|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] आपल्या मनाचीही एक मर्यादा असते. समोरचे विश्व आकलन होण्याची. समोरचा अवकाश जर नजरेच्या परिघात मावत नसला तर त्याचे विश्लेषणही आपल्याला करता येत नाही. नायगरा धबधब्याच्या बाबतीत असेच घडले आणि रोझ गार्डन विषयी देखील हाच अनुभव आला. San Jose येथे एक प्रसिद्ध असे रोझ गार्डन आहे. बरेच दिवसापासून त्याचे नाव ऐकत होतो. एके रविवारी क्षितिजने आम्हाला ते पाहण्यास नेले. अमेरिकेतील वास्तव्यात ही एक मर्यादा सतत जाणवत राहते. कुठे जावयाचे म्हणजे मुलाने आपल्याला नेले तरच जाणे शक्य असते. एक तर येथील ठिकाणे एकमेकांपासून खूप दूर. कोठेही जायचे म्हणजे कारनेच जावे लागते. दुसरे म्हणजे येथे पब्लिक ट्रान्सपोर्ट -सिटी बस, लोकल वगैरे अत्यंत कमी. तर आम्ही दोघे, मुलगा, सून असे सारेजण एके दिवशी सकाळी उठलो आणि रोझ गार्डनला आलो. अनेक एकरात तयार केलेली ही एक विस्तीर्ण बाग होती आणि नावा प्रमाणेच तिच्यात फक्त गुलाबाची विविध प्रकारची झाडे होती. कांही अगदी लहान, माझ्या दोन वितीएवढी तर काही माझ्याहून उंच. काही काटेरी तर काहींच्या फांद्या अगदी मऊसूत. फुलांच्या रंगात तर एवढे वैविध्य होते की त्यांचे शब्दात वर्णन करता येणे कठीण. मोजून मोजून किती रंग मोजणार? एखाद्या कसलेल्या चित्रकारालाही त्यापैकी अनेक रंगछटांची नावे माहीत नसतील. माझ्या कॅमेर्याला तर मोकळे कुरण मिळाले होते. ‘अनंत हस्ते कमलावराने’ दिल्यावर कॅमेराही ते दान घेण्यास अपुरा पडणारच. एकेक वाफा ओलांडत, पुढे सरकत सरकत फोटो काढण्यात काही वेळ गेला. वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या आकारांची फुलपाखरे शोधली. पण मग चक्क कंटाळा आला. आता पुरे झाले असे वाटू लागले. माणसाची आनंद घेण्याचीही क्षमता मर्यादित असते. की दोष आपलाच आहे? आपल्या हावरटपणाचा? फुकट मिळाले म्हणून सारे काही झोळीत भरून घेता येत नसते. मला आठवले, अनेक वर्षांपूर्वी फिलाडेल्फियाला मुलीकडे गेलो होतो. तेथे एक फुलपाखरांचे म्युझियम आहे असे कळल्यावर ते पाहण्यासाठी गेलो. वेगवेगळ्या खोल्यात, काचेच्या निरनिराळ्या आकाराच्या पेट्यात फुलपाखरे ठेवलेली होती. प्रत्येक पेटी शेजारी त्या फुलपाखराचे शास्त्रीय नाव, त्याचा रंग व आकार, त्याचा आयुष्यकाळ वगैरे माहिती लिहिलेली होती. या पेट्या वरच्या बाजूने उघड्या होत्या. काही पेट्यात फुलपाखरांना खाण्यासाठी खाद्य, काही ताजी फळे, फुले ठेवलेली होती. फुलपाखरे खोलीत आनंदाने बागडत फिरत होती. निदान मला तसे वाटत होते. मी त्यांचे अनेक फोटो काढले. तेथेही हाच अनुभव आला होता. काही वेळाने फोटो काढण्याचा चक्क कंटाळा आला. मग कॅमेरा बंद करून, पिशवीत ठेऊन निघालो, तेव्हा एका माणसाने मला थांबविले. तो म्हणाला, ‘Sir there is a butterfly on your back.’ अनेक माणसे माझ्या पाठीकडे पाहत होती. आता पाठीवरचे फुलपाखरू मला कसे दिसणार? एका कोपर्यात एक आरसा होता. पण त्याच्यासमोर उभे राहिले की आपला चेहराच दिसणार. पाठ काही दिसणार नाही. पाठीवरले ओझे माणसाला जाणवते तरी. या फुलपाखराला तर काहीच वजन नव्हते. अनेकांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या. तेही थोडे विचित्र वाटत होते. काय करावे या विचारात मी असताना तो मघाचा माणूस म्हणाला, ‘Flew away!” अरेच्चा! उडाले देखील! इतक्या लवकर! दिसले नाही तर नाही, थोडावेळ आणखी बसले असते तर? पाठीवर बसलेले ते फुलपाखरू मला यानंतर कधीच दिसणार नव्हते. क्षणभर चुकचुक वाटली. पण मग मनाशी म्हटले, हरकत नाही. खरे तर त्याची माझी ‘गाठभेट’ झालीच नव्हती. पण नकळत त्याने मला ‘फुलपाखरू पाठीवर बसलेला माणूस’ बनविले होते. यानंतर, ‘एकदा आपल्या पाठीवर फुलपाखरू बसले होते’ ही आठवण तर सदैव मनात राहणार आहे. शिवाय जाताना ते मला माझ्या वहीसाठी तीन ओळीसुद्धा देऊन गेले होते- समजले नाही
पाठीवर फुलपाखरू आहे कुणी सांगितल्याशिवाय
0 Comments
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] जपानी साहित्यातील सर्वाधिक लोकप्रिय व जगभर पसरलेला काव्यप्रकार म्हणजे हायकू. पण हायकूशिवायही जपानी साहित्यात बरेच काही अप्रतीम लेखन आहे जे गेल्या शतकाच्या उत्तरार्धात, अनुवादाद्वारे, सर्वदूर पोहोचले आहे. या साहित्यापैकी ‘हायबन’ नावाचा एक साहित्यप्रकार मात्र थोडासा अलक्षित राहिला आहे. या प्रकारच्या लेखनाची सुरुवात प्रथम मात्सुओ बाशो [1644-1694] या कवीने लिहीलेल्या ‘The Long Road to Deep North’ या पुस्तकाने झाली असे मानले जाते. 1689 साली बाशो हा त्याचे गाव सोडून सुदूर उत्तरेकडील हिराझुमी या गावी जाण्यास निघाला, आणि जवळजवळ दोन वर्षानी 1691 मध्ये तो परत आला. हा सुमारे 2400 की.मी.चा प्रवास त्याने पायी केला. या प्रवासाची, हिराझुमी व इतर अनेक गावांत केलेल्या वास्तव्याची कहाणी त्याने या पुस्तकात वर्णन केली आहे. या लेखनात त्याने एक अभिनव पद्धत वापरली. हे एक प्रवासवर्णन तर आहेच, तसेच ती त्याने अनेक ठिकाणी केलेल्या वास्तव्यातील अनुभवांची कहाणीही आहे. त्यांत निसर्गवर्णने आहेत, भेटलेल्या व्यक्तींची शब्दचित्रे आहेत, त्यांत त्याचे स्वतत्र हायकू आहेत, मुक्त चिंतनपर गद्य आहे, डायरी आहे, त्याने लिहिलेली व त्याला आलेली पत्रे आहेत, त्याने वाचलेल्या प्रसिद्ध कवींच्या कविता आहेत, इतरांचे हायकू आहेत, त्यावरचे भाष्य आहे, एवढेच नव्हे तर त्याने काढलेली चित्रेही आहेत. गद्य आणि काव्य यांच्या या ललित मिश्रणाला त्याने ‘हायबन’ असे नाव दिले. हे पुस्तक अमाप लोकप्रिय झाले. बाशोनंतर अनेक कवींनी, चिंतकांनी, प्रवाशांनी या प्रकारच्या रचना केल्या. या डायरीची सुरुवात बाशोने एका अत्यंत काव्यात्म परिच्छेदाने केली आहे- ‘दिवस आणि महीने हे अनंताचे प्रवासी आहेत. वर्षे येतात आणि जातात-तीही प्रवाशांसारखी. जे आपले आयुष्य जहाजावर तरंगत घालवितात किंवा घोड्यावरून सफर करीत जे म्हातारे होतात तेही प्रवासीच असतात. ते जेथे जातात ती जागा त्यांचे घर असते. अनेक वर्षांपासून, जेव्हा मला एखादा ढग आकाशात वायु लहरीवर तरंगत जाताना दिसतो, तेव्हा सारे सोडून प्रवासाला निघण्याची अनिवार उर्मि माझ्या मनात निर्माण होते.’ 