|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] मागच्या ब्लॉग मध्ये आपण हायकूची बलस्थाने बघितली. हायकू रसिकाने ही बलस्थाने ध्यानात घेऊन त्याच्याकडे वळले पाहिजे. Gabriel Rosenstock या अभ्यासकाने ‘Haiku Enlightenment’ नावाचे एक उत्तम पुस्तक लिहिले आहे. त्यांत त्याने हायकू रसिकाची तुलना मधमाशीशी केली आहे. बाशोचा एक हायकू उदघृत करून तो लिहितो- ही मधमाशी फुलातून बाहेर येण्यासाठी किती अनुत्सुक रसिकानेही हायकूतून ‘बाहेर’ येण्यास असेच अनुत्सुक राहिले पाहिजे. बाहेर येण्याची घाई तर मुळीच करू नये. हायकू वाचणे ही आपल्यासमोर आलेल्या एका विश्वाचे उत्खनन करण्याची संधी मानली पाहिजे. त्या विश्वात आपल्याला अनेक विश्वे मिळू शकतात. Diana Franinचा एक हायकू आहे- ब्रेडचा तुकडा उड्या मारतो आहे चिमणीबरोबर अंगणात रसिकही हायकूसोबत रांगू शकतो, उड्या मारू शकतो, हवेत उडू शकतो, पडू शकतो आणि स्तब्धही राहू शकतो. हायकूचा आस्वाद ही एक स्वतंत्र कला आहे. हा आस्वाद शक्यतो निर्दोष व्हावा यासाठी हायकूची निर्मिती प्रक्रिया ठाऊक असणे गरजेचे आहे, जी आपण गेल्या ब्लॉगमध्ये पहिली आहेच. हायकू हा माणसाची निसर्गाशी व स्वत:शी होणार्या भेटीचा क्षण अलगद टिपतो. हायकूत जे दडलेले असते ते शोधण्यासाठी वाचकाने स्वत:ल 3 प्रश्न विचारावे 1] कवि काय वर्णन करतो आहे? हायकूत जे पंचेंद्रियांतर्फे माणसाला जाणवते त्याचे प्रतिमाद्वारे वर्णन केलेले असते. उदाहरणार्थ दृष्टीने जाणवणारे [गळून पडणारी फुले, सळसळणारी पाने, सूर्योदय वगैरे.] ध्वनि [धबधब्याचा आवाज, तळ्यात उडी मारणार्या बेडकाचा आवाज, कीटकांची गुणगुण.] गंध [प्लमच्या फुलांचा मंद सुगंध, किंवा रान शेवंतीचा उग्र वास.] चव [ताज्या फळांची चव, किंवा मद्याची.] 2] ही घटना केव्हा घडते आहे हे पाहणेही महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ : वसंत ऋतूत की शरद ऋतूत? 3]कवि कोठे या घटनेचा अनुभव घेतो आहे तेही पाहिले पाहिजे. उदा. पर्वतमाथा, दर्या, रस्ता किंवा पायवाट,समुद्रकिनारा वगैरे. अर्थात हायकू कवि हे सारे स्पष्टपणे मांडत नाही. ते प्रतिकांतून मांडले जाते. ती प्रतीके शोधणे म्हणजेच हायकूचा अर्थ शोधण्याच्या प्रवासाला प्रारंभ करणे होय. केव्हाकेव्हा कवीची प्रतीके शोधता शोधता रसिकाच्या मनात ‘त्याची’ स्वतंत्र प्रतीके तयार होऊ शकतात. हायकूत रसिकाचा सहभाग असतो हे मी अनेक पुस्तकात वाचले होते. ते एकदा मला प्रत्यक्ष अनुभवावयास मिळाले. मी जेथे राहतो त्या नांदेड सिटीत अनेक संकुले आहेत आणि प्रत्येक संकुलासाठी एक लहानशी स्वतंत्र बाग आहे. एके दिवशी बागेतून घरी जाताना कॉलनीतील एका परिचिताकडे गेलो. तो बरेच दिवसापासून बोलावत होता. घरी गेल्यावर त्याने मला त्याच्या गॅलरीत लावलेली बाग दाखवली. अनेक प्रकारच्या फुलांची झाडे त्याने कुंड्यात लावली होती. एका कुंडीकडे बोट दाखवत तो म्हणाला, ‘हा पहा, किती सुरेख बोनसाय मी तयार केला आहे! बागेत हे झाड सुमारे तीन फूट उंच वाढते. या कुंडीत हे फक्त सहा इंच उंचीचेच वाढले आहे. एवढेसेच झाड पण त्याला फूलही आलेले आहे.” तो कौतुकाने बोनसाय बनविण्याची पद्धत मला सांगत होता. पण मला तो प्रकारच पटलेला नव्हता. तो झाडांवर अत्याचार आहे असे माझे मत होते. पण ते त्याच्या तोंडावर सांगण्याचा संकोचही वाटत होता. घरी आलो. मनात ते कृत्रिमपणे ‘तयार’ केलेले झाड सारखे येत होते. मन उद्विग्न झालेले होते. त्या दिवशी रात्री नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे डायरीत तो प्रसंग लिहिला. काहीतरी मन दुखावणारे मनात फिरत होते पण काय ते समजत नव्हते. [नेमकी ती ‘ठसठसणारी नस’ सापडत नव्हती.] खूप वेळानंतर फक्त दोन ओळी सुचल्या. त्या लिहून ठेवल्या- वितभर झाड नखाएवढे फूल ... तिसरी ओळ सुचलीच नाही. आणखी दोन दिवस असेच गेले. नंतरच्या दिवशी सकाळी, डॉ. मुलमुलेना सहजच फोन लावला. डॉक्टरांची व माझी मैत्री मी नांदेडला असल्यापासूनची. बागेत आलो आणि थोडा निवांत असलो की मी त्यांना फोन लावतो. त्यांना ताजा ताजा हायकू खाऊ घालतो. त्यांना मी मनात उमटलेल्या दोन ओळी सांगितल्या. म्हणालो, “एका हायकूच्या दोन ओळी सुचल्या आहेत. ‘वितभर झाड/नखाएवढे फूल’- तीन दिवसापासून मला तिसरी ओळ सापडत नाहीय.” ते म्हणाले, “दोन ओळी तर छान आहेत. तिसरीही लौकरच सुचेल.” दुसर्या दिवशी सकाळी त्यांचा फोन आला. “तिसरी ओळ व्हाट्सअप वर पाठविली आहे.” मी त्यांचा मेसेज पाहिला. तो असा होता- वितभर झाड नखाएवढे फूल दरवळ घरभर पहिल्या दोन ओळी कोणत्या प्रसंगामुळे सुचल्या हे मी त्यांना सांगितले नव्हते. त्यामुळे ते आपल्या स्वतंत्र वाटेने त्या ओळींना घेऊन गेले, आणि त्यांनी माझा हायकू पूर्ण केला.
