Vijay Padalkar
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क

हायकूच्या तळ्याकाठी

हायकूच्या तळ्याकाठी - 17: चेरीचा बहर आणि कवी

6/8/2026

0 Comments

 
Picture
वसंत ऋतूचे आगमन, म्हणजे सुमारे मार्च एप्रिलचा काळ, या काळात सारा जपान चेरीच्या फुलांच्या बहराने रंगून गेलेला असतो. जपानचे सांस्कृतिक जीवन देखील अनेक अंगानी फुलून आलेले असते. या पंधरा वीस दिवसात प्रचंड उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण झालेले असते. माणसे एकेकट्याने, गटागटाने, बहर पाहण्यासाठी बाहेर पडतात. जंगले, वने, उपवने चेरीच्या फुलांनी व्यापून टाकलेली. शहरात देखील रस्त्याच्या कडेला ओळीने लावलेल्या वृक्षांवर गुलाबी छटा असलेली नाजूक फुले लखडलेली असतात. त्यांचा मंद पण मन गंधित करून टाकणारा सुवास वातावरणात पसरलेला असतो. 

पुरातन काळापासून लोकप्रिय असलेली ही परंपरा आधुनिक काळात देखील जपानने जपली आहे. जंगलात तर चेरीच्या वृक्षांच्या प्रजातींचा अभ्यास करून उत्तम जातींची पद्धतशीर लागवड व जोपासना केली जातेच,  पण असंख्य  शाळांच्या आणि सरकारी इमारतींच्या आवारात देखील चेरीची झाडे लावली जातात. मुलांना लहानपणापासून त्या संबंधीच्या कथा, कविता ऐकविल्या जातात. चेरीचे फूल हे जपानने आपले राष्ट्रीय फूल म्हणून निवडले आहे.

या काळात माणसे खास ‘चेरीचा बहर पाहण्यासाठी’ बाहेर पडतात. इ.स.च्या 7व्या शतकापासून ही परंपरा सुरू झाली असे मानले जाते. प्रथम राजघराण्यातील मंडळी चेरीच्या बागेत जमत. फुलांच्या सावलीत दिवस घालवत. नंतर सामुराई घराण्यांनी ही परंपरा उचलली. हळू हळू ती सामान्य माणसांत देखील लोकप्रिय बनली. अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरेला ‘हनामी’ असे नाव दिले गेले आहे. ‘हनामी’ म्हणजे ‘flower viewing’ [बहर पाहणे]. या ‘पाहण्याला’ जपानी परंपरेत खास अर्थ आहे. पाहणे म्हणजे नुसते दृष्टिक्षेप टाकणे नव्हे. पाहणे म्हणजे सारे चित्त एकवटून लक्ष केन्द्रित करणे. पाहणे म्हणजे एकटक पाहत राहणे जोपर्यंत समोरच्या दृश्याशी आपले नाते जुळत नाही. इतक्या उत्कटतेने की एका काळानंतर पाहणाराच त्या दृश्याचा एक भाग बनून जातो, फूल बनतो. जपान मधील बहुसंख्य कवी ही [आणि पौर्णिमेचा चंद्र पाहण्याची] परंपरा पाळतात. अर्थात पाहण्यासाठी आलेल्या लोकांत हौशे-नवशेच अधिक असतात. अशाच लोकांना उद्देशून सायग्यो या कवीने हाइकू लिहिला आहे-

या चेरीचा एकमेव दोष
त्या फुलतात
 गर्दी जमा होते.

अर्थात हा दोष लोकांचा आहे हेच कवीला सांगायचे आहे हे लगेच ध्यानात येते. 
चेरीच्या बहराचा प्रभाव जपानच्या संस्कृतीत खोलवर रूजला आहे. प्राचीन काळापासून चित्रकार या फुलांची व झाडांची अगणित चित्रे काढीत आले आहेत. असा चित्रकार दाखविता येणे कठीण आहे ज्याने चेरीच्या बहराचे चित्र काढले नाही, असा कवी दाखविता येणे कठीण ज्याने या बहरावर कविता लिहिली नाही. कलावंत तर सोडाच, सैनिकांना देखील या बहराचे आकर्षण आहे. दुसर्‍या महायुद्धात चेरीच्या बहराचा लोकांत राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी उपयोग केला गेला. बॉम्बर विमानावर चेरीची झाडे रंगविली गेली. आजच्या तरुणांमध्ये देखील बहराविषयीचे प्रेम संक्रमित झाले आहे. जपानच्या राष्ट्रीय रग्बी टीमच्या युनिफोर्मवर चेरीच्या फुलांचे चित्र आहे, आणि तिचे नाव आहे-Brave Blossoms.

Picture
चेरीच्या बहराशी पुरातन काळापासून आणखी एक प्रतिकात्मक अर्थ निगडीत आहे. तो बहर जसे सौंदर्याचे तसेच जीवनाच्या क्षणभंगुरतेचे प्रतीक म्हणून देखील मानला गेला आहे. चेरीचा बहर हा जास्तीत जास्त आठ दहा दिवसच टिकतो, नंतर त्याची फुले गळून पडायला सुरुवात होते. जीवन सौंदर्यापूर्ण आहे पण तसेच ते क्षणकाळ टिकणारेही आहे. ही संकल्पना जपानी संस्कृतीतील mono no aware [ melancholy at passing of things- काल निसटून जात असल्याची विषण्ण जाणीव] या संकल्पनेशी निगडीत आहे. [जी.एंच्या ‘भेट’, ‘ओर्फिअस’ अशा काही कथांतून ही संकल्पना अवतरताना दिसते.] 
​11 व्या शतकातील पहिल्या जपानी महाकादंबरीत- ‘ The tale of Genji’- मध्ये प्रथम एका कवितेत ही संकल्पना मांडली गेली.

चेरीचा बहर
वसंत ऋतु
काहीच शाश्वत नाही​
श्रेष्ठ जपानी हाइकूकार योसा बुसोन लिहितो-
‘चेरीची फुले
गळून पडताहेत
आजही’

फुले उगवण्याची तसेच ती गळून पडण्याची क्रिया अव्याहतपणे चालूच आहे..चालूच राहणार आहे. सौंदर्य हरवलेले जीवन हे वास्तवही माणसाला स्वीकारावेच लागते.
असे असले तरी चेरीचा बहर म्हणजे उत्साहाचा बहर. चैतन्याचा बहर. कोबायाशी इस्सा लिहितो-

जगण्यातील आनंद
अद्भुत
 चेरीबहराच्या सावलीत

 या बहराचा प्रभाव एवढा आहे की-
कुणीही
अनोळखी उरत नाही
चेरीच्या बहराखाली
[इस्सा]
एकाच सौंदर्यपूजक वृत्तीतून ही माणसे एकत्र आलेली आहेत, मग ती अनोळखी कशी राहतील? त्यांचे एकमेकांशी नाते जुळेलच. 
मात्र हे नाते  तात्पुरते जुळले आहे का? कारण कायमचे  नाते जुळविण्यास हे जग अपात्र आहे!  दुसर्‍या एका हायकूत इस्सा लिहितो-
चेरी बहर जिकडे तिकडे
आणि हे
अपात्र जग
या बहराचा फक्त माणसावरच परिणाम होतो असे नव्हे.  ओनित्सुरा हा कवी एका हायकूत लिहितो-
पहाडातील निर्झर
चेरीच्या छायेखाली
दगड देखील गाणे गाऊ लागतात

चेरीची फुले क्षणजीवी तसेच नाजुक देखील. आवाजानेही गळून पडतील. म्हणून एक हाइकूकार इशारा देतो-
मंदिराची घंटा 
हळूच वाजवा
चेरी फुलली आहे
चेरीचा बहर असंख्य वेळा पाहत राहिल्यामुळे त्याच्या संदर्भातल्या अगणित आठवणी माणसाच्या मनात भिरभिरत असतात, म्हणूनच बाशो एका हायकूत लिहितो-
किती किती गोष्टी
पुन्हा मनात घेऊन येतो
चेरीचा बहर
चेरीचा बहर हा सौंदर्याचे प्रतीक असो की क्षणभंगुरतेचे, खरे तर हा प्रतीकात्मक अर्थ माणूसच त्याला देतो. निसर्ग फक्त असतो. आपल्याच नियमांनुसार बदलणारा. कोबायाशी इस्साने एका हाइकूतून हे सत्य अतीशय नेमकेपणाने मांडले आहे-
तुझ्याशिवाय
चेरीचा बहर
फक्त बहर
निसर्ग सर्वांसाठीच फुलत असतो. आपण त्याला काही खास बनवितो. त्याचे महत्त्व आपल्यासाठी अधिक वाढते जेव्हा तो बहर आपण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पाहतो. पण जेव्हा ती प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर? तर मग तो बहर ‘फक्त बहर’ असतो. आपले सारे वैशिष्ठ्य हरवून बसलेला. केवळ एका झाडाचा बहर असलेला.

चेरीच्या बहराविषयीचा एक अतिशय उत्तम आणि अर्थपूर्ण हायकू बुसोन याने लिहिला आहे.
झाडाच्या फांद्यातून 
पलीकडले देऊळ दिसते 
बहर ओसरल्यावर
बुसोन हा केवळ कवि नव्हता तो एक उत्तम चित्रकार देखील होता, आणि त्याच्या हायकू मध्ये या गोष्टीचे प्रतिबिंब स्पष्टपणे पडलेले दिसते. या हायकूमध्ये सुरूवातीला आपल्याला झाडाच्या फांद्या दिसतात जो दृश्याचा समोरचा भाग आहे. त्यानंतर त्या फांद्यामधून ‘पाठीमागचे मंदिर’ दिसते, जे दृश्याची पार्श्वभूमी आहे. ही मांडणी एका कुशल चित्रकाराची आहे हे जाणवते. 

या हायकू मधील सर्वात महत्त्वाचा शब्द ‘बहर ओसरल्यावर’ हा आहे. जेव्हा झाड पाणा फुलांनी पूर्ण डवरलेले असते तेव्हा ते खूप सुंदर दिसते. पण त्याच वेळी ते पलीकडचे सारे दृश्य दृष्टीपासून लपवून टाकते. जेव्हा हा बहर ओसरतो [पाने फुले गळून पडतात] तेव्हा झाड त्याचे बाह्य सौन्दर्य घालवते पण त्याचवेळी ते पारदर्शक दिसते. आता या हायकुला असलेला एक अध्यात्माचा पदर आपल्याला दिसू लागतो. मंदिर हे ‘ईश्वराचे’ किंवा ‘सत्याचे’ प्रतीक मानले तर हा हायकू एका वेगळ्या दिशेकडे अंगुलीनिर्देश करतो. जोपर्यंत मानवाच्या आयुष्यात यश किंवा मोहाचा बहर असतो तोपर्यंत त्याचे लक्ष्य बाह्य सौंदर्यावर असते. जेव्हा हा बहर ओसरतो तेव्हा गोष्टी साध्या आणि रिक्त होतात. तेव्हाच माणसाला आध्यात्मिक सत्याचे दर्शन होऊ शकते. सहसा बहर ओसरणे ही गोष्ट दू:खाद मनाली जाते, पण कवि येथे त्या घटनेला एका सकारात्मक वळणावर नेऊन ठेवतो. पाने, फुले गळून पडली आहेत या गोष्टीने निराश न होता त्या फांद्या आता ‘मंदिर पाहाण्यासाठी’ खिडकी बनल्या आहेत हे तो अधोरेखित करतो. 

प्रत्येक रसिक आपआपल्या पद्धतीने या हायकूचे रसग्रहण करू शकतो.एका समीक्षकाच्या मते ‘काहीतरी गमावल्याशिवाय काही प्राप्त होत नाही’ हे या हायकुचे मुख्य आशयसूत्र आहे.

चेरीचा बहर पाहून नादावणे ही काही जपानी कवींचीच मक्तेदारी नाही, जगातल्या प्रत्येक कवीला सौंदर्याची भूल पडलेली आहे. ज्याला ही भूल पडलेली नाही तो कवी होऊच शकत नाही. चेरीच्या बहरासंदर्भातील हायकू शोधताना मला अचानक Marilyn Potter या कवयित्रीचा हाइकू दिसला आणि मी चमकलो. तिच्या हायकूचा अनुवाद असा-​
हिवाळ्यातील वादळ-
कॅलेंडरच्या पानांवर शोधते
चेरीबहराचा फोटो

हिवाळ्यातील एक सर्दलेली एकाकी रात्र. खोलीत कवयित्री एकटी बसलेली आहे. बाहेर कडाक्याची थंडी, वादळ. आतले एकाकीपण आणि बाहेरचे गारठलेपण. अशावेळी आवश्यकता आहे ती कुठल्यातरी सोबतीची. मग ती सोबत आठवणींची का असेना. तिला आठवते, कॅलेंडरच्या मार्च महिन्याच्या पानावर चेरीच्या बहराचा सुंदर फोटो आपण पाहिला होता. ती ते पान शोधते. तो फोटो शोधते. त्याच्यावरून अलगद हात फिरविते. चेरीचा बहर पाहिल्याची सय तिच्या मनात जागी होते, पानावरच्या चित्रातले रंग आठवणीच्या रंगात हलकेच मिळून जातात. मनभर पसरतात. आता ती एकटी राहिलेली नसते. तिची आवडती चेरी तिच्या सोबतीला आलेली असते
Picture
0 Comments

हायकूच्या तळ्याकाठी - 16: रंजक हायकू

5/30/2026

0 Comments

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
मागच्या एका ब्लॉग मध्ये मी लिहिले होते, हायकूला विनोदाचे वावडे नसते. 
हायकूविषयीचा एक गैरसमज म्हणजे तो  नेहमी चिंतनपर किवा गंभीरच असला पाहिजे, त्याने जीवनाविषयी काही भाष्य केले पाहिजे. मात्र हायकू गंभीरच असावा असे मुळीच नाही. तो खेळकर, विनोदी देखील असू शकतो. कोबायाशी इस्साचे अनेक हायकू वाचताना ओठावर हास्य फुलते. उदाहरणार्थ, ​
हडकुळ्या बेडका
धीर सोडू नकोस
इस्सा आला आहे
जाताजाता सहज कवीला दिसलेले हे एक दृश्य आहे. दोन बेडूक एकमेकांशी लढताहेत. त्यांच्यापैकी एक धष्टपुष्ट आहे तर दूसरा रोड, हडकुळा आहे. स्वाभाविक आहे की जो रोड आहे त्याची या लढाईत पीछेहाट होते आहे. कवि ते पाहतो, आणि बेडकाला म्हणतो, ‘धीर सोडू नकोस, मी आलो आहे!’ 
आता कवीच्या येण्याचा या लढाईत हडकुळ्या बेडकाला काय फायदा? बरे तो काही मदत करण्याचा वादाही करीत नाहीय. जगात अशी वृत्ती असणारेच खूप असतात. दुरून पहायचे, मनोरंजन करून घ्यायचे आणि तोंडाने मात्र दुर्बलांना पाठिंबा द्यायचा. अशा वृत्तीचा छान उपहास कवीने या हायकूत केला आहे. 

