|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] समाजापासून दूर राहणार्या माणसाविषयी जशा अनेक दंतकथा पसरविल्या जातात तशा जपानी हायकू कवि र्योकानविषयीही सांगितल्या जातात. कारण तोही असाच, गावापासून दूर, एकांतवासात राहत होता. सकाळच्या वेळी तो आपला कटोरा घेऊन बाहेर पडे. आजूबाजूच्या गावात जाऊन भिक्षा मागे. पोटापुरते मिळाले की तो झोपडीत परत येई. त्याच्याजवळ एक पिशवी होती. हिवाळ्याच्या दिवसात, त्या पिशवीत दहा बारा दिवस पुरेल एवढा तांदूळ जरी असला तरी त्याला तो पुरे असे. अधिक संचय त्याला मान्य नव्हता. दिवसभर तो बुद्धवचनांवर चिंतन करी, कविता लिही, चित्रे काढी. सुलेखनकलेत तो प्रवीण होता. मात्र त्या कलेचा सराव करण्यासाठी अनेकदा त्याच्याजवळ ब्रश नसत. मग तो झाडाच्या लहान फांद्या तोडून त्यांचे ब्रश तयार करीत असे. कधी बोटांनीच अक्षरे, चित्रे काढी. एका कवितेत त्याने लिहिले- त्याचे लहान मुलांवर फार प्रेम होते. तो गावात गेला की मुले त्याच्या आजूबाजूला गोळा होत, आणि कुजबुजत, “चला, खेळू, वेडा भिक्षू परत आला आहे.” र्योकानला त्यांचा राग येत नसे. ती बिचारी निरागस पोरे त्याला वेडा म्हणतात त्यांत त्यांचा काय दोष होता? मोठी माणसे आपल्याला वेडा म्हणतात ते पाहून मुलेही म्हणतात. तो हसून आपली पिशवी झाडाच्या फांदीला लटकावे, आणि खिशातला चेंडू घेऊन मुलांच्यात सामील होई. मुलांत तो रमे. त्यांच्याबरोबर दिवसभर खेळत राहण्यालाही त्याची हरकत नसे. लोक नेहमीच त्याला वेडा म्हणत नसत, कधीकधी कौतुकाने त्याला ‘चेंडू खेळणारा भिक्षू’ असेही म्हणत. त्याची कशालाच ना नसे. ही मुले त्याच्या कवितेत वारंवार येतात. एका कवितेत त्याने लिहिले, मंदिराशेजारी मुले मला पाहतात आणि माझ्याभोवती जमा होतात माझे हात ओढतात. मी माझा कटोरा एका दगडावर ठेवतो पिशवी झाडाच्या फांदीला लटकवतो प्रथम आम्ही गवताचा गोफ तयार करून रस्सीखेच खेळतो मग आम्ही चेंडू हवेत उडवतो आणि गाणे म्हणतो मी चेंडू उडवतो, ते गाणी म्हणतात ते चेंडू उडवतात, मी गाणी म्हणतो घटिका उडून जातात, वेळ विसरला जातो येणारी जाणारी माणसे मला पाहून हसतात, म्हणतात- “असे मूर्खासारखे तू काय करतो आहेस?” मी फक्त डोके हलवतो. काहीच उत्तर देत नाही मी उत्तर देऊ शकलो असतो, पण का देऊ? तुम्हाला माहीत आहे का, माझ्या मनात सुरुवातीपासून काय आहे? हेच. फक्त हेच.’ मुलांसारखे निरागस होणे... कवीच्या संदर्भात एक कथा अशी आहे-
एके दिवशी कवी घरी नसताना एक चोर त्याच्या झोपडीत शिरला. चोराला अर्थातच काही मिळाले नाही. तेवढ्यात कवी बाहेरून परत आला. चोर त्याला पाहून घाबरून पळू लागला. मात्र तो रिक्त हस्ताने परत चालला याचे कवीला वाईट वाटले. त्याने चोराला थांबविले. मात्र त्याला देण्यासारखेही कवीजवळ काही नव्हते. मग त्याने आपल्या अंगातील एकुलता एक अंगरखा त्याला काढून दिला. चोराला हे काय होते होते आहे हे समजेना. आपल्याला शिक्षा झाली नाही एवढ्यावर तो समाधानी होता, वर त्याला भेटही मिळाली. चोर निघून गेल्यावर कवीने मग या संदर्भात एक कविता लिहिली. पोषाखाच्या बदल्यात कविता हा सौदा काही कवीला महागात पडला नाही. ‘चोराने तसाच ठेऊन दिला चंद्र माझ्या खिडकीतला’ चंद्र ही झेन तत्वज्ञानात ‘साक्षात्काराची’ प्रतिमा म्हणून देखील वापरली जाते. जे आत्मज्ञान झालेले