडरच्या पानांवर शोधते चेरीबहराचा फोटो हिवाळ्यातील एक सर्दलेली एकाकी रात्र. खोलीत कवयित्री एकटी बसलेली आहे. बाहेर कडाक्याची थंडी, वादळ. आतले एकाकीपण आणि बाहेरचे गारठलेपण. अशावेळी आवश्यकता आहे ती कुठल्यातरी सोबतीची. मग ती सोबत आठवणींची का असेना. तिला आठवते, कॅलेंडरच्या मार्च महिन्याच्या पानावर चेरीच्या बहराचा सुंदर फोटो आपण पाहिला होता. ती ते पान शोधते. तो फोटो शोधते. त्याच्यावरून अलगद हात फिरविते. चेरीचा बहर पाहिल्याची सय तिच्या मनात जागी होते, पानावरच्या चित्रातले रंग आठवणीच्या रंगात हलकेच मिळून जातात. मनभर पसरतात. आता ती एकटी राहिलेली नसते. तिची आवडती चेरी तिच्या सोबतीला आलेली असते.
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
सायग्योचा जन्म 1118 साली फुजिवारा नावाच्या प्रख्यात सामुराई घराण्यात झाला. त्याचे मूळ नाव नोरीकियो. त्याच्या घराण्यातील पुरुष हे राजाचे निष्ठावंत चाकर होते. लहानपणी नोरीकियोवर लढवय्येपणाचे संस्कार झाले. त्याच्या मनातही योद्धा बनण्याचे स्वप्न होते. खूप वर्षानी त्याने एका कवितेत आपल्या बालपणीच्या स्वप्नाना असे शब्दरूप दिले [जपान मध्ये बाल-साईग्योच्या बाहुल्या लोकप्रिय आहेत] तरुणपणी सायग्योला राजवाड्यात नोकरी मिळाली खरी पण पाच वर्षांतच, वयाच्या तेवीसाव्या वर्षी, त्याने त्या नोकरीचा राजीनामा दिला. त्याने असे का केले हे एक गूढच आहे. आजवर अनेक अभ्यासकांनी या गूढाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सायग्योने नंतरच्या काळात लिहीलेल्या कवितांचा सहसा आधार घेतला जातो. सायग्यो जन्मला त्याला आता नऊशे वर्षे पूर्ण झालेली आहेत. 12 व्या शतकातील जपानमध्ये, [अर्थात जवळपास जगातील बहुतेक देशात] प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनाविषयी काही लिहून ठेवले जाणे हे दुर्मिळ होते. सायग्योबद्दल आज जी माहिती आहे ती अनेकांनी सांगितलेल्या मौखिक आठवणीवर आधारित आहे किंवा त्याच्या संबंधीच्या अनेक आख्याइकांवरून संकलित केलेली आहे. किंवा त्याच्या कवितेतील स्वत:संबंधीच्या उल्लेखावरून अनुमान लावलेली आहे. [कवीच्या कवितेतील ‘मी’ आणि खरा ‘मी’ हे एकच असे ग्रहित धरणे चुकीचे आहे असेही अनेक अभ्यासकांचे मत आहे.] राजाश्रय सोडण्याच्या सायग्योच्या या निर्णयानंतरचे तपशील सुद्धा आज ज्ञात नाहीत. उदाहरणार्थ भिकखू होण्याची दीक्षा त्याने कोणत्या मंदिरात व केव्हा घेतली याची कुठेच नोंद नाही. मात्र एवढे खरे की त्या काळातील बहुतेक भिकखूप्रमाणे त्याने एखाद्या मठात वा मंदिरात कायमचे राहण्याचे नाकारले. तो सतत मठांपासून काहीसे अंतर ठेऊन पर्वतात, रानावनात फिरत राहिला. बहुतेक वेळा त्याचा निवास स्वत: तयार केलेल्या लहानशा, फक्त एक माणूस राहू शकेल एवढ्याच, झोपडीत असे. तो ज्या मठाजवळ असे तेथील लोक त्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था करीत आणि त्या बदल्यात तो गावोगाव