मला श्रेष्ठ जपानी हायकुकार ओगीवारा याची आठवण झाली. त्याने लिहिले आहे, ‘कवि फक्त अर्धाच हायकू लिहितो, उरलेला अर्धा हायकू वाचकाने पूर्ण करायला हवा.’ मी डॉक्टरांना म्हणालो, ‘हायकू तर छान जमला आहे. तुम्ही या दिशेने कसे गेलात?” “या दिशेने म्हणजे?” मग मी त्यांना माझ्या दोन ओळींची जन्मकथा सांगितली. ते म्हणाले, “मला अर्थातच हे माहीत नव्हते. मला वाटले तुमच्या घरच्या कुंडीत आलेल्या फुलाच्या संदर्भात त्या ओळी आहेत.”मुलमुलेंनी माझा हायकू पूर्ण केला होता, पण त्यांनी किती वेगळ्या दिशेने त्याला नेले होते! त्यांनी झाडाला आलेल्या नखाएवढ्या फुलावर लक्ष केन्द्रित केले होते. वितभर झाडावरच्या नखभर फुलाने त्यांच्या कल्पनेतील सारे घर सुगंधित करून टाकले होते. माझे मनही. हायकूचा याहून वेगळा कोणता परिणाम व्हायला हवा?
4 Comments
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे गेल्या ब्लॉगमध्ये आपण हायकूची व्याख्या व रूपाकार याबद्दल पहिले. या संदर्भात ‘हायकू ऋतु’ या समूहावरील अनेकांनी विचारणा केली की हायकुची नेमकी व्याख्या काय करता येईल. मी काही व्याकरणतज्ज्ञ नाही, पण सर्वसाधारणपणे मी हायकूची ही व्याख्या करू इच्छितो- “हायकू ही अल्पाक्षरी कविता अर्थपूर्ण शब्दांची पुनर्रचना करून एका क्षणाचे अनन्यसाधारणत्व प्रभावीपणे मांडते. हायकू ही तीन ओळींची, अल्पाक्षरी, अक्षर मर्यादेचे बंधन नसलेली लघुकविता असते जी एका श्वासात वाचता किंवा सांगता आली पाहिजे. या तीन ओळीत यमक नसले तरी चालेल पण त्यांना एक लय मात्र असली पाहिजे. सूचकता हा हायकूचा प्राण आहे. हायकू कविता ‘एका क्षणाबद्दल’ काही सांगू पाहते. मात्र ती त्या क्षणाशी बद्ध नसावी. हायकू हा जवळ आणि दूर, समोर आणि पार्श्वभूमीला, भूतकाळ आणि वर्तमानकाळ, ध्वनि आणि शांतता, क्षणभंगुरत्व आणि दीर्घकालीन अस्तित्त्व अशी जीवनाची द्वैती रूपे दर्शविणारा असतो.” अर्थात कोणत्याही व्याख्येसंदर्भात मतभेद होतात तसे या व्याख्येसंबंधीही होऊ शकतात. माझेच बरोबर असा आग्रह हायकू कुणीही धरू नये. आपल्या समूहावरील चर्चेतून एक गोष्ट माझ्या ध्यानात आली ती म्हणजे ‘हायकूत आताचा क्षण’ असलाच पाहिजे ही संकल्पना बरीच रूढ झालेली आहे. [मीही बराच काळ ती मान्य केली होती. पण हायकूविषयी आधुनिक अभ्यासकांची जी मते माझ्या वाचण्यात आली, आणि जे श्रेष्ठ हायकू मी वाचले त्यावरून माझे मत थोडे बदलले आहे. हायकू मराठी रसिकांना हायकूची ओळख करून देण्याचे श्रेय शिरीष पै यांचे. [पै यांच्या बद्दल एक स्वतंत्र लेख मी लिहिणार आहेच.] शिरीष पै यांचे समग्र हायकू पॉप्युलर प्रकाशनाने ‘हायकू हायकू हायकू’ या नावाने प्रकाशित केले आहेत. त्यांत शिरीष पै यांच्या एका प्रस्तावनेचा संक्षिप्त भागही दिला आहे. त्या प्रस्तावनेत शिरीष पै लिहितात – ‘1963 साली सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार विजय तेंडुलकर ह्यांनी एके दिवशी माझ्या हातात हायकूंचा एक सुंदर संग्रह ठेवला व ते म्हणाले, “आधी नाही...नंतर नाही...फक्त आताचा क्षण... त्या क्षणाची कविता म्हणजे हायकू.”’ शिरीष पै यांनी मराठीत हायकू लोकप्रिय करण्यासाठी जे काही कार्य केले ते अतुलनीय आहे. त्यामुळे हायकूंच्या संदर्भात त्यांचा शब्द एकेकाळी अंतिम मानला जात होता. मात्र अनेकांनी ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजे हायकू’ याचा अर्थ ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजेच हायकू’ असा लावला. त्याविषयी थोडे लिहिणे आवश्यक आहे. हायकूत ‘आताच्या क्षणाला महत्व असते’ हे मान्य मात्र ‘आताच्या क्षणाची कविता म्हणजेच हायकू’ असे म्हणता येणार नाही. आताचा क्षण वगळूनही उत्तम हायकू लिहिता येऊ शकतात, लिहिले जातात. उदाहरणार्थ जपानचा श्रेष्ठ कवि ईस्सा याचा एक गाजलेला हायकू असा आहे - दिवस किती मोठा आहे हे कारण पुरेसे म्हातारपणी डोळे पाणावयास किंवा बुसोन याचा एक हायकू असा आहे- चंद्र असा आहे की- चोरानेही थांबावे आणि गाणे गावे आता या हायकूंत ‘आताचा क्षण’ कोठे आहे? आताच्या क्षणासंबंधी हायकू अवश्य लिहावा [कारण आताच्या क्षणात आपण अधिक तीव्रतेने व उत्कटतेने सामील झालेलो असतो] पण याव्यतिरिक्तही हायकू लिहिता येतात हे ध्यानात ठेवावे.