आहे त्याला बाहेरचा कुणी चोर कसा चोरून नेऊ शकणार? एका वेगळ्या पातळीवर हा हायकू वस्तूचे मोल प्रत्येक व्यक्तीनुसार कसे बदलत जाते हेही सूचित करतो. चंद्राचे भले कवीला मोल असेल पण चोराला काय त्याचे? प्रत्येकाचा चंद्र निराळा. एकाचा चंद्र दुसर्याच्या कामाचा नसतोच! हे जसे खरे तसेच हेही खरे की चंद्राचा अनुभवदेखील प्रत्येकासाठी वेगळाच असतो. योसा बुसोन या कवीने लिहिले आहे, ‘चंद्र असा की चोरानेही थांबावे आणि गाणे गावे’ -ही चंद्राची स्तुति आहे की चोराविषयीची कवीकल्पना?’ चंद्राचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो तसा प्रत्येकाला आलेला चोराचा अनुभव देखील वेगळा असतो. माझे मित्र कवि अलोन यांना चोराचा आलेला अनुभव वेगळाच होता. बाहेरच्या व्यवहारी जगात ते माधव सावरगावकर या नावाने ओळखले जात. ही सुमारे 1990 सालची गोष्ट आहे. त्यावेळी कविराज नांदेड बाहेरील एक लहानशा कॉलनीमध्ये राहत असत. कॉलनीत बहुधा पंधरा वीसच घरे असावीत. एका रात्री चोरांची एक टोळी त्या कॉलनीत शिरली. त्यांनी घरांना बाहेरून कड्या घातल्या व एकेका घरात शिरून लुटालूट करण्यास सुरुवात केली. त्या काळात कुणाजवळ मोबाइल तर सोडाच, साधे फोनही नव्हते. बाहेरची कुणाची मदत येणे सुतराम शक्य नव्हते. चोरट्यांनी अनेक घरे लुटली त्यापैकी एक कविराजांचे देखील होते. दुसर्या दिवशी ही बातमी समजल्यावर मी त्यांच्याकडे गेलो. कविराज शांतपणे पलंगावर बसले होते. पत्नी व मुलगी यांच्या चेहर्यावरचे भय अजून कमी झाले नव्हते. मी विचारले, “काही मोलाचे गेले नाही ना माधवराव?” “नाही. माझ्याजवळ त्यांना काय मिळणार? उलट रागारागाने दोन रट्टे मलाच देऊन गेले.” मग समोरच्या भिंतीतील पुस्तकांच्या कपाटाकडे हात करीत कवि शांतपणे म्हणाले, “हे धन तर माझ्याजवळच राहिले ना!”
1 Comment
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] जगभर जपानी कवितेचे अनुवाद होणे जेव्हा सुरू झाले तेव्हा बाशोच्या बेडूकहायकूचे सर्वाधिक अनुवाद झाले. भारतात हायकू आणण्याचे श्रेय रविंद्रनाथ ठाकूरांना दिले जाते. 1919 साली रविंद्रनाथ जपानला सदिच्छा भेट देऊन परत आले. तेथे असताना त्यांना या कविताप्रकाराची ओळख झाली असावी. स्वत: एक भावोत्कट कवि आणि विचारांना निसर्गप्रेम व अध्यात्माची बैठक असणारे ठाकुर या कलाप्रकाराच्या प्रेमात पडले नसते तर नवलच. आल्यानंतर त्यांनी श्रेष्ठ जपानी हायकूकार बाशो याच्या काही कवितांचा बंगालीत अनुवाद केला. त्यापैकी एक बाशोच्या सुप्रसिद्ध ‘बेडूक हायकू’ चे भाषांतर होते. पुरोनो पुकुर ब्यांगेर लाफ जलेर शब्द या हायकूचा कविवर्य बा.भ. बोरकर यांनीही अनुवाद केला आहे पुराण्या डबक्यात बेडकाच्या उडीसरशी केवढा आवाज सुरेश मथुरे यांनी ‘हायकू : एक अवलोकन’ या पुस्तकात या संदर्भात एक मजेशीर माहिती दिली आहे. ते लिहितात, ‘बा. भ. बोरकर यांनी या हायकूविषयी लिहिले आहे, “मला तर या हायकूत कोठेच काव्य सापडेना.” हायकूचा प्रत्येकाने लावलेला अर्थ वेगळा असू शकतो! [कधीकधी न लावलेला अर्थही.] शिरीष पै या हायकूचा अनुवाद असा करतात एक तळे जुनाट स्तब्ध एक बेडूक बुडी घेतो त्यात जराशी खळखळ आणि पुन्हा शांत ‘एक’, ‘त्यात’, ‘आणि’ हे शब्द हायकूच्या अल्पाक्षरत्वला बाधा आणतात. ते गाळले तर हा अधिक बांधेसूद झाला असता. सुरेश मथुरे या हायकूचा