फिरून मठासाठी देणग्या गोळा करी. अशा प्रकारे त्याने जवळजवळ सार्या जपानची परिक्रमा केलेली आढळते. त्याच्या काळातला तो सर्वाधिक प्रवास केलेला प्रवासी मानला जातो. सायग्योने आपले शहर सोडले आणि त्यानंतर सुमारे पन्नास वर्षे तो जपानमध्ये हिंडत राहिला. एका ठिकाणी राहण्याचे त्याने नाकारले. त्याच्या मनाला जणू जबरदस्त ‘प्रवास भूल’ पडलेली होती. या प्रवासातच एकदा त्याने चेरीचा बहर पाहिला आणि तो त्याच्या प्रेमातच पडला. अनेक कवींनी चेरीच्या बहरावर कविता लिहिल्या आहेत पण सायग्योचे त्यावरील प्रेम काही विलक्षणच होते. त्याने चेरी बहराच्या संदर्भात दोनशेहून अधिक कविता लिहिल्या आहेत. एकीकडे जगापासून दूर जाण्याची, बुद्धाच्या तत्वज्ञानात जीवनाचा अर्थ शोधण्याची त्याची मनीषा आणि दुसरीकडे या नश्वर सौंदर्यात भान हरवून गुंग होणे यात वरवर पाहता विरोधाभास दिसतो पण तो तसा नाही. त्याचे या बहराविषयीचे आकर्षण हे त्याच्या आत्म्यात खोलवर रुजलेले होते. त्यांच्यात, पर्यायाने निसर्गात तो बुद्धाचे अस्तित्त्व पाहत होता. त्याच्यालेखी निसर्गातील सौंदर्याचा शोध आणि बुद्धाचा शोध हे एकच होते. निसर्गसौंदर्याचे वर्णन करणे म्हणजे मनाच्या एका उन्नत, भ्रममुक्त, ज्ञानी अवस्थेचे वर्णन करणे होय आणि म्हणूनच त्याच्या प्रेमात पडणे म्हणजे ‘योग्य मार्गावरील’ एक पाऊल आहे अशी त्याची धारणा होती. एका ठिकाणी त्याने लिहिले आहे- ‘मी संपूर्ण वसंत ऋतुत या फुलांकडे केवळ पाहत राहू इच्छितो.’ विशेषत: योशिनो पर्वतावरील चेरी बहर त्याच्या फार आवडीचा होता. ‘एकटा प्रवास करताना मला जाणवत नाही माझ्या हृदयाचे धडधडणे ते मागेच राहिले आहे जेथे मी चेरीबहर पाहिला होता’ चेरीचा बहर संपत आला तरी कवीचे मन काही भरत नाही. तो उरलीसुरली फुले शोधू लागतो. आणि एका वृद्ध वृक्षावरली फुले पाहताना त्याच्या ध्यानात येते, बहर जसा क्षणिक आहे तसेच आपले आयुष्य देखील आहे. ‘आता किती वसंत उरलेत फुलायचे?’ तो विचारतो ‘मला शोधायला हवी काही उरली सुरली फुले या वृद्ध वृक्षाने जपलेली आम्ही सारखेच आहो- आणखी किती वसंत उरलेत फुलायचे? मात्र कवीला सतत ‘पुढे’ जाण्याची ओढ आहे, ही प्रवासभूल त्याला एका ठिकाणी, ते कितीही मोहक असले तरी, थांबू देत नाही. त्याने आपल्यासाठी ‘सायग्यो’ हे जे टोपण नाव निवडले त्याचा अर्थ ‘पश्चिम-प्रवास’ हा आहे. ‘हा चंद्र असाच रात्रीमागून रात्री प्रकाशत राहील माझ्या या गवती झोपडीवर मला मात्र निघायला हवे. सायग्यो आजदेखील जपान मधील सर्वाधिक लोकप्रिय कवींपैकी एक आहे याचे कारण त्याच्या कविता या त्याच्या समकालीन जपानी कवितेपेक्षा फारच वेगळ्या होत्या. चीनी कवितेकडून उसने घेतलेले विचार आणि आत्यंतिक व्यक्तिनिष्ठ दृष्टीकोण यांच्यापासून जपानी कवितेला त्याने मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचे समकालीन कवी शाब्दिक खेळात रमलेले होते. त्याला या खेळात रस नव्हता. कवितेची भाषा अनलंकृत