या पद्धतीच्या विनोदी किंवा खेळकर हायकूंना जपान मध्ये सेनर्‍यू [Senryu] असे नाव दिलेले आहे. मराठीत त्यासाठी अजून वेगळे नाव नाही. मी अशा हायकूसाठी  ‘रंजक हायकू’ असे नाव सुचवतो आहे.  हायकू आणि रंजक हायकू  यांच्यातील सीमारेषा बरीचशी अस्पष्ट आहे. हायकूमध्ये सुरुवातीपासून एक ‘निसर्गवाचक किंवा ऋतुवाचक’ शब्द वापरला पाहिजे असा संकेत आहे. या रंजक हायकूमध्ये सहसा ‘निसर्गवाचक शब्द’ न वापरण्याची सूट दिली जाते. काही टीकाकार रंजक हायकूंना एक वेगळा काव्यप्रकार मानत असले तरी बरेचदा ते हायकू म्हणूनही स्वीकारले जातात. एका टीकाकाराने त्यावर भाष्य करताना [विनोदाने?]  म्हटले आहे, ‘जर हायकू म्हणजे चंद्राकडे वळलेले बोट असेल तर senryu म्हणजे तुमच्या बरगडीकडे ‘गुदगुल्या करण्यासाठी’ वळलेले बोट आहे.’
Picture
फार पूर्वीपासुन अशा प्रकारचे हायकू तुरळकपणे लिहिले जात पण ते सातत्याने लिहून  लोकप्रिय करण्याचा मान Karai Senryu [1718-1790] याला दिला जातो. या कवीचे मूळ नाव काराई हेचिमोन. पण त्याने हायकू लिहिण्यासाठी Senryu हे उपनाम घेतले. ‘सेनर्‍यू’ चा अर्थ तिसर्‍या प्रतीचा, अत्यंत कमी दर्जाचा. हे उपहासपूर्ण नाव इतके लोकप्रिय झाले की तेच पुढे या काव्यप्रकाराला दिले गेले.

​सेनर्‍यूच्या नव्या पद्धतीच्या हायकूंना विलक्षण लोकप्रियता मिळाली. त्याला असंख्य शिष्यही मिळाले. या शिष्यांनी 1765 साली सेनर्‍यूच्या निवडक हायकुंचा एक संग्रह प्रकाशित केला. 


रचनेच्या दृष्टीने हायकू आणि सेनर्‍यू मध्ये काही फरक नाही. पण दोन्हींचे उद्देश भिन्न असतात. हायकू हा बहुदा निसर्ग आणि ऋतु यांच्याशी संबंधित असतो तर सेनर्‍यू हा मानवी स्वभाववैशिष्ट्यांचे उपहासपूर्ण वर्णन करतो. त्यांच्यावर खुसखुशीत टीका करतो. विनोदी लेखनाची सारी हत्यारे त्यांत कुशलतेने वापरली जातात. सुरूवातीला या लेखनावर मान्यवर अभ्यासकांनी खूप टीका केली, पण नंतर त्याला हायकुचा उपप्रकार म्हणून मान्यता दिली गेली. 
​
काराई ‘सेनर्‍यू’ चा एक गाजलेला हायकू आहे-
मी पकडले चोराला 
तो निघाला
माझाच मुलगा

वाचताना प्रथम हसू आले तरी मनात कोठेतरी त्या बापाविषयी सहानुभूतीही देखील निर्माण होते.   हायकूत अनेकदा काव्यात सहसा न वापरले जाणारे, शिष्टसम्मत मानले न जाणारे  शब्द देखील वापरले जातात. उदाहरणार्थ कोबायाशी इस्साचेच आणखी दोन हायकू
माझ्या लघवीचा धबधबा
पाहण्यास तयार रहा 
ओरडणार्‍या बेडका
तू फार ओरडतो आहेस का ? गप्प बस नाहीतर मी तुझ्या अंगावर लघवी करतो असा ‘विनोदी’ दम कवि भरतो आहे. कुणास ठाऊक तो आपली धमकी खरीही करील. इससचा आणखी एक हायकू-
अरे नावाड्या
पाण्यातील चंद्रबिंबावर
लघवी करू नकोस
[नावाड्यासाठी चंद्र रोजचाच. त्याला त्याच्या सौंदर्याचे काय कौतुक असणार?]  
कोबायाशी इस्सा याच्या व्यक्तिमत्त्वातच एक मिस्किलपणा आहे. उदाहरणार्थ, त्याचा एक लोकप्रिय हायकू-
म्हातारी चालता चालता 
नाक शिंकरते-
रस्त्याकडेच्या फुलांवर
काही माणसे अशी असतात, विशेषत: म्हातारी, की त्यांना जग रहाटीच्या संकेतांचे काही नसते. काही माणसे अशीही असतात की निसर्गातील सौंदर्याकडे त्यांचे लक्षच नसते. ही म्हातारी अशीच आहे. नावाड्याला जसा चंद्र रोजचाच तशी म्हातारीला फुले. शिवाय फुलांवर नाक शिंकरू नये हा संकेतही  तिला माहीत असण्याची शक्यता नाही. 
इस्साचे हे रंजक हायकू जपान मध्ये अतिशय प्रसिद्द्घ आहेत. खोड्या करणार्‍या मांजरीला तो म्हणतो,
मांजरे ग ss
 ते फुलपाखरू पहा
 किती सभ्य आहे
फुलपाखराचे कौतुक मांजरीसमोर का? तर त्याला सुचवायचे आहे की मांजरी, तू का असे सभ्यपणे वागत नाहीस? हायकूचे विलक्षण सामर्थ्य हे की तो  प्रत्येक वाचकाच्या मनात वेगळे तरंग निर्माण करू शकतो. एका अभ्यासकाने लिहिले आहे, इस्सा फक्त मांजरीलाच चिडवीत नाही, तो वाचकालाही चिडवितो आहे..सभ्यपणे वागत नाही म्हणून.
एका हायकूत इस्सा लिहितो,
थोडाफार आनंदी हो 
 आतातरी घुबडा 
 वसंतातील पाऊस
निसर्गातील सौंदर्याचा काही माणसांवर मुळीच परिणाम होत नाही ही इस्साची आवडती थीम आहे.   हा हायकू इस्साने घुबडाला उद्देशून लिहिलेला असला तरी त्याचा रोख माणसाकडेच आहे हे ध्यानात येते. जनावरे आणि माणूस यांच्यातील साम्य इस्साला सतत खुणावत असते. त्याच्या एका अत्यंत लोकप्रिय हायकूत त्याने लिहिले आहे,
चिमणे ग ss
बाजूला सरक
अश्वराज येत आहेत

हा हायकू वाचताना प्रथम हसू येत असले [शाळेत मुलांना जे हायकू शिकविले जातात त्यांत हा हायकू असतोच.] तरी तो केवळ हसविण्यासाठी लिहिलेला नाही. पहिल्या पातळीवर हे एक क्षणचित्र आहे. जणू कॅमेर्‍याने घेतलेले. कवी वाटेवरून चालला आहे. त्याला एक दृश्य दिसते. त्या दृश्याच्या चौकटीत अलीकडे, वाटेवर बसलेली एक चिमणी त्याला दिसते आणि जरा अंतरावर एक मोठा अश्वही येताना दिसतो. त्याने मन या दृश्याची संगती लावू पाहते. चिमणी रस्त्यावर बसली आहे, कदाचित पडलेले दाणे किंवा किडे पकडण्यासाठी. तिचे लक्ष इतरत्र नाही व ते साहजिकच आहे. पण कवीला येणार्‍या घोड्याचा चिमणीला असलेला धोका दिसतो. तो तिला सावध करण्यासाठी म्हणतो, ‘बाजूला सरक, अश्वराज येत आहेत.’ 
दुसर्‍या पातळीवर पाहिले तर समाजातील एका ‘रीतीरिवाजावर’ इस्साने तिरकस भाष्य केले आहे. राजा, सेनापती वगैरे येत असताना जनतेने रस्ता मोकळा केला पाहिजे असा प्राचीन काळी दंडक होता.  सामर्थ्यवान हे दुर्बलापेक्षा नेहमीच श्रेष्ठ व वरच्या दर्जाचे समजले जातात. त्यांना काही खास अधिकार आहेत असेही मानले जाते, आणि ते अधिकार जनसामान्यांनी निमूटपणे पाळले पाहिजेत अशी अपेक्षा केली जाते. ‘खालच्या’ पातळीवरील चिमण्यांनी रस्त्यातून बाजूला सरावे नाहीतर परिणाम भोगायला तयार असावे. म्हणून इस्सा घोड्याला ‘अश्वराज’ म्हणतो. [इंग्रजी भाषांतरात ‘Sir Horse’ असा शब्द वापरलेला आहे.] यात थोडासा सामाजिक उपरोधाचाही सूर आहे. आजही काही वेगळी परिस्थिती नाही. तथाकथित ‘लोक प्रतिनिधी’ मार्गाने जात असताना ‘जनतेला’ बळाने हटविले जाते हे आपण पहातोच. इस्साची सहानुभूती अर्थातच या ‘गरीब प्राण्यांकडे’ आहे.
हे हायकू अनेकदा उपहासात्मक, विडंबन किंवा चेष्टा करणारेही असतात. बाशोचा एक हायकू आहे-

ती बाई दाखवते आहे
आरसा
कोळसे विकणार्‍याला
किंवा एका अनामिक कवीचा खालील हायकू-
हळुवारपणे द्राक्षे उचलीत 
ती म्हणाली-
 “केवढ्याला?”
काही माणसांच्या कृतीतच फक्त हळुवारपणा असतो! 
आधुनिक हायकू कवींनीही ‘रंजक हायकू’ यशस्विपणे लिहिले आहेत. एक कवयित्रि लिहिते,
मी सध्या काय करते आहे 
 हे पाहण्यासाठी 
मी गुगलवर गेले
सुझान फुल्लरचा एक हायकू आहे
‘बहुतेक 
मला वाटते
मला निर्णय घेता येत नाहीत’
तिसर्‍या वाक्यात कवयित्रीने जे विधान केले आहे ते ‘अधिक स्पष्ट’ करण्यास तिनेच बहुतेक पहिल्या वाक्यात ‘बहुतेक’ हा शब्द वापरला असावा. 
मला वाटते हायकू कवींना गंभीर किंवा ‘अर्थपूर्ण’ हायकू लिहून ‘थकवा’ येत असला पाहिजे. म्हणूनच बहुतेक कवि ‘रंजक हायकू’ कडे वळतात. मीही असे काही हायकू लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 
ठाण्याला माझी मुलगी राहते. तिच्याकडे अधून मधून जायचो तेव्हा पूर्व दिशेला मोकळी जागा असल्यामुळे सूर्य छानपैकी उगवताना दिसायचा. एकदा असाच तेथे गेलो असताना सकाळी उठल्यावर पाहिले, पूर्वेला एक मोठी इमारत बांधली जात होती आणि तिच्या लोखंडी खांबात, सळयांत, सूर्य बंदिस्त झाला होता. वाईट वाटले. पण शहरी विकासाच्या रेट्यापुढे आपण सामान्य माणसे काय करणार? मी आपला तीन ओळी लिहून माझा निषेध व्यक्त केला.
सूर्य उगवला, प्रकाश झाला
आडवा बिल्डर
 तयाला माझा नमस्कार.​
Picture
0 Comments

हायकूच्या तळ्याकाठी - 16: चेरीचा बहर आणि कवी

5/23/2026

0 Comments

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
Picture
वसंत ऋतूचे आगमन, म्हणजे सुमारे मार्च एप्रिलचा काळ, या काळात सारा जपान चेरीच्या फुलांच्या बहराने रंगून गेलेला असतो. जपानचे सांस्कृतिक जीवन देखील अनेक अंगानी फुलून आलेले असते. या पंधरा वीस दिवसात प्रचंड उत्साही आणि उत्सवी वातावरण निर्माण झालेले असते. माणसे एकेकट्याने, गटा गटाने, बहर पाहण्यासाठी बाहेर पडतात. जंगले, वने, उपवने चेरीच्या फुलांनी व्यापून टाकलेली. शहरात देखील रस्त्याच्या कडेला ओळीने लावलेल्या वृक्षांवर गुलाबी छटा असलेली नाजूक फुले लखडलेली असतात. त्यांचा मंद पण मन गंधित करून टाकणारा सुवास वातावरणात पसरलेला असतो. 