अनुवाद असा करतात- जुनाटलेला डोह अडमड्या बेडकामुळे डुबुकली शांतता ‘डूबुकली’ हा सुरेख शब्द. मात्र बेडकाला कसले विशेषण बाशोने दिलेले नाही. अनुवादकानेही ते द्यायला नको. शांता शेळके यांनी या हायकुचा अनुवाद असा केला आहे- एक डबके जुनाट, संथ बेडूक मारतो उडी पाणी खळबळून पुन्हा निवांत एकटक पाहण्याची स्पर्धा माझ्यात आणि एका बेडकात - इस्सा हा इस्साचा हायकू वाचल्यावर तर मी बेडकाकडे अधिक ‘लक्ष ‘देऊ लागलो. एकदा पुन्हा अमेरिकेला गेल्यानंतरची गोष्ट. आम्ही एक छोटी ट्रीप काढली होती. एके गावी-आता त्याचे नाव आठवत नाही-मला बेडकाचे एक मजेदार शिल्प आढळले. तो हात पुढे करून काही तरी विचारीत होता? काय विचारीत होता? त्याची भाषा मला समजत नव्हती. मी काही बोललो तर त्याला ते समजणार नव्हते. मग मी त्याला त्याच्या भाषेतच उत्तर दिले. आणि त्याचा निरोप घेतला. बेडकाच्या निर्मात्याने जगाचा घेतलेला निरोप. बाशो त्याच्या जीवनातच अत्यंत लोकप्रिय कवी बनला खरा पण काव्याला मिळणारी लोकप्रियता ही भ्रामक आणि कवितेला घातक देखील आहे असे बाशोचे मत होऊ लागले. हायकू हा जणू काही खेळ बनला होता. तसेच पैशासाठी ‘हायकू- मार्गदर्शन’ करणारी मंडळी देखील वाढली होती. एके वर्षी बाशो चेरीचा बहर पाहाण्यासाठी निवडक ठिकाणी गेलाच नाही. त्याने लिहिले, ‘नुसता आरडा ओरडा करणेच ज्यांना माहीत आहे अशा लोकांच्या गोंगाटाने ती ठिकाणे गजबजली आहेत.’ बाशो कवितेला अतीशय गंभीरपणे घेणारा कवी होता. हायकूमध्ये झेन तत्वज्ञानाचे प्रतिबिंब त्याने पाहिले. साधेपणा, थेटपणा, नैसर्गिकपणा व अगाधता ही झेन तत्वे हायकूत असायला हवी असे त्याचे प्रतिपादन होते. प्रत्येक हायकू पुढीलपैकी एका भावनेच्या पायावर आधारलेला असला पाहिजे- ‘एकाकीपणातिल सौंदर्य, मानवी जीवनाची अपूर्णता, ‘आत्यंतिक साधेपणा , क्षणभंगुरतेची जाण व नश्वरता हे जीवनाचे मूलभूत सत्य आहे ही जाणीव, जीवनातील लाभाविषयी उदासीनता, व उत्कट भावनिक प्रतिसाद. हायकूबद्दल तो शिष्यांना सांगे, ‘कविता वाचताना असे वाटले पाहिजे की जणू आपण फार खोल नसलेल्या नदीतील तळाचे दगड पाहतो आहो.’ 1693 साली बाशोने आपल्याकडे ठेऊन घेतलेला त्याचा पुतण्या वारला. त्याच्या मृत्युचा बाशोवर फार परिणाम झाला. तो स्वत:त अधिक अधिक गुंतत गेला. ऑगस्ट महिन्यात तर त्याने घराची दारे बंद करून घेतली व मित्रांनाही आत येण्यास मनाई केली. तो पुन्हा समाजात वावरू लागला खरा पण मनाने तो दूर निघून गेला होता. ऑक्टोबर 1694 मध्ये तो खूप आजारी पडला. आपला अंत जवळ आला आहे हे त्याने ओळखले. या काळातच त्याने त्याचा ‘निरोपाचा हायकू’ लिहिला. प्रवासात आजारी पडलोय- स्वप्ने भिरभिरताहेत वाळलेल्या कुरणावर यानंतर बाशोने जेवणखाण बंद केले. 26 नोहेंबर रोजी सकाळी तो उठला, स्नान केले व बुद्धाच्या मूर्तीसमोर त्याने उदबत्त्या लावल्या. दुसर्या दिवशी भेटायला आलेल्या शिष्यांना त्याने प्रत्येकी एक हायकू लिहावयास सांगितले.त्यानंतर तो म्हणाला, “या क्षणापासून तुमचा गुरू तुम्हाला दुरावला आहे. मला काहीही विचारू नका. मी काहीही सांगणार नाही.” नंतरच्या दिवशी पुन्हा शिष्य त्याला भेटायला आले. त्या दिवशी खोलीत माशा फार घोंघावत होत्या. त्यांच्याकडे पाहून बाशो हसून म्हणाला, “एक माणूस आजारी पडला आहे हे पाहून त्यांना आनंद झालेला दिसतो.”