जपानी संकल्पनेप्रमाणे श्रेष्ठ हायकूत खालीलपैकी एक किंवा दोन आशयसूत्रे असणे आवश्यक आहे. ‘जीवनातील अपूर्णता, एकाकीपणातील सौंदर्य, क्षणभंगुरतेची जाण आणि नश्वरता हे आयुष्याचे मूलभूत सत्य आहे ही जाणीव, जीवनातील लाभाविषयी उदासीनता व उत्कट भावनिक प्रतिसाद. जीवनाचा अर्थ शोधण्याची धडपड कवीच्या आत्म्यात असली पाहिजे.’ हायकूत निसर्ग असलाच पाहिजे अशी सक्ती करता येणार नाही; तरीही मला वाटते की हायकूमध्ये निसर्ग आला तर उत्तमच.. निसर्ग हा हायकूचा प्राण आहे. काही हायकू निसर्ग या विषयाव्यतिरिक्त लिहिण्यास हरकत नाही, तसे हायकू लिहिले जातातही. निसर्ग हा प्राण आहे असे म्हणण्याचे कारण म्हणजे माणसा-माणसाच्या नात्यापेक्षाही माणसाचे निसर्गाशी असलेले नाते फार वेगळे आहे. ते सनातन तर आहेच; पण तेथे माणूस थोडा शरण्यभावनेने, निसर्ग आपल्याला काही देईल या भावनेने जातो. म्हणून हायकूत निसर्ग यायला हवा. अर्थात हायकूत निसर्ग येताना तो स्पष्टपणे न येता प्रतिमांच्या भाषेत यावा. हायकूत निसर्गाचे केवळ वर्णन नसावे. चांगल्या कवितेतप्रमाणे प्रतिमा हाही हायकूचा प्राण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हायकू लिहिताना कवीची मन:स्थिति हायकूसाठी पोषक झाली पाहिजे, आणि निसर्ग या बाबतीत माणसाची सर्वाधिक मदत करू शकतो. कवीने निसर्गाकडे वळले पाहिजे. पण एवढेच पुरेसे नाही; निसर्गालाही आपल्या आत प्रवेश करू द्यायला हवा. कवी एक निसर्ग दृश्य पाहतो, तो वर्तमान क्षण आणि त्यासोबतचा तपशील देखील त्याचे मन टिपून घेते. त्यांच्याशी त्याचे एक नाते निर्माण होते. गद्य लेखन करताना अनुभवापासून थोडे तरी अलिप्त, वेगळे होण्याची गरज असते. हायकू-कवी त्या अनुभवात इतका खोल खोल जात राहतो की एका क्षणी तोच अनुभव बनतो. हायकूमध्ये प्रतिमांच्या साह्याने कवी आपले म्हणणे सूचित करू पाहतो, हायकूचा निश्चित अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. ही संदिग्धता हायकूचे सौंदर्य वाढविते. शेवटी श्रेष्ठ कला ही कलावंताचा अनुभव दर्शविते, त्याने वर्णन केलेली वस्तू नव्हे. त्यामुळेच हायकूत अधिक तपशीलवार वर्णनाला जागा नसते. कवी हायकूत शब्दांचा उपयोग शब्दांच्या पलीकडे जाण्यासाठी करतो. अनुभवातून गेल्यानंतर त्याच्या मनात पुढली प्रक्रिया सुरू होते. कवीच्या मनात काही जुन्या आठवणी असतात, संस्कार असतात, त्यांच्या प्रकाशात कवी हे तपशील निरखू लागतो. ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असते. या मंथनातून एक पुसटसा आकृतीबंध तयार होतो. तो कवीला अस्वस्थ करतो आणि तो शब्दांतून मांडण्याची अनिवार उर्मि त्याच्या मनात निर्माण होते. शब्द स्मृतीत साठवलेले असतातच, आता त्यांतून नेमके शब्द शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. या प्रक्रियेची पुढली पायरी म्हणजे जे शब्दातून व्यक्त करायचे आहे त्याचा ‘घाट’ ठरविणे. हा अनुभव हायकूतून व्यक्त होऊ शकेल की त्यासाठी दीर्घ कविता लिहावी लागेल हे ठरविणे. ही पायरी अत्यंत महत्त्वाची असते कारण हायकू लिहावयचे म्हणजे त्याचे अल्पाक्षराचे बंधन पाळावे लागते. आता शब्दांच्या वेगवेगळ्या छटा कवी न्याहाळू लागतो. त्याच्या कष्टाच्या मदतीला त्याची प्रतिभा येते व एका क्षणी हायकूचा जन्म होतो. हा क्षण केव्हा येईल याची कवीलाही कल्पना नसते. हायकू हा उस्फूर्त असतो असाही एक समज