पुरातन काळापासून लोकप्रिय असलेली ही परंपरा आधुनिक काळात देखील जपानने जपली आहे. जंगलात तर चेरीच्या वृक्षांच्या प्रजातींचा अभ्यास करून उत्तम जातींची पद्धतशीर लागवड व जोपासना केली जातेच,  पण असंख्य  शाळांच्या आणि सरकारी इमारतींच्या आवारात देखील चेरीची झाडे लावली जातात. मुलांना लहानपणापासून त्या संबंधीच्या कथा, कविता ऐकविल्या जातात. चेरीचे फूल हे जपानने आपले राष्ट्रीय फूल म्हणून निवडले आहे.

या काळात माणसे खास ‘चेरीचा बहर पाहण्यासाठी’ बाहेर पडतात. इ.स.च्या 7व्या शतकापासून ही परंपरा सुरू झाली असे मानले जाते. प्रथम राजघराण्यातील मंडळी चेरीच्या बागेत जमत. फुलांच्या सावलीत दिवस घालवत. नंतर सामुराई घराण्यांनी ही परंपरा उचलली. हळू हळू ती सामान्य माणसांत देखील लोकप्रिय बनली. अनेक शतकांपासून चालत आलेल्या या परंपरेला ‘हनामी’ असे नाव दिले गेले आहे. ‘हनामी’ म्हणजे ‘flower viewing’ [बहर पाहणे]. या ‘पाहण्याला’ जपानी परंपरेत खास अर्थ आहे. पाहणे म्हणजे नुसते दृष्टिक्षेप टाकणे नव्हे. पाहणे म्हणजे सारे चित्त एकवटून लक्ष केन्द्रित करणे. पाहणे म्हणजे एकटक पाहत राहणे जोपर्यंत समोरच्या दृश्याशी आपले नाते जुळत नाही. इतक्या उत्कटतेने की एका काळानंतर पाहणाराच त्या दृश्याचा एक भाग बनून जातो, फूल बनतो. जपान मधील बहुसंख्य कवी ही [आणि पौर्णिमेचा चंद्र पाहण्याची] परंपरा पाळतात. अर्थात पाहण्यासाठी आलेल्या लोकांत हौशे-नवशेच अधिक असतात. अशाच लोकांना उद्देशून सायग्यो या कवीने हाइकू लिहिला आहे
या चेरीचा एकमेव दोष
त्या फुलतात
गर्दी जमा होते.
अर्थात हा दोष लोकांचा आहे हेच कवीला सांगायचे आहे हे लगेच ध्यानात येते. 

चेरीच्या बहराचा प्रभाव जपानच्या संस्कृतीत खोलवर रूजला आहे. प्राचीन काळापासून चित्रकार या फुलांची व झाडांची अगणित चित्रे काढीत आले आहेत. असा चित्रकार दाखविता येणे कठीण आहे ज्याने चेरीच्या बहराचे चित्र काढले नाही, असा कवी दाखविता येणे कठीण ज्याने या बहरावर कविता लिहिली नाही. कलावंत तर सोडाच, सैनिकांना देखील या बहराचे आकर्षण आहे. दुसर्‍या महायुद्धात चेरीच्या बहराचा लोकांत राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी उपयोग केला गेला. बॉम्बर विमानावर चेरीची झाडे रंगविली गेली. आजच्या तरुणांमध्ये देखील बहराविषयीचे प्रेम संक्रमित झाले आहे. जपानच्या राष्ट्रीय रग्बी टीमच्या युनिफोर्मवर चेरीच्या फुलांचे चित्र आहे, आणि तिचे नाव आहे-Brave Blossoms. 

चेरीच्या बहराशी पुरातन काळापासून आणखी एक प्रतिकात्मक अर्थ निगडीत आहे. तो बहर जसे सौंदर्याचे तसेच जीवनाच्या क्षणभंगुरतेचे प्रतीक म्हणून देखील मानला गेला आहे. चेरीचा बहर हा जास्तीत जास्त आठ दहा दिवसच टिकतो, नंतर त्याची फुले गळून पडायला सुरुवात होते. जीवन सौंदर्यापूर्ण आहे पण तसेच ते क्षणकाळ टिकणारेही आहे. ही संकल्पना जपानी संस्कृतीतील mono no aware [ melancholy at passing of things- काल निसटून जात असल्याची विषण्ण जाणीव] या संकल्पनेशी निगडीत आहे. [जी.एंच्या ‘भेट’, ‘ओर्फिअस’ अशा काही कथांतून ही संकल्पना अवतरताना दिसते.] 
11 व्या शतकातील पहिल्या जपानी महाकादंबरीत- ‘ The tale of Genji’- मध्ये प्रथम एका कवितेत ही संकल्पना मांडली गेली. 
चेरीचा बहर
वसंत ऋतु
काहीच शाश्वत नाही

श्रेष्ठ जपानी हाइकूकार योसा बुसोन लिहितो-
चेरीची फुले
गळून पडताहेत
आजही
फुले उगवण्याची तसेच ती गळून पडण्याची क्रिया अव्याहतपणे चालूच आहे..चालूच राहणार आहे. सौंदर्य हरवलेले जीवन हे वास्तवही माणसाला स्वीकारावेच लागते. ही कल्पना मांडताना बूसोन आणखी एका हाइकूत लिहितो-
चेरीचा बहर संपला
मंदिर पुन्हा
फांद्यांच्या ताब्यात
असे असले तरी चेरीचा बहर म्हणजे उत्साहाचा बहर. चैतन्याचा बहर. कोबायाशी इस्सा लिहितो-
जगण्यातील आनंद
अद्भुत  
चेरीबहराच्या सावलीत
या बहराचा प्रभाव एवढा आहे की-
‘कुणीही 
अनोळखी उरत नाही
चेरीच्या बहराखाली ‘
[इस्सा]
एकाच सौंदर्यपूजक वृत्तीतून ही माणसे एकत्र आलेली आहेत, मग ती अनोळखी कशी राहतील? त्यांचे एकमेकांशी नाते जुळेलच. 
मात्र हे नाते  तात्पुरते जुळले आहे का? कारण कायमचे  नाते जुळविण्यास हे जग अपात्र आहे!  दुसर्‍या एका हायकूत इस्सा लिहितो-

चेरी बहर जिकडे तिकडे -
आणि हे
अपात्र जग 

या बहराचा फक्त माणसावरच परिणाम होतो असे नव्हे. ओरीसुरा हा कवी एका हाइकूत लिहितो-
पहाडातील निर्झर.
चेरीच्या छायेखाली 
दगड देखील गाणे गाऊ लागतात.

चेरीची फुले क्षणजीवी तसेच नाजुक देखील. आवाजानेही गळून पडतील. म्हणून एक हाइकूकार इशारा देतो-
मंदिराची घंटा 
 हळूच वाजवा
 चेरी फुलली आहे.
चेरीचा बहर असंख्य वेळा पाहत राहिल्यामुळे त्याच्या संदर्भातल्या अगणित आठवणी माणसाच्या मनात भिरभिरत असतात, म्हणूनच बाशो एका हाइकूत लिहितो-
किती किती गोष्टी
पुन्हा मनात घेऊन येतो
चेरीचा बहर

चेरीचा बहर हा सौंदर्याचे प्रतीक असो की क्षणभंगुरतेचे, खरे तर हा प्रतीकात्मक अर्थ माणूसच त्याला देतो. निसर्ग फक्त असतो. आपल्याच नियमांनुसार बदलणारा. कोबायाशी इस्साने एका हाइकूतून हे सत्य अतीशय नेमकेपणाने मांडले आहे-
‘तुझ्याशिवाय
चेरीचा बहर
फक्त बहर
निसर्ग सर्वांसाठीच फुलत असतो. आपण त्याला काही खास बनवितो. त्याचे महत्त्व आपल्यासाठी अधिक वाढते जेव्हा तो बहर आपण आपल्या प्रिय व्यक्तीसोबत पाहतो. पण जेव्हा ती प्रिय व्यक्ती जवळ नसेल तर? तर मग तो बहर ‘फक्त बहर’ असतो. आपले सारे वैशिष्ठ्य हरवून बसलेला. केवळ एका झाडाचा बहर असलेला.
झाडाच्या फांद्यातून
पालीकडले देऊळ दिसते
बहर ओसरल्यावर
चेरीचा बहर पाहून नादावणे ही काही जपानी कवींचीच मक्तेदारी नाही, जगातल्या प्रत्येक कवीला सौंदर्याची भूल पडलेली आहे. ज्याला ही भूल पडलेली नाही तो कवी होऊच शकत नाही. चेरीच्या बहरासंदर्भातील हाइकू शोधताना मला अचानक Marilyn Potter या कवयित्रीचा हाइकू दिसला आणि मी चमकलो. तिच्या हाइकूचा अनुवाद असा-
‘हिवाळ्यातील वादळ-
कॅलेंडरच्या पानांवर शोधते
चेरीबहराचा फोटो
हिवाळ्यातील एक सर्दलेली एकाकी रात्र. खोलीत कवयित्री एकटी बसलेली आहे. बाहेर कडाक्याची थंडी, वादळ. आतले एकाकीपण आणि बाहेरचे गारठलेपण. अशावेळी आवश्यकता आहे ती कुठल्यातरी सोबतीची. मग ती सोबत आठवणींची का असेना. तिला आठवते, कॅलेंडरच्या मार्च महिन्याच्या पानावर चेरीच्या बहराचा सुंदर फोटो आपण पाहिला होता. ती ते पान शोधते. तो फोटो शोधते. त्याच्यावरून अलगद हात फिरविते. चेरीचा बहर पाहिल्याची सय तिच्या मनात जागी होते, पानावरच्या चित्रातले रंग आठवणीच्या रंगात हलकेच मिळून जातात. मनभर पसरतात. आता ती एकटी राहिलेली नसते. तिची आवडती चेरी तिच्या सोबतीला आलेली असते.
0 Comments

हायकूच्या तळ्याकाठी - 15: ‘तांका’ [पंचपदी] विषयी आणखी थोडे

5/18/2026

0 Comments

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
Picture
प्रख्यात जपानी कवी सायग्यो होशी [1118-1190] हा ‘तांका’ या काव्य प्रकारातील एक श्रेष्ठ कवी मानला जातो.
सायग्योला  जपानचा सर्वोत्तम ‘बौद्ध कवी’ असेही म्हटले जाते. खरे तर तसे म्हणणे अन्यायकारक आहे, परंतु त्याच्या काव्यावर असलेला बौद्ध तत्वज्ञानाचा ठसा तसे वर्णन करण्यास भाग पाडतो. मात्र वर्गीकरण करण्याचा अट्टहास सोडला तर सायग्यो हा एक अत्यंत भावनाप्रधान, व उत्कट कवी होता हे मान्य करावे लागेल. जपानचा महान हायकूकार मात्सुओ बाशो याने आपल्यापूर्वी चार शतके जन्मलेल्या सायग्योचे आपल्यावरील ऋण अनेकदा मान्य केले आहे.
सायग्योचा जन्म 1118 साली फुजिवारा नावाच्या प्रख्यात सामुराई घराण्यात झाला. त्याचे मूळ नाव नोरीकियो. त्याच्या घराण्यातील पुरुष हे राजाचे निष्ठावंत चाकर होते. लहानपणी नोरीकियोवर लढवय्येपणाचे संस्कार झाले. त्याच्या मनातही योद्धा बनण्याचे स्वप्न होते. खूप वर्षानी त्याने एका कवितेत आपल्या बालपणीच्या स्वप्नाना असे शब्दरूप दिले
Picture
 ‘बांबूचे खेळण्यातील धनुष्य 
 हातात घेऊन एक मूल
 चिमणीवर नेम धरते 
 योध्याची आभूषणे धारण करण्याचे 
 स्वप्न मनात ठेऊन’
[जपान मध्ये बाल-साईग्योच्या बाहुल्या लोकप्रिय आहेत] 
तरुणपणी सायग्योला राजवाड्यात नोकरी मिळाली खरी पण पाच वर्षांतच, वयाच्या तेवीसाव्या वर्षी, त्याने त्या नोकरीचा राजीनामा दिला. त्याने असे का केले हे एक गूढच आहे. आजवर अनेक अभ्यासकांनी या गूढाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सायग्योने नंतरच्या काळात लिहीलेल्या कवितांचा सहसा आधार घेतला जातो. सायग्यो जन्मला त्याला आता नऊशे वर्षे पूर्ण झालेली आहेत. 12 व्या शतकातील जपानमध्ये, [अर्थात जवळपास जगातील बहुतेक देशात] प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनाविषयी काही लिहून ठेवले जाणे हे दुर्मिळ होते. सायग्योबद्दल आज जी माहिती आहे ती अनेकांनी सांगितलेल्या मौखिक आठवणीवर आधारित आहे किंवा त्याच्या संबंधीच्या अनेक आख्याइकांवरून संकलित केलेली आहे. किंवा त्याच्या कवितेतील स्वत:संबंधीच्या उल्लेखावरून अनुमान लावलेली आहे. [कवीच्या कवितेतील ‘मी’ आणि खरा ‘मी’ हे एकच असे ग्रहित धरणे चुकीचे आहे असेही अनेक अभ्यासकांचे मत आहे.]   