मग त्याने डोळे मिटून घेतले व शांतपणे या जगाचा निरोप घेतला. [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] गेले तीन चार ब्लॉग आपण तत्वचर्चेत बुडालो असल्यामुळे आपल्या बेडकाला विसरलो होतो. पुन्हा एकदा त्याची भेट घेऊ. बाशोचा हायकू, मला वाटते आतापर्यंत सर्वांना पाठ झाला असेल. प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक एक काळ असा होता की हायकूला ‘झेन तत्वज्ञानाचे काव्यात्म रूप’ असे समजले जात होते. आज ती कल्पना कालबाह्य झाली आहे. अनेक तरुण जपानी कवींना, आणि बहुतेक परकीय हायकूकारांना झेन तत्वज्ञानाची नीट ओळख नाही. हायकू लिहिण्यासाठी वा अनुवादित करण्यासाठी त्याची गरज आहे असे त्यांना वाटत नाही. असे असले तरी बाशो हा झेन सांप्रदायाचा अभ्यासक होता व त्याच्यावर असलेला ‘झेन’ प्रभाव या हायकूत देखील स्पष्ट दिसतो. हा हायकू म्हणजे 17 ओन मध्ये सांगितलेली काव्यात्म ‘झेन कथा’च आहे. प्राचीन तलाव या हायकूचे मध्यवर्ती केंद्र आहे. तो किती प्राचीन आहे हे सांगता येत नाही. अर्थात त्याची गरजही नाही. तो ‘प्राचीन’ आहे एवढे पुरेसे आहे. मग आपल्याला दिसते की एक बेडूक त्या तलावात उडी मारतो आहे, आणि त्या उडीतून एक आवाज निर्माण होत आहे. फक्त आवाज नव्हे, कवीच्या मनात आणखी काहीतरी निर्माण झाले आहे. ती आहे ‘जाण’. तो आहे आत्मसाक्षात्कार. Enlightenment. असे म्हटले जाते की बुद्धाला पहाटेच्या तार्याकडे पाहून ‘साक्षात्कार’ झाला. या क्षणाला जपानी भाषेत ‘सटोरी’ असे नाव आहे. एखाद्या बाह्य घटनेमुळे अचानक सार्या चित्तवृत्ती स्थिर होतात, मन स्वच्छ होते. निर्मळ होते. आणि माणूस विश्वाशी एकरूप होतो. हा साक्षात्कारी क्षण समजावून सांगता येत नाही, ज्याला तो साक्षात्कार झाला त्याला देखील आपल्या आत नेमके काय घडले हे समजत नाही, मग इतरांना ते सांगणे दूरच. ‘ज्ञान जे समजावून सांगता येते ते विश्वात्मक ज्ञान नसतेच’ अशी ताओ तत्वज्ञानात एक संकल्पना आहे. बुद्धासाठी तार्याचे दिसणे हा साक्षात्कारी क्षण होता, बाशोसाठी, ‘बेडकाने उडी मारणे’ हा. या हायकूतील अव्यक्त भाव ‘मी एकाकी आहे’ हा आहे. एका समीक्षकाने लिहिले, ‘ही कविता हा एक प्रवास आहे-शांततेकडून ध्वनीकडे व ध्वनिकडून परत शांततेकडे.’ आणखी एका रसिकाच्या मते, ‘येथे मांडला गेला आहे तो फक्त एक क्षण. या कवितेत स्थल आणि काळाचा विस्तार नाही. कोणतीच कविता याहून साधी असू शकत नाही. ती अनन्यसाधारण आहे.’ प्रत्येक क्षण हा एक नवा ‘अर्थ’ मनात निर्माण करू शकतो. तेवढ्या उत्कटतेने तो जगला मात्र पाहिजे. त्या दिवशी बेडकाने हायकूत मारलेली उडी एका अर्थाने युगप्रवर्तक ठरली. कारण त्यानंतर प्राण्यांकडे पाहण्याच्या जपानी कवींच्या दृष्टीतच फरक घडून आला. पण हा फरक झाला होता तो कुणा एकाच्या कवितेमुळे. तो आतून आलेला नव्हता. त्यामुळे इतरांनी त्यानंतर लिहिलेले ‘बेडकावरील हायकू’ बहुतेक वेळा पृष्ठस्तरावरच राहिले. त्यांची उडी खोल गेलीच नाही. बाशोच्या या सुप्रसिद्ध ‘बेडूक-तलाव’ हायकूबद्दल नंतरच्या हायकूकवींनीही अनेक टिपणे लिहिली आहेत. शिकी, ज्याला आधुनिक हायकूचा