आहे, मात्र अनेक मोठ्या कवींनी आपले हायकू पुन्हापुन्हा तपासून नव्याने सादर केल्याचीही उदाहरणे आहेत. कोबायाशी ईस्साने हायकू लिहिल्यावर तीन चार वर्षांनी ते ‘दुरुस्त’ केलेले जाणकारांनी दाखविले आहेत. R H Blith या अभ्यासकाने ‘हायकू म्हणजे क्षणिक साक्षात्कार’ असे म्हटले आहे. [expression of temporary enlightenment]. मात्र हायकूचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे तो क्षणिक व कालातीत यांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करतो. आयूष्य हे या क्षणाला सुरू झाले नाही किंवा संपणारही नाही, हा क्षण ही काळाच्या साखळीतील एक कडी आहे हे उत्तम हायकूकार जाणतो, व ते व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. या मालिकेतील पुढील लेखात आपण हायकूमधील रसिकाच्या/ वाचकाच्या सहभागाबद्दल विचार करणार आहो. [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे या ब्लॉगवर आपण हायकू या काव्यप्रकारासंबंधी, त्याच्या रूपाकाराविषयी, अनेक श्रेष्ठ जागतिक हायकू कवी व त्यांच्या काव्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहो. मात्र ही माहिती घेण्यासाठी हायकू रसिकाला हायकूच्या व्याकरणाची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे असे समूहावरील प्रतिक्रियेतून मला जाणवले. त्यामुळे या व पुढील ब्लॉग मध्ये या विषयावर मी लिहिणार आहे. या संदर्भात मी ‘हायकूच्या विश्वात’ हे दीर्घ पुस्तक लिहिले असून येत्या काही महिन्यांत ते प्रकाशित होईल. त्यातल्या एका प्रकरणाचा हा सारांश. 1] हायकू हा जपानी काव्य प्रकार आजच्या काळात जगभर लोकप्रिय झालेला असला आणि अनेक देशांत हायकू लिहिण्याची परंपराही तयार होताना दिसत असली तरी ‘हायकू’ची सर्वमान्य व्याख्या मात्र अजून केली गेली नाही. किंबहुना असेही म्हणता येईल की हायकूच्या आजवर ज्या ज्या व्याख्या करण्यात आल्या त्यापैकी एकही सर्वांना समाधानकारक अशी वाटलेली नाही. हायकू सोसायटी ऑफ अमेरिकाने हायकूची व्याख्या अशी केली होती: Haiku: A poem recording the essence of a moment keenly perceived, in which nature is linked to human nature. Usually a haiku in English is written in three unrhymed lines of seventeen or fewer syllables. ‘हायकू म्हणजे अशी कविता जिच्यात उत्कटतेने अनुभवलेला एक क्षण शब्दबद्ध केलेला असतो आणि तिच्यात निसर्ग आणि मानवी स्वभाव यांची सांगड घातली जाते. सहसा इंग्रजीत हायकू हे तीन निर्यमक ओळीत लिहिले जातात ज्यांत 17 किवा कमी सिलेबल्स असतात.’ ही व्याख्या हायकू सोसायटीनेच 2004 साली बदलली. नव्या व्याख्येनुसार A haiku is a short poem that uses imagistic language to convey the essence of an experience of nature or the season intuitively linked to the human condition.” या व्याख्येत सिलेबल्सच्या संख्येचा उल्लेखही नाही. Gabriel Rosenstock हा अभ्यासक लिहितो, ‘हायकू ही ‘एका श्वासाची कविता’ [one breath poetry] आहे. ती जपानी परंपरेनुसार 17 सिलेबल्समध्ये तर, जपान बाहेर सहसा ‘मुक्त काव्य’ रूपात, तीन ओळीत लिहिली जाते. हायकुच्या संदर्भात ‘ओन’ हा शब्द सतत वापरला जातो. ही संकल्पना काय आहे हे ध्यानात घेतल्यावरच हायकूची रचना नीट समजू शकते. ‘ओन’ हे जपानी भाषेतील उच्चारांचे एकक. ‘ओन’ ही संकल्पना मराठीत नाही. वाक्य उच्चारताना जेथे एक उच्चार संपतो तेथे पहिला ‘ओन’ संपला असे धरले जाते व तेथून पुढे दूसरा ‘ओन’ सुरू होतो. जपानमध्ये अगदी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांना ‘ओन’ मोजण्याचे शिकविले जाते. एक अत्यंत महत्त्वाची सूचना प्रथमच देऊन ठेवतो. विसाव्या शतकात मराठीत हायकू लिहिताना कुणीतरी हायकूत 17 अक्षरे असली पाहिजेत असे बंधन घातले व हायकूला