राजाश्रय सोडण्याच्या सायग्योच्या या निर्णयानंतरचे तपशील सुद्धा आज ज्ञात नाहीत. उदाहरणार्थ भिकखू होण्याची दीक्षा त्याने कोणत्या मंदिरात व केव्हा घेतली याची कुठेच नोंद नाही. मात्र एवढे खरे की त्या काळातील बहुतेक भिकखूप्रमाणे त्याने एखाद्या मठात वा मंदिरात कायमचे राहण्याचे नाकारले. तो सतत मठांपासून काहीसे अंतर ठेऊन  पर्वतात, रानावनात फिरत राहिला. बहुतेक वेळा त्याचा निवास स्वत: तयार केलेल्या लहानशा, फक्त एक माणूस राहू शकेल एवढ्याच,  झोपडीत असे. तो ज्या मठाजवळ असे तेथील लोक त्याच्या अन्नपाण्याची व्यवस्था करीत आणि त्या बदल्यात तो गावोगाव फिरून मठासाठी देणग्या गोळा करी. अशा प्रकारे त्याने जवळजवळ सार्‍या जपानची परिक्रमा केलेली आढळते. त्याच्या काळातला तो सर्वाधिक प्रवास केलेला प्रवासी मानला जातो. 

सायग्योने आपले शहर सोडले आणि त्यानंतर सुमारे पन्नास वर्षे तो जपानमध्ये हिंडत राहिला. एका ठिकाणी राहण्याचे त्याने नाकारले. त्याच्या मनाला जणू जबरदस्त ‘प्रवास भूल’ पडलेली होती. या प्रवासातच एकदा त्याने चेरीचा बहर पाहिला आणि तो त्याच्या प्रेमातच पडला. अनेक कवींनी चेरीच्या बहरावर कविता लिहिल्या आहेत पण सायग्योचे त्यावरील प्रेम काही विलक्षणच होते. त्याने चेरी बहराच्या संदर्भात दोनशेहून अधिक कविता लिहिल्या आहेत. एकीकडे जगापासून दूर जाण्याची, बुद्धाच्या तत्वज्ञानात जीवनाचा अर्थ शोधण्याची त्याची मनीषा आणि दुसरीकडे या नश्वर सौंदर्यात भान हरवून गुंग होणे यात वरवर पाहता विरोधाभास दिसतो पण तो तसा नाही. त्याचे या बहराविषयीचे आकर्षण हे त्याच्या आत्म्यात खोलवर रुजलेले होते. त्यांच्यात, पर्यायाने निसर्गात तो बुद्धाचे अस्तित्त्व पाहत होता. त्याच्यालेखी निसर्गातील सौंदर्याचा शोध आणि बुद्धाचा शोध हे एकच होते. निसर्गसौंदर्याचे वर्णन करणे म्हणजे मनाच्या एका उन्नत, भ्रममुक्त, ज्ञानी  अवस्थेचे वर्णन करणे होय आणि म्हणूनच त्याच्या प्रेमात पडणे म्हणजे ‘योग्य मार्गावरील’ एक पाऊल आहे अशी त्याची धारणा होती.  एका ठिकाणी त्याने लिहिले आहे-
‘मी संपूर्ण वसंत ऋतुत या फुलांकडे केवळ पाहत राहू इच्छितो.’

विशेषत: योशिनो पर्वतावरील चेरी बहर त्याच्या फार आवडीचा होता.
‘एकटा प्रवास करताना 
 मला जाणवत नाही 
 माझ्या हृदयाचे धडधडणे 
 ते मागेच राहिले आहे 
 जेथे मी चेरीबहर पाहिला होता’
चेरीचा बहर संपत आला तरी कवीचे मन काही भरत नाही. तो उरलीसुरली फुले शोधू लागतो. आणि एका वृद्ध वृक्षावरली फुले पाहताना त्याच्या ध्यानात येते, बहर जसा क्षणिक आहे तसेच आपले आयुष्य देखील आहे. ‘आता किती वसंत उरलेत फुलायचे?’ तो विचारतो
‘मला शोधायला हवी 
 काही उरली सुरली फुले 
 या वृद्ध वृक्षाने जपलेली 
 आम्ही सारखेच आहो- 
 आणखी किती वसंत उरलेत फुलायचे?

मात्र कवीला सतत ‘पुढे’ जाण्याची ओढ आहे, ही प्रवासभूल त्याला एका ठिकाणी, ते कितीही मोहक असले तरी, थांबू देत नाही. त्याने आपल्यासाठी ‘सायग्यो’ हे जे टोपण नाव निवडले त्याचा अर्थ ‘पश्चिम-प्रवास’ हा आहे.  
‘हा चंद्र असाच 
  रात्रीमागून रात्री 
 प्रकाशत राहील 
 माझ्या या गवती झोपडीवर 
 मला मात्र निघायला हवे.

सायग्यो आजदेखील जपान मधील सर्वाधिक लोकप्रिय कवींपैकी एक आहे याचे कारण त्याच्या कविता या त्याच्या समकालीन जपानी कवितेपेक्षा फारच वेगळ्या होत्या. चीनी कवितेकडून उसने घेतलेले विचार आणि आत्यंतिक व्यक्तिनिष्ठ दृष्टीकोण यांच्यापासून जपानी कवितेला त्याने मुक्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचे समकालीन कवी शाब्दिक खेळात रमलेले होते. त्याला या खेळात रस नव्हता. कवितेची भाषा अनलंकृत असावी यावर त्याचा कटाक्ष असे. त्याच्यानंतर सुमारे दोनशे वर्षांनी जपानमध्ये जो हायकू हा काव्यप्रकार उदयाला आला [त्यावेळी त्याचे नाव होक्कू असे होते.] त्याच्या उदयास सायग्योची कविता मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होती असे मानले जाते.
बौद्ध तत्वज्ञानाचा त्याच्या काव्यावर प्रभाव असणे हे साहजिक होते पण ते तत्वज्ञान क्लिष्ट स्वरूपत त्याच्या काव्यात कधीच अवतरत नाही, तर  ते सूचकतेने व प्रतिमांच्या भाषेत मांडले जाते. Mono no aware[जीवनाच्या नश्वरतेची जाणीव], त्याबद्दलचे दू:ख आणि हेच आयुष्याचे सत्य आहे ही खोलवर रुजलेली जाण,  Sabi [एकाकीपणा] आणि Kanashii [उदासीनता] हे त्याच्या काव्याचे महत्त्वाचे घटक होते. 
आयुष्य हे क्षणभंगूर आहे ही जाण कवीच्या मनात सतत आहेच तरी याबद्दल त्याची तक्रार नाही, उलट ते तसेच असायला हवे असेही त्याला वाटते. आयुष्य क्षणभंगुर असल्याची भावना, जी पुढे हायकूचा एक महत्त्वाचा भाग बनली ती येथे बीजरूपाने आढळते.

‘क्षणात दिसले, क्षणात अदृश्य 
फुलपाखरू उडताना 
 कुंपणाने वेढलेल्या फुलांमधून- 
असेच आयुष्य हवे, जरी ते असेल 
क्षणात दृश्य, क्षणात अदृश्य ...

1170 साली सायग्योने  ‘आपण कधी व कोठे मरण पावू इच्छितो’ या संदर्भात एक कविता लिहिली होती.
‘माझी इच्छा आहे 
वसंत ऋतूत मला मृत्यू यावा
चेरीचा बहर फुललेला असताना
वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात 
आकाशात पूर्ण चंद्र असताना.’ 
पुढे तो वीस वर्षे जगला. मात्र 1190 साली जेव्हा त्याला मृत्यू आला तेव्हा अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धाने त्याची ही इच्छा पूर्ण केली, फक्त एक दिवसाच्या फरकाने. चेरीला बहर आलेला असताना, पौर्णिमेच्या नव्हे तर त्यानंतरच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कदाचित पौर्णिमेच्या चंद्राने त्याला रात्रभर न्याहाळून त्याचा निरोप घेतला असेल! 
0 Comments

हायकूच्या तळ्याकाठी - 14: संभ्रमाचे धुके

5/10/2026

0 Comments

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
हायकूंचा शोध घेत असताना मी थोडा आजूबाजूलाही, जपानी कवितेच्या मुलूखात  फिरत होतो. त्यावेळी जपानच्या समृद्ध काव्य परंपरेचे विलक्षण दर्शन मला घडले. 
​

13 व्या शतकापर्यंत तांका हाच जपान मधील सर्वांत लोकप्रिय असा काव्यप्रकार होता. इ.स.च्या सातव्या शतकात जपानमधील सुशिक्षित वर्ग हा आपल्या भावना कवितेतून व्यक्त करू लागला होता. अर्थात हा सुशिक्षित वर्ग मुख्यत: उच्च वर्णीय -राजे रजवाडे, सरदार, आणि धनिक- असल्यामुळे समाजाच्या खालच्या स्तरातील लोक या कवीमध्ये सहसा आढळून येत नाहीत. हे उच्च वर्णीय लोक वेगवेगळ्या सामाजिक समारंभांच्या वेळी आपल्या कविता सादर करीत. या काळात कवितेला उत्तम राजाश्रय देखील होता. राजाच्या दरबारात वेळोवेळी कवितांच्या स्पर्धा घेण्यात येत. राजे, राणी, त्यांचे कुटुंबिय देखील अनेकदा स्वत: कविता सादर करीत.  
त्या काळाच्या रितीरिवाजाप्रमाणे जपानमध्ये आपसात नाते नसलेले उच्चवर्णीय स्त्री पुरुष एकमेकांशी मोकळेपणी बोलू शकत नसत. म्हणून ते बहुसंख्य वेळा पत्रांतून एकमेकांशी संपर्क करीत आणि ‘तांका’ हे त्या पत्रांचे अविभाज्य अंग असे. ही मंडळी ‘सुसंस्कृत’ असल्यामुळे सहसा या कवितेतून अभिरुचिहीन विचारांचे चित्रण केले जात नसे. अनेकदा प्रेमभावना स्पष्टपणे न मांडता आडवळणाने मांडल्या जात त्यामुळे आपोआपच योजल्या गेलेल्या प्रतिमांमुळे या पत्रांतील लेखन काव्याच्या पातळीवर जात असे. जपानी भाषाही या पद्धतीच्या लिखाणाला पूरक होती. उदा. जपानी भाषेत ‘मात्सु’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, ‘पाईनचा वृक्ष’ आणि दूसरा ‘वाट पाहणे’. त्यामुळे कवितेत पाईन वृक्षाचे वर्णन करणार्‍या कवीला ‘मी तुझी वाट पाहतो आहे’ असेही सुचवायचे असे. ‘समुद्र हे पर्वताला गिळून टाकू शकत नाहीत’ असे जेव्हा एखादा कवि लिही तेव्हा त्याचा अर्थ ‘कुठलीही शक्ति माझ्या प्रेमाचा नाश करू शकत नाही’ असाही असे. हरिणाचे ओरडणे हे उदासीनतेची प्रतिमा मानली जात असे. की सेन हा कवि लिहितो,
‘माझी भिख्खूची झोपडी
शहरापासून दूर

सोबत फक्त एक हरीण.
पर्वतातील घर, माणसे
सोडून गेलेली’ 

या कवितांपैकी बर्‍याचशा कविता ही ‘निसर्ग काव्ये’ असली तरी त्यापैकी अनेक कवितांत मानवी भावना, विशेषत: प्रेमभावनांचे सूचन केलेले असे. कधीकधी निसर्ग आणि मनातील प्रेमभावना  यांची सांगड देखील घातली जात असे. मिबू नो तादामिने   [860-920] ची एक कविता आहे-
‘गारठलेली सकाळ
क्षीण चंद्र
सोबतीला कुणी नाही
विरहात उगवणार्‍या दिवसाइतके
प्रेमहीन काहीच नाही'

कधी कधी निसर्गाचा संदर्भ न घेताच देखील प्रेम व्यक्त केले जात असे. निसर्गवाचक शब्द हा कवितेचा एक आवश्यक भाग नंतरच्या काळात मानला गेला. एक कवयित्री लिहिते-
‘जर तू मण्यांची माळ असतास
तर तुला मनगटाभोवती बांधले असते- 

पण या ऐहिक जगात
तू पुरुष आहेस
वळविण्यासाठी अवघड’

मात्र जसजसा ‘तांका’ हा काव्य प्रकार लोकप्रिय बनू लागला तसतशी आपल्याला जे सांगायचे आहे ते वाचकांनी ओळखावे म्हणून ते धूसर ठेवण्याची प्रथाही या काळात सुरू झाली. ओटोमो नो याकामोची हा कवि लिहितो-
‘माझ्या शरीराचे हे फोलपट
बिनमहत्त्वाचे आहे
मी पाहतो आहे
पर्वत आणि नद्यांकडे
शोधतो आहे माझा मार्ग’

हा मार्ग ऐहिक प्रवासातला मार्ग असू शकतो किंवा आत्मिक मार्गही. ही संदिग्धता काव्याला अधिक मनोरम बनविते. एक अनामिक कवी लिहितो-
‘माझे प्रेम, माझा तिरस्कार
किती  निरर्थक..
शरदातल्या उत्तररात्री
एकट्याने
पावसाचा आवाज ऐकताना’