निर्माता’ असे मानले जाते, त्याने या संदर्भात एक सुरेख टिपण लिहिले आहे. तो कल्पनेत बाशोला त्याच्या झोपडीत एकटा बसलेला पाहतो. [इतर टीकाकार जसे मानतात तसे ‘मित्रांच्या, शिष्यांच्या घोळक्यात’ नव्हे. ] शिकी लिहितो, ‘बाशोच्या मनात हायकूच्या परंपरागत रचनेबद्दल असमाधान होतेच. काहीतरी एक वेगळा मार्ग शोधायला हवा असा तो विचार करीत होता. जणू एखाद्या धुक्यात बसावे तसा तो बसून होता. Trance’ मध्ये असल्यासारखा. अर्धजागृत, अर्धनिद्रिस्त. भोवती सर्वत्र शांतता होती. अशावेळी त्याला ‘तो’ आवाज ऐकू आला. बेडकाने तळ्यात उडी मारल्याचा आवाज. त्याच्या कानात कोठूनसे शब्द उमटले, ‘बेडूक उडी मारतो...पाण्याचा आवाज.’ बाशो स्वप्नातून जागा झाला त्याच्या चेहर्यावर स्मित फुलले होते.’ अनेक कवींनी बाशोच्या बेडकाच्या पाठीवर बसून तलावात उडी मारलेली आहे. 19व्या शतकातील प्रसिद्ध जपानी कवी र्योकान याने या हायकूच्या संदर्भात एक हायकू लिहिला आहे- नवीन तलाव बेडूक उडी मारतो आवाज नाही. आपण ‘नवीन तलावात उडी मारणारे बेडूक’ आहो आणि आपल्या ‘हायकूत उडी’ मारण्यामुळे कसलाही आवाज होणार नाही असे तर कवीला सुचवायचे नसेल? एखादी कविता लोकप्रिय झाली की तिची विडंबनेही होऊ लागतात. एका कवीने लिहिले - तळ्याकाठी चिंतन करतोय बाशोचा बेडूक माशी केव्हाच उडालीय बाशोच्या या हाइकूची लोकप्रियता इतकी वाढली की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना त्याचा मोह पडलेला आहे. सेनगई नावाच्या एका चित्रकार भिख्खूने 18 व्या शतकात काढलेले एक चित्र उपलब्ध आहे. या चित्रात एका केळीच्या झाडाखाली एक बेडूक बसलेला दिसतो. [जपानी भाषेत ‘बाशो’ म्हणजे फळ न येणारे केळीचे झाड हा संदर्भ ध्यानात घ्यायला हवा]. या चित्राच्या वरच्या बाजूस एक हायकू लिहिला आहे- इथे तलाव असता तर मी उडी मारून बाशोला आवाज ऐकवला असता आधुनिक काळात देखील या हायकूची लोकप्रियता कमी झालेली नाही. Marlin Mountain [1939-1987] या अमेरिकन कवयित्रीचा एक हायकू प्रसिद्ध आहे. तिने तो जपानी पद्धतीने एका ओळीत लिहिला आहे. Old pond frog rises belly up प्राचीन तलाव बेडूक तरंगतोय पोट वर अगदी अलीकडे, म्हणजे 1987 साली जपान एयरलाईन्सने या हायकूचा संदर्भ घेत स्वतंत्र हायकू लिहिण्याची स्पर्धा घेतली होती. तिच्यासाठी हजारो स्पर्धकांनी आपले हायकू पाठविले होते. या स्पर्धेत Bernard Einbound च्या ज्या हायकूला पहिले बक्षीस मिळाले तो असा होता- बेडूक-तलाव एक पान पडले आवाजाविना -प्रत्येकाच्या तळ्यात काही पडले तर आवाज येईलच असे नाही. बाशोच्या बेडकाने तलावात मारलेली उडी किती खोल गेली आहे याचा अभ्यासक सतत शोध लावतच असतात. उडीमुळे निर्माण झालेल्या आवाजाचे प्रतिध्वनी अजून जगभर घुमतच आहेत! येथपर्यंत मी लिहिले होते व लेख पूर्ण केला होता. माझ्या नव्या पुस्तकात हा लेख अंतर्भाव करण्यासाठी पुन्हा वाचला तेव्हा माझ्या मनात आले, या हायकुला आधुनिक संदर्भही आहे. बाशोच्या काळात सर्वत्र तलाव होते आज त्यापैकि बहुसंख्य आटले आहेत. जग हळूहळू कोरडे होत चालले आहे. उडी मारण्यास पाणी नसेल तर बेडूक काय करील? माणूस काय करील? चिंतेशिवाय दुसरे काय? मग मला जाणवले की मीच बेडूक आहे. मीच बाशो [कवि]. माझ्यातील बेडकाने पाणी नसलेल्या जमिनीवर उडी मारली तरी ‘आवाज’ कसा येणार? मनात स्निग्धता नसेल तर नवनिर्मिती कशी होणार? थोडा विचार केल्यावर ध्यानात आले की हे सार्या कलांसाठी लागू होणारे सत्य आहे. कलेला रसाची आवश्यकता असते आणि आटला तर सृजनशीलता करपून जाते. आणि मी लिहिले - बाशो आहे मी आहे