बंधनात टाकून हायकू लिहिणे विनाकारण अवघड करून टाकले. हायकूत अमुक एक अक्षरेच असली पाहिजेत ही चुकीची समजूत आहे. जपानी हायकूत 17 ओन मोजले जात असले तरी ओन व अक्षर यांत फार फरक आहे, त्यामुळे 17 ओनमध्ये जे सांगितले जाते ते 17 अक्षरांपेक्षा जास्त किंवा कमी असू शकते. उदाहरणार्थ, ‘तोक्यो’ मध्ये जपानी व्याकरणाप्रमाणे 4 ‘ओन’ आहेत, इंग्रजीत 3 सिलेबल्स तर मराठीत 2 अक्षरे. ‘ओसाका’ मध्ये जपानी भाषेत 4 ‘ओन’, इंग्रजीत 3 सिलेबल्स तर मराठीत 3 अक्षरे आहेत. त्यामुळे मराठी हायकू लिहिताना त्यात किती अक्षरे आहेत हे कवींनी किंवा वाचकांनी पाहू नये. हायकूचा एक जाणकार शिक्षक, व अभ्यासक अलन गिन्स्बर्ग याने लिहिले आहे: ‘जपानी हायकू मधील 5/7/5 ही रचना इंग्रजीमध्ये जशीच्या तशी आणता येणार नाही. फक्त ध्यानात असू द्या-‘These three lines must make the mind leap!’ मराठी कवींनीही हे ध्यानात ठेवले पाहिजे. मी माझ्या एका हायकूतून हीच भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अडीच अक्षरे प्रेमाची कशी बसवू सतरा अक्षरात अक्षरांच्या संख्येत भावना बसविण्याचा प्रयत्न केला की त्या गुदमरण्याची शक्यताच अधिक. 17 अक्षर हे बंधन पाळल्यामुळे अनेकदा मराठी हायकू अपूर्ण किवा ‘अनावश्यक कात्री लावलेला’ किंवा ‘त्रोटक’ असा जाणवतो. ही बंधने झुगारून देण्याची वेळ आली आहे असे माझे स्पष्ट मत आहे. जपानी भाषेचे स्वरूप असे आहे की 5/7/5 ओनची रचना कवितेला एक आनंददायक ताल [Rhythm] मिळवून देते. त्याची नक्कल करणे दुसर्या भाषेला शक्य नाही. म्हणून मराठी कवींनी आपला ताल आपणच शोधायला हवा.
मग हायकू किती अक्षरांचा असावा? निश्चित आकडा ठरविता येत नसला [आणि त्याची गरजही नाही ] तरी हायकू ही ‘एका श्वासाची कविता’ आहे हे ध्यानात ठेऊन हायकुचे लेखन करायला हवे. एवढे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे की हायकू ही तीन ओळींची, अल्पाक्षरी, अक्षर मर्यादेचे बंधन नसलेली, प्रतिकातून व्यक्त होणारी लघुकविता असते जी एका श्वासात वाचता किंवा सांगता आली पाहिजे. या तीन ओळीत यमक नसले तरी चालेल पण त्यांना एक लय मात्र असली पाहिजे. 2] हायकू हा सामान्यपणे 3 ओळीत असावा. 3] हायकूमधील वाक्याची रचनाच अशा प्रकारे केली पाहिजे की ते वाक्य ‘कवितेचे तीन एकसंघ भाग’ वाटले पाहिजे. 4] हायकुला शीर्षक नको. जे सांगावयाचे आहे ते हायकूतून सांगावे. शीर्षकामुळे वाचकाचे विचार आधीच दुसर्या दिशेला जाण्याचा धोका असतो. 5] यमक जुळविण्याचा खटाटोप नको. बर्याच मराठी हायकूत पहिल्या व तिसर्या किंवा दुसर्या व तिसर्या ओळीत यमक जुळविलेले दिसते. त्याची आवश्यकता नाही. बहुतेक जपानी हायकूत यमकाचा वापर केला जात नाही. यमक सहज जुळून आले तर हरकत नाही पण त्याच्या आग्रहामुळे हायकुला कृत्रिम गेयता येते असे मानले जाते. Encyclopedia Britannica ने तर त्याच्या हायकुच्या व्याख्येची सुरुवातच ‘unrhymed poetic form’ अशी केली आहे. वेबस्टर dictionary मध्येही ‘an unrhymed verse form’ असाच उल्लेख आढळतो. यमक सहज जुळले तर हरकत नाही. ‘यमकामधून’ गेयता आणू नये. 6] विरामचिन्हे, अवतरण चिन्हे टाळली पाहिजेत. 7] हायकूची 17 अक्षरांची मर्यादा जर आपण नाकारली तर मग या काव्य प्रकाराची मुख्य लक्षणे कोणती? तीन ओळीतील एखादी अल्पक्षरी रचना हायकू आहे का नाही हे कसे ठरवायचे? याचा थोडा तपशीलवार विचार करू. हायकूमध्ये तीन महत्वाचे घटक असले पाहिजेत. पहिला म्हणजे निसर्गाविषयीचे प्रेम, जवळीक, निसर्गतादात्म्यता. दुसरा घटक म्हणजे, हायकूत विलक्षण सूचकता हवी. जे सांगायचे ते स्पष्टपणे मांडू नये. यामुळे उत्तम हायकू हा नेहमी विचारांच्या अनेक दिशा सूचित करणारा असतो, त्यामुळे एकाच हायकुची अनेक अर्थनिरूपणे होऊ शकतात. रचनेतील संदिग्धता ही दिखाऊ असू शकते पण अर्थातील संदिग्धता ही वैचारिक प्रवासाला आवाहन करू शकते. जी रचना एकच अर्थ स्पष्ट करू इच्छिते ती हायकू नसतेच. [किंवा कवीचा हट्टच असेल तर तिला ‘साधारण हायकू’ म्हणू.] तिसरे म्हणजे, हायकूत दोन वेगवेगळी बिंबे असायला हवीत, आणि त्यांचे नाते मांडले जावे. हे नाते पुन्हा प्रत्येक वाचकासाठी वेगळे असू शकते. 