2024 साली अमेरिकेत आल्यावर हे पुस्तक पुन्हा वाचण्यात आले. अचानक मनात कल्पना आली की अशा प्रकारेच आपले अनुभव का शब्दबद्ध करू नयेत? आणि मी टिपणे लिहावयास सुरुवात केली. काही दिवसांनंतर मी भारतात परत आलो. पण येथे आल्यावर देखील हा टिपणे लिहिण्याचा संकल्प मी मोडला नाही. त्या नोंदीपैकी ही एक नोंद- पहिल्यांदा जेव्हा आम्ही अमेरिकेत मुलाकडे आलो तेव्हा तो न्यू जर्सी येथे होता. पहिली अमेरिका भेट. त्यावेळी कोठे जायचे, कोणत्या ठिकाणांना भेटी द्यायच्या याची यादी वगैरे तयार होती. न्यू यॉर्क मधील अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यावर मुलाने एके दिवशी वीक एंडला नायगरा धबधबा पाहण्याची योजना आखली. मी तयारच होतो. भारतात राहून देखील अमेरिकेतील ज्या ठिकाणांची बरीच माहिती होती त्यापैकी एक हा धबधबा हे ठिकाण होते. या संदर्भात नेटवर बरेच तपशील उपलब्ध होते, काही विडिओ, बरीचशी चित्रे पाहिली होती. अनेकांनी पाहिली असतील. [त्यामुळे धबधब्याचे मी काहीच वर्णन करणार नाही] पण प्रत्यक्षात जेव्हा त्या धबधब्याचा प्रचंड विस्तार पाहिला तेव्हा मला आपल्या कल्पनादारिद्र्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. चित्रपट आस्वादाचे, अभ्यासण्याचे दिवस जीवनात आले तेव्हा कळत नकळत एक सवय लागली – प्रत्येक दृश्य भोवतीच्या चौकटीसह पहायचे, चौकटीच्या संदर्भात त्याचा अर्थ शोधायचा, आतील घटकांचा विचार देखील तिच्याच संदर्भात करायचा.आपल्या मनाचीही एक मर्यादा असते. समोरचे विश्व आकलन होण्याची. समोरचा अवकाश जर नजरेच्या परिघात मावत नसला तर त्याचे विश्लेषणही आपल्याला करता येत नाही. अविरत कोसळणारा तो जलप्रपात पाहून ‘अफाट, अफाट’, असे किती वेळा म्हणणार? तेव्हा काही बोलूच नये. नजरेत तो धबधबा मावत नव्हता म्हणून शेवटी कॅमेर्याचा आधार घेतला. पण हा आधार कृत्रिम आहे हा विचार मनाला टोचत होताच. अर्थात कॅमेर्याची मर्यादाहि लवकरच ध्यानात आली. त्याच्या view finder मधून देखील जेवढे दिसते त्यावरच समाधान मानावे लागत होते. व्हीडिओ काढला तरी तेच. ते प्रतिक्षणी उंचावरून खाली उडी मारणारे लाखो गॅलन पाणी, खालच्या पाण्यावर ते कोसळतांना तयार होणारा शुभ्र फेस, खालच्या पाण्यावर वरचे पाणी पडताना होणारा रौद्र भीषण ध्वनि, आणि या सार्यांना सौंदर्याचा आणखी एक दैवी स्पर्श देणारे, पाण्यावर सूर्यप्रकाश पडल्याने तयार झालेले इन्द्रधनुष्य ! हे काहीच कॅमेर्यात पकडले जात नव्हते. मी काही फोटो काढले व कंटाळून कॅमेरा बंद करणार एवढ्यात मला view finder मधून काहीतरी दिसले. शुभ्र पाण्याच्या पार्श्वभूमीवर कसला तरी एक काळा डाग दिसत होता. मी ते दृश्य झूम करून पाहिले. तो चक्क एक पक्षी होता! माझ्या नजरेवर माझा विश्वास बसेना. पण तो उडणारा पक्षी चौकटीच्या बाहेत जाऊ नये म्हणून मी पटकन त्याचे दोन तीन फोटो काढले. कॅमेरा बंद करून नुसत्या चर्म-चक्षुनि पाहिले. काहीच दिसत नव्हते. ‘मत रहना अखीयों के सहारे’ लिहिणार्या शैलेन्द्रची मला आठवण झाली. आम्ही सामान्य माणसे, ‘आखीयोंके झरोकों से’ पाहणारी. पण मन खरे