असावी यावर त्याचा कटाक्ष असे. त्याच्यानंतर सुमारे दोनशे वर्षांनी जपानमध्ये जो हायकू हा काव्यप्रकार उदयाला आला [त्यावेळी त्याचे नाव होक्कू असे होते.] त्याच्या उदयास सायग्योची कविता मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होती असे मानले जाते. बौद्ध तत्वज्ञानाचा त्याच्या काव्यावर प्रभाव असणे हे साहजिक होते पण ते तत्वज्ञान क्लिष्ट स्वरूपत त्याच्या काव्यात कधीच अवतरत नाही, तर ते सूचकतेने व प्रतिमांच्या भाषेत मांडले जाते. Mono no aware[जीवनाच्या नश्वरतेची जाणीव], त्याबद्दलचे दू:ख आणि हेच आयुष्याचे सत्य आहे ही खोलवर रुजलेली जाण, Sabi [एकाकीपणा] आणि Kanashii [उदासीनता] हे त्याच्या काव्याचे महत्त्वाचे घटक होते. आयुष्य हे क्षणभंगूर आहे ही जाण कवीच्या मनात सतत आहेच तरी याबद्दल त्याची तक्रार नाही, उलट ते तसेच असायला हवे असेही त्याला वाटते. आयुष्य क्षणभंगुर असल्याची भावना, जी पुढे हायकूचा एक महत्त्वाचा भाग बनली ती येथे बीजरूपाने आढळते. ‘क्षणात दिसले, क्षणात अदृश्य फुलपाखरू उडताना कुंपणाने वेढलेल्या फुलांमधून- असेच आयुष्य हवे, जरी ते असेल क्षणात दृश्य, क्षणात अदृश्य ... 1170 साली सायग्योने ‘आपण कधी व कोठे मरण पावू इच्छितो’ या संदर्भात एक कविता लिहिली होती. ‘माझी इच्छा आहे वसंत ऋतूत मला मृत्यू यावा चेरीचा बहर फुललेला असताना वर्षाच्या दुसर्या महिन्यात आकाशात पूर्ण चंद्र असताना.’ पुढे तो वीस वर्षे जगला. मात्र 1190 साली जेव्हा त्याला मृत्यू आला तेव्हा अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धाने त्याची ही इच्छा पूर्ण केली, फक्त एक दिवसाच्या फरकाने. चेरीला बहर आलेला असताना, पौर्णिमेच्या नव्हे तर त्यानंतरच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कदाचित पौर्णिमेच्या चंद्राने त्याला रात्रभर न्याहाळून त्याचा निरोप घेतला असेल!
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] हायकूंचा शोध घेत असताना मी थोडा आजूबाजूलाही, जपानी कवितेच्या मुलूखात फिरत होतो. त्यावेळी जपानच्या समृद्ध काव्य परंपरेचे विलक्षण दर्शन मला घडले. 13 व्या शतकापर्यंत तांका हाच जपान मधील सर्वांत लोकप्रिय असा काव्यप्रकार होता. इ.स.च्या सातव्या शतकात जपानमधील सुशिक्षित वर्ग हा आपल्या भावना कवितेतून व्यक्त करू लागला होता. अर्थात हा सुशिक्षित वर्ग मुख्यत: उच्च वर्णीय -राजे रजवाडे, सरदार, आणि धनिक- असल्यामुळे समाजाच्या खालच्या स्तरातील लोक या कवीमध्ये सहसा आढळून येत नाहीत. हे उच्च वर्णीय लोक वेगवेगळ्या सामाजिक समारंभांच्या वेळी आपल्या कविता सादर करीत. या काळात कवितेला उत्तम राजाश्रय देखील होता. राजाच्या दरबारात वेळोवेळी कवितांच्या स्पर्धा घेण्यात येत. राजे, राणी, त्यांचे कुटुंबिय देखील अनेकदा स्वत: कविता सादर करीत. त्या काळाच्या रितीरिवाजाप्रमाणे जपानमध्ये आपसात नाते नसलेले उच्चवर्णीय स्त्री पुरुष एकमेकांशी