8] हायकूत म्हणी, वाक्प्रचार यांचा अंतर्भाव करू नये, जनमाणसात रूढ असलेल्या म्हणी वापरू नयेत, कारण त्यांचा एखादा वेगळा, तयार अर्थ वाचकाने लावलेला असतो, किंवा त्याच्या मनात असतो. 9] हायकूत सहसा शब्दांची पुनरावृत्ती करू नये. एकाच अर्थाचे दोन शब्द वापरणेही टाळावे. जितके शब्द कमी तितकी सूचकता अधिक. ‘अधिक माहिती देणे’ अर्थाला मर्यादित करू शकते. 10] ’शब्दांचे खेळ’[wordplay] सहसा टाळायला हवे. कधी खेळ सहज जमून गेला तर तो त्याज्य मानू नये. 11] निसर्ग,ऋतुदर्शक शब्द [ज्याला जपानी भाषेत ‘किरेजि’ म्हणतात] हायकूत आलाच पाहिजे असे नव्हे. आधुनिक माणसाला दुर्दैवाने निसर्गापासून दूर जावे लागले आहे. त्याने आजूबाजूच्या जगातूनच कवितेचे विषय शोधले तर ते हायकूला वर्ज्य नसावेत. 12] ठोस प्रतिमा वापरायला हव्या. ठोस प्रतिमा इंद्रियांना आकर्षित करतात ज्यामुळे वाचक दृश्य, वस्तु किंवा कल्पना, ध्वनि, वास, चव आणि स्पर्श यासारख्या संवेदना वेगळ्या रूपात अनुभवू शकतात. त्या विशिष्ट आणि मूर्त असतात. अमूर्त प्रतिमा टाळा, ज्या इंद्रियाद्वारे थेट जाणवत नाहीत. 13] न्यायदाते बनू नका. आपण मांडले तेच सत्य असा आग्रह धरू नये. असा आग्रह हायकूला एकांगी व कमकुवत बनवू शकतो. संदेश देण्याचा, उपदेश करण्याचा, मार्गदर्शनाचा प्रयत्न करू नये. या भूमिका हायकूकाराच्या नाहीत. 14] दुर्बोधता टाळावी. अवघड, बोजड शब्द वापरू नयेत. 15] हायकू हे सहसा पूर्णपणे वस्तुनिष्ठ नसतात कारण मानवी अनुभवाशी त्यांचा जवळचा संबंध असतो. असे असले तरी निसर्गातील घटकांवर भाष्य करताना ‘स्व’ला मध्ये येऊ देऊ नये. ‘मी’, ‘मला’, ‘माझे मत’ असे शब्द सहसा टाळले पाहिजेत. 16] हायकू मधून ‘निष्कर्ष’ सांगण्याचा प्रयत्न कवीने करू नये. तो वाचकाला काढू द्या. 17] केवळ तात्विक विचार मांडू नका. हायकूत अवघड तत्वचिंतन येऊ देऊ नका. ते मूळ रूपात काव्य आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. 18] हायकूत नकारात्मक दृष्टीकोण नको. हायकू ही आशावादी कविता आहे. ती दु:खाचे मानवी जीवनातील महत्त्वाचे स्थान मान्य करते पण दु:खाला शरण जाण्यास नकार देते. दु:खाचे अस्तित्त्व मान्य करते पण सामर्थ्य नाकारते. 19] हायकूमध्ये एक लपलेला अर्थ असायला हवा. मात्र तो स्पष्ट करण्यासाठी धक्कातंत्र वापरू नका. ‘रसिकरंजनी’ वृत्ती, अति सुलभता, सोपेपणा, स्पष्टीकरण हे सारे टाळले पाहिजे. सहजसाध्य कलाटणी टाळली पाहिजे. 20] हायकूत वर्तमानकाळच वापरावा, भूतकाळ आला तर तो वर्तमान काळाशी नाते जोडणारा असावा. जर आठवण हा आजच्या जगण्याचा भाग असेल तर ती आजच्या हायकूचाही भाग होऊ शकते. आठवणीत रमणे हे जर केवळ स्मरणरंजन असेल तर तो मनाचा भावुकपणा असू शकतो. पण आठवण असणे ही माणसाच्या जिवंतपणाचे एक लक्षण आहे. हायकूसाठी आवश्यक हे की विचारांच्या साखळीची सुरुवात आठवणीपासून व्हायला नको. आजच्या क्षणाचा एक भाग म्हणून ती आठवण मनात प्रवेश करीत असेल तर ती हायकूत येऊ शकते. 21] आत्ताच्या क्षणावर लक्ष केन्द्रित करा’ पण ‘आताचा क्षण’ ही गेलेला क्षण आणि येणारा क्षण यांच्यामधील कडी आहे हे भान कवीला असायला हवे. 22] ‘सारखे’, ‘प्रमाणे ‘ असे शब्द टाळावे. ‘तुलना’ नको. उपमा, उत्प्रेक्षा असे अलंकार नकोत. 23] प्रत्येक विषयाला ‘तीन ओळीत’ बसविण्याचा प्रयत्न नको. जर तो विषय अधिक शब्द मागत असेल तर वाटल्यास त्यावर स्वतंत्र कविता लिहा. 