Picture
इ.स. 905 च्या सुमारास जपानचा राजा दियागो याने अनेक मान्यवर व्यक्तींना बोलावून जपानी कवितांचा एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह तयार करण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपविली. हे संकलन तयार करणार्‍यापैकी की नो त्सुरायुकी हा स्वत: एक उत्तम कवि होता. त्याने या संकलनाला सुरेख प्रस्तावना लिहिली आहे. त्यांत तो लिहितो-
‘जपानमधील कवितेचे बीज हे मानवी हृदय असून शब्द ही तिची पाने आहेत. जेव्हा माणसे आजूबाजूला जे पाहतात किंवा ऐकतात त्याने प्रभावित होतात, किंवा आपल्या आयुष्यातील घटनाबद्दलच्या आपल्या भावनांना शब्दरूप द्यावेसे त्यांना जेव्हा वाटते तेव्हा कविता निर्माण होते. पाखरांचे गाणी म्हणणे, तलावातील बेडकांचे आवाज करणे, आपल्याला शिकविते की पृथ्वीवरील सर्व प्राणी गाणे गाऊ शकतात. ही गाणी स्वर्ग आणि पृथ्वीलाही सहज हलवू शकतात, स्त्री आणि पुरुष यांच्या नात्यात सुसंवाद आणू शकतात आणि शूर योद्ध्यांच्या हृदयांना  कोमल बनवू शकतात.’ 
या कविता संकलनात स्त्रियांचा सहभाग देखील लक्षणीय आहे. ओनो नो कोमाची [834-880] ही त्यापैकी एक महत्त्वाची कवयित्री. ती तिच्या कवितेइतकीच तिच्या अप्रतिम लावण्याबद्दल प्रसिद्ध होती. तिच्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की तिला मागणी घालणार्‍या एका तरुणाला तिने अशी अट घातली की जर तो सलग शंभर रात्री तिच्या घरासमोर दिवस उगवेपर्यंत उभा राहिला तर ती त्याच्याशी लग्न करील. असे म्हणतात की तो नव्व्यानवव्या दिवशी मरण पावला.
कोमाचीची एक प्रसिद्ध कविता आहे-
‘मानवी हृदयाच्या
फुलांचा रंग
फिका होत जातो
या जगात
कसल्याही बाह्य कारणाशिवाय.’

फुजिवारा नो तेईका हा या परंपरेतील एक महत्त्वाचा कवि मानला जातो. तो एक उत्तम कवी तर होताच पण याबरोबरच त्याने जपानी कवितेच्या अभ्यासकांसाठी फार मोठे कार्य करून ठेवले आहे. इ.स. 1237 च्या सुमारास त्याने ‘हायकुनीन इस्शू’ या नावाचा एक काव्यसंग्रह तयार केला. या संग्रहात त्याने सातव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंतच्या निवडक 100 कवींच्या प्रत्येकी एक अशा 100 कविता एकत्रित केल्या. हे एक ऐतिहासिक कार्य होते. हा संग्रह अतीशय लोकप्रिय तर झालाच पण आज देखील त्याच्या नव्या नव्या आवृत्त्या निघत असतात व जपानी कवितेचा अभ्यास करणार्‍यांसाठी तो अत्यावश्यक असा ग्रंथ मानला जातो. हा संग्रह इतका लोकप्रिय झाला की त्याच्यावरून एक नवा ‘कार्ड-गेम’ तयार करण्यांत आला. या खेळात प्रत्येक कवितेच्या पाच ओळींची विभागणी दोन कार्डात केली जात असे. एका कार्डावर पहिल्या तीन ओळी लिहिल्या जात व दुसर्‍यावर नंतरच्या दोन. अशी 100 कवितांची दोनशे कार्डे तयार केली जात. ही कार्डे एकमेकात मिसळून ज्याच्या वाट्याला पहिल्या तीन ओळी येतील त्याने शेवटच्या दोन ओळी शोधून कविता पूर्ण करायची, असा हा खेळ होता. त्यात पारंगत होण्यासाठी पाठांतर व कवितेची जाण या दोन्ही गोष्टी आवश्यक होत्या. या काळात तांका काव्य इतके लोकप्रिय झाले होते की या कवितांचे wood-block prints काढले जात. त्या कविता घर सजवटीसाठी वापरल्या जात, इतकेच नव्हे तर कपड्यांवर देखील लिहिल्या जात.
या संग्रहाचा माझ्याजवळ असलेला इंग्रजी अनुवाद Frank Watson याने ‘One Hundred Leaves’ या नावाने केला आहे.
Picture
या संग्रहात कविता त्यांच्या प्रकाशनाच्या कालक्रमानुसार संग्रहित केल्या असल्यामुळे जपानी कवितेचा इ.स. 1300 पर्यंतचा विकास अभ्यासण्यासाठी त्याची फारच मदत होते.  या पुस्तकातील पहिली कविता ही एंपरर तेंची [इ.स. 623-671] याने लिहिलेली आहे.
‘कापणीचा हंगाम
कशीबशी शाकारलेली झोपडी
हिवाळ्याचा आसरा
माझी बाही
दवाने ओली’

(ओली बाही हे दु:खी मनाचे प्रतीक मानले जाते.)
काळ हातून निसतात चालला असल्याची विषण्ण करणारी भावना  ओनो नो कोमाची [825-900] याने त्याच्या खालील कवितेतून मांडली आहे.

 ‘थरथरणार्‍या फुलाचा चेहरा
सुकला आहे
मी शून्यपणे पाहत राहतो
जग वृद्ध होत जाते
पाऊस पडत राहतो’

ढगांच्या आकारात आपल्या मनाचे आकार शोधणे हा प्राचीन काळापासून कवींचा आणि कवीमनाच्या रसिकांचा छंद आहे. हेन झौउ  [काळ अनिश्चित-सुमारे आठवे शतक]  याची ही कविता आधुनिक काळातील भावकवितेशी किती जवळचे नाते सांगते!-
‘वायु लहरींनो
ढगांना विसकटणारे
तुमचे वाहणे कृपया थांबवा
मला दिसणारा तिचा चेहरा
पाहू द्या आणखी काहीकाळ’

काही कवितांमधून कवीच्या मनात भळभळणारे दु:ख ठळकपणे प्रकट होताना दिसते- 
अरिवारा नो युकीहीरा [818-893] लिहितो-
‘दूर आहो आपण एकमेकांपासून
पण जर मला
तुझे शोकगीत ऐकू आले-
मी लगेच परत येईन 
किंवा जीव देईन’
आपल्या प्रिय व्यक्तीची वाट पाहण्याची भावना अनेक कवितांमधून व्यक्त झालेली दिसते. 
सोसेइ होशी हा कवि लिहितो-

‘मी येते’ 
असे तू म्हणाली होतीस 
म्हणून मी वाट पाहत राहिलो 
या दीर्घ दिवसांत 
सकाळच्या चंद्राची’
ओशिकोची नो मित्सुने [859-925]  याची एक रचना आहे-
‘मन गोंधळले आहे माझे- 
मोसमातील पहिल्या धुक्याने 
संभ्रमाची चादर पसरली आहे 
पांढर्‍या शेवंतीवर... 
मी फुले तोडू शकेन तर योगायोगानेच’
हे एक सुंदर असे निसर्गदृश्य आहे. धुके, संभ्रम, पांढरी शेवंती या सार्‍यांना अर्थाचे दुहेरी पदर आहेत. प्रत्येकाने ते आपल्या मनात उलगडू पहावेत. मनातही कदाचित संभ्रमाचे धुके साचेल, पण ते हवेहवेसे असेल यात शंका नाही. 
हरूमीची नो त्सुराकी  [मृत्यू 920] ची एक सुरेख रचना-
‘पर्वतातील झर्‍यात 
पूल तयार केला आहे 
या वार्‍याने 
मेपलच्या पानांचा
प्रवाह अडवणारा’
दर्‍याखोर्‍यातून भ्रमण करणार्‍या वाटसरूला दिसणारे एक नेहमीचे दृश्य. पानगळीचा मोसम आहे. वार्‍याने मेपलच्या झाडांची पाने गळून पडताहेत ती खालच्या वाहणार्‍या झर्‍यात. प्रवाह अडला आहे. पण या पानांनी फक्त अडविण्याचे काम केलेले नाही, त्यांनी एक पूल देखील तयार केला आहे. हा पूल आहे ‘पलीकडल्या’ तीरावर जाण्यासाठी... गळून पडणारी पाने हा वाटसरूचाही ‘प्रवास’ संपण्याचा तर संकेत नसेल? 
तांका कवितेतील 5 ओळींची आणि 31 ओनची रचना नेमकी केव्हा दोन विभागात विभागली जाऊन तिचा 17 ओनचा भाग ‘स्वतंत्र’ झाला ते सांगता येत नसले तरी ही प्रक्रिया अकराव्या शतकात सुरू झाली असे मानले जाते. तिच्याविषयी पुढील भागात.

0 Comments

हायकूच्या तळ्याकाठी - 13: फुलचुखी

5/2/2026

0 Comments

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
हायकू ही एका श्वासाची कविता असते. या अवधीत  तिने तिला हवे ते व्यक्त केले पाहिजे.  कवी ‘अलोन’ यांचा एक हायकू
एक काजवा
अंधाराच्या मनात 
दिवा झालेला
​हायकू चकाकणारे क्षण पकडण्याचा प्रयत्न करीत असतो कारण अशा क्षणीच कवी प्रकाशकिरण बाहेर टाकत असतो

Picture
अलोन’ या टोपण नावाने कविता लिहिणार्‍या कवीचे व्यावहारिक नाव माधव सावरगावकर.  माधवरावांनी अगदी तरुणपणीच, 1965 मध्ये कविता लिहिण्यास सुरुवात केली. ग्रेस, आरतीप्रभू, दिलीप चित्रे, महानोर हे त्यांचे समकालीन कवी म्हणता येऊ शकतील. मात्र या कवींचा अलोन यांच्यावर कोणताही परिणाम नव्हता,  आपल्या स्वतंत्र, चोख, व एकाकी मार्गाने, ’दूरस्थ पडघम ऐकत’ अलोन आपल्या वाटेने चालत राहिले. हे पडघम ऐकताना कधीतरी त्यांच्या कानावर हायकूची कुहूकुहू आली आणि त्यांची पाऊले  त्या पायवाटेकडे वळली. अलोन लिहू लागले त्या काळात मराठी हायकू हा आपल्या अस्तित्त्वाचा आकार शोधण्यासाठी धडपड करीत होता. 

1970 च्या दशकातच  अलोन यांनी हायकू लिहिण्यास सुरुवात केली.  अलोन यांचे काही विखुरलेले  हायकू अधून मधून वेगवेगळ्या मासिकात प्रकाशित झाले पण त्यांत सातत्य नसल्यामुळे त्यांची चर्चा झाली नाही. शिवाय त्यांनी हायकू संग्रह प्रकाशित करण्याचाही प्रयत्न केला नाही. त्यांच्या निधनानंतर ‘फूलचुखी’ हा त्यांचा संग्रह त्यांच्या मित्रांनी नुकताच प्रकाशित केला आहे. 

अलोन यांचे हायकू वाचताना हे त्यांच्या कवितेचेच परिष्कृत [refined] रूप आहे असे मला जाणवत राहते. अल्पाक्षरत्व, चित्रदर्शित्व, अनुभवांची तात्कालिकता आणि चिरंतनता, निसर्गप्रेम, जीवनचिंतन आणि दृष्टीच्या टप्प्यात येणार्‍या भूमीच्या पलीकडले प्रदेश शोधण्याची ओढ ही हायकूकारासाठी आवश्यक असलेली गुणवैशिष्ट्ये त्यांच्या इतर कवितांत देखील आढळत होतीच. ती येथे अधिक उत्कटतेने व सौंदर्याने प्रकट झाली आहेत

उघडमीट
फुलपाखरू करी
मधुतंद्रीत
आपल्याच तंद्रीत प्राणांची उघडमीट करणार्‍या कवीचे हे हायकू आहेत. 

अल्पाक्षरत्व हे हायकूचा एक प्रधान गुणवैशिष्ट्य. अलोन हे रचनेच्या संदर्भात हायकुची जुनी परंपरा पाळणारे कवि होते. परंपरागत हायकू हा तीन ओळीत, 5/7/5/ या आकृतिबंधात लिहिला जातो. तोच अलोन यांनी पाळला. हा बंध पाळणार्‍या कवीजवळ जी शब्दांवरची हुकूमत पाहिजे ती अलोन यांच्याजवळ उपजतच होती.   

जपानी कवींचे ‘चंद्र पाहण्याचे’ वेड सर्वश्रुत आहे. पूर्ण चंद्राच्या दिवशी अनेक हायकू कवि घोळक्या घोळक्याने घराबाहेर पडतात आणि रात्रभर चंद्र ‘पाहतात’॰  मात्र माधवराव हा मार्ग अनुसरत नाहीत, कारण ते ‘अलोन’ आहेत. घोळक्यात रमणे हा त्यांचा स्वभाव नव्हे. त्यांचा चंद्र वेगळा असतो. स्वत:पुरता.