थरारले ते रात्री संगणकावर तो फोटो टाकून, मोठा करून पाहिल्यावर. ते इवलेसे पाखरू केवढ्या आत्मविश्वासाने त्या धबधब्याला आव्हान देत पुढे सरकत होते! मला अतिविस्तीर्ण वाटणारा जल-विस्तार त्याच्या खिजगिणतीत देखील नव्हता. त्याला तो दिसत असावा पण त्याला आपल्या ठरलेल्या ठिकाणी जायचे होते. त्याला एका बाजूच्या पडणार्या प्रपाताची जाणीव नव्हती, खालच्या खोलीकडे ते पाहतही नव्हते. त्याची दृष्टी फक्त समोर होती आणि जेथे जायचे तेथे आपण जाणार हा विश्वास त्याच्या मनात होता. मला जी,एंच्या ‘स्वामी’ मधील वाक्य आठवले, ‘आभाळात एखादे लहान पाखरू उडताना दिसले तर त्याला तू आतिथ्य दाखव, कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे.’ जरी ते पाखरू माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नव्हते तरी मी विचारले, ‘पाखरा, तुझ्यातला थोडा आत्मविश्वास मला देशील का?’ प्रश्न मीच विचारला, उत्तर मलाच द्यावयाचे आहे. उत्तर कसे देणार? मी काही पाखरू नाही. घरी परत आलो तरी धबधबा आणि तो पक्षी मनातून जात नव्हते. कितीतरी दिवस रोज एकदा तरी संगणक उघडून त्या फोटोकडे पहायचो. पाहताना नवे नवे विचार मनात यायचे. एकदा वाटले, आपण त्या पाखराकडे कौतुकाने पाहतो आहो, तसेच कौतुक धबधब्यालाही वाटत असले पाहिजे. कोसळणारा धबधबा कौतुकाने पाहतो जवळून उडणार्या पाखराकडे धबधब्याला आणि मला कौतुक करीत बसायला खूप वेळ आहे. पाखराजवळ कोठे आहे इकडे तिकडे पाहायला वेळ? त्याचे लक्ष्य एकच : समोर कोठेतरी पाय टेकण्यास जागा सापडेपर्यन्त उडत राहणे...
शेवटचा श्वास घेइपर्यंत आपलेही लक्ष्य लिहीत राहणे हेच हवे [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] जपानी हायकू कवींचे दोन अत्यंत आवडते विषय आहेत. एक, चेरीचा [किंवा प्लमचा] बहर आणि दूसरा, पौर्णिमेचा चंद्र. अगदी काही आधुनिक कवि सोडले तर 19 व्या शतकापर्यंत जवळजवळ प्रत्येक कवीने या विषयांवर हायकू लिहिले आहेत.विषय निघाला आहे तर आज ‘चंद्रावरचे काही हायकू’ पाहू. मात्सुओ बाशोचा एक गाजलेला हायकू आहे. दार उघडा चंद्राला येऊ द्या मंदिरात असे म्हणतात की बाशो एका पौर्णिमेच्या रात्री मठात झोपण्यासाठी गेला होता. तेथील कर्मचार्यांनी रात्रीची प्रार्थना झाल्यावर मठाचे दरवाजे लावून घेतले. त्यावेळी त्याने हा हायकू लिहिला. पण अशा आख्यायिका अनेक असतात. खरे सांगावयाचे तर हा हायकू लिहिण्यासाठी कवीला ‘प्रत्यक्ष’ त्या अनुभवाची काहीच गरज नव्हती. चंद्राला पाहून काहीजण वेडे होऊन रात्रभर फिरतात हे जसे त्याला माहीत आहे तसेच काहीजण खिडकी लावून घेतात हेही. अशा माणसांसाठीच तर त्याने एकदा लिहिले होते- चांदण्यात शांतपणे एक किडा झाडाचे खोड पोखरतोय आणखी एका हायकूत बाशोने स्वत:विषयी लिहिले- लखलखता चंद्र तळ्याकाठाने मी फिरतोय अरे, पहाट झाली की कवीला चंद्राचे आकर्षण. आणि चंद्राला? पृथ्वीवरल्या चेरी बहराचे. अशी विलक्षण कल्पना असणारा बाशोचा एक हायकू आहे चंद्र रेंगाळतो आहे रात्रीच्या आकाशात चेरीचा बहर निरखीत बुसोन [1716-1784] हा श्रेष्ठ हायकू कवि लिहितो