मोकळेपणी बोलू शकत नसत. म्हणून ते बहुसंख्य वेळा पत्रांतून एकमेकांशी संपर्क करीत आणि ‘तांका’ हे त्या पत्रांचे अविभाज्य अंग असे. ही मंडळी ‘सुसंस्कृत’ असल्यामुळे सहसा या कवितेतून अभिरुचिहीन विचारांचे चित्रण केले जात नसे. अनेकदा प्रेमभावना स्पष्टपणे न मांडता आडवळणाने मांडल्या जात त्यामुळे आपोआपच योजल्या गेलेल्या प्रतिमांमुळे या पत्रांतील लेखन काव्याच्या पातळीवर जात असे. जपानी भाषाही या पद्धतीच्या लिखाणाला पूरक होती. उदा. जपानी भाषेत ‘मात्सु’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, ‘पाईनचा वृक्ष’ आणि दूसरा ‘वाट पाहणे’. त्यामुळे कवितेत पाईन वृक्षाचे वर्णन करणार्या कवीला ‘मी तुझी वाट पाहतो आहे’ असेही सुचवायचे असे. ‘समुद्र हे पर्वताला गिळून टाकू शकत नाहीत’ असे जेव्हा एखादा कवि लिही तेव्हा त्याचा अर्थ ‘कुठलीही शक्ति माझ्या प्रेमाचा नाश करू शकत नाही’ असाही असे. हरिणाचे ओरडणे हे उदासीनतेची प्रतिमा मानली जात असे. की सेन हा कवि लिहितो, ‘माझी भिख्खूची झोपडी शहरापासून दूर सोबत फक्त एक हरीण. पर्वतातील घर, माणसे सोडून गेलेली’ या कवितांपैकी बर्याचशा कविता ही ‘निसर्ग काव्ये’ असली तरी त्यापैकी अनेक कवितांत मानवी भावना, विशेषत: प्रेमभावनांचे सूचन केलेले असे. कधीकधी निसर्ग आणि मनातील प्रेमभावना यांची सांगड देखील घातली जात असे. मिबू नो तादामिने [860-920] ची एक कविता आहे- ‘गारठलेली सकाळ क्षीण चंद्र सोबतीला कुणी नाही विरहात उगवणार्या दिवसाइतके प्रेमहीन काहीच नाही' कधी कधी निसर्गाचा संदर्भ न घेताच देखील प्रेम व्यक्त केले जात असे. निसर्गवाचक शब्द हा कवितेचा एक आवश्यक भाग नंतरच्या काळात मानला गेला. एक कवयित्री लिहिते- ‘जर तू मण्यांची माळ असतास तर तुला मनगटाभोवती बांधले असते- पण या ऐहिक जगात तू पुरुष आहेस वळविण्यासाठी अवघड’ मात्र जसजसा ‘तांका’ हा काव्य प्रकार लोकप्रिय बनू लागला तसतशी आपल्याला जे सांगायचे आहे ते वाचकांनी ओळखावे म्हणून ते धूसर ठेवण्याची प्रथाही या काळात सुरू झाली. ओटोमो नो याकामोची हा कवि लिहितो- ‘माझ्या शरीराचे हे फोलपट बिनमहत्त्वाचे आहे मी पाहतो आहे पर्वत आणि नद्यांकडे शोधतो आहे माझा मार्ग’ हा मार्ग ऐहिक प्रवासातला मार्ग असू शकतो किंवा आत्मिक मार्गही. ही संदिग्धता काव्याला अधिक मनोरम बनविते. एक अनामिक कवी लिहितो- ‘माझे प्रेम, माझा तिरस्कार किती निरर्थक.. शरदातल्या उत्तररात्री एकट्याने पावसाचा आवाज ऐकताना’ इ.स. 905 च्या सुमारास जपानचा राजा दियागो याने अनेक मान्यवर व्यक्तींना बोलावून जपानी कवितांचा एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह तयार करण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपविली. हे संकलन तयार करणार्यापैकी की नो त्सुरायुकी हा स्वत: एक उत्तम कवि होता. त्याने या संकलनाला सुरेख प्रस्तावना लिहिली आहे. त्यांत तो लिहितो- ‘जपानमधील कवितेचे बीज हे मानवी