अलक्षितसा
 दिवसाचा चंद्रमा
माझा सांगाती
शब्दलालित्य, हा कवितेचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे हे आपण आज विसरून चाललो आहो. मराठी नवकाव्याने, जुन्याशी नाते तोडताना  ज्या काही गोष्टी गमावल्या त्यातील ही एक. नव्याशी संबंध जुळवितानाही ‘अलोन’ यांची जुन्याशी असलेली नाळ कधी तुटली नाही. त्यांच्या हायकूमधून शब्दांची लालित्यपूर्ण रचना, तिचे रूपलाघव तर जाणवतेच त्याबरोबर त्यांनी केलेली शब्दांची ‘नवनिर्मितीही’ मन मोहवते. कवीने पाऊसकिड्यांसाठी वापरलेला ‘उजेडवेडे’ हा शब्द असाच.
पाऊस किडे 
उजेडवेडे येती 
जळून जाती

आणखी एका हायकूत ते लिहितात-
पार ढासळे
ढेकळाचा निग्रह 
ओलबोलीने
कधी  थरथरत खाली घसरणार्‍या थेंबासाठी कवी ‘भितुर भितुरसा’ अशा चपखल शब्दांची योजना करतात. कधी गवाक्षातून हळू उतरणार्‍या चंद्रासाठी ‘चोरल’ चंद्र असे नवे विशेषण ते शोधून काढतात. तर कधी ‘झरणे’ आणि ‘झुरणे’ यांची सुरेख सरमिसळ करीत ते लिहितात-
कोरडा नळ
पक्ष्यापुरता 
झुरता थेंब
‘आलोन’ यांचा एक अत्यंत सुंदर हायकू आहे.
वास मातीचा
की सहवास तिचा
काल रातीचा?
हायकूविषयी काही गैरसमज आहेत, त्यापैकी एक म्हणजे ‘गतकाळातील आठवण सहसा हायकूत येऊ नये, कारण  हायकू ही या क्षणाची कविता असते.’ मात्र हायकूवर असे बंधन टाकता येत नाही. जर आठवण हा आजच्या जगण्याचा एक भाग असेल तर ती आजच्या हायकूचाही भाग होऊ शकते. आठवणीत रमणे हे जर केवळ स्मरणरंजन असेल तर तो मनाचा भावूकपणा  असतो. पण आठवण असणे हे माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. अट ही की विचारांच्या साखळीची सुरुवात आठवणीपासून व्हायला नको. गतकातरता हायकुला नको त्या दिशेने नेऊ शकते.  आजच्या क्षणाचा एक भाग म्हणून जर ती आठवण मनात प्रवेश करीत असेल तर ती हायकूत येऊ शकते. ‘अलोन’ यांच्या या हायकूत विचारसाखळी सुरू होते ती ‘मातीच्या गंध ज्या क्षणी आला त्या क्षणाने’. मग तो गंध कवीला काल रात्रीकडे घेऊन जातो. हा प्रदेश कवीचा खास स्वत:चा, तिकडे रसिकाने जाऊ नये. आपले प्रदेश आठवावे जेथे इतरांना प्रवेश नाही. हायकू वाचन हा असा बाहेरून आपल्याच मनाकडे परतणारा प्रवास असतो. 

‘अलोन’ हे हायकुची परांपरागत 5/7/5 ही रचना प्रमाण मानणारे हे आपण पाहिलेच आहे.  मात्र या आकृतीबंधात बसण्यासाठी काही वेळा त्यांनी प्रचलित शब्दांची मोडतोड देखील केली आहे. पण ती देखील इतक्या कौशल्याने की ती मोडतोड आहे हे वाचकाला समजतच नाही किंवा समजले तरी तो तिला सहज स्वीकारून पुढे जातो. 

अंधारदर्या 
थेंबुकला दिलासा 
सोनकिडयाचा
कवी ओळखीच्या शब्दाची नवी रूपे सहज सादर करतात. थेंबाचे नाजुकपण ‘थेंबुकला’ मधून किती मोहकपणे व्यक्त होते! 
कोयल कोहे 
दूर आम्रवनात
फुले मनात

कोकिळेची कुहू कुहू आपण ऐकतोच. कवी त्याला एक हलकासा धक्का देत ‘कोहे’ हे नाजुक क्रियापद तयार करतात.
निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल हायकूकाराच्या मनात प्रेम असायला हवे. सारे एकाच अमर आत्म्याचे अंश आहेत हे त्याला ठाऊक तर असलेच पाहिजे पण मान्यही पाहिजे.  ही अत्यंत अवघड गोष्ट असते. रचनेचे कौशल्य तर अनेकांजवळ असते पण मनाची निसर्गाशी ही एकतानता अपवादात्मक असते. ती ज्याच्याजवळ असते तोच खरा हायकू कवी बनु शकतो. यामुळेच

येती कुठून 
थव्याथव्यांनी रावे 
नि जाती कुठे ?
Picture
हा फक्त इतरांविषयीचा प्रश्न राहत नाही, तो शोध बनतो. स्वत:च्याही आगमन प्रस्थानाचा.   

हायकू हे एखादा गुरु सांगत असलेले तत्वज्ञान नव्हे. कवीने आपल्यासाठी उघडे केलेल्या हृदयाचे ते दार आहे. आपल्या आत्म्याच्या गवाक्षातून कवी जगाकडे पाहतो. त्याच्याजवळ ती एकटीच खिडकी असते. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. त्यांतून जे दिसते ते एकाच वेळी मर्यादित आणि अमर्याद असते. F. Scott. Fitzgerald ने लिहिले आहे, ‘Life is much more satisfactorily looked at from a single window.’ 

दुर्दैवाने माधवरावांनी आपल्यामधील कवित्वशक्तीचा खोलवर वेध घेण्याचा प्रयत्न केला  नाही. झाडावरून पान पडावे इतक्या नैसर्गिकपणे ते कविता लिहीत राहिले आणि कागदावर ठेऊन नामानिराळे झाले. पण जे झाले नाही त्याबद्दल आता खंत करण्यात काय अर्थ आहे? जे उरले आहे, आपल्या हाती गवसले आहे त्याचे स्मरण करू या. कारण तसे करणे म्हणजे कवीचेच पुन्हा स्मरण करणे असेल.  एका हायकूत कवी लिहितात-

फुलचुखीने 
फुलाच्या हृदयात 
काय गोंदले ?
या प्रश्नाचे ज्याचे त्याचे उत्तर वेगळे असणार  कारण ते खास त्याचे उत्तर असणार. पण असे उत्तर शोधण्यासाठी रसिकाला प्रवृत्त करणे हीच तर हायकुची खरी देणगी.

हायकूतून नेहमी एखादा मोठा साक्षात्कार घडला पाहिजे अशी अपेक्षा करणे योग्य नव्हे. साक्षात्कार हे योगी वगैरे घडवू शकतात. हायकूकार हाही आपल्यासारखाच एक माणूस. फक्त समोरच्या क्षणातील सत्य चिमटीत पकडणे व शब्दांद्वारे आपल्या पर्यन्त पोचवणे ही असाधारण कला त्याच्याजवळ असते. त्या शब्दांमुळे आपल्या भोवतीचा अंधार क्षणिक उजळून निघतो. कदाचित आपण पुन्हा अंधाराने वेढले जाऊही. पण आता आपल्यात एक सूक्ष्म बदल झालेला असतो. हायकू वाचण्यापूर्वीचे आपण हायकू वाचल्यानंतर राहत नाही.  
सरतेशेवटी अलोन यांच्या ‘फुलचुखी’साठी माझ्या तीन ओळी

‘ही ‘फुलचुखी’
बनली आहे 
स्वत:च एक फूल ...’

आता रसिकाला फुलचुखी होणे भाग आहे
0 Comments

हायकूच्या तळ्याकाठी - 12: फुलपाखरू पाठीवर बसलेला माणूस

4/25/2026

0 Comments

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
Picture
आपल्या मनाचीही एक मर्यादा असते. समोरचे विश्व आकलन होण्याची. समोरचा अवकाश जर  नजरेच्या परिघात मावत नसला तर त्याचे विश्लेषणही आपल्याला करता येत नाही. नायगरा धबधब्याच्या बाबतीत असेच घडले आणि रोझ गार्डन विषयी देखील हाच अनुभव आला. 
San Jose येथे एक प्रसिद्ध असे रोझ गार्डन आहे. बरेच दिवसापासून त्याचे नाव ऐकत होतो. एके रविवारी क्षितिजने आम्हाला ते पाहण्यास नेले. अमेरिकेतील वास्तव्यात  ही एक मर्यादा सतत जाणवत राहते. कुठे जावयाचे म्हणजे मुलाने आपल्याला नेले तरच जाणे शक्य असते. एक तर येथील ठिकाणे एकमेकांपासून खूप दूर. कोठेही जायचे म्हणजे कारनेच जावे लागते. दुसरे म्हणजे येथे पब्लिक ट्रान्सपोर्ट -सिटी बस, लोकल वगैरे अत्यंत कमी. 
तर आम्ही दोघे, मुलगा, सून असे सारेजण एके दिवशी सकाळी उठलो आणि रोझ गार्डनला आलो. अनेक एकरात तयार केलेली ही एक विस्तीर्ण बाग होती आणि नावा प्रमाणेच तिच्यात फक्त गुलाबाची विविध प्रकारची झाडे होती. कांही अगदी लहान, माझ्या दोन वितीएवढी तर काही माझ्याहून उंच. काही काटेरी तर काहींच्या फांद्या अगदी मऊसूत. फुलांच्या रंगात तर एवढे वैविध्य होते की त्यांचे शब्दात वर्णन करता येणे कठीण. मोजून मोजून किती रंग मोजणार? एखाद्या कसलेल्या चित्रकारालाही त्यापैकी अनेक रंगछटांची नावे माहीत नसतील.

Picture
माझ्या कॅमेर्‍याला तर मोकळे कुरण मिळाले होते. ‘अनंत हस्ते कमलावराने’ दिल्यावर कॅमेराही ते दान घेण्यास अपुरा पडणारच. एकेक वाफा ओलांडत, पुढे सरकत सरकत फोटो काढण्यात काही वेळ गेला. वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या आकारांची  फुलपाखरे शोधली. पण मग चक्क कंटाळा आला. आता पुरे झाले असे वाटू लागले.  माणसाची आनंद घेण्याचीही क्षमता मर्यादित असते. की दोष आपलाच आहे? आपल्या हावरटपणाचा? फुकट मिळाले म्हणून सारे काही झोळीत भरून घेता येत नसते.

मला आठवले, अनेक वर्षांपूर्वी फिलाडेल्फियाला मुलीकडे गेलो होतो. तेथे एक फुलपाखरांचे म्युझियम आहे असे कळल्यावर ते पाहण्यासाठी गेलो.  वेगवेगळ्या खोल्यात, काचेच्या निरनिराळ्या आकाराच्या पेट्यात फुलपाखरे ठेवलेली होती. प्रत्येक पेटी शेजारी त्या फुलपाखराचे शास्त्रीय नाव, त्याचा रंग व आकार, त्याचा आयुष्यकाळ वगैरे माहिती लिहिलेली होती. या पेट्या वरच्या बाजूने उघड्या होत्या. काही पेट्यात फुलपाखरांना खाण्यासाठी खाद्य, काही ताजी फळे, फुले ठेवलेली होती. फुलपाखरे खोलीत आनंदाने बागडत फिरत होती. निदान मला तसे वाटत होते. 
Picture
मी त्यांचे अनेक फोटो काढले. तेथेही हाच अनुभव आला होता. काही वेळाने फोटो काढण्याचा चक्क कंटाळा आला. 
मग कॅमेरा बंद करून, पिशवीत ठेऊन निघालो, तेव्हा एका माणसाने मला थांबविले. तो म्हणाला,  ‘Sir there is a butterfly on your back.’  अनेक माणसे माझ्या पाठीकडे पाहत होती. 

आता पाठीवरचे फुलपाखरू मला कसे दिसणार? एका कोपर्‍यात एक आरसा होता. पण त्याच्यासमोर उभे राहिले की आपला चेहराच दिसणार. पाठ काही दिसणार नाही. पाठीवरले ओझे माणसाला जाणवते तरी. या फुलपाखराला तर काहीच वजन नव्हते. अनेकांच्या नजरा माझ्याकडे लागल्या होत्या. तेही थोडे विचित्र वाटत होते. काय करावे या विचारात मी असताना तो मघाचा माणूस म्हणाला, ‘Flew away!”

अरेच्चा! उडाले देखील! इतक्या लवकर! दिसले नाही तर नाही, थोडावेळ आणखी बसले असते तर? पाठीवर बसलेले ते फुलपाखरू मला यानंतर कधीच दिसणार नव्हते. क्षणभर चुकचुक वाटली. पण मग मनाशी म्हटले, हरकत नाही. खरे तर त्याची माझी ‘गाठभेट’ झालीच नव्हती. पण नकळत त्याने मला ‘फुलपाखरू पाठीवर बसलेला माणूस’ बनविले होते. यानंतर, ‘एकदा आपल्या पाठीवर फुलपाखरू बसले होते’  ही आठवण तर सदैव मनात राहणार आहे. शिवाय जाताना ते मला माझ्या वहीसाठी तीन ओळीसुद्धा देऊन गेले होते-

समजले नाही 
पाठीवर फुलपाखरू आहे 
कुणी सांगितल्याशिवाय
0 Comments

हायकूच्या तळ्याकाठी - 11: बाशोचे हायबन

4/5/2026

0 Comments

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
जपानी साहित्यातील सर्वाधिक लोकप्रिय व जगभर पसरलेला काव्यप्रकार म्हणजे हायकू. पण हायकूशिवायही जपानी साहित्यात बरेच काही अप्रतीम लेखन आहे जे गेल्या शतकाच्या उत्तरार्धात, अनुवादाद्वारे, सर्वदूर पोहोचले आहे. या साहित्यापैकी ‘हायबन’ नावाचा एक साहित्यप्रकार मात्र थोडासा अलक्षित राहिला आहे. या प्रकारच्या लेखनाची सुरुवात प्रथम मात्सुओ बाशो [1644-1694] या कवीने लिहीलेल्या ‘The Long Road to Deep North’ या पुस्तकाने झाली असे मानले जाते. 