तलाव मात्र नाही चिंता करतोय बेडूक [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] हायकूच्या अनुवादासंदर्भात अनेकांनी माझ्याकडे काही प्रश्न विचारले आहेत. त्यासाठी ही खास पोस्ट अनुवादसंदर्भात. ‘घंटेवरले फुलपाखरू’ या तीन श्रेष्ठ जपानी कवींच्या हायकूंच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या प्रकाशनप्रसंगी केलेले भाषण, थोडक्यात. ‘जपानचे तीन महाकवी आणि त्यांचे कार्य यांचा परिचय करून देत त्यांच्या सुमारे पाचशे हायकुंचा भावानुवाद सादर करणारे हे पुस्तक आहे. शाळेत असतानाचे ते दिवस मला आठवतात. त्या दिवसांतच कवितांची गोडी मनाला लागली होती. प्रथम वाचलेले कवितांचे पुस्तक होते ‘विशाखा’. मग बालकवी, गोविंदाग्रज, केशवसुत, तांबे वाचले. कवितांची भूल मनावर पडायला सुरुवात झाली होती. मग कॉलेजमध्ये गेल्यावर बोरकर, मर्ढेकर, ग्रेस वाचले. भूल वाढतच गेली. गंमत म्हणजे इतर भाषांतील लेखक वाचायला सुरुवात केल्यावर देखील प्रथम कवीच वाचले. टागोर आणि खलील जिब्रान. गालिब आणि साहीर. नंतर पास्तरनाक, रिल्के आणि फ्रॉस्ट. नक्ष लायलपुरीचा एक शेर आहे- ‘कहां तक नाम गिनवाये, सभीने हमको लूटा है’! सांगायचं म्हणजे कवितेशी नाते इतके जुने आहे. या कवितांच्या वाचनाने मनाची कवितेला प्रतिसाद देण्याची एक बैठक तयार झाली. कधी वाटायचे की आपणही कविता लिहाव्यात. ही गोष्ट आज माझ्या फक्त एकाच मित्राला ठाऊक आहे की माझ्या दोन कविता १९७०-७१ साली ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. पण मला अजून आठवते की लिहिताना त्या भलत्या ग्रेट आहेत असे वाटले होते, आणि हेही स्पष्ट आठवते की छापून आल्यावर प्रथम जाणवले होते ते त्यांचे सामान्यपण. मी ज्या कविता वाचत होतो, अनुभवत होतो त्या तुलनेत माझ्या कविता कुठेच नव्हत्या. जी.ए.नी एका पत्रात लिहिलेले मी खूप नंतर वाचले, “कवी म्हणून माझी निवड झालेली नव्हती.” मला जाणवले की कवींच्या भूमीत घुसखोरी करता येत नाही. तिच्यात राहण्याचा परवाना तुम्हाला ‘वरून’ मिळावा लागतो. पण तिथले नागरिकत्त्व मिळाले नाही तरी तेथे जाऊन येण्याचा प्रवासी व्हिसा जरूर मिळतो आणि तो मिळतो अनुवादातून. कविता लेखन थांबले, पण कवितांचे वाचन चालूच होते. एकदा गुलजार नांदेडला आले असता त्यांची एक कविता मराठीत अनुवादित करून त्यांना ऐकविली. [त्यांना मराठी चांगले येते.] त्यांना ती आवडली. मग मी त्यांच्या ७५ कवितांचा अनुवाद केला, तो ‘एक स्वप्न पुन्हा पुन्हा’ या नावाने प्रकाशित झाला व त्याचे उत्तम स्वागत झाले. या कवितांपैकी काहींचा गुच्छ गुलजारांनी ‘त्रिवेणी’ या नावाने प्रकाशित केला होता. त्यावेळी प्रथम ‘अल्पाक्षरी