एकटाच आहे मैत्री करावी म्हणतो चंद्राशी चंद्राइतका प्रेमळ मित्र कवीला कोठे मिळणार? चांदण्यात फिरताना कधी कधी गमतीदार गोष्टीही घडतात- [विनोदाचे हायकूला वावडे नसते.] बुसोन एका हायकूत लिहितो चांदण्यात फिरताना एका आंधळ्याने धडक दिली आणि तो हसला ज्याला डोळे आहेत असा माणूसही आंधळ्यासाखा फिरतो आहे, आपल्याला धडक देतो आहे हे पाहून आंधळा हसणारच ना! जपानच्या चार श्रेष्ठ हायकू कवींपैकी एक, कोबायाशी इस्सालाही सामान्य माणसांचे ‘चंद्र-दुर्लक्ष’ ठाऊक आहे. तो लिहितो- काहीजण स्वागत करतात घोरण्याने- पौर्णिमेच्या चंद्राचे मी माझ्या एका हायकूत असेच काही मांडले होते- ज्याचात्याचा चंद्र ज्याच्यात्याच्या आकाशाएवढा इस्साला हेही ठाऊक आहे. म्हणून तो लिहितो- पूर्ण चंद्र प्लमच्या सुवासात गुंफलेला फक्त माझा चंद्र जेव्हा आपला असतो तेव्हा इतरांच्या प्रतिक्रियेची गरजच नसते. जपानमध्ये ‘चंद्र पाहण्याची’ एक प्राचीन परंपरा आहे. पौर्णिमेच्या रात्री कवी आणि रसिक मोठ्या संख्येने चंद्र पाहण्यास घराबाहेर पडतात. ‘चंद्र पाहून’ घरी परत आल्यानंतर कवयित्रि चियो-नी लिहिते- चंद्र पाहून परतल्यानंतर नि:शब्द ट्रेसी डेव्हिडसन लिहिते- उबदार चंद्र मी झटकून टाकते लोकरी पांघरुणे एक भारतीय कवी जगजीत सलाम लिहितो- शांत तलाव मी घेऊन येतो बादलीभर चंद्र चंद्राची मोहिनी माणसाच्या अबोध मनालाही पडत असावी. लहानपणापासून मुले या दैवी गोलाच्या प्रेमात पडलेली असतात. अनेक भारतीय भाषांतील कवितात देखील चंद्र आणि मुलांचे सख्य वर्णन केले आहे. यासुको त्सुशिमाचा एक अप्रतिम हायकू आहे- झोपेतच चेहरा वळविते माझे मूल चंद्राकडे कोण अधिक निरागस? चंद्राकडे चेहरा वळविणारे मूल की ते न्याहाळणारा कवी... मराठी रसिकांना सहज आठवेल ग. दि. माडगूळकरांचे हे अजरामर भावगीत – ‘चांद मोहरे, चांदणे झरे झोपेतच गाली असा हसशी का बरे.. माझ्या ‘हायकूऋतू’ या हायकू संग्रहाची सुरुवात मी चंद्राच्या हायकूनेच केली आहे चंद्र घेऊन आला चकोरासाठी चांदणे माझ्यासाठी हायकू हायकू हा काव्य प्रकार अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपाससून जपानी कवी चंद्रावर कविता लिहीत आलेले आहेत. इ.स.च्या 12 व्या शतकातील एक उत्कट कवी सायग्यो याचे चेरी बहरावर आणि चंद्रावर अतिशय प्रेम होते. 1170 साली त्याने ‘आपण कधी व कोठे मरण पावू इच्छितो’ या संदर्भात एक कविता लिहिली होती. माझी इच्छा आहे वसंत ऋतूत मला मृत्यू यावा चेरीचा बहर फुललेला असताना वर्षाच्या दुसर्या महिन्यात आकाशात पूर्ण चंद्र असताना. पुढे तो वीस वर्षे जगला. मात्र 1190 साली जेव्हा त्याला मृत्यू आला तेव्हा अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धाने त्याची ही इच्छा पूर्ण केली, फक्त एक दिवसाच्या फरकाने. चेरीला बहर आलेला असताना, पौर्णिमेच्या नव्हे तर त्यानंतरच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कदाचित पौर्णिमेच्या चंद्राने त्याला रात्रभर न्याहाळून त्याचा निरोप घेतला असेल!
|
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |


RSS Feed