|
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे] सर्वप्रथम हा ब्लॉग सुरू करण्यासाठी 1-2-2026 ही तारीख का निवडली याबद्दल. बरोब्बर 25 वर्षांपूर्वी, 1-2-2001 रोजी मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन बँकेची नोकरी आनंदाने सोडून दिली. त्या दिवशी मी लिहिले होते-
आज 25 वर्षांनंतर हे थोडे भाबडे वाटते आहे, पण स्वप्न पाहताना माणूस थोडा भाबडा बनला नाही तर कसे? यातील बर्याच इच्छा पूर्ण झाल्या, काही झाल्या नाहीत. पण हा सार्यांचाच अनुभव असतो. एक इच्छा मात्र मनात कोठेतरी सुप्त रूपात होती, जी त्यावेळी ओठावर आली नाही. ती होती शब्दांना कधीतरी कवितेचे रूप मिळावे ही. काही दिवसांपूर्वी तीही पूर्ण झाली. हायकू माझ्या मनात वस्तीला आले.
त्यांच्या सोबत केलेल्या हायकूंच्या जगाच्या परिक्रमेची ही कहाणी टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. पहिला टप्पा : पुढील रविवारी.
14 Comments
हायकूकडे जाणार्या पायवाटेला पुढे अनेक रानवाटा फुटतात. वाटेवरले गवत तुम्हाला एका दिशेने घेऊन जाते, त्यावर उडणारे फुलपाखरू दुसर्या दिशेला खुणावत असते, कोकिळेची साद तिसर्याच रस्त्याकडे बोलावते. दूर कोठेतरी हरिण ओरडते. समोरच्या पर्वताच्या दिशेने एक गोगलगाय हळूहळू सरकत असते. शेजारच्या फांदीवर एक कावळा येऊन बसतो आणि फांदी थरथरते. मंदिरातील विशालकाय घंटेवर एक चिमणे फुलपाखरू निवांत झोपलेले असते. एका वाटेवर पावलांच्या खुणा दिसतात आणि पुढे चालून त्या ज्या तळ्यात विलीन होतात त्या तळ्याच्याकाठी एक बेडूक ध्यानस्थ बसलेला असतो. ते असते हायकूचे तळे! एकदा या तळ्यापाशी मी आलो आणि येथेच बसलो. ध्यानस्थ वगैरे नाही तर तळ्यात काय काय दडलेले आहे याचा शोध घेत. या शोधात जे माझ्या हाती आले ते कवितेच्या रसिक वाचकांना वाटण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या लेखनातून मी वाचकांना जगातील उत्तमोत्तम हायकू कवींची, त्यांच्या जीवनातील काही अर्थपूर्ण व रंजक घटनांची ओळख करून देणार आहे. शिवाय या ब्लॉगमध्ये हायकुच्या विश्वात सर्वोत्तम समजल्या जाणार्या हायकूंचे रसग्रहणदेखील असेल. आणखीही बरेच काही. ‘हम अभीसे क्या बताएं क्या हमारे दिल में है’! ह्या ब्लॉगसाठीचा पहिला लेख आज, मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर 14 जानेवारी रोजी प्रकाशित करीत आहे. पुढील लेख आठवड्याला दोन याप्रमाणे दर रविवारी व बुधवारी येथे ठेवले जातील. नुकतेच माझे ‘हायकूऋतू’ हे हायकूंचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्या निमित्ताने अनेक मित्रांशी बोलताना माझ्या ध्यानात आले की बहुसंख्य उत्तम वाचकांना देखील या काव्यप्रकाराविषयी फारच थोडी माहिती आहे. हायकूविषयी समज कमी आणि गैरसमजच जास्त आहेत. यासंदर्भात आपण पुढे बोलूच, आता एवढेच: ‘हायकूच्या वाटेवरून चालल्यानंतर आपण पूर्वीचे उरत नाही.’ ज्याचे कवितेवर प्रेम आहे त्याने हे लेखन अवश्य वाचावे, समानधर्मियांना त्याविषयी सांगावे. |
विजय पाडळकरArchives
May 2026
Categories |

RSS Feed