हृदय असून शब्द ही तिची पाने आहेत. जेव्हा माणसे आजूबाजूला जे पाहतात किंवा ऐकतात त्याने प्रभावित होतात, किंवा आपल्या आयुष्यातील घटनाबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप द्यावेसे त्यांना जेव्हा वाटते तेव्हा कविता निर्माण होते. पाखरांचे गाणी म्हणणे, तलावातील बेडकांचे आवाज करणे, आपल्याला शिकविते की पृथ्वीवरील सर्व प्राणी गाणे गाऊ शकतात. ही गाणी स्वर्ग आणि पृथ्वीलाही सहज हलवू शकतात, स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यात सुसंवाद आणू शकतात आणि शूर योद्ध्यांच्या हृदयांना कोमल बनवू शकतात.’ या कविता संकलनात स्त्रियांचा सहभाग देखील लक्षणीय आहे. ओनो नो कोमाची [834-880] ही त्यापैकी एक महत्त्वाची कवयित्री. ती तिच्या कवितेइतकीच तिच्या अप्रतिम लावण्याबद्दल प्रसिद्ध होती. तिच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की तिला मागणी घालणार्या एका तरुणाला तिने अशी अट घातली की जर तो सलग शंभर रात्री तिच्या घरासमोर दिवस उगवेपर्यंत उभा राहिला तर ती त्याच्याशी लग्न करील. असे म्हणतात की तो नव्व्यानवव्या दिवशी मरण पावला. कोमाचीची एक प्रसिद्ध कविता आहे- ‘मानवी हृदयाच्या फुलांचा रंग फिका होत जातो या जगात कसल्याही बाह्य कारणाशिवाय.’ फुजिवारा नो तेईका हा या परंपरेतील एक महत्त्वाचा कवि मानला जातो. तो एक उत्तम कवी तर होताच पण याबरोबरच त्याने जपानी कवितेच्या अभ्यासकांसाठी फार मोठे कार्य करून ठेवले आहे. इ.स. 1237 च्या सुमारास त्याने ‘हायकुनीन इस्शू’ या नावाचा एक काव्यसंग्रह तयार केला. या संग्रहात त्याने सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंतच्या निवडक 100 कवींच्या प्रत्येकी एक अशा 100 कविता एकत्रित केल्या. हे एक ऐतिहासिक कार्य होते. हा संग्रह अतीशय लोकप्रिय तर झालाच पण आज देखील त्याच्या नव्या नव्या आवृत्त्या निघत असतात व जपानी कवितेचा अभ्यास करणार्यांसाठी तो अत्यावश्यक असा ग्रंथ मानला जातो. हा संग्रह इतका लोकप्रिय झाला की त्याच्यावरून एक नवा ‘कार्ड-गेम’ तयार करण्यांत आला. या खेळात प्रत्येक कवितेच्या पाच ओळींची विभागणी दोन कार्डात केली जात असे. एका कार्डावर पहिल्या तीन ओळी लिहिल्या जात व दुसर्यावर नंतरच्या दोन. अशी 100 कवितांची दोनशे कार्डे तयार केली जात. ही कार्डे एकमेकात मिसळून ज्याच्या वाट्याला पहिल्या तीन ओळी येतील त्याने शेवटच्या दोन ओळी शोधून कविता पूर्ण करायची, असा हा खेळ होता. त्यात पारंगत होण्यासाठी पाठांतर व कवितेची जाण या दोन्ही गोष्टी आवश्यक होत्या. या काळात तांका काव्य इतके लोकप्रिय झाले होते की या कवितांचे wood-block prints काढले जात. त्या कविता घर सजवटीसाठी वापरल्या जात, इतकेच नव्हे तर कपड्यांवर देखील लिहिल्या जात. या संग्रहाचा माझ्याजवळ असलेला इंग्रजी अनुवाद Frank Watson याने ‘One Hundred Leaves’ या नावाने केला आहे. या संग्रहात कविता त्यांच्या प्रकाशनाच्या कालक्रमानुसार संग्रहित केल्या असल्यामुळे जपानी कवितेचा इ.