कवितेची ओळख झाली’. अमेरिकेत मुलाकडे गेलो असता योगायोगाने जपानचा महाकवी इसाच्या ३६० हायकूंचा इंग्रजी अनुवाद हाती आला. तेथल्या वाचनालयात शोधल्यावर तेथे इतरही कवींच्या हायकुंचे अनुवाद मिळाले. त्या सहा महिन्यांत जवळजवळ तीन हजार हायकू मी वाचले. हायकू हे लघु कवितेचे एक रूप. मूळ देश जपान. तेथे सुमारे चारशे वर्षांपासून ‘हायकू परंपरा’ जपली जाते. तीन ओळींत एक संपूर्ण भावस्थिती वाचकासमोर उभी करणे हे हायकूचे प्रधान वैशिष्ट्य आहे. अल्पाक्षरत्त्वाचा आग्रह असल्यामुळे येथे विस्ताराला मज्जाव आहे. जे मांडावयाचे आहे ते अत्यंत कमी शब्दात, जवळजवळ सूत्ररूपाने मांडण्यावर हायकूकर्त्याचा भर असतो. उदाहरणादाखल बाशोचा एक हायकू आपण पाहू- पर्णहीन फांदीवर कावळा येऊन बसला शरदातील संध्याकाळ हे एक निसर्गचित्र आहे की संध्याकाळविषयी कवीला काही सांगावयाचे आहे? कवी फक्त ‘संध्याकाळ’ लिहितो. त्याचा अर्थ ‘संध्याकाळी’ असा घेतला तर हे मोजक्या रेषांनी रेखाटलेले एक निसर्गचित्र बनते. पण ‘संध्याकाळप्रमाणे’ असा घेतला तर कावळा आणि संध्याकाळ मधील सीमारेषाच संपून जाते.[येथे हेही ध्यानात घेतले पाहिजे की जपानी परंपरेत हायकुमध्ये ‘प्रमाणे, सारखा,’ असे शब्द वापरू नयेत असा संकेत आहे.] कावळा जसा फांदीवर बसला आहे तशी ही संध्याकाळ कवीच्या मनावर येऊन बसली आहे. आता ‘पर्णहीन’ हा शब्द कवीच्या मनाची स्थिती दर्शविणारा बनतो आणि कवितेची दिशा बदलून जाते. फांदीवरल्या कावळ्याचे वजन आता आपल्याला जाणवू लागलेले असते. बुसोनचा असाच एक हायकू आहे- वसंत जातो आहे कोठे ते माहित नाही- बोट नांगरलेली ‘नांगरलेली’ बोट हे कवीच्या आयुष्याचे प्रतीक म्हणून पहिले तर ती, एका ठिकाणी असून सुद्धा आपल्याला किती दूर घेऊन जाते! हायकू हा माणसाची निसर्गाशी आणि स्वत:शी होणाऱ्या भेटीचा क्षण अलगद टिपतो. हायकू हे ‘पाहणे’ आणि ‘अनुभवणे’ यांचे संयुग असते. हायकूत कवी त्या अनुभवात इतका खोल खोल जात राहतो की एका क्षणी तोच अनुभव बनतो. अनुभव त्याच्या अस्तित्त्वात असा काही विरघळून जातो की त्याचे वेगळेपण उरत नाही हायकूंचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे तर अतिशय कठीण बनते. योग्य प्रतिशब्द तर मिळवावेच लागतात, पण मर्यादित संख्येत. सांस्कृतिक भिन्नता असल्यामुळे आपल्या विश्वातील योग्य संदर्भ शोधावे लागतात. मला जपानी येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया जपानी ते इंग्रजी ते मराठी अशी अधिक अवघड बनून जाते. आणखी एक अडचण मला जाणवली. इंग्रजीत जपानी हायकूंचे अनेक अनुवाद झालेले आहेत. इस्साच्या हायकूंचे अनेक वेगवेगळे अनुवाद मला सापडले. आणि ते सारे एकमेकापासून भिन्न होते. बाशोच्या, या ब्लॉगच्या सुरूवातीला सांगितलेल्या, ‘बेडूक हायकूचे’ तर 100 हून अधिक अनुवाद माझ्याजवळ आहेत. मग कोणता ग्राह्य धरायचा? बुसोन या कवीचा एक जगप्रसिद्ध हायकू आहे. त्याचा माझ्या वाचनात आलेला पहिला अनुवाद- Butterfly Sleeping On the temple bell मी त्याचा अनुवाद असा केला होता- देवळातल्या घंटेवर- झोपले आहे फुलपाखरू त्याचे इतर काही अनुवाद असे होते.