1689 साली बाशो हा त्याचे गाव सोडून सुदूर उत्तरेकडील हिराझुमी या गावी जाण्यास निघाला, आणि जवळजवळ दोन वर्षानी 1691 मध्ये तो परत आला. हा सुमारे 2400 की.मी.चा प्रवास त्याने पायी केला. या प्रवासाची, हिराझुमी व इतर अनेक गावांत केलेल्या वास्तव्याची कहाणी त्याने या पुस्तकात वर्णन केली आहे. या लेखनात त्याने एक अभिनव पद्धत वापरली. हे एक प्रवासवर्णन तर आहेच, तसेच ती त्याने अनेक ठिकाणी केलेल्या वास्तव्यातील अनुभवांची कहाणीही आहे. त्यांत निसर्गवर्णने आहेत, भेटलेल्या व्यक्तींची शब्दचित्रे आहेत, त्यांत त्याचे स्वतत्र हायकू आहेत, मुक्त चिंतनपर गद्य आहे, डायरी आहे, त्याने लिहिलेली व त्याला आलेली पत्रे आहेत, त्याने वाचलेल्या प्रसिद्ध कवींच्या कविता आहेत, इतरांचे हायकू आहेत, त्यावरचे भाष्य आहे, एवढेच नव्हे तर त्याने काढलेली चित्रेही आहेत. 

गद्य आणि काव्य यांच्या या ललित मिश्रणाला त्याने ‘हायबन’ असे नाव दिले. हे पुस्तक अमाप लोकप्रिय झाले. बाशोनंतर अनेक कवींनी, चिंतकांनी, प्रवाशांनी या प्रकारच्या रचना केल्या.  या डायरीची सुरुवात बाशोने एका अत्यंत काव्यात्म परिच्छेदाने केली आहे-
‘दिवस आणि महीने हे अनंताचे प्रवासी आहेत. वर्षे येतात आणि जातात-तीही प्रवाशांसारखी. जे आपले आयुष्य जहाजावर तरंगत घालवितात किंवा घोड्यावरून सफर करीत जे म्हातारे होतात तेही प्रवासीच असतात. ते जेथे जातात ती जागा त्यांचे घर असते. अनेक वर्षांपासून, जेव्हा मला एखादा ढग आकाशात वायु लहरीवर तरंगत जाताना दिसतो, तेव्हा सारे सोडून प्रवासाला निघण्याची अनिवार उर्मि माझ्या मनात निर्माण होते.’ 

 2024 साली अमेरिकेत आल्यावर हे पुस्तक पुन्हा वाचण्यात आले. अचानक मनात कल्पना आली की अशा प्रकारेच आपले अनुभव का शब्दबद्ध करू नयेत? आणि मी टिपणे लिहावयास सुरुवात केली. काही दिवसांनंतर मी भारतात परत आलो. पण येथे आल्यावर देखील हा टिपणे लिहिण्याचा संकल्प मी मोडला नाही. त्या नोंदीपैकी ही एक नोंद-

पहिल्यांदा जेव्हा आम्ही अमेरिकेत मुलाकडे आलो तेव्हा तो न्यू जर्सी येथे होता. पहिली अमेरिका भेट. त्यावेळी कोठे जायचे, कोणत्या ठिकाणांना भेटी द्यायच्या याची यादी वगैरे तयार होती. न्यू यॉर्क मधील अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून झाल्यावर मुलाने एके दिवशी वीक एंडला नायगरा धबधबा पाहण्याची योजना आखली. मी तयारच होतो. 

भारतात राहून देखील अमेरिकेतील ज्या ठिकाणांची बरीच माहिती होती त्यापैकी एक हा धबधबा हे ठिकाण होते. या संदर्भात नेटवर बरेच तपशील उपलब्ध होते, काही विडिओ, बरीचशी चित्रे पाहिली होती. अनेकांनी पाहिली असतील.  [त्यामुळे धबधब्याचे मी काहीच वर्णन करणार  नाही] पण प्रत्यक्षात जेव्हा त्या धबधब्याचा प्रचंड विस्तार पाहिला तेव्हा मला आपल्या कल्पनादारिद्र्याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

चित्रपट आस्वादाचे, अभ्यासण्याचे दिवस जीवनात आले तेव्हा कळत नकळत एक सवय लागली – प्रत्येक दृश्य भोवतीच्या चौकटीसह पहायचे, चौकटीच्या संदर्भात त्याचा अर्थ शोधायचा, आतील घटकांचा विचार देखील तिच्याच संदर्भात करायचा.आपल्या मनाचीही एक मर्यादा असते. समोरचे विश्व आकलन होण्याची. समोरचा अवकाश जर  नजरेच्या परिघात मावत नसला तर त्याचे विश्लेषणही आपल्याला करता येत नाही. अविरत कोसळणारा तो जलप्रपात पाहून  ‘अफाट, अफाट’, असे किती वेळा म्हणणार? 
तेव्हा काही बोलूच नये. नजरेत तो धबधबा मावत नव्हता म्हणून शेवटी कॅमेर्‍याचा आधार घेतला. पण हा आधार कृत्रिम आहे हा विचार मनाला टोचत होताच.

अर्थात कॅमेर्‍याची मर्यादाहि लवकरच ध्यानात आली. त्याच्या view finder मधून देखील जेवढे दिसते त्यावरच समाधान मानावे लागत होते. व्हीडिओ काढला तरी तेच. ते प्रतिक्षणी उंचावरून खाली उडी मारणारे लाखो गॅलन पाणी, खालच्या पाण्यावर ते कोसळतांना तयार होणारा शुभ्र फेस, खालच्या पाण्यावर वरचे पाणी पडताना होणारा रौद्र भीषण ध्वनि, आणि या सार्‍यांना सौंदर्याचा आणखी एक दैवी स्पर्श  देणारे, पाण्यावर सूर्यप्रकाश पडल्याने तयार झालेले इन्द्रधनुष्य ! हे काहीच कॅमेर्‍यात पकडले जात नव्हते. 

मी काही फोटो काढले व कंटाळून कॅमेरा बंद करणार एवढ्यात मला view finder मधून काहीतरी दिसले. शुभ्र पाण्याच्या पार्श्वभूमीवर कसला तरी एक काळा डाग दिसत होता. मी ते दृश्य झूम करून पाहिले. तो चक्क एक पक्षी होता! माझ्या नजरेवर माझा विश्वास बसेना. पण तो उडणारा पक्षी चौकटीच्या बाहेत जाऊ नये म्हणून मी पटकन त्याचे दोन तीन फोटो काढले. कॅमेरा बंद करून नुसत्या चर्म-चक्षुनि पाहिले. काहीच दिसत नव्हते. ‘मत रहना अखीयों के सहारे’ लिहिणार्‍या शैलेन्द्रची मला आठवण झाली. आम्ही सामान्य माणसे, ‘आखीयोंके झरोकों से’ पाहणारी.

Picture
पण मन खरे थरारले ते रात्री संगणकावर तो फोटो टाकून, मोठा करून पाहिल्यावर. ते इवलेसे पाखरू केवढ्या आत्मविश्वासाने त्या धबधब्याला आव्हान देत पुढे सरकत होते! मला अतिविस्तीर्ण वाटणारा जल-विस्तार त्याच्या खिजगिणतीत देखील नव्हता. त्याला तो दिसत असावा पण त्याला आपल्या ठरलेल्या ठिकाणी जायचे होते. त्याला एका बाजूच्या पडणार्‍या प्रपाताची जाणीव नव्हती, खालच्या खोलीकडे ते पाहतही नव्हते. त्याची दृष्टी फक्त समोर होती आणि जेथे जायचे तेथे आपण जाणार हा विश्वास त्याच्या मनात होता. 

मला जी,एंच्या ‘स्वामी’ मधील वाक्य आठवले,  ‘आभाळात एखादे लहान पाखरू उडताना दिसले तर त्याला तू आतिथ्य दाखव, कारण दोन कोवळ्या पंखांच्या आत्मविश्वासाने ते आभाळाला किंचित मागे रेटत आहे.’ 

जरी ते पाखरू माझ्या प्रश्नाचे उत्तर देणार नव्हते तरी मी विचारले, ‘पाखरा, तुझ्यातला थोडा आत्मविश्वास मला देशील का?’
प्रश्न मीच विचारला, उत्तर मलाच द्यावयाचे आहे. उत्तर कसे देणार? मी काही पाखरू नाही. 

घरी परत आलो तरी धबधबा आणि तो पक्षी मनातून जात नव्हते. कितीतरी दिवस रोज एकदा तरी संगणक उघडून त्या फोटोकडे पहायचो.
पाहताना नवे नवे विचार मनात यायचे. एकदा वाटले, आपण त्या पाखराकडे कौतुकाने पाहतो आहो, तसेच कौतुक धबधब्यालाही वाटत असले पाहिजे. 
कोसळणारा धबधबा 
कौतुकाने पाहतो 
जवळून उडणार्‍या पाखराकडे
धबधब्याला आणि मला कौतुक करीत बसायला खूप वेळ आहे. पाखराजवळ कोठे आहे इकडे तिकडे पाहायला वेळ? त्याचे लक्ष्य एकच : समोर कोठेतरी पाय टेकण्यास जागा सापडेपर्यन्त उडत राहणे...
शेवटचा श्वास घेइपर्यंत आपलेही लक्ष्य लिहीत राहणे हेच हवे
0 Comments

हायकूच्या तळ्याकाठी - 10: चंद्र आणि कवि : पुन्हा एकवार

4/4/2026

1 Comment

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
Picture
जपानी हायकू कवींचे दोन अत्यंत आवडते विषय आहेत. एक, चेरीचा [किंवा प्लमचा] बहर आणि दूसरा, पौर्णिमेचा चंद्र. अगदी काही आधुनिक कवि सोडले तर 19 व्या शतकापर्यंत जवळजवळ प्रत्येक कवीने या विषयांवर हायकू लिहिले आहेत.विषय निघाला आहे तर आज ‘चंद्रावरचे काही हायकू’ पाहू. मात्सुओ बाशोचा एक गाजलेला हायकू आहे.
दार उघडा  
चंद्राला येऊ द्या  
मंदिरात
असे म्हणतात की बाशो एका पौर्णिमेच्या रात्री मठात झोपण्यासाठी गेला होता. तेथील कर्मचार्‍यांनी रात्रीची प्रार्थना झाल्यावर मठाचे दरवाजे लावून घेतले. त्यावेळी त्याने हा हायकू लिहिला. पण अशा आख्यायिका अनेक असतात. खरे सांगावयाचे तर हा हायकू लिहिण्यासाठी कवीला ‘प्रत्यक्ष’ त्या अनुभवाची काहीच गरज नव्हती. चंद्राला पाहून काहीजण वेडे होऊन रात्रभर फिरतात हे जसे त्याला माहीत आहे तसेच काहीजण खिडकी लावून घेतात हेही. अशा माणसांसाठीच तर त्याने एकदा लिहिले होते-
चांदण्यात शांतपणे 
एक किडा 
झाडाचे खोड पोखरतोय
आणखी एका हायकूत बाशोने स्वत:विषयी लिहिले-
लखलखता चंद्र 
तळ्याकाठाने मी फिरतोय 
अरे, पहाट झाली की
कवीला चंद्राचे आकर्षण. आणि चंद्राला? पृथ्वीवरल्या चेरी बहराचे. अशी विलक्षण कल्पना असणारा बाशोचा एक हायकू आहे
चंद्र रेंगाळतो आहे 
रात्रीच्या आकाशात 
चेरीचा बहर निरखीत
बुसोन [1716-1784] हा श्रेष्ठ हायकू कवि लिहितो
एकटाच आहे 
मैत्री करावी म्हणतो 
चंद्राशी
चंद्राइतका प्रेमळ मित्र कवीला कोठे मिळणार? 
चांदण्यात फिरताना कधी कधी गमतीदार गोष्टीही घडतात- [विनोदाचे हायकूला वावडे नसते.] बुसोन एका हायकूत लिहितो
चांदण्यात फिरताना 
एका आंधळ्याने धडक दिली 
आणि तो हसला
ज्याला डोळे आहेत असा माणूसही आंधळ्यासाखा फिरतो आहे,  आपल्याला धडक देतो आहे हे पाहून आंधळा हसणारच ना!  जपानच्या चार श्रेष्ठ हायकू कवींपैकी एक, कोबायाशी इस्सालाही सामान्य माणसांचे ‘चंद्र-दुर्लक्ष’ ठाऊक आहे. तो लिहितो-
काहीजण स्वागत करतात 
घोरण्याने-
पौर्णिमेच्या चंद्राचे
मी माझ्या एका हायकूत असेच काही मांडले होते-
ज्याचात्याचा चंद्र 
 ज्याच्यात्याच्या 
आकाशाएवढा
इस्साला  हेही ठाऊक आहे. म्हणून तो लिहितो- 
पूर्ण चंद्र 
प्लमच्या सुवासात गुंफलेला 
फक्त माझा

चंद्र जेव्हा आपला असतो तेव्हा इतरांच्या प्रतिक्रियेची गरजच नसते. 
​​जपानमध्ये ‘चंद्र पाहण्याची’ एक प्राचीन परंपरा आहे. पौर्णिमेच्या रात्री कवी आणि रसिक मोठ्या संख्येने चंद्र पाहण्यास घराबाहेर पडतात. ‘चंद्र पाहून’ घरी परत आल्यानंतर कवयित्रि चियो-नी लिहिते-
चंद्र पाहून 
परतल्यानंतर 
नि:शब्द
ट्रेसी डेव्हिडसन लिहिते-
उबदार चंद्र 
मी झटकून टाकते 
लोकरी पांघरुणे
एक भारतीय कवी जगजीत सलाम लिहितो-
शांत तलाव 
मी घेऊन येतो 
बादलीभर चंद्र
चंद्राची मोहिनी माणसाच्या अबोध मनालाही पडत असावी. लहानपणापासून मुले या दैवी गोलाच्या प्रेमात पडलेली असतात. अनेक भारतीय भाषांतील कवितात देखील चंद्र आणि मुलांचे सख्य वर्णन केले आहे. यासुको त्सुशिमाचा एक अप्रतिम हायकू आहे-
झोपेतच चेहरा वळविते 
माझे मूल 
चंद्राकडे

कोण अधिक निरागस? चंद्राकडे चेहरा वळविणारे मूल की ते न्याहाळणारा कवी...
मराठी रसिकांना सहज आठवेल ग. दि. माडगूळकरांचे हे अजरामर भावगीत –
‘चांद मोहरे, चांदणे झरे
झोपेतच गाली असा हसशी का बरे..