स. 1300 पर्यंतचा विकास अभ्यासण्यासाठी त्याची फारच मदत होते. या पुस्तकातील पहिली कविता ही एंपरर तेंची [इ.स. 623-671] याने लिहिलेली आहे. ‘कापणीचा हंगाम कशीबशी शाकारलेली झोपडी हिवाळ्याचा आसरा माझी बाही दवाने ओली’ (ओली बाही हे दु:खी मनाचे प्रतीक मानले जाते.) काळ हातून निसतात चालला असल्याची विषण्ण करणारी भावना ओनो नो कोमाची [825-900] याने त्याच्या खालील कवितेतून मांडली आहे. ‘थरथरणार्या फुलाचा चेहरा सुकला आहे मी शून्यपणे पाहत राहतो जग वृद्ध होत जाते पाऊस पडत राहतो’ ढगांच्या आकारात आपल्या मनाचे आकार शोधणे हा प्राचीन काळापासून कवींचा आणि कवीमनाच्या रसिकांचा छंद आहे. हेन झौउ [काळ अनिश्चित-सुमारे आठवे शतक] याची ही कविता आधुनिक काळातील भावकवितेशी किती जवळचे नाते सांगते!- ‘वायु लहरींनो ढगांना विसकटणारे तुमचे वाहणे कृपया थांबवा मला दिसणारा तिचा चेहरा पाहू द्या आणखी काहीकाळ’ काही कवितांमधून कवीच्या मनात भळभळणारे दु:ख ठळकपणे प्रकट होताना दिसते- अरिवारा नो युकीहीरा [818-893] लिहितो- ‘दूर आहो आपण एकमेकांपासून पण जर मला तुझे शोकगीत ऐकू आले- मी लगेच परत येईन किंवा जीव देईन’ आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहण्याची भावना अनेक कवितांमधून व्यक्त झालेली दिसते. सोसेइ होशी हा कवि लिहितो- ‘मी येते’ असे तू म्हणाली होतीस म्हणून मी वाट पाहत राहिलो या दीर्घ दिवसांत सकाळच्या चंद्राची’ ओशिकोची नो मित्सुने [859-925] याची एक रचना आहे- ‘मन गोंधळले आहे माझे- मोसमातील पहिल्या धुक्याने संभ्रमाची चादर पसरली आहे पांढर्या शेवंतीवर... मी फुले तोडू शकेन तर योगायोगानेच’ हे एक सुंदर असे निसर्गदृश्य आहे. धुके, संभ्रम, पांढरी शेवंती या सार्यांना अर्थाचे दुहेरी पदर आहेत. प्रत्येकाने ते आपल्या मनात उलगडू पहावेत. मनातही कदाचित संभ्रमाचे धुके साचेल, पण ते हवेहवेसे असेल यात शंका नाही. हरूमीची नो त्सुराकी [मृत्यू 920] ची एक सुरेख रचना- ‘पर्वतातील झर्यात पूल तयार केला आहे या वार्याने मेपलच्या पानांचा प्रवाह अडवणारा’ दर्याखोर्यातून भ्रमण करणार्या वाटसरूला दिसणारे एक नेहमीचे दृश्य. पानगळीचा मोसम आहे. वार्याने मेपलच्या झाडांची पाने गळून पडताहेत ती खालच्या वाहणार्या झर्यात. प्रवाह अडला आहे. पण या पानांनी फक्त अडविण्याचे काम केलेले नाही, त्यांनी एक पूल देखील तयार केला आहे. हा पूल आहे ‘पलीकडल्या’ तीरावर जाण्यासाठी... गळून पडणारी पाने हा वाटसरूचाही ‘प्रवास’ संपण्याचा तर संकेत नसेल?
तांका कवितेतील 5 ओळींची आणि 31 ओनची रचना नेमकी केव्हा दोन विभागात विभागली जाऊन तिचा 17 ओनचा भाग ‘स्वतंत्र’ झाला ते सांगता येत नसले तरी ही प्रक्रिया अकराव्या शतकात सुरू झाली असे मानले जाते. तिच्याविषयी पुढील भागात. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |


RSS Feed