हा इंग्रजी अनुवाद मी प्रथम वाचला असता तर माझा मराठी अनुवाद असा झाला असता- देवळातल्या घंटेवर कुणीतरी शांत झोपले आहे पहा-एक फुलपाखरू प्रश्न असा पडतो मराठी अनुवादसाठी कोणता इंग्रजी अनुवाद ग्राह्य धरायचा? शेवटी मनाचा कौल मानावा लागतो. प्रत्येक भाषेची लय अनन्यसाधारण असते. ती दुसर्या भाषेतील शब्दांतून पकडणे अवघडच. म्हणून काव्याची भाषांतरे सहसा असमाधानकारक वाटतात. जपानमध्ये हायकू संदर्भात काही संकेत पाळले जातात व त्यांचे मूळ परंपरेत असते. ही जपानी परंपरा माहीत नसेल तर तो हायकू नीट समजत नाही व त्याचा अनुवादही ‘नेमका’ होत नाही. हायकूमध्ये नुसता ‘बहर’ असा शब्द असेल तर त्याचा अर्थ ‘चेरीचा बहर’ असा घेतला जातो. हायकूचा अनुवाद जर एवढा अवघड असेल तर मग तो का करावा? या प्रश्नाचे माझे उत्तर असे की हायकू वाचताना मला जो आनंद मिळाला तो मनातल्या मनात त्यावर चिंतन करताना द्विगुणीत झाल्यासारखा भासत होता. कधीकधी कसलाही जाणीवपूर्वक प्रयत्न न करता काही प्रतिशब्द मनात तयार होत आणि कागदावर प्रकट होण्याची मागणी करीत. दुसरे असे की जे आपल्यापर्यंत आले ते इतरांपर्यंत पोचविण्याची एक अनिवार उर्मी माझ्यात आहे. म्हणून मी हे अनुवाद केले. इस्साचा एक हायकू आहे- वसंतातील संध्याकाळ मी एका मेणबत्तीने दुसरी पेटवीत जातो हे अनुवाद म्हणजे एक प्रकारे ‘दुसरी मेणबत्ती’ पेटविण्याचा प्रयत्न आहे. अमेरिकेतून येताना तेथे वाचलेल्या सुमारे ३००० हायकू पैकी ५०० हायकूंची निवड केली व ते घेऊन परत आलो. नंतर मी रोज फक्त एका हायकूचा अनुवाद करण्याचे ठरविले. सकाळी एक हायकू वाचायचा, दिवसभर तो मनात घोळवायचा आणि रात्री त्याचा अनुवाद करून एका फाईल मध्ये सरकवून द्यायचा. एक महिन्यानंतर लिहिलेल्या तीस हायकुंचे पुन्हा वाचन करायचे, त्यांत सुधारणा करायच्या आणि पुढे सरायचे. अशा प्रकारे अनुवादित केलेले सुमारे पाचशे हायकू या संग्रहात मी समाविष्ट केले आहेत. फक्त एक ‘वैधानिक इशारा’ देऊन ठेवतो. हायकूच्या आकलनासाठी आणि आस्वादासाठी वाचकाचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे. हायकू वाचल्यानंतर, ‘हे काहीतरी अवघड दिसते आहे’, किंवा ‘हे काही समजले नाही’ अशी त्वरित कमेंट करून पुढे सरकत गेले तर हायकूच्या विश्वात तुम्हाला कधीच प्रवेश मिळणार नाही. असे करणे म्हणजे काठावर बसून समुद्राची कल्पना करणे होय. कुठल्याही कलाकृतीच्या आस्वादासाठी मनाची स्वागतशील अवस्था अत्यावश्यक असते. हायकूच्या संदर्भात तर जास्तच. हायकू हे निवांतपणे, ‘चित्ती हळुवारपणा’ आणून, एकट्यानेच वाचायचे असतात. सहज जाताजाता चार हायकू वाचू असे म्हणून हायकू वाचता येत नाहीत. शेवटी या अनुवादासंदर्भात मी लिहिलेला एक हायकू: तळ्यातल्या सावल्या उडणाऱ्या पक्ष्यांच्या तसे हे हायक धन्यवाद.
|
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |




RSS Feed