24] हायकूला विनोद वर्ज्य नाही, फक्त तो केवळ ‘हसविण्यासाठी’ नसावा. जपानमध्ये निखळ विनोदी हायकू देखील लिहिले जातात पण त्यांना ‘सेनर्यू’ असे नाव आहे. [याविषयी एक स्वतंत्र लेख पुढे लिहिला जाईल.] 25] हायकू लिहिताना मनाला भटकू देऊ नये. ‘विषयावर’ मन केन्द्रित करण्याचा प्रयत्न करा. हायकू लेखन ही एक प्रकारची ध्यानधारणा आहे. 26] आपल्याला हायकू लिहिता येत नाहीत असे मानून कवीने प्रयत्न सोडू नये. सकारात्मक दृष्टीकोण असू द्यावा तो तुम्हाला लेखनातच नव्हे तर जगण्यातही साथ देईल. 27] सारेच हायकू ‘नियमांनुसार’ लिहिले जातील असे नव्हे. काही हायकूत वरीलपैकी काही नियम पाळले जाणारही नाहीत. 28] एक सल्ला : हायकू लिहिल्यावर लगेच प्रकाशित करण्याची घाई करू नये. लिहीलेल्या हायकूत दुरूस्ती करणे कमीपणाचे समजू नये. अनेक श्रेष्ठ हायकूकारानी आपल्या हायकूत तो प्रकाशित झाल्यावर देखील ‘सुधारणा’ केल्याची उदाहरणे सापडतील. सारेच हायकू उत्तम लिहिले जातील असे मानू नये. अनेक महान कवींनी सामान्य हायकू लिहिले आहेत. बाशोने लिहिले आहे, ‘जर तुम्ही आयुष्यात पाच उत्तम हायकू लिहिलेत तर तुम्ही ‘हायकू कवी’ आहात; दहा लिहिले तर तुम्ही श्रेष्ठ कवी.’ सरतेशेवटी वाचकांसाठी : हायकू वाचताना प्रत्येक हायकुला थोडा वेळ द्या. पुढल्या हायकूकडे जाण्याची घाई करू नका. पहिल्या वाचनात हायकू समजला नाही तर लगेच त्याला बाद करू नका. पुन्हा किमान एकदातरी त्याच्याकडे जा. ‘रोज एक पुस्तक’ वाचणार्यांनी कृपया हायकूच्या वाटेला जाऊ नये. हायकू कवींना व वाचकांनाही खूप खूप शुभेच्छा. [बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक श्रेष्ठ जपानी हायकू कवि मात्सुओ बाशो हा जपान मधीलच नव्हे तर जगातील सर्वश्रेष्ठ कवीपैकी एक मानला जातो. माझाही तो अत्यंत आवडता कवि. त्यामुळे ‘हायकुच्या तळ्यात’ हा नवा ब्लॉग सुरू करताना पहिले नमन बाशोला करणे क्रमप्राप्त आहे. सुरूवातीला दिलेला हायकू हा बाशोचा सर्वाधिक लोकप्रिय हायकू आहे. बाशोच्या तळ्यात बेडकाने मारलेल्या उडीचे पडसाद चार शतके लोटली तरी अजून उमटत असतात. प्रत्येक उत्कट हायकू कवि आणि रसिक एकदा तरी त्या बेडकाच्या उडीचा आवाज ‘आपल्या पद्धतीने’ ऐकतोच, या तळ्यात डुबकी मारतोच. पण हे सारे जाणण्याआधी आपण या उडी संबंधी थोडे अधिक जाणून घेऊ. इ.स. 1686 मधील गोष्ट. जपानमधील एका लहानसा गावात अनेक कवी आणि काव्यरसिक मात्सुओ बाशो [1644-1694] या मान्यवर कवीच्या घरी जमले होते. ही घटना घडली त्यावेळी बाशोने नुकतीच वयाची चाळीशी ओलांडली असली तरी एक महत्वाचा हायकूकार म्हणून त्याची प्रसिद्धी जपानभर पसरली होती. तो हायकू या काव्यप्रकारात जे नवे प्रयोग करू लागला होता आणि जे परिवर्तन घडविण्याची त्याची इच्छा होती तिला मान्यता मिळू लागली होती. जवळजवळ दोन हजार साहित्य अभ्यासकांनी त्याला गुरू मानून त्याच्या साहित्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. सुमारे सत्तर कवींनी त्याचे शिष्यत्व पत्करले होते. जिवंतपणीच तो एक आख्यायिका बनला होता. असंख्य लोक त्याच्या दर्शनाला येत. या दिवशी अर्थातच नेहमीप्रमाणे या मैफिलीचे प्रमुखपण बाशोकडे आले होते. अशा प्रकारच्या मैफिलीत सर्वसाधारणपणे एक विषय घेऊन त्यावर हायकू लिहिण्याची पद्धत होती. आजचा विषय ‘बेडूक’ हा होता. बेडकावर अनेक कवींनी आपले हायकू सादर केले. बाशोचा एक शिष्य शिको याने या मैफिलीचे फार अप्रतीम वर्णन लिहून ठेवले आहे. तो लिहितो, ‘त्या दिवशी रिमझिम पाऊस पडत होता. बाशोच्या घराशेजारी असलेल्या तळ्यात बेडूक उड्या मारीत असल्याचा आवाज अधून मधून ऐकू येत होता.' काही काळ शांतपणे विचार केल्यावर बाशोने प्रथम 12 ‘ओन’ची रचना सादर केली. ‘ओन’ म्हणजे जपानी भाषेतील उच्चाराचे एकक. मराठीत त्याला पर्यायी शब्द नाही. शिवाय हायकुचा आस्वाद घेण्यासाठी तो ‘ओन’ ची माहिती असणे गरजेचे नाही. [ओनविषयी अधिक माहिती ओघओघाने या ब्लॉगमधून दिली जाईलच.] हायकू तीन विभागांत असतात व त्यांची रचना सामान्यपणे 5+7+5 अशी 17 ओनची असते. बाशोने लिहीलेल्या त्या 12 ओनच्या रचनेचा इंग्रजी अनुवाद असा- Frog jumps in Sound of water ... पण अजून हायकूची सुरुवात त्याला सापडत नव्हती. त्याच्या एका शिष्याने एक ओळ सुचविली. पण ती बाशोला पटली नाही. काही वेळाने त्याच्या या रचनेत ‘प्राचीन तळ्याने’. प्रवेश केला व त्याने हा हायकू असा पूर्ण केला- The old pond Frog jumps in Sound of water पुढे बाशो हे उपनाम घेतलेल्या मात्सुओ किसाकूचा जन्म उइनो या लहानशा गावी ई.स. 1644 साली झाला.. 1678 साली प्रथम त्याने नवीन वर्षाच्या कविता लिहून प्रकाशित केल्या. त्या काळी फक्त मान्यताप्राप्त कवीच असे करीत, यावरून त्याच्या कवितांना मान्यता मिळू लागली होती असे दिसते. काही तरुण त्याचे शिष्यही बनले. अशाच एका शिष्याने भेट म्हणून एक केळीचे झाड आणून त्याच्या अंगणात लावले. हे झाड कवीला आवडले, केळीच्या झाडाला जपानीत ‘बाशो’ म्हणतात. त्यामुळे यानंतर किसाकूने आपले जुने नाव टाकून ‘बाशो’ हे नाव घेतले. [एका पुस्तकात मला असा संदर्भ आढळला की ‘बाशो’ म्हणजे केवळ झाड नसून ‘फळ न येणारे केळीचे झाड’ आहे!] तसा बेडूक हा विषय ‘हायकू’ साठी नवा नव्हता. पण बेडूक हा त्याच्या ‘गाण्यासाठी’ आठवला जायचा, कवी त्याच्या आवाजाचे, त्याच्या संगीताचे, गाण्याचे वर्णन करणारे हायकू लिहीत. हे हायकू सहसा विनोदाच्या अंगाने लिहिले जात. पण त्या दिवशी बाशोने जो हायकू सादर केला त्या पद्धतीने बेडूक कधीच कवितेत अवतरला नव्हता. बाशोच्या काळात जपानी कवितेवर चीनी काव्याचा फार मोठा परिणाम होता. चिनी कवितेत सहसा बेडकाच्या ओरडण्याचे वर्णन केले जायचे. बाशोने प्रथम रसिकांचे लक्ष ‘पाण्याच्या आवाजाकडे’ वेधले. आता हा हायकू पूर्णपणे जपानी बनला. त्याने एक परंपरा मोडली, एक नवी परंपरा चालू केली. कवितेकडे [आणि जगाकडेही] बघण्याचा एक नवा दृष्टीकोण दाखवला. काही वर्षांपूर्वी मी बाशोचे सुमारे 100 हायकू [घंटेवरले फुलपाखरू’ या पुस्तकासाठी] मराठीत अनुवादित केले होते तेव्हा या हायकूचा अनुवाद असा केला होता- प्राचीन तलाव एक बेडूक उडी घेताना पाण्याचा आवाज माझ्यासारख्या ज्या वाचकाला जपानी भाषा येत नाही त्याला [दुर्दैवाने] इंग्रजी अनुवादावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मी वरील अनुवाद हा एका इंग्रजी अनुवादावरूनच केला होता. काही दिवसांपूर्वी नेटवर एका बाशो-अभ्यासकाने व संग्राहकाने या हायकूचे 32 वेगवेगळ्या आस्वादकांनी इंग्रजीत केलेले अनुवाद प्रसिद्ध केलेले माझ्या वाचनात आले. त्यापैकी प्रो. उइदा यांनी केलेला एक अनुवाद असा होता- Old pond Frog jumps in Splash! ‘sound of water’ चे ‘splash’ का झाले याचा शोध घेत असताना मोठी रंजक माहिती हाती आली. मूळ जपानी हायकूचे शब्द असे आहेत- Furu ike ya kawazu tobikomu mizu no oto Furu म्हणजे प्राचीन, Ike म्हणजे तलाव, Kawazu म्हणजे बेडूक, tobikomo म्हणजे उडी मारणे, mizu म्हणजे पाणी. शेवटचा oto हा शब्द omnomatopoeic आहे. Omnomatopoeia म्हणजे The naming of a thing or action by vocal imitation of the sound associated with it. एखाद्या कृतीचे त्याद्वारे निर्माण होणार्या ध्वनिनुसार वर्णन करणे. हा धागा पकडून आता या हायकूचे भाषांतर मी नव्याने केले. पहिल्या भाषांतरात ‘एक बेडूक’ असे शब्द होते. यांतील ‘एक’ हा शब्द मला अनावश्यक वाटला. तो गाळला. नवे भाषांतर असे झाले- प्राचीन तलाव बेडकाची उडी डुबुक येथून पुढे सुरुवात झाली ‘घंटेवरले फुलपाखरू’ या माझ्या जागतिक हायकूंच्या अनुवादाच्या प्रकल्पाची.
|
विजय पाडळकरArchives
April 2026
Categories |
RSS Feed