 माझ्या ‘हायकूऋतू’ या हायकू संग्रहाची  सुरुवात मी चंद्राच्या हायकूनेच केली आहे
चंद्र घेऊन आला  
चकोरासाठी चांदणे 
माझ्यासाठी हायकू
हायकू हा काव्य प्रकार अस्तित्वात येण्याच्या पूर्वीपाससून जपानी कवी चंद्रावर कविता लिहीत आलेले आहेत. इ.स.च्या 12 व्या शतकातील एक उत्कट कवी सायग्यो याचे चेरी बहरावर आणि चंद्रावर अतिशय प्रेम होते. 1170 साली त्याने  ‘आपण कधी व कोठे मरण पावू इच्छितो’ या संदर्भात एक कविता लिहिली होती.
माझी इच्छा आहे
वसंत ऋतूत मला मृत्यू यावा
चेरीचा बहर फुललेला असताना
वर्षाच्या दुसर्‍या महिन्यात
आकाशात पूर्ण चंद्र असताना.
पुढे तो वीस वर्षे जगला. मात्र 1190 साली जेव्हा त्याला मृत्यू आला तेव्हा अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बुद्धाने त्याची ही इच्छा पूर्ण केली, फक्त एक दिवसाच्या फरकाने. चेरीला बहर आलेला असताना, पौर्णिमेच्या नव्हे तर त्यानंतरच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. कदाचित पौर्णिमेच्या चंद्राने त्याला रात्रभर न्याहाळून त्याचा निरोप घेतला असेल! 
1 Comment

हायकूच्या तळ्याकाठी - 9:  चंद्र, चोर आणि कवी वगैरे

3/28/2026

1 Comment

 
[बिंबे आणि प्रतिबिंबे/ एकत्र मिळून बनते/ हायकूचे तळे]
समाजापासून दूर राहणार्‍या माणसाविषयी जशा अनेक दंतकथा पसरविल्या जातात तशा जपानी हायकू कवि र्‍योकानविषयीही सांगितल्या जातात. कारण तोही असाच, गावापासून दूर, एकांतवासात राहत होता. सकाळच्या वेळी तो आपला कटोरा घेऊन बाहेर पडे. आजूबाजूच्या गावात जाऊन भिक्षा मागे. पोटापुरते मिळाले की तो झोपडीत परत येई. त्याच्याजवळ एक पिशवी होती. हिवाळ्याच्या दिवसात, त्या पिशवीत दहा बारा दिवस पुरेल एवढा तांदूळ जरी असला तरी त्याला तो पुरे असे. अधिक संचय त्याला मान्य नव्हता. दिवसभर तो बुद्धवचनांवर चिंतन करी, कविता लिही, चित्रे काढी. सुलेखनकलेत तो प्रवीण होता. मात्र त्या कलेचा सराव करण्यासाठी अनेकदा त्याच्याजवळ ब्रश नसत. मग तो झाडाच्या लहान फांद्या तोडून त्यांचे ब्रश तयार करीत असे. कधी बोटांनीच अक्षरे, चित्रे काढी.
एका कवितेत त्याने लिहिले- 
Picture
‘महत्वाकांक्षी न होण्याइतपत 
मी आळशी आहे 
मी सोडून देतो जगाला 
आपली काळजी घेण्यासाठी. 
माझ्या पिशवीत दहा दिवस पुरेल इतका तांदूळ आहे 
शेकोटी शेजारी लाकडांची मोळी 
कशाला चिंता, भ्रम आणि साक्षात्कार वगैरेची 
छतावर पडणार्‍या रात्रीच्या पावसाचा आवाज ऐकत 
मी बसून राहतो आरामात 
पाय पसरून.’
Picture
त्याचे लहान मुलांवर फार प्रेम होते. तो गावात गेला की मुले त्याच्या आजूबाजूला गोळा होत, आणि कुजबुजत, 
“चला, खेळू, वेडा भिक्षू परत आला आहे.” 
र्‍योकानला त्यांचा राग येत नसे. ती बिचारी निरागस पोरे त्याला वेडा म्हणतात त्यांत त्यांचा काय दोष होता? मोठी माणसे आपल्याला वेडा म्हणतात ते पाहून मुलेही म्हणतात. तो हसून आपली पिशवी झाडाच्या फांदीला लटकावे, आणि खिशातला चेंडू घेऊन मुलांच्यात सामील होई. मुलांत तो रमे. त्यांच्याबरोबर दिवसभर खेळत राहण्यालाही त्याची हरकत नसे. लोक नेहमीच त्याला वेडा म्हणत नसत, कधीकधी कौतुकाने त्याला ‘चेंडू खेळणारा भिक्षू’ असेही म्हणत. त्याची कशालाच ना नसे.
ही मुले त्याच्या कवितेत वारंवार येतात. एका कवितेत त्याने लिहिले, 
​
मंदिराशेजारी मुले मला पाहतात आणि माझ्याभोवती जमा होतात 
माझे हात ओढतात. 
मी माझा कटोरा एका दगडावर ठेवतो 
पिशवी झाडाच्या फांदीला लटकवतो
प्रथम आम्ही गवताचा गोफ तयार करून रस्सीखेच खेळतो 
मग आम्ही चेंडू हवेत उडवतो आणि गाणे म्हणतो 
मी चेंडू उडवतो, ते गाणी म्हणतात 
ते चेंडू उडवतात, मी गाणी म्हणतो 
घटिका उडून जातात, वेळ विसरला जातो 
येणारी जाणारी माणसे मला पाहून हसतात, म्हणतात-
“असे मूर्खासारखे तू काय करतो आहेस?”
मी फक्त डोके हलवतो. काहीच उत्तर देत नाही
मी उत्तर देऊ शकलो असतो, पण का देऊ?
तुम्हाला माहीत आहे का, 
माझ्या मनात सुरुवातीपासून काय आहे?
हेच. फक्त हेच.’
मुलांसारखे निरागस होणे...
कवीच्या संदर्भात एक कथा अशी आहे-
एके दिवशी कवी घरी नसताना एक चोर त्याच्या झोपडीत शिरला. चोराला अर्थातच काही मिळाले नाही. तेवढ्यात कवी बाहेरून परत आला. चोर त्याला पाहून घाबरून पळू लागला. मात्र तो रिक्त हस्ताने परत चालला याचे कवीला वाईट वाटले. त्याने चोराला थांबविले. मात्र त्याला देण्यासारखेही कवीजवळ काही नव्हते. मग त्याने आपल्या अंगातील एकुलता एक अंगरखा त्याला काढून दिला. चोराला हे काय होते होते आहे हे समजेना. आपल्याला शिक्षा झाली नाही एवढ्यावर तो समाधानी होता, वर त्याला भेटही मिळाली. चोर निघून गेल्यावर कवीने मग या संदर्भात एक कविता लिहिली. 

पोषाखाच्या बदल्यात कविता हा सौदा काही कवीला महागात पडला नाही. 
‘चोराने तसाच ठेऊन दिला 
चंद्र 
माझ्या खिडकीतला’

चंद्र ही झेन तत्वज्ञानात ‘साक्षात्काराची’ प्रतिमा म्हणून देखील वापरली जाते. जे आत्मज्ञान झालेले आहे त्याला बाहेरचा कुणी चोर कसा चोरून नेऊ शकणार? एका वेगळ्या पातळीवर हा हायकू वस्तूचे मोल प्रत्येक व्यक्तीनुसार कसे बदलत जाते हेही सूचित करतो. चंद्राचे भले कवीला मोल असेल पण चोराला काय त्याचे? 

प्रत्येकाचा चंद्र निराळा.    
एकाचा चंद्र दुसर्‍याच्या कामाचा नसतोच! 

हे जसे खरे तसेच हेही खरे की चंद्राचा अनुभवदेखील  प्रत्येकासाठी वेगळाच असतो. योसा बुसोन या कवीने लिहिले आहे, 

‘चंद्र असा की 
चोरानेही थांबावे 
आणि गाणे गावे’

-ही चंद्राची स्तुति आहे की चोराविषयीची कवीकल्पना?’

चंद्राचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो तसा प्रत्येकाला आलेला चोराचा अनुभव देखील वेगळा असतो. माझे मित्र कवि अलोन यांना चोराचा आलेला अनुभव वेगळाच होता. 

बाहेरच्या व्यवहारी जगात ते माधव सावरगावकर या नावाने ओळखले जात. ही सुमारे 1990 सालची  गोष्ट आहे. त्यावेळी कविराज नांदेड बाहेरील एक लहानशा कॉलनीमध्ये राहत असत. कॉलनीत बहुधा पंधरा वीसच घरे असावीत. एका रात्री चोरांची एक टोळी त्या कॉलनीत शिरली. त्यांनी घरांना बाहेरून कड्या घातल्या व एकेका घरात शिरून लुटालूट करण्यास सुरुवात केली. त्या काळात कुणाजवळ मोबाइल तर सोडाच, साधे फोनही नव्हते. बाहेरची कुणाची मदत येणे सुतराम शक्य नव्हते. चोरट्यांनी अनेक घरे लुटली त्यापैकी एक कविराजांचे देखील होते. 

दुसर्‍या दिवशी ही बातमी समजल्यावर मी त्यांच्याकडे गेलो. कविराज शांतपणे पलंगावर बसले होते. पत्नी व मुलगी यांच्या चेहर्‍यावरचे भय अजून कमी झाले नव्हते. मी विचारले, “काही मोलाचे गेले नाही ना माधवराव?”

“नाही. माझ्याजवळ त्यांना काय मिळणार? उलट रागारागाने दोन रट्टे मलाच देऊन गेले.” मग समोरच्या भिंतीतील पुस्तकांच्या कपाटाकडे हात करीत कवि शांतपणे म्हणाले, “हे धन तर माझ्याजवळच राहिले ना!”

1 Comment
<<Previous

    विजय पाडळकर

    Archives

    May 2026
    April 2026
    March 2026
    February 2026
    January 2026

    Categories

    All
    Haiku

    RSS Feed

मुख्य पान

परिचय

पुस्तके

संपर्क

१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.
[email protected]
+९१-७८२२९५४७०६
Website Design and Copyright © 2017 - Kshitij Padalkar
Logos of Bookganga.com and Amazon.in are copyrighted by respective companies and are used with permission.
  • मुख्य पान
  • परिचय
  • पुस्तके
    • कादंबऱ्या >
      • अल्पसंख्य
      • कवीची मस्ती
      • गोष्ट सांगण्याचा आनंद अर्थात टेकडीमागचे 
    • कथासंग्रह >
      • पाखराची वाट
      • छोट्या छोट्या गोष्टी
      • ठसा
      • अनंत यात्री
    • चित्रपटविषयक >
      • तो उंच माणूस
      • चंद्रावेगळं चांदणं
      • गंगा आये कहां से
      • सिनेमाचे दिवस - पुन्हा
      • गगन समुद्री बिंबले...
      • नाव आहे चाललेली...
      • ‘देवदास' ते 'भुवन शोम’
      • बखर गीतकारांची
      • सिनेमायाचे जादूगार
      • शेक्सपिअर आणि सिनेमा
      • मोरखुणा
      • गर्द रानात भर दुपारी
      • सुहाना सफर और...
      • आनंदाचा झरा
    • ललित / आस्वादक समीक्षा >
      • देखिला अक्षरांचा मेळावा
      • कथांच्या पायवाटा
      • कवडसे पकडणारा कलावंत
      • कवितेच्या शोधात
      • मृगजळाची तळी
      • जिवलग
      • जी.एंच्या रमलखुणा
    • कुमार साहित्य >
      • गाण्याचे कडवे
      • यक्षभूमीचा जादूगार
      • यक्षभूमीची नवलकथा
      • गोजी, मुग्धा आणि करोना
      • मुलांसाठी पथेर पांचाली
    • भाषांतरे / इतर >
      • एक स्वप्न पुन्हा पुन्हा
      • घंटेवरले फुलपाखरू
  • ऑडिओ बुक्स
  • ब्लॉग
  • संपर्क